Saturday, March 1, 2025

उल्लेखनीय अंक 'मोडी दर्पण' चा सन्मान

' मोडी दर्पण ' हा मोडी लिपीच्या प्रचारासाठी वाहिलेला दिवाळी अंक गेली अनेक वर्षे दिमाखात प्रसिद्ध होतो आहे.गेल्या दिवाळीत पंधरावा अंक प्रकाशीत झाला तेव्हा अनेक नामवंतानी त्याचे कौतुक केले होते. शिवकालीन मोडी लिपीला पुढच्या पिढीच्या समोर ठेवून त्यातून नवे मोडी प्रेमी निर्माण व्हावेत मोडीचे अभ्यासक निर्माण व्हावेत त्यातून एखादा इतिहास संशोधक पुढे यावा आणि मराठ्यांच्या इतिहासाचे मोडी कागद अभ्यासले जावो मराठ्यांचा अपरिचित इतिहास जगासमोर मांडला जावा यासाठी या अंकाचे प्रयोजन आहे.

      निव्वळ मोडी लिपीतील साहित्य प्रकाशित केल्यास इतरवाचकांपर्यत हा अंक जाणार नाही त्यामुळे मराठीतील देवनागरी लिपीतील  साहित्य यामध्ये प्रकाशित केले जात असल्यामुळे वाचकास दुहेरी फायदा होतो. गेली पंधरा वर्षे सातत्याने मोडी मुळाक्षरे बाराखडी आणि शिकण्यासाठी आणखीन काही नमुने असलेल्या या दिवाळी अंकात मोडी लिपीतील साहित्यही असते. त्याचबरोबर गेली पाच वर्षे कोकणातील विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख हे नामवंत लेखकांच्या लेखणीतून आलेले देवनागरी लिपीत असतात त्यामुळे मोडी दर्पण चा वेगळा वाचक वर्ग तयार झाला आहे. 

         मुळातच महाराष्ट्रातील साडेतीनशेच्या वरती प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची बाजारातील परिस्थिती फार चिंताजनक असताना केवळ एक व्रत  म्हणून आम्ही मोडी दर्पण प्रकाशित करीत आहोत. आमच्या जाहिरातदारांच्यामुळे त्या अंकाचे बाह्यांग दर्जेदार ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मोडी दर्पण वरती प्रेम करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार आणि नुकतेच ज्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे ते आदरणीय अच्युत पालव सर या अंकाचे मुखपृष्ठ तयार करीत असतात त्यामुळे या अंकांचं महत्त्व अधिक वाढलेले आहे. 

         मोडी लिपी मित्र मंडळाच्या माध्यमातून प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे पदाधिकारी आणि हितचिंतक यांचे फार मोठे योगदान लाभलेले आहे. २०२४ च्या या अंकात कोकणातील बोलीभाषा, कोकणातील ऐतिहासिक तलावे, कोकणातील समृद्धता विशद करणारे विविध लेख, ग्रामीण कथा आणि कविता
या सर्व सदरात नामवंत सुप्रसिद्ध लेखकांनी हजेरी लावलेली असल्याने या अंकाचे विषयमूल्य हे दर्जेदार ठरले आहे. त्यामुळे या अंकाबद्दल आमच्या नेहमीच्या वाचकांनी भरभरून कौतुक केलेले आहे. 
          पुरस्काराने प्रोत्साहन मिळते परंतु पुरस्कारासाठी म्हणून आमच्या दिवाळी अंकाचे काम नसते. त्यामुळे फार कमी ठिकाणी आम्ही अंक पाठवतो. मुंबई मराठी पत्रकार संघाकडे आम्ही आवर्जून दोन अंक पाठवीत असतो. आज-काल सर्वच दिवाळी अंक वाचनीय आणि दर्जेदार असतात त्यामुळे प्रत्येक वेळेला आम्हाला पुरस्कार मिळेल अशा भ्रमात आम्ही नसलो तरी मोडी दर्पणच्या एकंदरीत प्रवासात मुंबई मराठी पत्रकार संघाने यापूर्वी दोन वेळा आमच्या अंकाचे पुरस्कार देऊन कौतुक केले आहे. यावर्षी सुद्धा एक 'उल्लेखनीय अंक असा ' मोडीदर्पणचा गौरव करून मोडीदर्पणला पुरस्कार दिला आहे. मोडीदर्पणशी संबंधित असणाऱ्या सर्वांनाच त्याचा आनंद झाला. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मराठी भाषा दिनाच्या दिवशी ठेवण्यात आला होता. नुकतेच मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्याने यावर्षीच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमावर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसला. सगळीकडे मराठीचा जयजयकार करणारे दिमाखदार सोहळे आयोजित केले गेले. अनेक जण वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यामुळे पुरस्कार घेण्यासाठी मोडी दर्पणच्या कार्यकर्त्यांना गर्दी करता आली नाही.  संपादकांनाही उपस्थित राहता आले नाही. मात्र खऱ्या अर्थाने मोडी दर्पणला ताकद देणारे मोजके कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
            मोडी दर्पण आकारास आणणारे लेखक, कवी, चित्रकार,मुद्रक  त्याचबरोबर जाहिरातदार आणि मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराने आमचा सर्वांचा उत्साह वाढून पुढील अंकासाठी अधिक जोमाने काम करु याची खात्री आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाने अतिशय देखण्या सन्मान चिन्हाने मोडी दर्पण यास सन्मानित केले त्याबद्दल  आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.

सुभाष लाड 
संपादक 
मोडी दर्पण दिवाळी अंक २०२४
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

No comments:

Post a Comment