आठवडे बाजारात शाळा बुडवून फिरणाऱ्या एखाद्या शिक्षकावरुन सगळेच शिक्षक त्याच तराजूत मोजण्याची वृत्ती आता थांबवली पाहिजे व दूर गावात इमाने इतबारे विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी पुढे आले पाहिजे.जेव्हा चांगल्याचे कौतुक होत आहे हे दिसून आले कि दुसऱ्याची वाईट वृत्ती आपोआप दबली जाते.राजापूर -लांजा तालुका नागरिक संघ गेली दहा वर्षे उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करतो आहे.अशा व्रतस्थ शिक्षकांची संघाच्या निवड समितीकडे मोठी यादी आहे.प्रत्येक वर्षी दोन शिक्षकांना पुरस्कारीत करीत असल्याने हे शिक्षक हळू हळू लोकांच्या समोर येतीलच.जेव्हा निवड झालेल्या शिक्षकांची यादी जेव्हा जाहिर केली जाते तेव्हाच त्यांना कळते की आपणास पुरस्कार जाहिर झाला आहे.त्यांनी पुरस्कारासाठी म्हणून काम केले नसले तरी आपल्या कामाची दखल कुणीतरी घेतली एवढाच त्यांना आनंद असतो.अनेक जण त्यांचे अभिनंदन करायला पुढे येतात तो सुखावतो आणि तो पुरस्कार योग्य ठिकाणी दिल्याचे संघाला समाधान मिळते.
हे शिक्षक कधीच आपण काही वेगळं काही काम करतो आहोत हे सांगत नाहीत.मात्र शाळेच्या विविध उपक्रमातून चमकलेल्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांकडून त्यांच्यविषयी कळते.त्या शिक्षकाला समाजातून दिला जाणारा आदर हा सुद्धा एक महत्वाचा निकष असतो.महिन्याभरापुर्वी मला रत्नागिरीतून शौकत गोलंदाज यांचा फोन आला.
" सर माझ्या मुलांचा कवितासंग्रह प्रकाशित करतोय आणि त्याचे प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावे अशी माझी इच्छा आहे."
मी काही एवढा मोठा साहित्यिक नाही कि माझ्या हस्ते पुस्तक प्रकाशन व्हावे आणि मी एवढाही कुठे व्यस्त नाही की मला वेळ नाही असे सांगावे.यापूर्वी दोन कार्यक्रमात मी त्यांना पाहिले होते.ते परिचीत झाले होते.त्यांच्या विचारांची झेप आणि काम करण्याची पद्धत माझ्या लक्षात आल्याने मी नाही म्हणू शकलो नाही.मी माझ्या प्रवासाचे आरक्षण केले.जाण्याच्या एक दोन दिवस त्यांची कार्यक्रम पत्रिका माझ्या हातात आली तेव्हा लक्षात आले कि त्यांनी आयोजित केलेल्या मुलांच्या समर कॅम्पचे उद्घाटन आहे व त्यात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे.सोबत पुस्तकाची पीडीएफ ही पाठवली होती.त्या लहानग्या कवींच्या पुस्तकाच्या सुंदर मुखपृष्ठावर नाव होते ' छकुल्यांचे आभाळ '.
दोन तीन महिन्यापूर्वी शरयू देसाई यांनी माटुंगा कल्चर सेंटर येथे ' बाल साहित्य संमेलन ' आयोजित केले होते.त्या संमेलनाचे अध्यक्षपद भुषविण्याची संधी मला मिळाली होती.शरयू देसाई या ग्रंथपाल म्हणून काम करतात. ग्रंथपाल म्हणजे पुस्तक देवाण घेवाण एवढ्यापुरताच विद्यार्थ्यांच्या संपर्कात असावा हा सर्वसामान्य समज त्यांनी खोडून टाकला असून मुलांना वाचनाची आवड निर्माण करतांना त्यांच्यातून नवा साहित्यिक कसा निर्माण होईल ही तळमळ उराशी बाळगून शिक्षकांच्या ही पुढे जाऊन त्या मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत असतात.बरे त्यांचे कार्य क्षेत्र केवळ आपल्या शाळेपुरता मर्यादित नाही तर कोकणातल्या अनेक उपक्रमशील शिक्षकांना हाताशी धरुन अनेक शाळांमध्ये, गावांमध्ये मुलांची गोष्टींची पुस्तके पुरवून बाल वाचनालये चालवित आहेत.त्याच शिक्षकांना घेऊन त्यांनी हे बाल साहित्य संमेलन आयोजित केले होते.पुणे, रायगड,ठाणे, रत्नागिरी अशा भागातून आलेले हे विद्यार्थी ज्या पद्धतीने व्यासपीठावर वावरत होते ते पाहून त्यांच्या शिक्षकांचे मी मनापासून कौतुक केले.त्यात रत्नागिरीहून आपले विद्यार्थी घेऊन आलेले आणि आयोजनातील प्रत्येक गोष्टीत आनंदाने सहभाग दाखवणारे शौकत गोलंदाज हे एक होते.ते तेव्हाच आमच्या संपर्क यादीत विराजमान झाल्याने संघाच्या नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली.या संमेलनाची अनुभूती आपल्याही विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून गोलंदाज सर शिपोशीतही मुलांसोबत उपस्थित होते.आपल्या विद्यार्थी छकुल्यांचे भावविश्व अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शौकत गोलंदाज सरांनी जेव्हा " तुम्ही यावं अशी इच्छा आहे " असं म्हटलं त्यांचं क्षणी " ,मी येणार " हे उत्तर मी दिलं.
आमचे मित्र शिक्षक आणि साहित्यिक श्री.दीपक नागवेकर हे त्याच जातकुळीतले असल्याने त्यांनासुद्धा गोलंदाज सरांच्या समर कॅम्प ला भेट द्यायचीच असल्याने आम्ही पिरंदवणे वाडाजून येथील शाळेत पोहोचलो. रत्नागिरी शहरातून बाहेर पडल्यानंतर बारा किमीचा प्रवास झाडा झुडपांच्या सावलीतून होत असल्याने उन्हाच्या कळांची तीव्रता तितकीशी जाणवत नसल्याने गप्पा करीत गावात पोहोचलो.'जोगेश्वरी व सोमेश्वर मंदिर हा विलोभनीय मंदिर परिसर उजव्या बाजुला ठेवून तिथेच उजव्या बाजूकडे शेतीतल्या माती रस्त्यावरुन पुढे आलं की सुकाई देवीचे आटोपशीर आणि टुमदार असे मंदिर लागते.तिथूनच हापूस आंब्याच्या झाडांनी उचलून धरल्या गत नव्याने उभारलेली दोन गाळ्यांची इमारत दिसते.आज तिच्यापुढे बांधलेला मंडप पाहून चुकीच्या ठिकाणी आलो की काय असं वाटत असतानाच शिक्षकी आवाजातले निवेदन कानावर पडल्यानं हेच आपले मकान हे शिक्कामोर्तब झाले.
आम्ही प्रवेशद्वार ओलांडताच एक रुबाबदार हसरं व्यक्तीमत्व पुढं आलं.नागवेकर सर म्हणाले ,' हे रावणंग सर'. रावणंग हे नाव मोडी दर्पण दिवाळी अंकांच्या जाहिरातीमुळे जोडले गेले आहे.आम्ही यापूर्वी कधीही भेटलो नव्हतो वा बोललो ही नव्हतो.पण आपण फार जुने मित्र असल्यासारखा त्यांच्या डोळ्यातला भाव, हस्तांदोलनातील घट्टपणा यामुळे मी माझ्या मित्रपरिवारात आलोय की काय असा भास निर्माण करून गेला.त्यानींच मला स्वागत कक्षात नेऊन पाहुणचाराचा फेटा बांधून घ्यायला लावला.फेटे बांधणारे हे सुद्धा एक शिक्षकच असल्याचे कळले आणि मलाच फेटे बांधता येतात हा माझा गृह मोडीत जात असतांना कधीतरी आपल्याला यांचा उपयोग करून घेता येईल असे नागवेकर सरांना सांगितले. व्यासपिठावर गट शिक्षण अधिकारी,आजी माजी शिक्षण विस्तार अधिकारी आणि अशाच मान्यवरांबरोबर माझा ही पुकारा झाला.संघाच्या माध्यमातून होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांची आठवण करून संघाचा अध्यक्ष म्हणून सत्कार स्वीकारताना रत्नागिरीतल्या पिरंदवणे गावापर्यंत संघाचे नाव गेल्याचे समाधान मिळाले.
नव्या जुन्या अशा शाळा इमारतींना सोबत करताना आनंदलेल्या आंब्याच्या झाडांनी त्या परिसराला देखणेपण आणले आहे.मी म्हणणाऱ्या उन्हातही या झाडांनी केवढा गारवा निर्माण केला होता.मुलांनी सादर केलेले स्वागतगीत,ईशस्तवन कुणी जाणकार संगीत तज्ञांकडून बसवल्या सारखे वाटले म्हणून सहज चौकशी केली तर या शाळेत अष्टपैलू शिक्षक आहेत ते जे मुलांना शिकवतात ते त्या त्या क्षेत्रातल्या मातब्बर माणसाला लाजवील असेच असते.त्या शिक्षकांच नाव शौकत गोलंदाज होते.त्यामुळे आत्मविश्वासपूर्वक, जोरकस आणि मुद्देसूद भाषणे ऐकून या मुलांना कुणी शिकवलं हा प्रश्न आता विचारण्याची गरज उरली नाही. 'छकुल्यांचे आभाळ ' या मुलांच्या स्वरचित काव्यसंग्रहाचे प्रकाशन म्हणजे उद्याच्या कवींना आजच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करतांना कल्पकता ,श्रम आणि पैसा ओतणारे असे किती शिक्षक असतील ?उगाच मनात ताळमेळ सुरू झाला.मुळात असे चाकोरीबाहेर जाऊन मुलांना त्यांचे आभाळ मोकळे करून देणारे शिक्षक आजही आहेत ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे.मी तर गोलंदाज सरांना त्यासाठी सलाम केलाच पण गोलंदाज सर या महिनाअखेर सेवानिवृत्त होताहेत हेही ऐकलं आणि मी उडालोच.कोणताही सरकारी कर्मचारी आपल्या सेवेच्या शेवटच्या महिन्यात आपल्या निवृत्तीवेतनाच्या फाईल पूर्ण करण्याच्या गडबडीत असतो. निवृत्तीवेतन किती बसेल याची आकडेमोड करत बसतो पण या ठिकाणी तर त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांच्यासाठी जगायचं या व्रतस्त भावनेने काम करणाऱ्या गोलंदाज सरांसाठी मी कौतुकाचे कोणते शब्द वापरावेत हेच मला कळेना.
मधुबनी चित्रकला,डान्स,फोक डान्स,बाॅलीवुड डान्स, म्युझिक,सरगम ओळख,अभिनय ओळख,फोरम कार्यशाळा अशा विविध विषयांचे मार्गदर्शन करणारे हे शिबिर रविवारी म्हणजे चौथ्या दिवशी संपणार होते. एक डोळा फळ्यावर तर दुसरा डोळा हातातल्या घड्याळावर असणाऱ्या शिक्षकांना वेळेबाहेर जाऊन काम करण्याची मजा काय कळणार ? एम एन एस ची परीक्षा किंवा शिष्यवृत्ती परीक्षा यांची तयारी करताना वेळेबाहेर जाऊन किंवा शनिवारी रविवारी सुद्धा काम करावं लागतं आणि जेव्हा अशा स्पर्धा परीक्षातून आपल्या मुलांची निवड होते त्यावेळेला त्या शिक्षकाला आपण खऱ्या अर्थाने ज्ञानदान केले याचा आनंद मिळतो. शिक्षकांनी नेमकं कसं आणि कोणतं काम करायला हवं याचा वस्तूपाठ पिरंदवणे- वाडाजून इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी निर्माण केला आहे, त्यांचं नेतृत्व शौकत गोलंदाज करतात. त्यांनी घेतलेल्या समर कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी मला उपस्थित राहायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो.
गोलंदाज सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला पुन्हा उपस्थिती लावण्याची गरज पडू नये म्हणून याच कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांनी आणि त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या शिक्षकांनी त्यांच्याबद्दल गौरव गौरवोद्गार काढताना ते ज्या ज्या शाळेत बदली होऊन गेले ती ती शाळा त्यांनी फुलवली तिथल्या मुलांच्या बरोबर तिथल्या मुलांच्या पालकांचेही प्रेम संपादन केले याचे ओजस्वी वर्णन केले.याचे प्रत्यंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मुलांच्या समोर त्यांच्या मदतीसाठी आलेला पालक वर्ग पाहून आले.
सरांनी मुलांच्या माध्यमातून राबवलेला एक अभिनव कार्यक्रम मला ऐकायला मिळाला तो म्हणजे इयत्ता सातवी पर्यंतच्या मुलांच्या कडून तीन अंकी नाटकाचे प्रयोग यशस्वी करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला. नटसम्राट या नाटकाचे त्यांनी पाच सहा प्रयोग नाट्यगृहात केलेत.त्यांचे पाठांतर,अभिनय आणि नेमक्या जागा हे सगळं मुलांना शिकवणं म्हणजे दिव्यच म्हणायचे.ते दिव्य गोलंदाज सरांनी यशस्वी केलंय.कुठून येतं हे ? न उलगडणारा प्रश्न आहे.ज्या मुलांनी त्यांच्या या उपक्रमात भाग घेतला ते उद्याचे थोर नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक असे दिग्गज कलाकार होतील याबाबत शंकाच नाही.
जेवतांना सहज गावाबद्दल चौकशी करताना मराठी नाट्यभूमीवरील सुप्रसिद्ध नटवर्य शंकर घाणेकर याच पीरंदवणे गावातले असे ग्रामस्थांकडून कळले.शिबीर संपल्यानंतर मी त्यांच्या घराला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला नमस्कार करून आलो.
रिंगणे गावचे सुपुत्र आणि गिरणगावचे प्रथितयश नाटककार म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या नाटककार ला.कृ.आयरे यांच्या नाटकांत नटवर्य शंकर घाणेकर यांनी भुमिका केल्याची माहिती मला असल्याने मी अधिक आत्मियतेनं त्यांच्या घरी गेलो.घाणेकरांचे बंधु आणि कुटुंबियांना भेटून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.याच गावातल्या सोमेश्वर मंदिराच्या रंगमंचावर नाट्यप्रयोग सादर करताना घाणेकरांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच भूमीतल्या मुलांच्या अभिनय कौशल्याला खत पाणी देण्याचं काम शौकत गोलंदाज करतात एका अर्थाने शंकर घाणेकरांचे राहिलेले काम पुढच्या पिढीकडून करून घेण्याचे श्रेय शौकत गोलंदाजांना आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
थोर नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर हे गेली अनेक वर्षे आपल्या जन्मभूमीत राजापूर मधील माडबन गावात राहतात.त्यांचा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळावा यासाठी गोलंदाज सर पिरंदवणे येथून विद्यार्थ्यांना घेऊन माडबनला जातात आणि त्यांच्या चरणांवरती घालतात.हा मोकळा ढाकळा आणि खेळकर नाट्ऋषी त्या मुलांच्यात स्वतःला हरवून जातो.त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतो.त्यांना हसवतो.आणि सहज बोलून जातो." मोठे व्हा,नाव कमवा." गवाणकरांच्या या दोन शब्दांनी गोलंदाज सरांच्या भरलेल्या डोळ्यांत आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य चमकून जाते.कसला अट्टाहास हा ?
याच शौकत गोलंदाज यांनी संघाने मे महिन्यात आयोजित केलेल्या रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहातील ' वीररत्न बाजीप्रभू ' या नाटकाचा खेळ यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली.याकरीता आणि त्यांच्या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतांना नाट्यप्रयोगाच्या सुरुवातीला संघातर्फे त्यांचा छानसे स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करतांना आम्हांस आनंद झाला.
जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी शाळांमध्ये असे शिक्षक आहेत म्हणून त्या शाळांचा दर्जा टिकून आहे.प्रश्न एकच आहे तो म्हणजे अशा शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशात आणण्याचा.
सुभाष लाड
९८६९२०५७३४
अभिप्राय********""**""
१)
शुभाषभाई,प्रेमाचा नमस्कार
स्वीकारावा!
रत्नागिरीतील त्या आंब्यांच्या गर्द
झाडीतील हळुवार साहित्यिक गारवा
आणि गुणवंतांचा ,पारिजातकाच्या
मंद सुगंधा प्रमाणे दरवळणारा अखंड
सहवास आपणास कायमच लाभत
राहो !अशी माता सरस्वती देवीच्या चरणी नम्रतापुर्वक प्रार्थना आहे!
आपले लिखाण,ही आपणास लाभलेली एक अद्भुत देणगीच आहे.
असे मी मानतो.आपणास खूपसारे
धन्यवाद !!!
विश्वनाथ चव्हाण
कोंडगे
२)
सर सगळ्या क्लिप पाहिल्यावर
आपल्या लिखाणा बद्दल आणि
अक्षर आयरे या गुणी कलावंता
बद्दल मनात आदर खूपच वाढला, तसेच आदर्श वेरळगांव
व अष्टपैलू शौकत गोलंदाज सर
यांच्याबद्दलही अभिमान दाटून आला असेच अनेक गुणी जनांना प्रोत्साहन देण्याचं आणि
त्यांचं कौतुक करणयाच काम
आपणाकडून सातयैहोत रहावं
हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
नाटककार
विद्याधर यशवंत शिवणकर 🙏
३)
शौकत गोलंदाज या रत्नाला आम्ही समाजसेवेकरता वेचलेहोते परंतु त्यांचा आदर्श शिक्षकी पेशा असल्यामुळे ते मुलांच्यातअधिक रमले आजपर्यंतची त्यांची वाटचाल लाड सर आपण अगदी आत्मीयतेने आणि तंतोतंत मांडलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि गोलंदाज सरांचे मनःपूर्वक अभिनंदन!🌹🌹🌹🌹 सर आपले लिखाण अतिशय प्रभावी ओघवती भाषाशैली आणि मनाची पकड घेणारे असं असतं म्हणूनच रसिक वाचकांना ते खिळवून ठेवते असेच लिहीत राहा आपल्या लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा!🌹🌹🌹🌹
श्रद्धा कळंबटे
४)
शौकत गोलंदाज या रत्नाला आम्ही समाजसेवेकरता वेचलेहोते परंतु त्यांचा आदर्श शिक्षकी पेशा असल्यामुळे ते मुलांच्यातअधिक रमले आजपर्यंतची त्यांची वाटचाल लाड सर आपण अगदी आत्मीयतेने आणि तंतोतंत मांडलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि गोलंदाज सरांचे मनःपूर्वक अभिनंदन!🌹🌹🌹🌹 सर आपले लिखाण अतिशय प्रभावी ओघवती भाषाशैली आणि मनाची पकड घेणारे असं असतं म्हणूनच रसिक वाचकांना ते खिळवून ठेवते असेच लिहीत राहा आपल्या लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा!🌹🌹🌹🌹
रिमा आयरे
No comments:
Post a Comment