Monday, June 24, 2024

शिक्षक चुकीचं काम करणार नाहीत !

        
      आज दिवसभर दूरदर्शन वरती नाशिक मधील शिक्षक मतदार संघात मतदारांना काही वस्तूंचे वाटप करण्यात आले हे दाखवण्यात येत होते.त्यावरती उलट सुलट चर्चा होत होत्या यात किती तथ्य आहे हा भाग सोडला तरी आजकाल सर्वच थरातल्या निवडणुका पैशाच्या जोरावर होत असतात.मतदारांना मतदानाच्या आदल्या रात्री चक्क पैसे देऊन मत देण्याची खात्री करून घेतली जाते. हे आता सर्रास चालले आहे. हे असंच असतं ते त्यातून सांगण्याचाही प्रयत्न केला जातो. 
         नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या प्रचारामध्ये अमुक एक पक्ष सत्तेवर आला तर तो संविधान बदलणार अशा प्रकारचा प्रचार हा दोन्ही कडून होत होता. कुणी त्याबद्दल भीती दर्शवीत होतं तर कोणी हे व्हायलाच हवे असं मत प्रदर्शित करीत होते. पण आपल्याला हे माहीत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेबद्दल लिहिताना ज्या ज्या वेळेला आवश्यकता वाटेल त्या त्या वेळेला याच्यामध्ये योग्य तो बदल करू शकतो कारण येथील जनतेचे जीवनमान सुखी करण्यासाठी, त्यांना शांततापूर्ण जगण्यासाठी, त्यांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि सर्वांसाठी एकसारखे जीवन जगण्याची संधी देण्यासाठी संविधानाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे बदलत्या जगण्याच्या पद्धतीनुसार काही आवश्यक कायद्यांमध्ये बदल करावे लागल्यास त्यात चुकीचे काही असणार नाही १९५० पासून आजतागायत सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने त्यांना आवश्यक असलेल्या कायद्यांमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे संविधान बदलाची भीतीही घेण्याचं कारण नाही आणि ते चुकीचे आहे हेही म्हणण्याचे कारण नाही.
        हे सांगत असताना आपल्या लोकशाहीला राजकीय पक्षांकडून भीती नाही तर ती भीती सामान्य जनतेकडून आहे कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये गुंडगिरी करणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या आणि अनितिने वागणाऱ्या अशा अनेक उमेदवारांना आपण निवडून देण्याचे धाडस केलेले आहे. हे लोक प्रचंड मताधिक्याने निवडून येतात त्यावेळेला त्यांची लोकप्रियता, त्यांनी केलेली कामे किंवा त्यांची जनमानसातील छाप याचा कोणताही विचार न करता त्यानी दिलेला धाक आणि दिलेल्या पैशाला बळी पडून आपण त्यांना निवडून देत असतो आणि म्हणूनच अशा लोकांच्या हातामध्ये आपण सत्ता देतो त्यावेळेला त्यांना मनमानी करायला आपण संधी देत असतो. निवडून आल्यानंतर त्यांना आपण कोणताही प्रश्न विचारू शकत नाही कारण त्यानी आपल्याला विकत घेतलेले असते.
          ज्याने पैसे घेतलेले असतात तो कधीही कोणाला  'आपण पैसे घेतले असे सांगणार नाही त्यामुळे पैसे दिले गेले हे आपल्याला सिद्ध करता येत नाही मात्र हे पैसे वाटणारे लोक असतात त्यांना नेमकं माहिती असतं कुणाला किती पैसे दिले आणि त्या मतदान केंद्रात  आपल्याला किती मत मिळायला पाहिजे होती याचं गणित जुळवताना त्यांच्या लक्षात येतं आपल्याला पैसे घेऊन फसवलं आहे किंवा आपली आपण पैसे दिले ते उपयोगात आलेत. ज्यावेळी लोकांच्याकडून फसवलं जातं त्यावेळेला हेच पैसे वाटणारे कार्यकर्ते त्यांना जाब विचारायलाही मागेपुढे बघत नाहीत त्या वेळेला या गोष्टी निदर्शनास येतात.मात्र पैसे घेणाऱ्याबद्दल कोणाला घृणा वाटत नाही कारण आपण सगळेच त्यात बरबटलेलो आहोत.
          आता शिक्षक मतदार संघाची आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका आहेत या निवडणुकात मतदान करणारे मोजकेच मतदार असल्याने त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी उमेदवाराचे कार्यकर्ते सज्ज असतात नेमक्याच लोकांना भेटायचं असल्यामुळे त्या नेमक्या लोकांना मॅनेज करण्याची पद्धत सुरू झाली आहे आणि म्हणूनच नाशिक येथे झालेला प्रकार हा जर खरा असेल तर तो त्या मतदार साठी लज्जास्पद आहे. 
          शिक्षक तरी असे कृत्य करणार नाही अशी आमची खात्री आहे. जेव्हा या पृथ्वीतलावर शिक्षण देण्याची पद्धत सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत समाजामध्ये शिक्षकाला आदराचं स्थान मिळालेलं आहे. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांचा शिक्षक नसून तर त्याचे जीवन हे अवघ्या समाजासाठीच आदर्शवत असते. ' तुझ्या शिक्षकाने तुला हेच शिकवले काय ' हे प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक चुकणाऱ्या मुलाला ऐकावे लागत आहे. याचा अर्थ शिक्षक नेहमीच आपल्या मुलांना एक आदर्श नागरिक बनवण्याचे काम करत असतात त्यामध्ये मुलांना चुकीचं वागायचं नाही हे सांगितलं जातं त्यामुळे  शिक्षक मुलांकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा करतात त्यावेळेला ते सुद्धा चांगलेच वागत असतात. खरं पाहता लोकशाही तळागाळापर्यंत रुजवण्याचं काम हे शिक्षकांनीच केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
        आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम करणाऱ्या समाजसुधारकात शिक्षकांचा भरणा जास्त असलेला आपल्याला बघायला मिळतो. महात्मा ज्योतिबा फुले, साध्वी सावित्रीबाई फुले गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, महाराष्ट्र माऊली साने गुरुजी याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील असंतोषाचे जनक म्हणून जनसामान्यात प्रसिद्ध पावलेले लोकमान्य टिळक ही सर्व मंडळी शिक्षक होती. महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना " होय मी याच वाटेवरचा एक वारकरी आहे, शिक्षक आहे" हे अभिमानाने सांगावं इतकं संचित या व्यक्तीं मुळे महाराष्ट्रातला शिक्षकांना मिळालेलं आहे. शिक्षकी पेशाची गरिमा काय आहे एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर ठेवतो. मुंबईतील सुप्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रो या कंपनीत कामगार नेमणूक अधिकारी पदावरती काम करणारे श्री शर्मा नावाचे गृहस्थ होते दोन वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले. कामगार भरतीच्या वेळेला लेखी परीक्षा व मुलाखती यातून पुढे जावे लागते. एखादा उमेदवार हा शिक्षकाचा मुलगा किंवा मुलगी असल्यास श्री. शर्मा जास्त चौकशी न करता त्या मुलाची किंवा मुलीची नोकरी पक्की करायचे.आपल्या वरिष्ठांना सांगायचे अवघ्या जगात पाप फिरू कुणी असेल तर तो शिक्षक. शिक्षकां इतकं प्रामाणिक कुणी असू शकत नाही. त्या शिक्षकांची मुलं ही त्यांच्या सारखीच असतात अशी माझी खात्री आहे." पुढे दहा-पंधरा वर्षानंतर त्या मुलांनी कंपनीत केलेले प्रामाणिक काम पाहून आपण किती योग्य निर्णय घेतले हे ते अनेकांना सांगत असायचे. शिक्षकी पेशाचा असा गरिमा असतो हे या शिक्षकांना माहित नाहीये काय ? असे असताना हे शिक्षक चुकीचं काम कसे करू शकतील ?
            भ्रष्टाचाराने आकाश भरून गेलेले आहे पावसाळी ढगांप्रमाणे हे आकाश निवडणुकीच्या काळात ढगफुटी सारखे प्रत्येक घरावर कोसळत असते. आकाशच फुटले आपण काय करायचे असे म्हणून आपल्याला भागणार नाही. या आकाशाला ठिगळ लावण्याचं काम हे शिक्षकांनाच करावं लागेल. अगदीच नाही जमलं तरी स्वतःपुरती एक प्रामाणिकपणाची छत्री उघडून आपण त्यापासून अलिप्त राहणं हेही सोयीस्कर ठरेल.काही उमेदवार वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला प्रलोभने दाखवतीलही परंतु शिक्षकांनी अशा प्रलोभनांना बळी न पडता आपण शिक्षक असून, आपणच लोकशाही संरक्षणाचे काम करणार आहोत हे त्यांना ठणकावून सांगायला हवंय. आपल्या कृतीनं दाखवायला हवंय. तेव्हाच पुन्हा कोण्या शिक्षकाने मतदानासाठी पैसे घेतले हे म्हणण्याचं धाडस कुणी करणार नाही. ज्या काळात शिक्षकांना पुरेसा पगार नव्हता त्यावेळीही शिक्षकांनी कधी कणा वाकवला नाही, आज तर आमचा शिक्षक चांगले वेतन घेत असताना असल्या हरामाच्या पैशाकडे ढुंकूनही बघणार नाही.अशातूनही एखादा शिक्षक असे घृणास्पद काम करताना दृष्टिस आला तर त्याला योग्य ते शासन मिळण्यासाठी बाकीच्यांनी पुढे यायला हवे.जय लोकशाही !

सुभाष लाड
अध्यक्ष 
राजापूर -लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 

*******अभिप्राय******
१)
मतदानाच्या आधी हा मेसेज सर्व शिक्षकांनी वाचायला हवा. शिक्षक विकला जात नाही हे जरी खरे मानले तरी आजच्या सर्व निवडणुकीत पैसे वाटप करुन मतदाराला विकत घेण्याची पध्दतच सुरु झाली आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात वारेमाप पैशाची उधळण झाली हे वास्तव आहे.समाजप्रबोधन करणारे,मतदार जागृती करणारे,निर्भय बनो चळवळ चालविणारे सर्व निष्प्रभ ठरले हे नाकारुन चालणार नाही. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात गेल्यावर्षी हेच चित्र पहायला मिळाले.छान मेसेज 👌👍👍
गणपत शिर्के 
माजी मुख्याध्यापक 
न्यू इंग्लिश स्कूल, लांजा 

२)
अगदी सत्य आहे.....
तरीही शिक्षकांबद्दल असा खोटा प्रचार जर कोणता पक्ष करत असेल तर तो पक्ष आणि प्रचार करणारे किती खोटे वागू शकतात. शिवाय आपले ठेवायचे झाकून आणि खोटे सांगायचे रेटून असाच प्रकार सुरू आहे...
अशा पक्षाला किती सहमती द्यायची हे प्रत्येकाने भविष्यात ठरवायला हवे...
सुनिल वागळे
माजी शिक्षक, चित्रकार 

No comments:

Post a Comment