Wednesday, February 26, 2025

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले साहित्य संमेलन

        ९८ व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही दिल्ली वारी केली. अडीच हजार वर्षांचा मराठी बोलीचा इतिहास असल्याचे सर्व मान्य झाल्याने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. अवघ्या मराठीयांची मराठी भाषा हा अस्मितेचा विषय आहे त्यामुळेच मराठी साहित्य महामंडळाने अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येणारे पहिले संमेलन भारताच्या राजधानीत घेण्याचे निश्चित केले. एकेकाळी दिल्ली वरती आधीपत्य गाजवणाऱ्या मराठी माणसाला पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आपले अस्तित्व दाखवण्याची संधी प्राप्त झाली. दिनांक२१,२२,२३ फेब्रुवारी २०२५ हे दिवस राजधानी दिल्लीला मराठीयांचे मराठी भाषेबद्दलचे अतिव प्रेम दाखवणारे ठरले आहेत. खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलनात मराठी साहित्यिकांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळाली. सरहद पुणे या नामांकित संस्थेने या संमेलनाच्या आयोजनात सिंहाचा वाटा उचलला. एक नेटक्या आयोजनाचा अनुभव त्यामुळे घेता आला. 
           संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांच्या भाषणाने लोक वाङमयाला उजाळा मिळाला. त्यांच्या रसाळ वाणीने अवघी साहित्य नगरी झंकारल्यागत झाली. महाराष्ट्रात एकमेकांच्या नजरेला नजर न मिळवणारे जेव्हा दिल्लीत येतात त्यावेळेला आपापसातला द्वेष किंवा वैरत्व  दूर ठेवून एक असल्याचे दाखवतात हे खरे तर महाराष्ट्राच्या हिताचे आहे. परंतु दूर प्रदेशात जाऊन दाखवली जाणारी एकी ही महाराष्ट्रातही टिकून राहिली तर ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारी ठरेल. अशा प्रकारच्या मराठी भाषेच्या प्रसाराच्या निमित्ताने आम्हास जे काही सुचवायचे होते त्याबाबतीतला  लेख प्रसिद्ध साप्ताहिक कोकण मीडियाने प्रसिद्ध केला आहे तो आपल्यासाठी इथे देत आहोत. 
          आम्ही लिहिले ते शंभर टक्के खरे आहे असे आमचे म्हणणे नाही त्यामुळे यावरती आपली सुद्धा काही मते असल्यास ती परखडपणे लिहावीत. पण मराठीचा झेंडा यापुढे अधिक डौलाने कसा फडकत राहील यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्नशील राहायला हवे हीच एक अपेक्षा.

आपला 
सुभाष लाड  
अध्यक्ष 
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

अभिप्राय. 
१)
🌹🙏🌹सुभाष लाड,साहेब नमस्कार 
आपल्या धडाकेबाज नेतृत्वाखाली आज काही महत्वपूर्ण निमित्ताने राजापूर लांजा  नागरीक संघाचे नाव देशाच्या राजधानीत नेऊन पोहचविण्याचे कार्य आपले हातुन घडले आणि घडत राहो.हिच ईश्वर चरणी प्रार्थनीय अभिवादन करून धन्यवाद ,
एकनाथ विश्वासराव

२)

नमस्कार सर 🙏
आताच आपला लेख वाचला.
महाभारतातील संजया प्रमाणे आपल्या वाणीने नाही तर लेखणीने दिल्ली संमेलनाचा इती वृत्तांत आमच्यासारख्या संमेलनात इच्छा असूनही जाता न येणाऱ्या रसिकांपर्यंत आपण पोहोचविला त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. अगदी बारकाइने प्रत्येक गोष्ट आपण इथे नमूद केलेली आहे त्यामुळे प्रत्यक्ष संमेलनामध्ये फेरफटका मारल्यासारखे झाले. आपण स्वतः जगमित्र असल्यामुळे संमेलनाच्या ठिकाणी आपणास शेकडो स्नेही मिळाले यात नवल ते काय? घरबसल्या संमेलनाचा इतिवृत्तांत वाचावयास मिळाला आणि दुधाची तहान आम्ही ताकावर भागवून घेतली. मराठीतून सही करणे यासारखा उपक्रम वाचून मराठीचा ध्यास घेतलेली माणसे अनुभवता आली. दहा हजार पुस्तकांची खरेदी करुन एक आदर्श समाजासमोर ठेवला याबद्दल अभिनंदन.
लेखाच्या सुरुवातीलाच आपले मत परखडपणे व्यक्त करावेत असे तुम्ही सांगितलेले आहे त्यामुळे दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात.

1. काव्य संमेलन सोडल्यास लक्षवेधी असे साहित्यिक कार्यक्रम कोणकोणते होते?


2. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून आलेल्या


        साहित्यिकांची दखल
        घेतली गेली का?
    3. संमेलनाच्या सांगतादिवशी जो राजकीय वेगवेगळ्या पक्षांच्या समर्थकांनी ज्या वेगवेगळ्या घोषणा दिल्या त्याबद्दल आपले काय मत आहे? यावेळी सर्व गटांनी मिळून केवळ शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या असता तर कसे वाटले असते?

No comments:

Post a Comment