Friday, June 6, 2025

मोडी लिपी प्रचाराच्या प्रवासाकडे मागे वळून बघताना !🍁🌿🍁🌿🍁🌿🍁


       जगाकडे बघताना जगात अशा अनेक कला आहेत हे लक्षात येते.त्या कलाद्वारे आनंद मिळतो, ज्ञान मिळतं आणि एखादी कला आत्मसात करून  ते ज्ञान इतरांना देता आलं तर वेगळं समाधान मिळते. आम्ही मोडी लिपीचा अभ्यास करण्यामागे काळाच्या आड गेलेल्या मोडी लिपीला पुन्हा प्रकाशात आणावं हाच उद्देश होता. महाराष्ट्राचा आणि विशेषतः शिवचरित्राचा इतिहास पाहायचा असेल तर मोडी लिपी शिकणं आवश्यक आहे याची जाणीव झाल्यानंतर आपण मोडी लिपीच्या प्रचाराचं काम करावं असं ठरवलं. आपला हेतू शुद्ध असेल तर आपल्या मदतीसाठी बरेच हात पुढे येतात. दादरच्या छबिलदास विद्यालयाच्या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष मा.श्री. क.र. प्रभूदेसाई यांनी दादरला मध्यवर्ती असणाऱ्या, रेल्वे स्टेशन पासून शंभर मीटर वर असलेल्या छबिलदास हायस्कूलच्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरचा एक वर्ग शनिवारी आणि रविवारी  संध्याकाळच्या वेळेत वापरण्यास परवानगी दिली. आणि मोडी वर्ग सुरू झाले.


      दिवाळी अंकाच्या बाजारात मराठी बरोबर मोडी मधला ही दिवाळी अंक असला पाहिजे असे आम्हाला वाटले आणि त्या कामात सुद्धा मुद्रक प्रकाशक विश्वास शिरवाडकर, सुलेखनकार अच्युत पालव सर आणि त्याचबरोबर अनेक देणगीदार आमच्या सोबत आल्याने आम्ही अनेक नामवंत लेखकांच्या सहकार्याने गेली अनेक वर्षे एक दर्जेदार दिवाळी अंक बाजारात आणत आहोत. 


     आमच्या या कामाची दखल घ्यावी या हेतूने रत्नागिरी आकाशवाणी वरुन आमची मुलाखत प्रसारित करण्यात आली. ती मुलाखत पुन्हा एकदा आपल्याकडे पाठवीत आहोत. मोडी लिपीच्या प्रचारार्थ आणि मोडीदर्पणच्या जाहिराती करता आपण ती अनेकापर्यंत पोहोचवून मोडी लिपी प्रचाराच्या राष्ट्रीय कार्यात आपलेही योगदान आहे हे दाखवावे ही विनंती.

ही लिंक क्लिक करा.open हा पर्याय क्लिक करा.

https://youtu.be/5WkNboWInrU?si=3ej_wKdHClOruSsC

ही लिंक मुलाखतीची आहे.आपण आवर्जून ऐकावी.

सुभाष लाड

संपादक

मोडी दर्पण


No comments:

Post a Comment