Friday, June 7, 2024

गजाभाऊ आनंदात आहेत!🌳🌴🍀☘️

गजाभाऊ आनंदात आहेत!🌳🌴🍀☘️
         लांजा शहर हे माझे दुसरे गावच झाले आहे. गेल्या 30 वर्षात मी जेवढा माझ्या रिंगणे गावी गेलो आहे. त्याहीपेक्षा जास्त वेळ लांजा शहरात राहिलो आहे. लांजा हे शहर असून तालुक्याचे ठिकाण आहे. इथे एसटी बस स्थानक असून इतरही वाहनांची रेलचेल असल्यामुळे इथे राहून मला कोणत्याही वाहनाने वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहता येते. आज-काल माझ्या मित्र मंडळीत बरीच भर पडली असल्यामुळे अनेकांची घरे माझ्यासाठी मोकळी असतात तर अनेकांची वाहने माझ्यासाठी पळत असतात यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजत आलो आहे माझ्या सामाजिक कार्याला या सर्व मंडळींचा मोठा हातभार आहे हे मी कधीही विसरू शकत नाही. पण प्रथम ज्यांनी आपल्या घरी मला स्वतःच्या घरात राहण्याचा आनंद दिला त्या गजाभाऊंना व त्यांच्या कुटुंबीयांचाही मी ऋणी आहे.
(गजाभाऊ आणि सौ.काकू)

       प्रा.मधु दंडवते हे आमचे आदर्श. त्यांच्या निवडणुकीच्या वेळी चार दोन दिवसाची रजा टाकून किंवा रविवारचा फायदा घेऊन मी माझ्या स्वतःच्या प्रवास खर्चाने गावाला येत असे. स्वतःचीच भाकरी बांधून निवडणुकीच्या कार्यक्रमात प्रचारात भाग घेत असे. अशा कार्यकर्त्यांचे चहापान, नाश्ता किंवा जेवण हे तर बऱ्याच वेळी माझ्या रिंगणातल्या घरी झालेले आहे. आज काल मतदान करण्यासाठी सुद्धा पैसे घेतले जातात हे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले. समृद्ध लोकशाहीसाठी मी ऐकलेली पैसे घेण्याची गोष्ट खोटी ठरावी असेच मला वाटते. 
           अशाच एका निवडणुकीच्या वेळी माझी मुलाखत लांजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजाभाऊ वाघदरे यांच्याशी झाली.पुढे त्यांचे मैत्रीत रुपांतर झाले.त्यांनी वडीलकीच्या नात्याने मला अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले.त्यामध्ये मी नोकरी सोडून सक्रिय राजकारणात कधीही पडू नये हा त्यानी दिलेला सल्ला मी त्यावेळी ऐकला यांचे मला आज समाधान वाटते. ते साप्ताहिक नव आंदोलन (पूर्वी 'आंदोलन तुमचे आमचे' असे नाव होते.) चालवतात. त्यांची स्वतःची स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस असल्याने तसेच समाजात घडत असलेल्या बऱ्या वाईट प्रसंगावर आपले विचार मांडून समाज प्रबोधन करावे असे त्यांना वाटत असे आणि म्हणूनच अनेक विषयांच्या वरती आपले प्रकट विचार मांडून या क्षेत्रात त्यांनी नाव कमावले आहे.   
             एकेकाळी लांजातील मोठे सावकार असलेल्या, चौसोपी घरात नोकर चाकर असलेले हे वाघदरे कुटुंब. गजाभाऊंच्या जन्माच्या अगोदर या कुटुंबावर असे काही आघात झाले की गजाभाऊंच्या वडिलांना बेघर व्हावे लागले.काळाच्या ओघात दारिद्र्याचे चटके सोसावे लागले.त्यांनी मुंबईत जाऊन मिळेल ती नोकरी करुन संसार सांभाळण्याचा प्रयत्न केला.पण प्रकृतीने साथ देण्याचे नाकारले आणि परत ते लांज्यात आले.आपल्या पूर्वजांच्या विकल्या गेलेल्या घराच्या शेजारच्या गोठ्यात त्यांनीं संसार थाटला पण पाठीमागे दोन लहानगी मुले व पत्नीला सोडून अकाली दिवंगत झाले.गजाभाऊं व त्यांच्या पाठची बहिण पोरके झाले.  मात्र त्यांच्या आईने हार न मानता मोलमजुरी करून त्यांचे पालन पोषण केले. गजाभाऊंना समजायला लागल्यापासून ते सुद्धा लांजातील कधी हॉटेलमध्ये कप-बशा धुण्याचे काम कर तर कुठे मोलमजुरीचे काम करत असत. करता करता वय वाढतच राहिले आणि शिक्षणापासून आपण दूर जातो आहोत की काय अशी भीती त्यांच्या मनाला चाटून गेली आणि त्यांनी वयाच्या पठारावस्थेत प्राथमिक शाळेत नाव नोंदवून शिक्षणाचा श्री गणेशा केला. कधी गुरांच्या गोठ्यात राहून तर कधी कुणाच्या पडवीत राहून मोलमजुरी करीत त्यांच्या आईने त्यांना वाढवले. गजाभाऊंना मॅट्रिकची परीक्षा देण्यापर्यंत अर्धवेळ काम करणं भाग पडले होते तरीही ते चांगल्या गुणांनी मॅट्रिक झालेच. त्यामुळे आता आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल आणि आपण आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवू शकू असे वाटू लागले. काही दिवस ते मुंबईच्या आर्यन स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले पण आईला गावी ठेवून मुंबईत आपण  सुखाने राहू शकत नाही ही बोच त्यांना अस्वस्थ करू लागली ते गावी आले काही काळ लांजा हायस्कूलमध्ये काम केले तर अधिक पैसे मिळतील म्हणून प्रभानवल्ली खोरनिनको इथे रिक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकाच्या जागेवरती रुजू झाले. खोरनिनको ते लांजा हा पायी प्रवास शनिवारी व सोमवारी करावा लागायचा. नशीब शोधण्याच्या संघर्षात ठेकेदारीने त्यांना चांगली साथ दिली.पण पुढे टक्केवारी सुरु झाली व सचोटीने पैसा कमवायचा आदर्शामुळे त्यांनी त्या क्षेत्रातून पाय काढला.व  छपाईचा व्यवसाय सुरू केला.आणि कुटुंबाला बरे दिवस दिसू लागले.

( गजाभाऊंचा आताचा फोटो सुनबाई सौ.योजना मुलगी होऊन सेवा करतात)

          आपण दारिद्र्याचे चटके सहन केले तशी वेळ इतरांवर येऊ नये यासाठी गजाभाऊंनी अनेकांना मदतीचा हात पुढे करतांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली.बॅ.नाथ पै यांच्या लोकप्रिय नेतृत्वामुळे कोकणात समाजवादी चळवळ फोफावली.त्यात अनेक नि:स्पृह भावनेने काम करणारी तरुण मंडळी पुढे आली त्यात गजाभाऊ वाघदरे हे एक नाव होते.ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यापलिकडे त्यांनी अन्य पदांची हाव धरली नाही परंतु सामाजिक न्यायासाठी लांजात उभारलेल्या मोर्चात, उपोषणात किंवा चळवळीत एक बिनीचा शिलेदार म्हणून गजाभाऊं नेहमीच पुढे राहू लागले त्यामुळे समाजात त्यांना आदराचे स्थान मिळाले.लांजा हायस्कूल,तेथील माजी विद्यार्थी संघटना, लोकमान्य वाचनालय,विविध विकास सोसायट्या, सहकारी पतसंस्था या लांज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या संस्थात गजाभाऊंचे उल्लेखनीय योगदान राहिलेले आहे.
        गजाभाऊंनी स्वतः:च्या हिंमतीवर आपल्या छोट्या बहिणीचे लग्न व स्वत:चे लग्न करुन आपला मुलगा कर्तृत्ववान झाला आहे याचा विश्वास आपल्या आईला दिलाच पण ज्या घरात आपण अनेक वर्षे भाडे पट्टीने राहात होतो तेच घर विकत घेऊन आईला स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंदही दिला. ज्या घरात एक वेळच्या खाण्याची ददात असायची त्या घरात सामाजिक कार्यकर्त्यांच्या पंगती बसू लागल्या. ओटीवरच्या खुर्चीत बसून वृद्धापकाळातले ते हसरे जीवन अनुभवतच त्यांच्या आईंने समाधानाने अखेरचा श्वास घेतला.
         गजाभांऊना एक मुलगी आणि दोन मुलगे.त्या सर्वांचे चांगले शिक्षण झालेच पण चांगले संस्कार ही झाले.फार मोठी आर्थिक श्रीमंती गजाभाऊ निर्माण करु शकले नाहीत पण त्यांनी दिलेल्या जीवन जगण्याचा मंत्र जगातल्या कोणत्याही श्रीमंती पेक्षा मोठा होता.मोठा मुलगा मिलींद उर्फ अभ्या प्रिंटिंग प्रेस सांभाळतो आहे.तर त्याची पत्नी लांजा हायस्कूलमध्ये विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.सुमंत वकिली व्यवसायात नाव कमवून तो रत्नागिरीत वास्तव्यास असला तरी सकाळ संध्याकाळ घरी येऊन आईवडिलांची विचारपूस करुनच तो निघत असतो.
            गजाभाऊंनी आपल्या गरीबीचे कधी भांडवल केले नाही. उलट एक जीवन संघर्षाचे एक रणांगण समजून श्रमाची तलवार करून आणि नि:स्पृह वृत्तीने चाल करून हसत हसत त्यांनी मैदान मारले. आपल्या वैयक्तिक जीवनाचे कथन कधी सार्वजनिक जीवनात करू दिले नाही उलट धनाच्या संपत्तीपेक्षा गुणाच्या संपत्तीनेच माणूस मोठा होतो हे त्यांनी दाखवून दिले. अशा कष्टमय जीवनातही त्यानी कधी कविता करून तर कधी कथा लिहून मनाच्या घुसमटीला मोकळे केले. अनेक दिवाळी अंकातून किंवा नियतकालिकातून जेव्हा त्यांचे साहित्य प्रसिद्ध व्हायचे त्यावेळेला त्या आनंदी व्हायचे आपल्यात एक साहित्यिक दडलेला आहे याची त्यांना जाणीव व्हायची. त्यांच्या साप्ताहिकातील अग्रलेख हे नवाकाळच्या अग्रलेखांच्या आठवणी करून देत इतकं अभ्यासपूर्ण आणि नेमक्या शब्दात मांडण्याची ताकद गजाभाऊंच्या लेखणीत आहे.क्रौंच हा त्यांचा कथासंग्रह हा तेवढ्याच ताकदीचा आहे.पण आपण उच्चशिक्षित नाही याची सल त्यांना स्वस्त बसू देईना आयुष्याची पंच्याहत्तरी गाठताना त्यानी बी.ए.ची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होऊन शिक्षणाचे महत्त्व न समजणाऱ्या व अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या तरुणांच्या पुढे आदर्श ठेवला.त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करावा म्हणूनच कोट गावी संपन्न झालेल्या संघाच्या पाचव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना संघाने सन्मानपूर्वक देण्यात आले.
          आयुष्याकडे मागे वळून बघताना त्यांनी जगलेल्या आयुष्याचा सोपान लिहून काढला.एक उत्कृष्ट आत्मकथन असलेले झाकोळ नावाचे पुस्तक प्रकाशन करण्याच्या निमित्ताने त्यांच्या मित्र मंडळींनी त्यांचा यथोचित गौरव केला.वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीही लांजा बाजारपेठेत सकाळ संध्याकाळ अशा दोन फेऱ्या मारतांना आपल्या जिवलग मित्रांची चौकशी करणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हा त्यांचा नित्यक्रम होता पण गेल्यावर्षी त्यांची तब्येत बिघडली त्यात त्यांच्या चालण्यावर निर्बंध आले.हळूहळू ते परावलंबी झाले. दुसऱ्याचा आधार हवा झाला.एक दिवस मी अभ्याला चौकशीचा फोन केला तेव्हा त्याने पटकन फोन उचलला नाही पण थोड्या वेळाने समोरुन त्यानेच फोन केला. " भाऊंना काही सुधारलं नाही आणि कपड्यातच केलं.ते साफ करत होतो तेवढ्यात तुमचा फोन आला." 
        काकीही तेवढ्याच वयस्कर असल्याने भाऊंची काळजी मुलगा आणि सुनेवर पडली.सौ.योजना सकाळी लवकर उठून न्याहरीचे आणि दुपारच्या जेवणाचे करून धावत पळत शाळेत जाते हे मी अनेक वर्षे बघत आलो आहे. दुपारी घरी आल्यावर डाळ,भाजी फोडणीला देऊन गरम गरम जेवण घरच्यांना वाढतांनाची तिची तारांबळ होते.त्यात आता भाऊंना आंघोळ घालणे,त्यांना मसाज करणे,त्यांना भरवणे या गोष्टीही तिला अभ्यासोबत कराव्या लागतात. हे करतांना तिच्या चेहऱ्यावर कधी त्रासिक भाव दिसला नाही तर उलट भाऊंना लहान मुलासारखे समजावत त्यांना हसत बोलत ठेवण्यासाठी काहीतरी विषय काढत त्यांच्या चेहऱ्यावर हासू आणत ही माऊली भाऊंची सेवा करतांना "भाऊ किती भाग्यवान आहेत कि त्यांची मुले तर भाऊंची काळजी घेतातच पण नोकरी करुनही भाऊंची आई होऊन काळजी घेणारी त्यांना सून मिळाली आहे." 
          कोरोना काळात आई बाबांशी फटकून वागणाऱ्या अनेक मुलांच्या कथा ऐकायला वाचायला मिळाल्या.घरात ऐश्वर्य आणणाऱ्या आई बापाला वृद्धाश्रमात ठेवणारे कितीतरी महाभाग पाहिले की हीच उद्या आपली संस्कृती बनणार आहे की काय अशी शंका वाटू लागली आहे.त्याच वेळेला भाऊंच्या घरात गेल्यावर अजुनही आईवडिलांची सेवा करणारी मुलं आणि सुनाही आहेत.आपण फक्त चुकीचे वागणाऱ्यांची चर्चा करीत असतो त्यामुळे संस्कारी मुलांच्या कडे पाहतांना ' काय झालं केलंय तर मुलगाच आहे ना.' असं म्हणून दुर्लक्षीत करीत असतो.आपल्याला चांगलं पेरायचं आहे ना ,चांगलं उगवलेलं बघायचं आहे ना मग चांगल्याचं कौतुक पण करायला सुरुवात करु या.
         गजाभाऊंचा नातू तन्मय शिक्षणासाठी पुण्यात असतो.त्याचा फोन येणे हे भाऊंना उत्साहवर्धक असते.तो जेव्हा लांजात असतो त्यावेळी आपल्या मित्राला भेटल्याचा आनंद भाऊंच्या चेहऱ्यावर असतो.तीन पिढ्या एकत्र नांदण्याची चित्रे दुर्मिळ झाली असतांना लांज्याच्या पोस्टाच्या गल्लीत राहणारे वाघदरे कुटुंब एकत्र कुटुंबाचे सुख अनुभवत आहेत.
         गजाभाऊ या ही परिस्थितीत '' मला एम ए ची परीक्षा द्यायची आहे "असं हसत हसत बोलतात तेव्हा तो आत्मविश्वास कुठून येतो.आपलं कुटुंब याही परिस्थितीत माझी काळजी घेताहेत याचं ते प्रत्यय आहे.यातून त्यांची जगण्याची उर्मी वाढते आहेच पण राहिलेले कामही पूर्ण करीन हा विश्वास त्यांना वाटतो आहे.प्रत्येकाला एक दिवस गजा भाऊंच्या अवस्थेतून जावं लागेल पण गजाभाऊंची जशी काळजी घेतली जातेय तशी काळजी घेणारी मुले प्रत्येकाच्या वाट्याला येतील का?
      मी गजाभाऊंना शतायुषी होण्याची शुभेच्छा देतांना त्यांच्या मुलांनाही शुभेच्छा देतो.  परमेश्वरांने त्यांना आयुरारोग्य प्रदान करावे अशी प्रार्थना करतो.
💐💐💐💐💐
सुभाष लाड
९८६९१०५७३४
    
   
   गजाभाऊ म्हणजे गजानन वाघदरे,
स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस,लांजा,पोस्टाची गल्ली.        

अभिप्राय******
१)
      शौकत सरांशी ओळख  नाही परंतु आपल्या लेखामुळे ती झाली. आपल्या लेखणीतून अनेकजण उलगडू लागले आहेत.

गजाभाऊ वाघदरेंबद्दलही खूप विस्तृत लिहिलंय त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने त्यांना समजून घेता आले. राजकारणाऐवजी समाजकार्याविषयीची त्यांची विचारधारा नक्कीच सार्‍यांना विचार करायला लावणारी आहे. त्यांच्या प्रकृत्तीच्या चौकशीसाठी नक्की फोन करेन.

स्नेहल आयरे 

२)
खुप सुंदर व सर्वस्पर्शी लेख. आदरणीय गजाभाऊंचे संपूर्ण आयुष्य अनुभवता आले.अभिनंदन व धन्यवाद💐💐🙏🙏
गणपत शिर्के,लांजा
३)
साथी सुभाष लाड 
आपण गजाभाऊ वाघदरे यांच्या वरचा लेख वाचला लेख वाचताना गजा भाऊंच्या सहवासातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. गजाभाऊचा व माझा सहवास गेल्या पन्नास वर्षे आहे. भाऊंना मी बालपणापासून पाहत आलो आहे.त्यांच्याबद्दल जे तन्मय तेने आपण दो लेख लिहिला आहे अतिशय सुंदर आहे सामाजिक कार्यकर्त्याला अशा प्रकारचे लेख लिहिल्यामुळे ती त्याची शाबासकी असते आपल्याला धन्यवाद!
 नाना मानकर


--------- गजाभाऊंचे निधन ------------
*आमचे वडिल*
*श्री. गजानन शंकर वाघदरे* *यांचे रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी दुःखद निधन झाले.*
*🙏🏻दशक्रिया (दहावे) विधी*🙏🏻
 *मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९-०० वा.*
*स्थळ*
*विठ्ठलादेवी मंदिरानजिक बाजारपेठ, ( तळ्याशेजारी) लांजा*
🙏🏼.  *बारावे विधी*.🙏🏼
 *गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी*
*स्थळ*
*राहते घरी, पोस्ट आॅफीसजवळ, बाजारपेठ लांजा*

           *शोकाकुल*
*मिलिंद गजानन वाघदरे*
*सुमंत गजानन वाघदरे*

1 comment:

  1. आदरणीय गजाभाऊ हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे.त्यामुळेच त्यांचे कुटुंबाही आदर्शवत आहे.लेख खूप छान, वास्तव व भावस्पर्शी आहे. अभिनंदन 🌹🌹🌹 श्री.जे.एम.पाटील

    ReplyDelete