Saturday, June 8, 2024

संस्कार कलश तेजाळत राहो!


संस्कार कलश तेजाळत राहो!
         पृथ्वीतलावर उगवणारे प्रत्येक झाड किंवा जन्मास येणारा प्रत्येक जीव एक दिवस उन्मळून पडत असतो. किती जन्मास येतात आणि किती मरतात याची गणती कोणीच करत नाही. परंतु एखादे झाडसुद्धा किती लोकांना सावली देऊन गेले, किती लोकांना फळे-फुले  देऊन गेले, किती पक्षांना घरटे बांधण्यासाठी आधार ठरले आणि ते कोठे जगले याचा मात्र आठव अनेकांना असतो आणि म्हणूनच अशा काही झाडांची आठवण मनुष्य सुद्धा आपल्या हृदयात साठवून ठेवत असतो. माझ्या माहितीत ली आणि मी पाहिलेली  अशी झाडे मी आपणांस सांगू शकतो. लांजातील सापुचे तळे या गावातील लांजा ते पावस रस्त्यावरील दोन आंबे आणि शिपोशी गावातील वाटूळ- दाभोळ रस्त्यावरील वाकडा फणस आजही अनेकांच्या लक्षात आहे कारण ही झाडे तिथे येणाऱ्या प्रवाशांना सावली देत होती त्यांची फळे त्यांच्या मालकापेक्षा वाटसरुनीच जास्त खाल्ली असतील त्यामुळेच ही झाडे आज नष्ट झालेली असली तरी तिथल्या थांब्याच्या नावावरून ती आज अमर झालेली आहेत. 
             माणसांचंही असंच आहे. माणसाच्या जन्माची आणि मृत्यूची सरकारी नोंद केली जात असली तरी  त्यातील किती नावे लोकांसाठी सोडून द्या पण त्याच्याच पिढ्यांमध्ये किती जणांना माहीत असतात. घरातील मृत व्यक्तीचा फोटो हा एक वर्षभर भिंतीवर दिसून येतो मात्र पुढे पुढे तो वातावरणात खराब होतोच पण तो लावणाऱ्यांच्या हृदयातूनही जात असतो कदाचित आपल्या फ्लॅट ला तो सुट होत नाही म्हणूनही तो काढला जातो. आपल्या हिंदू धर्मात माणसाच्या अंत्यविधी मध्ये पिंडदान करताना पुरोहिताकडून मृत व्यक्तीचे नाव त्याच्या वडिलांचे नाव त्याच्या आजोबांचे नाव त्याच्या पणजोबांचे नाव त्याच्या खापर पंजोबाचे नाव  असे मागील सात पिढ्यांची नावे विचारली जातात. जास्तीत जास्त आजोबांच्या नावापर्यंत आपण पोहोचतो आणि मग पणजोबांचे नाव विचारताच तो आपल्या ज्येष्ठांकडे अपेक्षेने पाहतो त्यावेळी कळतं की याला स्वतःच्या आजोबांचंही नाव माहित नसतं. बापाचं नाव आपल्याला माहीत असतं कारण त्याचा सहवास आपल्याला भेटलेला असतो. आजोबांचं नावही लक्षात राहू शकतं कदाचित आजोबांनी त्याला खांद्यावर खेळवलेलं असतं परंतु पणजोबाच्या नावासाठी तो ज्या वेळेला इतरांकडे पाहतो त्यावेळी त्याची अपेक्षा असते की माझ्या पणजोबाच्या आठवणी यांच्याकडे असतील आणि ते मला नाव सांगतील. जर त्याच्या पणजोबाने खापर पणजोबाने, समाजासाठी लोक कल्याणासाठी किंवा त्याच्या वेगळ्या गुणांसाठी तो प्रसिद्ध असेल तर आजूबाजूचे लोक पुढे येऊन त्याचे नाव सांगतात. कधी कधी त्या नावाबरोबर त्याच्या कर्तुत्वाच्या अनेक गोष्टी सांगू लागतात. हे ऐकताना त्याच्या नातवाला किंवा पणतुला फार आनंद वाटतो. आपण काही वेगळे आहोत याची त्याला जाणीव होते आणि तो सुद्धा आपण असंच काही वागलं पाहिजे, समाजासाठी काही केलं पाहिजे अशी मनाशी खुणगाठ बांधतो आणि तसे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. संस्काराचे चक्र हे अशा रितीने फिरू लागते. घराण्याचा इतिहास हा याचसाठी शोधायचा असतो.
         आज सकाळी मला आमचे मित्र माजी आदर्श ग्रामसेवक सुधाकर पेडणेकर यांचा फोन आला." आपल्या नागरगोजे सरांचे वडील दोन दिवसांपूर्वी वारले ".
(मृत्यू दि.५ जून २०२४)मी अवाक झालो. कारण पंधरा दिवसांपूर्वी नागरगोजे सर आपल्या घरगुती धार्मिक कार्याकरता आपल्या गावी गेले होते त्याबद्दल मला माहिती होती. तसेच दोन महिन्यापूर्वी त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या रत्नागिरीतल्या घरात मी भेटलो होतो. ९४ वर्षाचे ते गृहस्थ रत्नागिरीत आपल्या मुलाच्या घरी हवा पालट करण्यासाठी आले होते. आयुष्यभर शेतात राबणारी ही माणसं शहरातल्या घरात आवडीने राहत नाही आणि शहरात राहणाऱ्या मुलांना आपल्या आई-वडिलांनी आता आपल्या सोबत राहायला हवं असं मनापासून वाटतं त्यात आपण आई-वडिलांची सेवा केल्याचं समाधान मिळतं परंतु गावाकडच्या माणसांना गावाकडच्या मातीतच, गावाकडच्या हवेतच राहणं अधिक आवडतं एक वेळ जेवण नसलं तरी चालेल पण गावातलं घर सोडून राहणं त्यांना मानवत नाही. 
         नागरगोजे सर म्हणजे अर्जुन नागरगोजे ग्रामविकास अधिकारी, कुंवारबाव ग्रामपंचायत, ता.जि. रत्नागिरी हा त्यांचा आताचा पत्ता आहे. आमची ओळख मात्र राजापुरातल्या पाचलच्या शेजारी असलेल्या ताम्हाणे गावामध्ये राजापूर - लांजा तालुका नागरिक संघाचे चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पार पडले तेव्हा पासूनची. त्याच गावच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय पाटील यांनी ताम्हाणे गावी संमेलन घेण्याविषयी आमंत्रण दिले आणि मी त्या गावात अनेक वेळा येऊन गेलो. मला सुधाकर पेडणेकरांनी " तिथले ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे यांची भेट घ्या ते तुम्हाला सहकार्य करतील " असे सांगितल्याने मी एक दिवस सरळ ग्रामपंचायती मध्ये जाऊन बसलो. त्यांनी माझे आदराने स्वागत केले आपण साहित्य संमेलनाबाबत ऐकून आहोत आणि हा एक चांगला कार्यक्रम आहे, आपण ताम्हाण्यातला कार्यक्रम यशस्वी करू असे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक आश्वासन दिले.संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संमेलन यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.
          ग्रामपंचायतीतल्या  सरकारी अधिकाऱ्याला आपण सरसकट ग्रामसेवक म्हणूनच संबोधत असतो परंतु छोट्या महसुली गावात ल्या ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवक असतो आणि मोठ्या ग्रामपंचायतीचे काम करण्यासाठी ग्राम विकास अधिकारी असतो. ग्रामसेवकांच्या पदोन्नतीतून किंवा उच्च शिक्षणातून ही जागा मिळत असते. नागरगोजे सर हे उच्चशिक्षित असल्याने त्यांची नियुक्ती ही ग्रामविकास अधिकारी म्हणूनच झालेली असल्याने त्यांची सेवा मोठ्या महसुली गावातच झालेली आहे. 
          मी जसा त्यांच्या अधिक जवळ गेलो तसतसे त्यांच्या स्वभावाचे पैलू माझ्या लक्षात आले. बऱ्याच वेळेला ग्रामसेवक हा भ्रष्टच असतो अशी कल्पना करून ग्रामस्थ असतात परंतु गेले अनेक वर्ष आम्ही अनेक ग्रामसेवकांच्या जवळ जाऊन त्यांचे काम पाहत आलो आहोत त्यातून अनेक प्रामाणिक आणि नि:स्पृह स्वभावाचेही लोक ग्रामसेवक म्हणून अभिमान वाटावे अशी कामगिरी करत आहेत. ताम्हाणे गावात ब्रिटिश कालापासून चा नदीवरचा लोखंडी पूल  भंगारात काढलेला होता. भंगारवाल्याने काही हजारात ते लोखंडी साहित्य उचलून नेले असते. अर्जुन नागरगोजे यांनी तो लोखंडी पूल पाहिला त्यात त्यांना सोने दिसले आणि एवढ्या चांगल्या लोखंडी सामानाचा उपयोग आपण छोट्या ओढ्या नाल्यावरती साकव करण्या करिता केला तर पुढची अनेक वर्षे तिथल्या लोकांची चांगली सोय होऊन जाईल असे वाटले त्यांनी त्याबाबतचे प्रस्ताव संबंधित कार्यालयांकडे पाठवले. त्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि खनपटीस बसल्यागत जे भंगार म्हणून दुर्लक्षित केले होते त्या चांगल्या लोखंडी साहित्याचा उपयोग करून गावातील  अनेक छोट्या ओढ्यांवर साकव तयार करून घेतले. हे एवढ्याच साठी सांगतो आहे. आज-काल आपली नित्याचीच कामे करताना सरकारी बाबू चाल ढकल करत असतात परंतु एका सरकारी मालमत्तेचा गावाच्या चांगल्या कामासाठी उपयोग करून घेताना आपल्याला विविध कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतील, कागदपत्रे तयार करावी लागतील आणि तुमचा त्यात स्वार्थ काय  असा प्रश्न करून मानसिक त्रासही होऊ शकतो असे असून सुद्धा नागरगोजे सरांनी भंगारात जाणाऱ्या चांगल्या प्रतीच्या लोखंडाचा उपयोग गावच्या विकासात करून घेतला हा एक आदर्श नाही काय? त्यांच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्र जिल्हा परिषदेसोबत महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोकणातील ७० वर्षाची परंपरा असलेली अग्रगण्य संस्था राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचा ' नारायण तावडे जनमित्र पुरस्कार ' ही त्यांना प्राप्त झालेला आहे. मराठवाड्यासारख्या दूरच्या भागातून येऊन देखील त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाच्या आधारावर 'रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे' अध्यक्षपद अनेक वर्ष भूषवलेले आहे.
          आपण जनतेचे सेवक आहोत, लोकांच्या पर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचं आणि लाभार्थींचा शोध घेत त्याचा परिपूर्ण फायदा करून त्यांना देण्याचं काम हे ग्रामविकास अधिकाऱ्याचं असतं. याच भावनेने नागरगोजे सर आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात. आपल्या सामान्य ग्रामस्थांना कधी पैशाचा भुर्दंड पडणार नाही किंवा उगाच वेळ त्यांचा वाया जाऊ देणार नाही या भावनेने ते काम करीत असल्याने आज पर्यंत कोणत्याही गावातल्या कोणत्याही ग्रामस्थांने त्यांच्याबद्दल कधी तक्रार केली नाही उलट आमचे भाऊ देव माणूस आहेत असे उद्गार आम्ही स्वतः ऐकलेले आहेत आणि म्हणूनच राजापूर - लांजा तालुका नागरिक संघाच्या कामात आम्ही त्यांचे नेहमी सहकार्य घेत असतो.
           नागरगोजे वहिनी सौ.सविता या सुद्धा सुशिक्षित असून चांगल्या व्याख्यात्या आहेत. आपला फावला वेळ सत्कारणी लागावा यासाठी संत निरंकारी संप्रदायाच्या मार्फत त्या वेगवेगळ्या गावात जाऊन निरूपण देण्याचे काम करत असतात. त्यांची मुले कोकणातील प्राथमिक शाळा नेरकेवाडी व गुजारवाडी गुजर आळी येथे प्राथमिक शिक्षण झालं वराजापूर हायस्कूल, येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.पुढील शिक्षण त्यांनी कराड कोल्हापूर आणि पुणे  येथे जाऊन घेतले आणि आज उच्च अधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सेवेत आहेत. कुमार अक्षय याचे शिक्षण एम टेक पर्यंत होऊन आज तो महाराष्ट्र शासनाच्या सेवेत वर्ग दोन चा अधिकारी म्हणून काम करीत असून कुमार अजय याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.
            हे सर्व संस्काराचं देणं कुठून आलं असेल.आपली शाळा म्हणजे आपले आईवडीलच असतात नाही का ? मला त्यांच्या आईवडिलांना भेटण्याची इच्छा होती पण बीड जिल्ह्यात जाव लागणारं म्हणजे ठरवूनच शक्य होणार होतं." या की आमच्या गावाकडे ". असं बऱ्याच वेळेला नागरगोजे सरांकडून आमंत्रण आलं होतं परंतु वेळ जमत नव्हती. मला एकदा रत्नागिरीत उतरायचं होतं मी नागरगोजे सरांना फोन केला. त्यांनी आपले आई-वडील आल्याचे मला सांगितलं. मला फार आनंद झाला. त्या रात्री उशिरा मी त्यांच्या घरी पोहोचलो सकाळी उठल्यानंतर मी त्यांच्या आई-वडिलांच्या पाया पडलो, त्यांच्या डोक्यावरचा फेटा पाहून तसाच फेटा मलाही बांधण्याची इच्छा व्यक्त केली. बाबांनी मला फेटा बांधला. मला फार बरे वाटले. एक संस्कार देणारं झाड आणि त्या संस्कारतून तयार झालेला एक आदर्श ग्राम विकास अधिकारी सोबतच होते हा दुर्मिळ फोटो मी माझ्या मोबाईल मध्ये घेतला.आज त्या फोटोकडे पाहतांना एक चित्र डोळ्यासमोर येते.
             बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी गावातील साडे पाच एकराची जमीन जवळ असूनही पदरी असलेल्या पाच मुलांचा सांभाळ करुन त्यांना शिकवण्या इतकं काही त्यातून मिळणार नव्हतं. म्हणूनच मराठवाड्यात ऊस कामगार म्हणून आपल्या कच्च्या-बच्चा ना घेऊन जाणारे आई-वडील मला डोळ्यांसमोर दिसतात. मोठ्या मुलींना शिकवू शकलो नाही याचा सल सोसत शेवटच्या दोन मुलांना मात्र पाहिजे तेवढे शिकवायचं असा पण करून आई-वडिलांनी प्रसंगी मोलमजुरी केली. मुलं शिकली, चांगले कमावती झाली. त्याचप्रमाणे त्यांच्यात पेरलेलं माणुसकीचं बी सुद्धा तेवढेच सकस निघालं त्यामुळे सरकारी नोकरीत असूनही दोन्ही मुलांनी आपल्या आई वडिलांच्या नावाला डाग लागणार नाही याची आयुष्यभर काळजी घेतली.नागरगोजेसरांचे बंधू श्री.संजय नागरगोजे  बीड जिल्हा परिषदेत लेखाधिकारी पदावर काम करत असून उपलेखा व वित्वित अधिकारी पदाचा पदभार सांभाळत असतात ते श्रेणी एक चे अधिकारीआहेत.पुरेसा पैसा हातात येताच वडिलांसाठी अधिक जमीन घेऊन शेत मजुराचा शेतकरी करण्याचं काम या दोन्ही भावांनी मिळून केले.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी या मातीची सेवा केली.मुलींना शिकवू शकलो नाही म्हणून तिन्ही मुलींच्या मुलांना त्यांनी आपल्या घरी आणून त्यांना पुरेसे शिक्षण देण्याचं काम करुन शिक्षणाचा पुरस्कार केला.
            जे स्वतःला मातीतच गाडून घेतात त्यांना ही माती कोणताही आजार देत नाही.नागरगोजे यांच्या वडिलांना कधी इंजेक्शन काय पण कधी साधी गोळीही घेण्याची गरज पडली नाही.आपल्याच हाताने खणलेल्या मातीत आपल्याच घामानं शिंपून उगवलेल धान्य खाऊन आयुष्याची चौऱ्याहण्णव वर्षे निरोगी जीवन जगणारा हा खरा शेतकरी काल मातीत मिसळून गेला.उभ्या गावातील आबालवृद्धांचे आवडते 'अण्णा ' खरे पाहता हे संस्काराचे झाड होते निसर्ग नियमानुसार ते उन्मळून पडले.पण पुढच्या कैक पिढ्या त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गातील. स्वत:  अशिक्षित असूनही आपल्या मुलांच्या करवी आपल्या दारात शिक्षणाची गुढी उभारण्याचे काम त्यांनी केले आहे.आपण दैवत मानत असलेल्त्यांया भगवान बाबांचे आपल्यावर कृपाछत्र अशी त्यांची श्रद्धा होती.स्वभावातील ऋजुता आणि परोपकारी वृत्ती यामुळे आजुबाजुच्या परिसरात त्यांना आदराचे स्थान होते.त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या जन समुदायावरुन त्यांचे मोठेपण लक्षात येते.
         स्व.जनार्दन हरिभाऊ नागरगोजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी उभारलेल्या शिक्षणाच्या गुढीचा संस्कार कलश सदोदीत तेजाळत राहो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

सुभाष लाड
अध्यक्ष 
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई,
९८६९१०५७३४

दशक्रिया विधी 
सोमवार दि.१०जून २०२४
मु.पो.येवलवाडी,
तालुका - पाटोदा,
जिल्हा - बीड.

अभिप्राय+
१)
नमस्कार  सुप्रभात 
सर , 
आपण लिहिलेले दोन लेख
एक गजाभाऊ वरील आणि 
दुसरा नागोरजे सरांच्या वडीलांच्या वरील वाचून नुसतचसमाधान नाही तर 
जीवनाकडे कशाप्रकारे बघावे आणि जीवन
कसे जगावे यांचा सुंदर धडा मिळाला, आपल्या या माहितीमधून जर माणसांनी वागायचं ठरवलं तर अध्यात्म आणि 
समाजसेवा या दोन्ही गोष्टींचा आनंद त्याला पुरेपूर घेता येईल धन्यवाद सर ,अशाच अनेक प्रबोधनपर गोष्टी तुम्ही आम्हाला 
देत रहा आणि त्यासाठी ईश्वर आपणाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

विद्याधर यशवंत शिवणकर 🙏

************"दशक्रिया विधी तील काही क्षण चित्रे *********"

2 comments:

  1. श्री नागरगोजे भाऊ यांनी बऱ्याच वेळेला गावी येण्याची विनंती केली .त्यांचे कौटुंबिक चर्चा ऐकून त्यांचे आई वडिलांची भेट घ्यावी अशी इच्छा होती .त्यातच एक आधारवड वयाच्या 94 वर्षी कोसळला त्यांना भेटण्याची सल आयुष्यात मनास कायमस्वरूपी राहील .
    श्री.लाड सरांनी या ब्लॉगच्या माध्यमातून कुटुंबीयांची आदर्श संस्कार कसे असावेत आदर्श कुटुंब कसे असावे या ब्लॉगच्या माध्यमातून सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. स्व. जनार्दन नागरगोजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

    ReplyDelete
  2. सर, ब्लॉग वाचला...
    आपण जे लिहिताय ते एक कवडसा आहे.. अशी माणसं विरळ झालीत हल्ली...
    कष्ट करून परिस्थिती बदलण्याची धमक असणारी ही जुनी माणसं...

    स्व. अण्णांना विनम्र अभिवादन

    ReplyDelete