विधी मराठी शाळेत जाते ,
चर्चा झालीच पाहिजे
काल एक विधीची ध्वनि चित्रफीत पाहिली त्यात तिने आपण मराठी शाळेत नव्हे नव्हे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश घेतल्याचे सांगितले. माझ्यासारख्या अनेक मराठी प्रेमींना त्याबद्दल झालेला आनंद व्यक्त केला आणि विधीला शुभेच्छा ही दिल्या मग आता चर्चा झालीच पाहिजे असं का म्हणावं लागलं?
मित्रांनो कोणी कितीही भलामण केली तरी ज्या परिस्थितीतून मराठी भाषिक शाळा जात आहेत आणि मराठी भाषेची गळचेपी होते आहे हे चिंतनीय आहे. याचा दुरगामी विचार केल्यानंतर काही वर्षांनी मराठी शाळा बंद पडलेल्या असतील, पोकळ अस्मितेचा बाजार मांडणारे एक स्थानिक भाषा म्हणून एखादी तासिका मराठीची ठेवा म्हणून आग्रह धरतील, उपकार केल्यागत राजकारणी त्याला मान्यताही देतील, मराठी भाषा दिन हा आताच्या दिखाऊ शिवजयंती उत्सवासारखा साजरा करण्याची अहमिका सुरू होईल, गळ्यात टाय अडकवलेल्या पाल्याला किती छान मराठी बोलता येते हे सांगणाऱ्या महिलांची व्यासपीठावर गर्दी असेल, आज मंत्रालयाच्या दारात असलेली मराठी भाषा परदेशी संशोधकांच्या अभ्यासाचा विषय होऊन महाराष्ट्राच्या भूमीत परत फिरण्यासाठी ज्वलंत मराठी अभिमानी वीर सावरकरांचे ' ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ' हे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या बहारदार पण दर्दभऱ्या चालीतले गाणे आळवतील.
कुणी म्हणतील ही अतिशोयुक्ती आहे. ज्यांनी आपली मुले इंग्रजी माध्यमात घालताना आपण मराठीशी कोणती प्रतारणा करतो आहोत याचा जराही विचार केलेला नाही. त्यांच्याकडून आणखी कोणती अपेक्षा असू शकते? पण जे आपल्या आईची क्षणोक्षणी कृतज्ञतेने आराधना करतात त्यांना पावलोपावली मराठीच्या अपराधीपणाची भावना टोचत असते म्हणूनच एखादी विधी जेव्हा सुहास्य वदने लडिवाळपणे "मी मराठी शाळेत शिकणार आहे" हे सांगते तेव्हा वसंत ऋतू मध्ये पालवी फुटलेल्या वृक्षाला डवरण्याची आशा पल्लवीत करते तसे मराठी प्रेमाचा आशावाद जागृत होतो.
कोण आहे ही विधी? स्वतःच्या अभिव्यक्तीला आकाश मोकळे करून देऊन स्वत:च्या पंखांना स्वतःच ताकद देण्याचा आत्मविश्वास देऊन स्वतःचा जीवनप्रवास स्वच्छंदपणे करू देणाऱ्या सुजाण पालकांची ही प्रातिनिधिक कन्या आहे. तिच्या बोलण्यातला आशावाद ऐकला की ही आपली मुलगीसुद्धा असं बोलली पाहिजे असं वाटणाऱ्यांसाठी ती दीपस्तंभ आहे. तिला हे मोकळे आकाश करून देणारेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून तिच्या पालकांचाही परिचय या चर्चेत झालाच पाहिजे.
रत्नागिरी जिल्ह्यात उपक्रमशील प्रशाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयात गेली तेरा वर्षे अध्यापक असलेले दोनदा एम.ए. करूनही तिसऱ्या विषयात एम. ए. चा अभ्यास करीत असलेले श्री.विजय हटकर हे विधीचे वडील. इतिहासाचा शोध हा त्यांचा आवडता विषय. कोकण पर्यावरणात फेरफटका मारणे व त्याचा सूक्ष्म अभ्यास करणे हा त्यांचा छंद. सामाजिक कार्याच्या आवडीने अनेक सामाजिक संस्थांत काम करताना पुरोगामी महाराष्ट्राला अभिप्रेत असलेल्या नव्या विचारांची कास धरून उपक्रम राबवण्यात ते नेहमी पुढे असतात. ते उत्तम वक्ते आहेतच पण उत्तम निवेदक म्हणून अधिक परिचित आहेत.त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लांजा येथे झाले आहे. कुडाळला त्यांनी बी.एड. तर एम. ए. चे शिक्षण सावर्डे,चिपळूण येथे पूर्ण केले. त्यांची पत्नी सुद्धा पदवीधर आहे.
' मराठीतून शिकून मला आवश्यक ते ज्ञान आणि जगण्याची कला अवगत झाली आहे मग मी माझ्या मुलीला या समृद्धीच्या मार्गापासून दूर का करावे?' असे अभिमानाने व समाधानाने सांगणारे विजय हटकर यांनी त्यांच्या घराजवळच असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक लांजा शाळा नंबर १ मध्ये विधीला दाखल केले आहे.
आता चर्चा जिल्हा परिषदेच्या शाळांची. मला गेले अनेक वर्षे महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शाळा पाहण्याचा योग आला. सुंदर रंग रंगोटी केलेली चित्रे आणि माहिती देणाऱ्या फलकांनी सजलेल्या या प्राथमिक शाळा म्हणजे तेथील शिक्षकांनी मुलांना शाळेत रमविण्यासाठी केलेला यशस्वी खटाटोप पाहून कौतुक वाटते. सगळ्याच शाळांत संगणक असून मुलांना नवीन तंत्रज्ञान हाताळण्यासाठी शिक्षक स्वतः प्रशिक्षित आहेत. कोणत्याही खाजगी शाळांतील शिक्षकांपेक्षा येथील शिक्षक एक पायरी पुढे आहेत कारण ते निवड प्रक्रियेतूनच घेतलेले असतात. तसेच त्यांच्या कामाचा आवाकाही मोठा असतो. शिक्षणेतर सरकारी कामे इमाने इतबारे करून आपल्या वर्गातील मुलांनाही न्याय देण्याचे दुहेरी काम करताना त्यांची दमछाक होते पण हरल्याची सूक्ष्मछटाही त्यांच्या चेहऱ्यावर असत नाही. हेच शिक्षण जर ते आपल्या विद्यार्थ्यांना देत असतील, माणूस म्हणून जगण्यासाठी जगाच्या बाजारात मुलांना उतरवणार असतील तर ते त्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचे नाही काय ?
यात शाळातून शिक्षण घेऊन पुढे एमपीएससी परीक्षा पास होऊन सरकारी खात्यातील उच्च पदावरच्या नोकऱ्या मिळवणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम नुकताच एप्रिल 2024 मध्ये राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या तर्फे लांजातील कल्पना कॉलेजच्या सभागृहात पार त्यावेळी त्या मुलांच्या पालकांनी आमच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळांमधून जे शिक्षण मिळाले त्यामुळेच आमची आज मुलं यशाच्या शिखरावर पोहोचली. काही दिवसांपूर्वी आम्ही गगन भरारी या लेखातून रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून निवडलेल्या वीस मुलांना जगभरात नामांकित ठरलेल्या सर्वोत्कृष्ट अशा नासाच्या प्रयोग शाळेत जाऊन अभ्यास करण्याची संधी मिळाली असून तसेच जवळ जवळ पंधरा दिवस अमेरिकेतील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्याचा हा लाखो रुपयांचा खर्चिक कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा परिषद करते त्या वीस मुलांचे आम्ही कौतुक करतोच परंतु त्यांना शिक्षण देणाऱ्या त्यांच्या शिक्षकांचेही योगदान परिश्रम लक्षात घेतले पाहिजे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की हे सर्व शिक्षक रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या प्राथमिक शाळा तले शिक्षक आहे त्यांचेही मनापासून कौतुक. याचबरोबर एन. एम. एम. एस. अशा स्पर्धात्मक परीक्षा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेतील मुलं सहभागी होतात उत्तीर्ण होतात आणि काही हजारांच्या रकमेची शिष्यवृत्ती मिळवतात त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणाचा पालकांवरील पडणारा भार हा कमी होतो आहे. हे सर्व नजर लागण्या इतकं काम आमचे प्राथमिक शाळेचे शिक्षक करत असतात याचा आम्हाला अभिमान वाटतो.आम्ही आमच्या मुलांच्या सर्व शिक्षकांचे पुन्हा एकदा अत्यंत आभारी आहोत.
पण या शिक्षकांकडून एक चूक होताना दिसतेय आणि त्याने ती सुधारावी अशी आमची अपेक्षा आहे. बरेच प्राथमिक शाळांतील शिक्षक स्वतःच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात किंवा कुठल्यातरी खाजगी शाळेत टाकून एक तर ते आपल्याच तसेच आपल्या सहकारी शिक्षकांच्या अध्यापनावर अविश्वास दाखवत आहेत किंवा मराठी माध्यम कुचकामी आहे हे सिद्ध करत आहेत.त्यांनी आता तरी जमिनीवर येऊन मी किती चांगला शिक्षक आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण हेही सकस आहे हे दाखवून देण्याची एकही संधी गमावू नये तसेच आपणही एका खेड्यात खितपत पडलेले असताना ज्या मराठी शाळेमुळे आपले जीवन घडले ती भाषा पुढच्या पिढीचे नुकसान करणार नाही याची खात्री लोकांना देण्याची गरज आहे. विद्यार्थी आहेत तोपर्यंतच आपण शिक्षक असणार आहोत म्हणून एकेक विद्यार्थी मिळवताना आपला पाल्यही त्यात जमेस धरावा हे विसरू नका. एवढेच सांगणे आहे कारण यातूनच मराठी माध्यमांच्या शाळा टिकतील व मराठी भाषा ही.
आता खेडोपाड्यात गेलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांबाबत चर्चा ही काय करायची ! हे तर पैसे कमवण्याचे चांगले माध्यम असल्याने त्यांनी आपले धन गुंतवलेले आहे यात कुठेही सामाजिक भान अभावानेही दिसत नाही. पहारेकऱ्याला गुंगीचे औषध देऊन आतला माल लुटणाऱ्या चोरांसारखे यांचे आहे .१९६० च्या दशकात आमच्या गावागावातले समाज धुरीण एकत्र आले आणि माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था केली. बिचाऱ्या गरीब -अडाणी ग्रामस्थांनी जमेल तसा पैसा, झाड-माड देऊन त्या शाळा उभ्या राहण्यासाठी हातभार लावला. त्यात आमच्या पिढीपासूनचे विद्यार्थी गावात शिकून मोठे झाले. त्या गावकऱ्यांना सामाजिक भान होते. त्यांचे नेहमीच आम्ही कृतज्ञ आहोत. आज इंग्रजीचे दुकान मांडणाऱ्यांबद्दल कोण कृतज्ञता व्यक्त करणार आहे आणि का करावी ? हे भरमसाठ फिया गोळा करून पालकांना जेरीस आणतातच त्यात तुमच्या मुलांना अधिक शिकवणीची गरज आहे असे सांगून त्यांचे साठे लोटे असलेल्या ट्युशन क्लासेस मध्ये पैसे भरावयास भाग पाडतात. एवढे करूनही ते आपल्या मुलाला बॅरिस्टर करण्याची तसेच डॉक्टर करण्याची हमी देतात काय ?जास्त नको पण जगाच्या बाजारात स्वतःच्या हिमतीवर लाथ मारेन तिथे पाणी काढीन अशी धमक तरी त्यांच्या विद्यार्थ्यांत निर्माण करू शकतील काय ?
यांनी तर आमच्या कोकणी संस्कृतीवरच घाला घातला आहे याचे प्रत्यंतर उद्या गावागावात वृद्धांचे आश्रम उभे राहून त्यात दहावीपर्यंत मुलांचे दप्तर आपल्या खांद्यावर घेऊन शाळेत जाणारे पालक उद्या आपला मुलगा विचारत नाही म्हणून आश्रमात जातील तेव्हा येईल. आमच्या मराठी संस्कृतीत वृद्ध आई-बाबांची सेवा करण्याचे संस्कार शिकवले जातात तर पाश्चात्य संस्कृतीत बिनकामाच्या वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची व्यवस्था असते.
शिक्षण म्हणजे पैसे छापण्याचे मशीन तयार करणे नसून माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक त्या कौशल्यांची रुजवण करणे होय हे केवळ शाळेतच मिळते असे नाही तर विद्यार्थ्यांच्या आजूबाजूच्या परिसरातून मिळत असते. त्यासाठी त्या परिसराचा एक घटक होऊन जगायचे असते समाजाशी एकरूप होण्यासाठी दोघांची एकच भाषा असावी लागते ती असते मातृभाषा आणि म्हणूनच शिक्षणात मातृभाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे.
विधीला या मातृभाषेचा चांगला लाभ होईल आणि मला कोण व्हायचंय याचा निर्णय तिचा ती घेईल तोपर्यंत तिची प्राथमिक बैठक पूर्ण पणे पक्की झालेली असेल.त्यानंतर इंग्रजीचं काय ज्या ज्या भाषा तिच्या कर्तुत्वाच्या वाटेवर आवश्यक वाटतील त्या भाषा समंजसपणे आणि सहजपणे आत्मसात करील याबद्दल आम्हाला जराही शंका वाटत नाही.प्रत्येक घरातल्या विधीला हसत खेळत बालपणाचा आनंद घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच घ्यावे यासाठी ही चर्चा. तूर्तास येथे थांबूया.
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर -लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
२२जून २०२४
रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी काढलेल्या मिरवणुकीत जि.प.मराठी शाळेची मुले व सीतेच्या वेशात कु.विधी
******* अभिप्राय ******
१)
खूप समाधान वाटते.खास करून हटकर सरांचे अभिनंदन.त्यांच्या धाडसाला शत शत प्रणाम.💐💐💐💐💐
विनोद साळुंखे,कोर्ले
२)
खरं आहे चर्चा तर झालीच पाहीजे
सुर्यकांत निकम
उपविभाग प्रमुख
मनसे,मालाड
३)
नेहमीप्रमाणे खुप छान लेख, तुम्ही जनजागरण करीत आहात 👍🏻👍🏻
वीणा चव्हाण,
कवयित्री,वाटुळ
४)
वा सर आपण फार कलाकार आहात छान 👌🌹🙏शुभ सकाळ सर
लोहे,सर
मुंबई
५)
👍 आमच्या मातृभाषेचा अभिमान मराठी शाळा🙏 विधीला शुभेच्छा!
अशोक कांबळे,
संगमेश्वर
६)
तुमचं सुभाषपर्व मधून मधून वाचतो.छान लिहिता.
"तेव्हाच घराला घरपण येतं"हे पर्व खूप आवडलं.धन्यवाद.
दत्ता पवार
साहित्यिक, रत्नागिरी
७)
होय काका,
आजकाल चे पालक मुलांना इंग्रजी मिडीयम शाळेत घालतात........
सुयोग पेडणेकर,
रिंगणे
८)
अतिशय सुंदर लेख!
अभिनंदन आणि आभार.
तुम्ही निरनिराळ्या क्षेत्रात वावरता म्हणून तुमचे लेखाद्वारे मांडलेले अनुभव म्हणजे आमच्या मनातील भावनांच!
ईंग्रजी माध्यमातून शिक्षण आणि आपल्यासारख्यांची मुलांच्या बाबतीत मानसिता ( गळेलठ्ठ पगाराची सरकारी नोकरी, मानसन्मान,डॉक्टर,इंजिनिअर ई.)हा भ्रमाचा भोपळा होता हे एव्हाना कळलचं असेल. आपल्या पीढीपासून पुढे सर्वांचीच मुलं ईंग्रजी माध्यमात! पण आर्थिक परिस्थिती सुधारली असं नाही म्हणता येणार. ऊलट खालावली! शिवाय यापीढीने समाजाशी संबंध पूर्णपणे तोडले. समुहजिवनाचा आनंदही ते घेऊ शकत नाहीत.
मातृभाषेतून शिकुन मराठी आणि ईंग्रजी दोन्ही भाषा चांगल्याप्रकारे अवगत होतात अशी माझी श्रद्धा आहे आणि नोकरीच्या अगणित संधी सुद्धा उपलब्ध आहेत हे समाजाला पटवून द्यायला हवं.
विश्वनाथ धों.पेडणेकर
सेवानिवृत्त -व्यवस्थापक
कॅनरा बँक
९)
अप्रतिम bolg लिहीलाय.....
मराठी समृद्ध भाषा, मराठी संस्कार, मराठी प्रगल्भता, मराठी वातावरण, मातृभाषेतून मिळणारे खोलवर ज्ञान या सगळ्यांची उकल आपण यात केली आहे....
आपल्या लिखाणाबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन....
सुनिल वागळे
चित्रकार, भांडुप
१०)
ब्लॉग खूपच छान..!
मराठी माध्यमातून शिकण्यासाठी आपल्या पाल्यांना उद्युक्त करणाऱ्या पालकांचे मनस्वी आभार आणि अभिनंदन!!
सध्या असाही एक स्तुत्य उपक्रम चालविणे गरजेचे झाले आहे ...
कु. विधि आणि मा. विजय हटकर आणि त्यांच्या सौ. चे अभिनंदन ..!
डॉ.मंगेश हांडे,
नाटककार,उद्योजक
११)
कु.विधी चे मनःपूर्वक अभिनंदन🌹💐💐मराठी शाळा वाचवण्यासाठी आपली आपल्या संघामार्फत चाललेली धडपड आम्ही पहात आहोत. शिक्षकांना सुध्दा सुंदर उपदेश दिला आहे. खुप छान लेख.आपले अभिनंदन💐🌹🌹
गणपत शिर्के
सेवानिवृत्त मुख्याध्यापक
न्युज इंग्लिश स्कूल, लांजा
१२)
मी डॉ.सुनीता बेडसे, ठाणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. माझी मुलगी कियारा ही देखील भले ज्युनिअर सिनिअर इंग्लिश शाळेत होती. पण पहिलीला आमच्या मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे.
१३)
माझ्या दोन्ही मुलांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. आता माझ्या मुलीची मुलगी श्रीशा आणि मुलाची मुलगी अनुश्रुती या दोघींनाही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच आवर्जून प्रवेश घेतला आहे. श्रीशा सावंतवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीत शिकत आहे. अनुश्रुतीला खेडशी, तालुका रत्नागिरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत यावर्षी पहिलीला प्रवेश घेतला आहे.
प्रमोद कोनकर
ज्येष्ठ संपादक, कोकण मिडिया
१४)
व्वा सर विधीचं कौतुक तर आहेच पण तिचे आई बाबा एक चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करताहेत म्हणून या कुटुंबातील सर्वांचं कौतुक व्हायला हवं. तुमचे सगळे मुद्दे विचार करायला लावणारे आहेत. तुम्ही परिचय करून दिलेल्या सर्वांना भेटून प्रत्यक्ष अभिनंदन करायला मला आवडेल. आपण सगळे म्हणजे बोधनकर, हांडे, डुंबरे, वागळे असे सर्व वेळ काढून जाऊ पर्यटना सोबत या आधुनिक तिर्थ क्षेत्रांची गळाभेट घेऊ. बघा कसं जमवता येते ते. कार्यक्रम मात्र सुटसुटीत असावा. सगळ्यांना पुरेसा वेळ देता आला पाहिजे हे लक्षात घेऊन आखला जावा असे वाटते. आपले मनापासून आभार!
नारायण जाधव
सिने,नाट्य,अभिनेता
खूच छान परिचय.विधी आणि तिच्या पालकांचे खूप खूप कौतुक.
ReplyDelete