राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या कोणत्याही उपक्रमाची किंवा कार्यक्रमाची आखीव
रेखीव बैठक असते.वेळेचे नियोजन, कामाचे वाटप व साहित्य पूर्तता या गोष्टींवर भर देऊन आपलं काम संपलं की दुसऱ्याला मदत करायची या भावनेने प्रत्येक जण काम करत असतो.संघाच्या कार्यकर्त्यांची पद्धत आता गावोगावच्या कार्यकर्त्यांनाही माहित झाल्याने संमेलन पूर्व तयारीची लगबग ही लग्नमंडपातल्या तयारीसारखी असते. यावर्षीच्या दहाव्या व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या त्या लगबगीत एक चेहरा नव्याने उतरला होता. तो कार्यकारणीचा सदस्य असूनही त्याला यापूर्वीच्या साहित्य संमेलनाच्या वेळी कामाच्या व्यग्रतेमुळे हजर राहता आले नव्हते.
सध्या कार्यकारणीत असलेल्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये नव्याने दाखल झालेले कोंडगे गावचे सुपुत्र श्री रमेश काटकर यांच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. त्यांचे बालपण आणि शिक्षण गावातच गेल्यामुळे त्यांना सामाजिक कामाची ओढ सुरुवातीपासूनच. मुंबईला आल्यावर नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्त्याने स्वच्छंदपणे काम करायला सुरुवात केली.त्यांच्या मितभाषी व मृदू स्वभावामुळे त्यांच्या मनाचा ठाव घेता येत नाही पण दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या वृत्तीमुळे ते अनेकांचे चाहते ठरले आहेत.
कोंडगे गावच्या अनेक सामाजिक संस्थांमध्ये तसेच नावेरी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये त्यांचा वावर आहे. संघाने कोरोना काळात वेगवेगळ्या माध्यमातून मदत कार्य सुरू केले तसेच त्याच काळात कोकणात अतिवृष्टीमुळे चिपळूण व लांजा राजापूरच्या पूर्व भागात फार मोठी हानी झाली त्यावेळी सुद्धा संघाने मदतीचा हात पुढे केला या सर्व उपक्रमात अनेक लोकांनी संघाकडे आर्थिक सहाय्य पाठवले त्यामध्ये रमेश काटकर यांचा मोलाचा वाटा होता त्यातूनच ते संघाशी अधिक जवळ आले. पुढे त्यांना संघाच्या कार्यकारणीत स्थान मिळाल्याने त्यांच्या सामाजिक विचारांना अधिक बळकटी आली. संघाने आयोजित केलेला माचाळ महोत्सव, त्याच दरम्यान वाटूळ ते दाभोळ रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्याचा उपक्रम, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम यामध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग होता.
यावर्षी वाटूळ येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांना पूर्णवेळ सहभागी होता आले. मुंबईवरून येऊन संघाचे कार्यकर्ते कोण कोणत्या प्रकारचे काम करतात याचा त्यांना अनुभव घ्यायचा होता. रमेश काटकर मुंबई महानगरपालिकेत अधिकारी पदावरती काम करत असले तरी सामाजिक क्षेत्रात आपण एक सामान्य कार्यकर्ता आहोत या भावनेने त्यांनी संमेलनात समरसून काम केले आणि संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात स्थान मिळवले. अनेकांनी माझ्याजवळ येऊन खाजगीत त्यांचे कौतुक केलेले पाहून मलाही आनंद झाला. मला त्यांचे जाहीर कौतुक करण्याची संधी पाहिजे होती आणि म्हणूनच हा लेखन प्रपंच.
काल गणेश चव्हाण यांचा फोन आला. त्यांनी मला रमेश काटकर यांचा आज वाढदिवस असल्याचे सांगितले त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस ते टिटवाळ्याच्या जवळील म्हसकळ गावातील जीवन संवर्धन फाउंडेशनच्या अनाथ मुलांच्या आश्रमात जाऊन तेथील मुलांच्या बरोबर साजरा करणार असल्याचे कळले. संध्याकाळी परतीच्या प्रवासात त्यांना माझ्या घरी घेऊन येण्यास मी गणेश चव्हाण यांना सांगितले. मला त्यांच्या अंगावरती कौतुकाची शाल टाकताना अभिमान वाटला. संघाकडे अशा तरुणांची फौज आहे त्या फौजेची रमेश काटकर यांच्या सहभागामुळे ताकद वाढली आहे. नि:स्पृह भावनेने काम करणाऱ्या तरुणांची फळी ज्या संस्थांकडे असते त्याच संस्था भविष्यात यशस्वीपणे वाटचाल करू शकतील अशी माझी धारणा आहे. या बाबतीत आमचा संघ भाग्यशाली आहे असे मला वाटते. म्हणूनच रमेश काटकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचे आम्ही नेहमीच कौतुक करत आलो आहोत. श्री रमेश काटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना परमेश्वर त्यांना आयुरारोग्य देवो अशी प्रार्थना करतो.
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
No comments:
Post a Comment