Tuesday, June 3, 2025

भैरवीला कोकण रत्न कला गौरव पुरस्काराने सन्मानित ! 🚩🏵️🚩🏵️🚩🏵️🚩🏵️🚩🏵️🚩


        गावाकडे दहावी अकरावीचे शिक्षण घेऊन मी मुंबईला आलो. मुंबईतला हा  सुरुवातीचा आठ वर्षांचा काळ   खानावळीत गेला. विक्रोळीत माझ्या मोठ्या बहिणीकडे राहताना आपण आपल्या घरीच राहतो आहोत असे वातावरण होते परंतु आईची कमतरता ही नेहमीच भासायची. मुंबईत स्वतःची खोली घेतल्यानंतर आई मुंबईत येऊन राहील असे वाटले होते परंतु गावाकडे दुसऱ्या भावाचं कुटुंब असल्यामुळे आणि आईला गावात राहणं अधिक आवडत असल्यामुळे ती काही दिवस मुंबईत यायची.पण आठ दहा दिवस झाले की तिला गावाकडे जाण्याचे वेध लागायचे. तिचा परतीचा प्रवास नेहमीच माझे डोळे ओले करून जायचा. माझ्या लहानपणी माझे वडील आम्हाला सोडून गेले त्या वेळेला आम्ही पाच भावंडे लहान होतो. मोठा भाऊ मुंबईला आला असला तरी एवढ्या मोठ्या कुटुंबाचं पोषण करता येईल एवढी मनी ऑर्डर करता येईल एवढी त्याची कमाई नव्हती. त्यामुळे  आम्हा मुलांचं पोट भरण्यासाठी आईने कंबर बांधून जे काबाडकष्ट केले ते डोळ्यांसमोर उभे राहायचे. माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला ती जास्त काळ आमच्या सोबत मुंबईत राहिली. पण ती त्यावेळी थकलेली होती. तिला चालताना त्रास व्हायचा. मी तिला रेल्वे गाडीने गावाला सोडावे यासाठी ठाणे स्टेशन वरती आलो. दहा नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती समोरचा  मोठा जिना बघून आई जाग्यावरच थबकली. आम्हाला  स्टेशन पर्यंत सोडायला आलेल्या  पंकजने लहान मुलाला उचलून घेतात तसं आईला दोन हातात उचलून घेतले आणि जिना चढून वरती आला. नातू आणि आजीचं प्रेम त्या दृश्यातून दिसलं. ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर बरेच दिवस तसेच तरळत असताना ' आई नसे शब्द दोन अक्षरांचा, आभाळ फाटल्या आधार पाखरांचा ' हे गीत तयार झाले. पुढील वर्षी ती मुंबईला असतानाच गोदरेज हॉस्पिटलला माझ्या नातीचा जन्म झाला. आईने हॉस्पिटलला जाऊन आपल्या नूतन पणतिचे मुखदर्शन घेतले, तेव्हा आईचा सुखावलेला चेहरा आईचं आजारपण विसरून गेल्यासारखा वाटत होता. पण ते सगळे फसवे होते.आई आम्हाला सोडून दहा मार्च २०१८ रोजी स्वर्गवासी गेली.तिच्या वर्षश्राद्धाला सुनिल बुवा जाधवांना भजनाची सुपारी दिली तेव्हा माझ्या कवितेला चाल लावून ते भैरवीने गायचे असे सांगितले. भैरवींच्या गळ्यातून मी माझ्या आईला आदरांजली दिली.त्यानंतर त्या गाण्याचे रेकॉर्डिंग करून कुणाल मुझिकच्या युट्यूबवर प्रसारित झाले. मला जेव्हा माझ्या आईची आठवण येते त्यावेळेला मी ते गाणे ऐकत असतो.
       २०१४ मधील गणपती उत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी मी आजारी पडलो. माझ्या श्रद्धाळू आईने गणपतीलाच नवस केला आणि पुढच्या वर्षापासून तीन वर्ष अकरा दिवसाचा गणपती आणू म्हणून सांगितलं. हे मला आईने पुढील वर्षाच्या गणपती उत्सवाच्या अगोदर सांगितले. मग आम्ही अकरा दिवसाच्या उत्सवाच्या तयारीनेच गावाकडे गेलो. गौरी विसर्जना पर्यंत आमच्या रिंगणे गावातील पेडणेकर वाडीत घरोघरी भजने असतात त्यामुळे ते दिवस गजबजलेले असतात,मात्र त्यानंतर पुढे चार-पाच दिवस आमचा एकट्याचाच गणपती अनंत चतुदर्शी पर्यंत असल्यामुळे काहीतरी विशेष कार्यक्रम करणे आवश्यक होते. मी भजनासाठी एका चांगल्या बुवांच्या शोधात होतो.मला सुरेश आप्पा आयरे यांनी प्रभानवल्लीतील सुनील बुवा जाधव आहेत, ते छान भजन करतात त्यांना आपण बोलूया असे सांगितले. आमचे गणेश चव्हाण त्याच गावचे असल्यामुळे मी त्यांना त्या बुवांच्याबद्दलची माहिती विचारली आणि त्यांनाच एक दिवस भजन करण्याचे आमंत्रण द्यायला सांगितले. त्यावेळच्या भजनामुळे सुनील बुवांची ओळख झाली. त्यांच्या भजनाला लोकांनी गर्दी केली होती आणि त्या गर्दीचे समाधान बुवांनी आपल्या सुरेल भजनातून केले. आमच्या लहानपणी डबलबारीच्या भजनासाठी प्रसिद्ध असलेल्या लालू बुवांचे नाव ऐकलेले होते त्यांचेच हे चिरंजीव असल्याचे कळल्याने त्यांच्याबद्दलची आपुलकी अधिक वाढली.
 पुढे कधीतरी मे महिन्यात एका गावात श्री सत्यनारायणाच्या महापूजेसाठी त्यांचे भजन ठेवले होते आणि त्या वेळेला त्यांची मुलगी भैरवीही तिथे येणार आहे असे सांगून बुवांनी मला उपस्थित राहण्याची विनंती केली होती.कदाचित ती डबलबारी असावी त्यामुळे तुफान गर्दी जमली होती. भैरवीचे गायन मी त्या वेळेला ऐकले.तिचा आवाज गोड आहे आणि आत्मविश्वासही कौतुक करण्यासारखा असल्याचे मी पाहिले. लोकांनी तिला चांगलीच दाद दिली मात्र तरुण मुलं शिट्या वाजवत होती हे मला काही पटले नाही. मी सुनील बुवा ना त्याबद्दल बोललो आणि भजना बरोबरच भैरवीने शास्त्रीय गायनाकडे अधिक लक्ष देऊन तसे कार्यक्रम करावे असे मी सुचविले.
          २०२१ च्या मे मध्ये नाटककार ला.कृ. आयरे यांची जन्मशताब्दी मुलुंड येथील मराठा मंडळाच्या सहकार्याने करण्याचे नाटककार ला.कृ आयरे स्मृती ट्रस्टने ठरविले. त्या कार्यक्रमात भैरवीने ला.कृ.आयरे यांच्या स्वराज्य रवी या नाटकातील पदे सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. त्या कार्यक्रमाला प्रसिद्ध निवेदक विजय हटकर यांनी रसाळ निवेदनाची जोड दिल्याने तो कार्यक्रम लोकांना अधिकच भावला. भैरवीला अधिकाधिक लोकांच्या समोर तिची कला सादर करता आली तर तिचे नाव होईल. कोकणातील या उदयोन्मुख गायिकेला व्यासपीठ मिळवून देता यायला हवे असे मला नेहमी वाटत असते. राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती कोट, नाटे व प्रभानवल्ली या गावांत सलग तीन वर्षे भैरवीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गणपती उत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने गावात येत असल्याने त्यांच्यापर्यंत भैरवीची गायकी पोहचली पाहिजे या हेतूने लांजाचे महेंद्र साळवी , चंद्रकांतदादा खामकर व विजय हटकर यांना सोबत घेऊन कोंडगे, रिंगणे, आरगाव, नेरके, शिपोशी, वेरळ, लांजा अशा अनेक गावात भैरवीची भजने आयोजित केली जातात. 
ज्या गावाची किंवा समाजाची भजनाची मंडळे नसतात अशा ठिकाणी भैरवीला गणेशोत्सवात बोलावले जाते किंवा अधिकचा एक कार्यक्रम करावा या हेतूने बोलावले जाते. यु ट्यूब वरती सुद्धा भैरवीची अनेक गाणी प्रसारित झालेली आहेत. ' आई नसे शब्द दोन अक्षरांचा.' , 'माझे प्रभानवल्ली गाव ', ' माझं गाव हर्दखळे, ' धनी केदारलिंग देवाची पालखी' , ' तुझे पाय सोन्याचे '  ही तसेच आणखी काही मी लिहिलेली गाणी भैरवीच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त अनेक कवींची भैरवीने गायलेली गाणी यु ट्यूब वरती हजारो लोक बघत असतात. 'माझे प्रभानवल्ली गाव' या गाण्याची धून तर  कॉलर ट्यून म्हणून वापरून  एअरटेल कंपनीने भैरवीचा आवाज हजारो घरात पोहोचवला आहे.
 
        भैरवीला गायकीचा समृद्ध वारसा हा तिच्या घरातूनच मिळालेला आहे. तिचे आजोबा स्वर्गस्थ श्री.काशिनाथ जाधव उर्फ लालू बुवा हे तर रत्नागिरी -सिंधुदुर्ग मध्ये डबलबारी भजनासाठी प्रसिद्ध होते. त्यानंतर तीच परंपरा तिचे वडील सुनील बुवा जाधव यांनी पुढे चालवली आहे. भैरवीची एक बहिण भक्ती जाधव ही तबलापटू आहे तर भाऊ सोहम जवळजवळ सर्वच वाद्ये वाजवतो. कोरोना काळात या कुटुंबाने 'कुटुंब रंगले हरी भजनी ' या नावाने फेसबुक वरती प्रत्येक दिवशी नवीन गाणे गाऊन लोकांच्या पर्यंत पोहोचवून कोरोनाची भीती कमी करण्याबरोबरच मनोरंजन करण्याचे काम केले.
 
         एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या भैरवीला तिच्या बालवयात गायनाची आवड निर्माण झाली असली तरी आता तिला आपली नोकरी सांभाळून गायन कला जोपासावी लागते आहे. केवळ गायकीतच तिने आपले भविष्य शोधायचे ठरवले तर भैरवी ही कोकणची गान कोकिळा ठरू शकते इतका तिचा आवाज गोड आणि मधुर आहे. आपल्याच मातीत जन्मलेल्या भैरवीला आपणच व्यासपीठ मिळवून देऊन आपल्याच मातीतल्या माणसाला आपणच मोठं करावं असं कोकणी माणसाने ठरवलं तर आपल्या मातीला एक मोठी गायिका मिळेल. रत्नागिरीतील शिव स्वराज्य  फाउंडेशन कडून भैरवी जाधवला कोकण रत्न कला गौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. रत्नागिरीतील वीर सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या या समारंभात रत्नागिरीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या सोबत( ज्यामध्ये मालवणी बोली सम्राट सचिन काळे कोकणचे नटसम्राट अमोल रेडीज, अभिनेता विनायक खानविलकर यांचा समावेश आहे) गायिका कुमारी भैरव जाधव हिचाही सन्मान करण्यात आला याबद्दल तिचे मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर शिव स्वराज्य फाउंडेशनने एका उदयोन्मुख गायिकेला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद !
     माझ्या आईसाठी लिहिलेले गाणे भैरवीने गायले आणि युट्युब च्या माध्यमातून माझ्या आईला अजरामर केले ही गोष्ट मी कायमची हृदयात जपून ठेवलेली असल्याने भैरवीला मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. भैरवीने अधिक मोठे व्हावे,तिने आपले नाव कमवावे यासाठी माझ्या भरभरून 
शुभेच्छा  !

💐💐💐💐
*सुभाष लाड*
अध्यक्ष 
राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 
   
   
   
  🍁🍁🍁🍁🍁🍁🍁  🍁🍁🍁🍁🍁🍁 अभिप्राय 🍁🍁🍁🍁🍁
 मनाचा ठाव घेणारा आपला जीवन प्रवास आणि आई वरचे प्रेम  मला माझ्या आईच्या कुशीत घेऊन जात.लाड सर आपली जीवन कहानी सांगत असताना tya प्रवासात भेटलेल्या कला प्रेमींना आणि त्यांच्या कलेला जी प्रेरणा देता त्याबद्दल आपणास धन्यवाद द्यावे तेव्हढे थोडेच आहेत.आपल्या कार्यक्रमात भैरवी ची गाणी ऐकलेली आहेत. त्या छोट्या मुलीला सतत आशीर्वाद देऊन तिच्या वडिलांच्या मागे लागून तुम्ही तिच्या कलेला एका उंच जागी नेऊन ठेवले आहे आणि म्हणूनच भैरवी ला कोकण रत्न कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.याचे सगळे श्रेय तिचे असले तरी त्याला प्रेरणा देणारे तुम्ही आहात. मी भैरवी बरोबर तुमचे ही अभिनंदन करतो.
सुरेश हांडे 
लेखक

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हा उत्तम लेख आज वाचनात आला. भैरवीचे खूप खूप अभिनंदन आणि आपलेही. आपणच आपल्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे हा अत्यंत प्रोत्साहक विचार आहे.
    तुमच्या दिल्ली वारीचा लेख वाचून मलाही माझ्या पहिल्या दिल्ली वारीची आठवण झाली.
धन्यवाद 🙏
विनोद,शिक्षक सभा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
.       भैरवीचे मनापासून अभिनंदन!
खूप छान पोष्ट लिहिली आहेस. सुभाष, तुझे काम हे वाखाणण्याजोगे आहे. लोकांना पुढे आणण्याचा तुझा जो प्रयत्न आहे तो स्तुत्य आहे. 🙏🙏धन्यवाद 🙏

डॉ.मंगेश हांदे,
रिंगणे 


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🙏🏼 धन्यवाद सर खूप छान आपण भैरवी पुरस्कार विषयी लिहिलात आपले आभार . आपले शब्दच असे असतात की ती संगीत करायला व भैरविला गायला आनंद होतो . आपले नेहमीच आमच्या परिवाराच्या सोबत एक स्नेह पूर्वक जिव्हाळ्याचे  सबंध जोडले आहेत . आपले काम सतत आमच्या साठी प्रेरणादायी असते .असेच आशीर्वाद प्रेम कायम असूदेत . 
आपले  
श्री सुनील बुवा जाधव 🙏🏼

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🌹आपल्या सुभाषपर्व मध्ये मानाचे स्थान मिळविणाऱ्या कु.भैरवी जाधव हिला कोकण रत्न कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन.तिची कला अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आपण दिलेल्या संधीला तिने सोन्याची झालर चढवली.आपले सर्व क्षेत्रातले कलाप्रेम कौतुकास्पद आहे.सर्व कलाक्षेत्रात आपण अग्रेसर असता आपलेही अभिनंदन.🌹
सुप्रिया मोरे
गुहागर, मुंबई 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कु,भैरवी जाधव ,
 आदरणीय गुरूवर्य श्री, लाडसरजी प्रथम आपले अभिनंदन ! कु, भैरवीचा जीवन प्रवास अतिशय मार्मिकपणे ओजस्वी शैलीत व्यक्त करताना तिने गायनासाठी घेतलेले अथक परिश्रम अचूक व हळुवारपणे मांडले आहेत, जाधव परिवाराचा वारसा कु,भैरवी चालवत असल्याचे पाहून अभिमान वाटतो,त्यात तिच्यातील उपजत गुणांना आपण योग्य दिशा देण्याचे सत्कार्य आपण केलेले आहे,ही अस्सीम कार्याची  पोच म्हणावी लागेल, आपल्या समाज सेवेला सलाम करतो,
        कु, भैरवी तुझे गोडकौतुक करावे तेवढे थोडच आहेत, तुझी गाणी मी श्रवण केलेली आहेत, अतिशय मधुर व गोड आवाजात आहेत, ती ऐकत राहवे,असेच वाटते,या तुझ्या प्रवासात थोर विचारवंतमंडळी तुझ्यासोबत आहेत, आणि तुझे प्रयत्न तुला यशाच्या उच्चशिखरावर नेहतील अशी खात्री आहे,आज "" कोकण रत्न कला गौरव देऊन पुरस्कारले "" आहे, तुञे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन,! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ,
वसंत गायकवाड 
सेवानिवृत्त शिक्षक मुंबई मनपा

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नमस्कार सर...
सुभाषपर्व म्हणून तुम्ही आठवणीने पाठवलेले लेख खुप छान आणि प्रेरणादायी असतात.त्याला कुठेही मी पणाची झालर नसते.तुम्ही, आपलं कोकण,आपला समाज यासाठी तळागाळापर्यंत पोहचून जे काम करताय,कला जिवंत ठेवण्यासाठी जो ध्यास घेतला आहे त्याला सलाम.... तसेच तुम्ही लिहीलेली गाणी असोत किंवा लेख हे आपलंसं करून जातात.... तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छाही 💐💐
भैरवीचं अभिनंदन..💐💐 आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...🙏🙏

प्रेमा( पुजा )सुवारे,
देवरुख

2 comments:

  1. खुप सुंदर लिहिले आहे. या निमित्ताने भैरवी ताईचा संगीतमय प्रवास या शब्द माळेतून डोळ्यांसमोर आला. अभिनंदन भैरवी आणि पुढील यशस्वी वाटचालीस अनेक शुभेच्छा 💐👍

    ReplyDelete