Sunday, August 4, 2024

🪴 वृक्ष महोत्सव 🪴

 
  *चला सहभागी होऊया संघाच्या वृक्ष महोत्सवात!!*
*झाडे लावुया! सृष्टी जगवुया!!*
🌳🌴🌳🪴🍃🌱🌴🌵🎄🎍🌿🍀☘️🪴🌿🪴           
                      पृथ्वीवरील सृष्टीत वृक्षांना अनन्य साधारण स्थान आहे किंबहुना सृष्टीला सुंदर करण्याचं काम, सृष्टीला प्राणवायू पुरवण्याचे काम ही झाडेच करीत असतात. झाडांचा, वृक्षवेलींचा मनुष्य जीवनाला फार मोठा आधार आहे. म्हणूनच मनुष्याने आपल्या आयुष्यात अनेकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण समारंभातून संधी निर्माण केलेली आहे. त्यात देवदेवतांबरोबर पशुपक्षी आणि वृक्ष सुद्धा आहेत. वडाची पूजा, पिंपळाची पूजा, उंबराची, पूजा, तुळशीची पूजा अशा अनेक झाडांना पवित्र मानून शक्यतो त्यांना तोडायचे नाही असा दंडक घालून घेतला. आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे शेतीच्या कामात जमिनीची व पावसाची जशी गरज असते तशी प्राण्यांची असते, तशी झाडांचीही असते. अन्न ही गरज सुद्धा झाडे, वेली, तृणधान्ये अशा द्वारे पूर्ण होत असते.प्रत्येक गोष्टीत तो झाडांवरती वेलींवरती किंवा गवतावरती अवलंबून असलेला दिसतो.आज सुद्धा माणसाने कोणतीही प्रगती केली तरी पोटाचा प्रश्न हा झाडे- वेली आणि वनस्पती या द्वारेच भागवला जातो आणि म्हणून जगाच्या अंतापर्यंत याला पर्याय असू शकत नाही.

           चाळीस पन्नास वर्षांपूर्वी झाडांची तोड केवळ घर बांधणे किंवा आवश्यक असलेला साकव बांधणे किंवा सार्वजनिक इमारत बांधणे यासाठी होत असे. कोकणात शेतकरी शेती करीत असताना पाच वर्षाच्या कालावधीनंतर नाचणी सारख्या पिकासाठी दुसऱ्या सुपीक जागेचा शोध घ्यायचा. त्यावेळेला काही झाडे तोडणे त्याला आवश्यक वाटत असे.मात्र त्या काळात अर्थात तीस चाळीस वर्षापुर्वी शेतकरी जिथे जाईल तिथे आपल्याबरोबर झाडांचे बी सोबत घेऊन जात असे. उदाहरणार्थ रानात काम करताना सकाळच्या न्याहरीला पिकलेला फणस बरोबर घेऊन जायचा, गरे खाल्ल्यानंतर त्याच्या आठल्या तिथेच सोडून यायचा.दुपारच्या जेवणात पिकलेला आंबा चोखून खायची सवय असे. त्यानंतर ती बाट तिथेच ठेवली जायची. निसर्गनियमानुसार तिथे तिथे त्या झाडांची रुजवण होऊन नवीन झाडांची निर्मिती व्हायची. त्यामुळे एखादं झाड तोडलं तरी त्याची कमतरता पर्यावरणाला भासत नव्हती. भविष्यात आपल्या मुलांना- नातवंडांना घर बांधण्याची वेळ आली तर त्याला पुरेसे वाढ झालेले सागाचे झाड हवे झाले तर त्याने आपल्याच मातीतलेच झाड तोडावे यासाठी शेतकरी मुद्दामहून पाच-पन्नास सागाची झाडे लावायचा,वाढवायचा आणि आपल्याला गरज लागली तर आपल्या पूर्वजांनी लावून ठेवलेली वाढवलेली सागाची, फणसाची, आइन, किंजळीची, शिवणीची झाडे तोडून तो आपले घर बांधायचा. हे चक्र पिढ्यानपिढ्या चालत आलेले होतं. मात्र गेल्या चाळीस वर्षात हे चक्र थांबलेले दिसते आहे तर दुसरीकडे कोळसा करण्यासाठी झाडाची कत्तल करण्यात  येत आहे. त्यातून चांगला पैसा मिळतो आहे म्हणून आपल्या पूर्वजांनी लावलेली किंवा सांभाळलेली झाडे पुढच्या पिढीने व्यापाऱ्यांना देऊन टाकली मात्र त्या जागी एखादे झाड लावावे अशी कुणाची इच्छा झाली नाही. ही झाडे विकणारे पुण्या मुंबईतले चाकरमाने असल्याने ते फक्त पैशांचे मालक झाले. इथे राहणाऱ्या शेतकऱ्याने सुद्धा नवीन झाडे लावण्याचा संस्कार सोडून दिलेला आहे. आजकाल रेशन वरती कमी किमतीतले किंवा फुकट धान्य मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती सोडली.रानात फिरण्याची गरज उरली नाही त्यामुळे नेमकी आपली जमीन कुठे आहे हे सुद्धा अनेकांना माहित नाही. काही लोक आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेली जमीन विकून पैसा करू लागले आहेत.त्यावेळेला एखाद्या जुन्या जाणत्या माणसाला घेऊन आपल्या जमिनीचा शोध घेत असतात. जमिनी विकली की त्या जमिनीतील झाडे,त्या जमिनीत राबलेल्या पूर्वजांच्या आठवणी त्या जमिनीतून जाणाऱ्या पायवाटा हे सगळं काही क्षणात त्या कुटुंबापासून दूर होतात. ज्यांनी पोटाला चिमटा काढून आपली जमीन राखली, अधिकचे धान्य पिकवून त्यातून मिळालेल्या पैशातून जमीन विकत घेतली त्या पूर्वजांना हे सगळं पाहून काय वाटत असेल याचा कोणी विचार केला आहे काय ? आज-काल पितरांच्या नावाने ठेवलेल्या कागावळ खायला कावळा येत नाही त्याची अनेक कारणे असू शकतील,मात्र तो जर आपल्या पूर्वजांच्या नावाने खरंच येणार असेल तर आपल्या वंशजाने आपण निर्माण करून ठेवलेली, आपण राखून ठेवलेली जमीन,झाडे हे सगळं त्याने दुसऱ्याला विकले असेल तर त्यांना वाईट वाटत नसेल का ? जर ते रागावले असतील म्हणूनच ते कागावळ घ्यायला येत नसावेत याचेही कुठेतरी चिंतन व्हायला हवे.

          पूर्वी प्रत्येक गावात ग्राम देवताच्या देवळाच्या आसपास  अनेक ठिकाणी देवराई उभ्या होत्या त्या राईत उंच उंच आकाशाला भिडू पाहणारी दाटीवाटीन उभ्या असलेल्या झाडांची गर्दी असे. त्या महाकाय झाडांवरती वेलीनीही विस्तार केलेला असे .त्या झाडांच्या आधाराने छोटी मोठी औषधी झाडे बहरलेली असायची. या देवराईत वेगवेगळ्या पक्षांची घरटी असत. मोठमोठ्या झाडांच्या ढोलीत पक्षी प्राणी राहत. मोठ्या झाडांच्या फांद्यांना लटकलेली मधाची पोळी खालून एखाद्या ठिपक्यासारखी दिसत. मधाच्या पोळ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात.काळंबी,सातपकडी, तुमसड सारखी तर घागरीच्या आकाराची पोळी असत. त्यांच्या माशांचे प्रकार पण तशाच प्रकारे वेगवेगळे असतात. मध गोळा करण्याचे झाडं सुद्धा वेगवेगळी असत, ज्या वेळेला एखाद्या रानात अशा विविध प्रकारच्या माशा जगतात म्हणजेच अशा प्रकारच्या वनस्पती त्या जंगलामध्ये असतात असा त्याचा अर्थ होतो. केल्या काही वर्षात या देवराई सुद्धा नष्ट झाल्या आहेत किंवा त्या नष्ट केल्या आहेत.काही जीव तगवून उभ्या आहेत.

         त्या काळात गावातून रस्ते नव्हते. बैलगाड्यांचे रस्ते ही शेतीची काम संपल्यानंतर अर्थात कापणी झाल्यानंतर सुरू व्हायचे. मात्र गेल्या चाळीस वर्षात गावागावातून पक्के रस्ते तयार करण्यात आले. शेतीतून किंवा डोंगरातून हे रस्ते गेले त्यावेळेला अनेक झाडे तोडली गेली. गावात रस्ता आला तर एसटी सारखे वाहन आपल्या गावात येईल. प्रवासाचे साधन आल्यामुळे सर्वांचं भलं होईल ही एक चांगली भावना बाळगून लोकांनी आपल्या जमिनी दिल्या आणि झाडे तोडण्यासाठी सुद्धा परवानगी दिली मात्र तोडलेल्या झाडाच्या बदल्यात रस्त्याच्या कडेला त्याची आठवण म्हणून दुसरे रोप लावावे असे कुणाला वाटले नाही. ते ते काम आपले नाही तर सरकारचे आहे या विचाराला पुष्टी दिली गेली आणि सार्वजनिक कामातून संवेदना नष्ट होण्याची सुरुवात इथेच झाली.
          मुंबई गोवा या हम रस्त्याच्या रुंदीकरणाला सोळा वर्षांपूर्वी सुरुवात केली गेली त्यावेळेला या रस्त्याच्या दुतर्फा असलेली शितल छाया देणारी पशुपक्ष्यांना आधार देणारी रस्त्याच्या सौंदर्यात भर करणारी हजारो झाडे तोडली गेली. ठेकेदाराने आपण झाडे लावू असे लिहूनही दिले, मात्र आज पर्यंत रस्ता पूर्णत्वास गेला नाहीच आणि तोडलेल्या झाडांची जागा भरूनही काढली गेली नाही. दोन वर्षांपूर्वी वाटुळ ते दाभोळ हा भांबेड मार्गे जाणारा रस्ता रुंदीकरण करण्यात आला त्यावेळेला सुद्धा अनेक झाडे तोडली गेली.काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले गेले. मात्र अहवाल देण्यापलीकडे त्या झाडांची कुणी काळजी घेतली नाही आणि म्हणून तो रस्ता ही आज झाडांविना रखरखीत वाटतो आहे. 
          राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई ही संस्था गेली सात दशके इथल्या खेडोपाड्यांचा विकास व्हावा म्हणून झटते आहे. त्या संस्थेने केलेल्या कामाचा पाढा वाचण्याची ही जागा नसली तरी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करून येथे अक्षर संस्कृती रुजवण्याचं काम गेली दहा वर्ष ही संस्था करीत आहे. हे करीत असताना निःस्पृह भावनेने काम करणारे, सामाजिक बांधिलकी जोपासणारे अनेक कार्यकर्ते संघाला येऊन मिळाले आहेत हे सांगताना आम्हास अभिमान वाटतो. त्याच कार्यकर्त्यांच्या कल्पनेतून वृक्ष महोत्सव संपन्न होणार आहे. 
           वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचं काम संघाने यापूर्वीही केले आहे. पाचल येथे बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुरुष वर उंच वाढलेली झाडे ही संघाने लावलेली आहेत हे सांगताना आनंद वाटतो. संघाचे हरहुन्नरी कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी, आरगावचे सुपुत्र वृक्षमित्र श्री अमर गणपत खामकर यांच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या वर्षी लांजा तालुक्यातील व्हेळ रस्त्यावरती गावठी काजूची झाडे लावली. त्याला पाणी घालून वाढवली मात्र येत्या पावसाळ्यात त्या रोपांना सुंदर पालवी फुटल्यानंतर कुणीतरी ती झाडे हलवली याचे दुःख झाले. मात्र हे का व कसे झाले याचा विचार करून जी झाडे कोणी हलवू शकणार नाही त्याचबरोबर त्या झाडांमुळे या रस्त्यांवर सावली होईल त्यांची फळे खाण्यासाठी पक्षी येतील त्यातून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल अशी वड, पिंपळ, चिंच ,काजरा अशी पाचशे झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे हा उद्देश घेऊन हा वृक्ष महोत्सव संपन्न करण्यात येणार आहे. संघाच्या यशस्वी वाटचालीची दखल घेऊन इंडियन ऑइल कार्पोरेशनने या कामे सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले आहे. गेली अनेक वर्ष दहावीचा शंभर टक्के निकाल लावून आपला शैक्षणिक दबदबा निर्माण करणारे आणि याच वर्षी शाळा रौप्य महोत्सव साजरा करीत असणा-या रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ,ता.लांजा या प्रशालेने संघाच्या वृक्ष महोत्सव उपक्रमात सहभागी होण्याचे मान्य केले आहे. लांजातील सिनियर कॉलेजच्या एन.एस.एस विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करण्याचे ठरवले आहे. संघाच्या उपक्रमांना नेहमीच प्रसिद्धी देणारे कोकण मीडियाचे संपादक श्री प्रमोदजी कोनकर हे सुद्धा सोबत असणार आहेत. शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ या दिवशी सकाळी नऊ वाजता व्हेळ ता.लांजा येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयाच्या सभागृहात स्वागताचा कार्यक्रम होईल व वृक्ष दिंडी निघेल. त्यानंतर दाभोळ मार्गावरील व्हेळ-विलवडे या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली जाईल.
          या वृक्षांना जाळी लावून संरक्षित केले जाईल. ज्याच्या हस्ते हा वृक्ष लावला जाईल त्या मुलाचे व व्यक्तीचे नाव तिथल्या फलकावरती लिहिले जाईल. या उपक्रमात अनेक संस्था अनेक शाळा सहभागी होणार आहेत. त्यामुळे इथे एक उत्सवाचे स्वरूप निर्माण होऊन येथे लावले जाणारे वृक्ष उद्या जेव्हा गगनाला भेटतील, फळा फळाने डवरतील अनेक पशुपक्ष्यांना आधार ठरतील आणि इथून जाणाऱ्या प्रवाशांना सुखद प्रवासाचा अनुभव देतील त्यावेळेला हे वृक्ष लावणाऱ्या हातांना कृतकृत्य झाल्याचा आनंद होईल. हा आनंद अनेक लोकांनी लुटावा यासाठी आम्ही सर्वांना वृक्ष महोत्सवात सहभागी होऊन एक झाड लावण्यासाठी आमंत्रित करीत आहोत.
             *या वृक्ष महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी रुक्मिणी भास्कर विद्यालयाचे मुख्याध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी कामास लागले आहेत. वृक्षमित्र अमर खामकर आणि संघाचे स्थानिक सेनापती श्री महेंद्र साळवी सर  संघाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वृक्ष महोत्सव उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. चला आपण हे एक झाड लावून त्यांना प्रोत्साहन देऊया.* 

     *वृक्ष महोत्सवातील सहभागी संस्था*🌳🌳

१)लांजा सिनियर कॉलेज एन.एस.एस.विद्यार्थी 
२)कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लांजा
३)ग्रामपंचायत व्हेळ,
४)ग्रामपंचायत विलवडे,
५)ग्रामपंचायत वाघणगांव.
६)ग्रामपंचायत वाटुळ
७)प्राथमिक शाळा व्हेळ
८)प्राथमिक शाळा विलवडे 
९)विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई ग्रामीण 
१०)विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना 
११)अपना बाजार, लांजा 
१२)तांबे उपहारगृह ,लांजा
१३)डॉक्टर असोसिएशन, लांजा 
१४)ज्येष्ठ नागरिक संघटना,लांजा
१५) आदर्श विद्यामंदिर,वाटूळ
१६)वै.हभप.सोनबाबुवा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संघ,भांबेड

कार्यक्रम -
शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ सकाळी ९ ते १२
स्थळ - 
रुक्मिणी भास्कर विद्यालय, व्हेळ

🍀🙏🙏🙏🍀
*सुभाष लाड*
*अध्यक्ष*
*राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई*  
 

3 comments: