तेव्हाच घराला घरपण येते
अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील कोणतीही एखादी गोष्ट कमी पडली तर माणूस जगू शकत नाही इतक्या या महत्त्वाच्या आहेत.
पूर्वी प्रत्येक माणसाला स्वतःसाठी या गरजा हव्या असतील तर स्वतःलाच कष्ट करावे लागत होते परंतु पुढे व्यवहारात चलन आले आणि त्यातून अन्न निर्माण करणारे वेगळे वस्त्र निर्माण करणारे वेगळे आणि घर बांधून देणारे वेगळे आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो या सर्व गरजा त्यांच्याकडून भागवून घेतो उदाहरणार्थ पूर्वी प्रत्येक माणसाला शेती करावी लागायची आणि म्हणूनच खेडेगावात माणसं राहत असताना प्रत्येकाला शेतात राबवून आपल्या पुरता व आपल्या कुटुंबाकरता धान्य पिकवावेच लागे. आज मुंबई पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना धान्य किंवा फळभाज्या कशा पिकवल्या जातात याची माहितीही नाही मात्र हे धान्य या फळभाज्या नसतील तर त्यांचे पोट भरू शकत नाहीत. मग हे लोक आपल्याकडील असलेले चलन वापरून आपणास हवे असलेले धान्य किंवा अन्नातील इतर जिन्नस विकत घेतात. वस्त्राच्या बाबतीतही तसेच आहे ज्यावेळी लज्जा झाकण्या पुरता एखाद्या झाडाची पाने एखाद्या झाडाच्या साली यांचा उपयोग केला जात असे त्यावेळी प्रत्येकाला या वस्तू निसर्गातून आणाव्या लागत मात्र पुढे धाग्याचा शोध लागला धाग्यापासून वस्त्र होऊ लागले त्यासाठी कौशल्याची गरज लागली. मग जो कोणी वस्त्र विणू लागला त्याला शेतकरी धान्य देत असे आणि आपल्याला हवे असलेले कापड त्याच्याकडून घेत असे. काळ बदलला धान्याऐवजी चलन आले आणि चलन देऊन हवे ते कपडे बाजारात मिळू लागले. आदिम काळापासून माणसाला ऊन वारा पाऊस यापासून स्वतःला संरक्षित करण्यासाठी सुरक्षित जागेची गरज होती मग तो एखाद्या झाडाच्या ढोलीत, दगड कपारीत आणि निसर्गतः तयार झालेल्या गुहेचा वापर करत असे. त्या गुहेवरून आणि माणसांपेक्षाही निसर्गात हुशार असलेल्या पक्षांकडून माणसाला घराचा शोध लागला. आजही माणूस स्वतःचे घर स्वतःच करीत असलेले उदाहरण पाहिजे असेल तर कोणत्याही अविकसित आदिवासी पाड्यांमध्ये हे मिळू शकेल. आजही अनेक शेतकरी आदिवासी झाडांचे सरळ खोड, झाडांचे दोर, झाडांची पाने किंवा गवत यांचा उपयोग करून स्वतःच्या कुटुंबाचे घर बांधत असताना दिसून येतात. तर दुसरीकडे अनेक बदल होऊन आज-काल घरावर घर असलेल्या शंभर दीडशे मजल्याच्या इमारती दिसून येतात. याचा अर्थ माणसाची घराची गरज आहेच परंतु आपण काही वेगळ्या ठिकाणी राहत आहोत ही अहमिका वाढीस लागून जास्तीत जास्त चलन वापरून घर घेण्याची पद्धत निर्माण झालेली आहे. त्याही पलीकडे जाऊन घर केवळ राहण्यासाठी नसून घर ही एक संपत्ती म्हणून दाखवण्याची स्पर्धा निर्माण झालेली आहे. मुंबई सारख्या शहरात एखादा अनोळखी तरुण रोजगार शोधत येतो त्यावेळी तो कोणत्याही झोपडपट्टीत अगदी कागद गुंडाळलेल्या घरात स्वतःचे जीवन जगायला तयार असतो पुढे त्याच्याकडे पैसे आले की तो पक्क्या चाळीत घर घेतो अधिक पैसे आले की एखाद्या इमारतीमध्ये खोली घेतो अधिक पैसे आले की अधिक बंदिस्त अशा फ्लॅट पद्धतीच्या टोले जंग इमारतीत जातो किंवा एकर दोन एकर जागा व्यापेल अशा घराची बांधणी करतो. एकीकडे सामान्य माणूस छोट्याशा खोलीमध्ये सुद्धा स्वतःची प्रगती करत असतो त्या वेळेला ज्याच्याकडे चलन जास्त आहे त्या माणसाला अधिक जागा असलेले घर असावे असे वाटते. एक मात्र खरे जिथे समाधान मिळते, सुरक्षितता मिळते, जिथे आयुष्यात पुढे जाण्याचे स्वप्न फुलते ते घर महत्त्वाचे मग ते लहान असो अथवा मोठे. मग ती झोपडी असेल किंवा टोलेजंग बंगला.
५०-६० वर्षांपूर्वी गाव गाडा फुललेला होता. बहरलेला होता. एखाद्या पाटलाचा वाडा जसा माणसांनी भरलेला असायचा तशी एखाद्याच्या झोपडीत सुद्धा मुलाबाळांची, वृद्ध माणसांची गर्दी असे. याच घरात वेळी अवेळी येणारी पाहुणेमंडळी ही आनंदाने राहत असत. येताना जेवढ्या आपुलकीने स्वागत केले जाई, जाताना तेवढेच हिरमुसलेपण, विरहाची वेदना यजमानांच्या चेहऱ्यावर दिसत असे. काळ बदलला घराघरातली माणसं कमी झाली. कोणी पाहुणा आपल्या घरी यावा याबद्दलची उत्सुकता, आपुलकी राहिली नाही एखादा पाहुणा येतो त्यावेळेला आपण किती दिवसांसाठी आला आहात याची चौकशी केली जाते. येताना हिरमुसलेपणाने स्वागत केले जाते आणि जाताना मात्र आनंदाने निरोप दिला जातो.
" या हं परत राहायला " असं लबाड कोल्ह्यागत बोलले जाते .ही विपरीत रीत आता दिसून येऊ लागली आहे.
मी ज्या ५०- ६० वर्षांपूर्वीच्या राहणीमानाची गोष्ट बोलतो आहे. त्या काळात गावातल्या घरात जसे आपुलकीने पाहुणे येत जात होते तसेच मुंबईसारख्या शहरात सहा बाय दहाच्या खोलीतही दहा दहा माणसं आनंदाने दाटीवाटीने राहात होती. कोकणातील जास्त जास्त लोक त्याच काळात मुंबईत आले ते सगळेच काही आपल्या नातेवाईकांकडे आले नाहीत तर गावातल्या तसेच इतर गावातल्या दूरच्या ओळखीच्या माणसांच्या आधाराने आले. एखादा कर्ता तरुण गावामध्ये उनाडक्या करत असेल तर त्या गावात गेलेला चाकरमानी त्याच्या आई-वडिलांना भेटून याला गावात उनाडक्या करण्यापेक्षा मुंबईला पाठवून द्या. चार पैसे कमवेल. स्वतःच आयुष्य सुधारेल आणि तुम्हालाही चार पैशांची मनी ऑर्डर करील. तो चाकरमानी कुठल्यातरी गावातल्या मुलाला घेऊन बोटीचा, मोटारीचा बैलगाडीचा किंवा पायी असा प्रवास करून मुंबईत यायचा त्याच्या नोकरीची व्यवस्था आपल्या ओळखीच्या लोकांना बोलून करायचा. त्याची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था स्वतः जिथे राहत असे तिथेच आपल्या घरच्या माणसासारखी करायचा. त्या गावावरून आलेल्या तरुणाला जेव्हा आपण आता दुसरीकडे राहू शकतो किंवा स्वतंत्र व्यवस्था करू शकतो असे जेव्हा आत्मविश्वासपूर्वक वाटायचे त्यावेळेला तो ज्याने आपल्याला गावातून आणून अन्नास लावले त्या कुटुंबाचा साश्रू नयनांनी निरोप घ्यायचा तसेच आयुष्यभर त्या माणसाचे उपकार हृदयात जतन करून ठेवायचा. आज मुंबई जी भरली आहे माणसांनी त्यांचे पूर्वज हे अशाच प्रकारे मुंबईत आलेले आहेत आस्मादिक लेखक हाही तसाच त्यांच्या बंधूंकडे आला. आपल्या बहिणीकडे, नातेवाईकांकडे राहिला, शिकला, नोकरी केली, लग्न केले आणि ज्या वेळेला आता आपण स्वतंत्र राहू शकतो असे त्याला वाटू लागले त्या वेळेला त्यांने स्वतःचे घर घेतले पण ज्या ज्या लोकांच्या घरी तो राहिला, जिथे चहा प्यायला, जिथे जेवला, जिथे वस्ती केली त्या सर्वांच्या प्रती त्याला नितांत आदर आहे.त्यांचे उपकार तो कधीही फेडू शकत नाही. त्याच्या घरी सुद्धा अशीच अनोळखी माणसं येऊन राहिली. त्यांची दिशा त्यांना मिळेपर्यंत त्यांची सर्व व्यवस्था केली याचे समाधान आहे. यावेळी आस्मादिकांना जरा मोठी जागा मिळाली त्यावेळी गावाकडच्या कुणा तरुणाला किंवा आजारी माणसाला मुंबईमध्ये जागा नसेल तर त्याने आपल्याकडे राहावे यासाठी त्याच्या घराच्या गच्ची वरती स्वच्छता ग्रहासहित राहण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे अनेक गावच्या बैठका किंवा नाटकाच्या तालमीं साठी मोफतच जागा दिली जाते.
मी हे का लिहितो आहे ? गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात वावरताना समाजामध्ये झालेला मोठा बदल हा ठायी ठायी दिसू लागला आहे. माणूस माणसांपासून दूर जाऊ लागला आहे अशी भीती वाटत असताना काल-परवा राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने आयोजित केलेल्या महालक्ष्मी कला मंचच्या सहकार्याने वीररत्न बाजीप्रभू या नाटकाच्या कोकण दौऱ्याच्या निमित्ताने मला आलेला सकारात्मक अनुभव उपरोक्त परिस्थितीला छेद देणारा आहे. आजही माणुसकी शिल्लक आहे याचं मिळालेलं उदाहरण मला आपल्यापुढे मांडायचे आहे.
' वीररत्न बाजीप्रभू ' या नाटकाचा चार दिवसांचा कोकण दौरा होता या नाटकातील कलाकार आणि त्यांचे सहाय्यक मिळून २५ ते ३० माणसांचा चमू सोबत होता. त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची आपल्या परीने उत्तम व्यवस्था करावी असे आम्हाला वाटत होते. त्याचबरोबर सध्याची महागाई लक्षात घेता कमी खर्चात चांगलं स्वागत कसं करता येईल याबाबत साळवी सर आडाखे बांधत होते,तशी चौकशी साळवी सर व हटकर सर करीत होते.या नाटकाची जबाबदारी स्वीकारलेले महेंद्र साळवी सर विजय हटकर सर, किशोरभाई नारकर ,आप्पाजी साळवी हे माझ्यासोबत होते. यातील जास्त जबाबदारी आमच्या साळवी सरांनी उचलली असल्याने आम्ही दोघं नाटकवाल्यांच्या राहण्या खाण्याच्या सोईबाबत चर्चा करत होतो फिरत होतो. परंतु आम्हाला आमच्या आवाक्यात बसणारी जागा मिळत नव्हती. या कामात अधिक धावपळ करु शकणाऱ्या वारंग सरांची साळवी सरांना आठवण झाली.ते गावी गेल्याची माहिती मिळाली असल्याने त्यांना फोन केलेला नव्हता. परत आले असतील तर त्यांना बोलावून घेऊ या हेतूने त्यांनी लागलीच वारंग सरांना फोन केला.ते लांज्यात परत आल्याचे कळताच साळवी सरांच्या चेहऱ्यावरचा भाव नकळत बदलला.आपली काय अडचण आहे हे त्यांच्या कानावर घातली. त्यांचीही लांजात बऱ्यापैकी ओळख असून त्यांनी चांगली माणसे जोडलेली आहेत. मागच्या 'वीर शिवाजी' या नाटकाच्या दौऱ्यात त्यांनीच व्यवस्था केली होती. आपण आजच सकाळी सावंतवाडी हून आल्याचे सांगून " बघतो काय करता येते ते" असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.त्यांनी सुद्धा काही ठिकाणी चौकशी केली तिथे आर्थिक गणित बसत नव्हते. शेवटी त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावले. लांजा पासून दोन किलोमीटरवर असलेल्या केळंबे गावी अमृतसृष्टी या ठिकाणी त्यांनी नवीन घर बांधलेले आहे. साळवी सरांनी आपली गाडी काढली आणि आमचा मोर्चा त्यांचे घर शोधत निघाला.गुगल नकाशा दर्शकाने अगदी दारातच गाडी थांबवली.गाडीचा आवाज ऐकताच सर पुढे आले.प्रथम बंदिस्त अंगणाचा लोखंडी दरवाजा उघडला आणि त्यानंतर बाहेरच्या प्रवेशद्वाराचा दरवाजा उघडून आम्हाला आत घेतलं.
" हे दोन दोन दरवाजे आणि साऱ्या अंगणाला जाळ्या लावून बंदिस्त का केलंय."
मी कुतुहलाने विचारले.
" एकतर वस्तीपासून आम्ही दूर आहोत.त्यात इकडे वाघांचं फिरणं सुरू झालंय.घराजवळच कोल्ही दिसतात. तेव्हा ही सुरक्षितता आवश्यक वाटली." वारंग सरांचे हे बोलणं ऐकत घरात प्रवेश केला.तेवढ्यात बाईंनी गार पाण्याचे ग्लास पुढे केले." चहा कि सरबत ? "
आम्ही सरबत म्हणताच त्या आत गेल्या. बाईंना संघाच्या २०१४ च्या पहिल्याच विविध पुरस्कार वितरण समारंभात ओणी येथे प्रथम पाहिले होते.संघाने प्रथमतःच सुरु केलेल्या पुरस्कार वितरण करण्याच्या उपक्रमातील पहिला साने गुरुजी पुरस्कार सौ.संजना वारंग यांना मिळाला होता.त्यानंतर संघाच्या अनेक कार्यक्रमात त्या आवर्जून उपस्थित राहत असतात.वारंग सर ही तेव्हापासून संघाशी जोडले आहेत, संघाच्या कामाबद्दल त्यांनाही आदर आहे.त्यांनी अनेकवेळा घरी येऊन चहा पिऊन जाण्याचे आमंत्रण दिले होते पण योग जुळून येत नव्हता.काही दिवसांपूर्वीच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी या नवीन घरात प्रवेश केला होता.आज मात्र नव्या घरात चहा पिण्याचा योग आला.
"बरं काय झालं कामाचं ?" साळवी सरांनी मुद्द्याला हात घातला. "पहिलं आपण टेरेसवर जाऊन येऊ या." असं म्हणत वारंग सरांनी आम्हाला गच्ची वरती आणलं.केवढीतरी मोठी जागा,सोबत छान शौचालय, स्नानगृह आणि एक दहा-दहा लांबी रुंदीची खोली.बाहेर हवेशीर गॅलरी.आम्ही प्रथमच घरी आल्यामुळे ते आम्हाला नवीन घर दाखवतायत एवढेच आमच्या गावी.बरे इथे नाटकमंडळीची व्यवस्था करा असे आम्ही म्हणू शकत नव्हतो.त्यांनी खिडक्या उघडल्या.
" इथे इतकी हवा येते की रात्रीला पंख्याची गरजच नाही.सध्या गर्दीचे दिवस आहेत म्हणून एखाद दुसरा पंखा पुरेसा आहे.त्या खोलीत चार पाच महिला राहतील.बाहेर कितीही पुरुष झोपू शकतात."
साळवी सरांनी माझ्याकडे पाहिले.त्यांचा रोख माझ्या लक्षात आला. " ही तर उत्तम व्यवस्था आहे." मी दुजोरा देताच "आपण गाद्या आणून टाकू या." साळवी सरांनी तर पक्के करुन टाकले.
आम्ही खाली आलो. सरांनी नाटक कंपनीला इथे आणण्याविषयी सांगितले खरे पण त्यांच्या पत्नीला हे माहित आहे का असल्यास त्यांची संमती आहे का याची खात्री करावी म्हणून सहज बाईंना म्हटले " अहो सर इथे नाटक वाल्यांना दोन चार दिवसासाठी राहण्यासाठी या म्हणतायेत."
" वा चांगलंच आहे की जर त्यांनाही जागा पुरेशी असेल तर राहू द्या की त्यांना."
साळवी सर आणि मी निवांत म्हणे खुर्चीवर बसलो डोक्यावरचा मोठा भार कमी झाल्यासारखं वाटलं मग शांतपणे वारंग सरांशी चर्चा करून इथं लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपण आजच बाजारातून विकत आणून ठेवूया असं ठरलं. वारंग सर स्वतःच आपल्या ओळखीच्या दुकानात घेऊन आले.पाच मोठ्या दुमडणाऱ्या चटया पाच बेडशीट्स पाच हुशार आणि दोन स्टॅंडिंग पंखे असं साहित्य गाडीत भरलं. आमची गाडी कोरले फाट्यावर आली त्याच वेळेला नाटक कंपनी ही तिथे आल्याने आमच्या गाडीच्या मागोमाग त्यांना यायला सांगितले. मला त्यांच्या जेवणाची काळजी वाटली. मी तसे बोलताच वारंगसर म्हणाले "जेवणाची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केलेली आहे, हे लोक हातपाय धुवून किंवा आंघोळ करून पुन्हा त्याच गाडीत बसून जेवण करून येतील मी परत निश्चिंत झालो.
वारंग सरांच्या अमृतसृष्टी येथील घराजवळ श्री महालक्ष्मी कला मंच ची दौऱ्याची गाडी थांबली. आम्ही त्या सर्वांचे स्वागत केले आणि सर्वजण अंगणात बसलो. संजय मांडवकर आणि प्रदीप रेवाळे यांना घेऊन त्यांची व्यवस्था केलेल्या त्या गच्ची वरती आम्ही पोहोचलो. ती प्रशस्त जागा बघून ते खुश झाले " अरे वा हे तर सोन्याहून पिवळे".
आम्ही बाजारातून आणलेल्या चटया व इतर साहित्य वर दिले. त्या सर्वांनी आपल्या पथार्या मांडल्या. आणि आंघोळी करायला सुरुवात केली. वरती एकच स्नानगृह असल्याने थोडी कुच्चमना होते असे वाटू लागले. वारंग बाईंना याची जाणीव असावी म्हणून त्यापुढे येऊन म्हणाल्या
" अजून खाली दोन ठिकाणी पुरुषांना आंघोळ करण्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी त्यांना जायला सांगा ".
आम्ही न सांगताच बाईंनी त्या सर्वांसाठी चहा करायला घेतला होता.घरात स्त्रीचे असणे किती महत्त्वाचे आहे हे मी माझ्या घरात आयुष्यभर पाहात आलो आहे.मला नेमकी या वेळेला पितांबरीकार रवींद्र प्रभुदेसाई यांच्या बालपणात घडलेला प्रसंग अचानक आठवला.पाहुणे घरी आले असताना पाहुण्यांसाठी गोड शिरा करावा यासाठी त्यांच्या आईने त्यांना जिन्नस लिहिलेली चिठ्ठी पिशवी देऊन नेहमीच्या दुकानदाराकडे पाठवले पण मागील उधारी न मिळाल्याने त्या त्या दुकानदाराने त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले होते त्यावेळी त्यांच्या आईची काय अवस्था झाली असेल ? तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. आपण सहज ' अतिथी देवो भव ' म्हणतो पण घरातील स्त्रीच त्या देवाची पूजा करीत असते.माझ्यामुळे माझ्या आईला अनेकदा अवेळी जेवण करून माझ्या मित्रांना वाढावे लागले होते. त्यावेळी अनेकदा आईने मला सांगितले होते. "आम्हाला जेवण करायला आवडते आणि आपल्याकडे चार माणसे जेवली तर आपल्याला आनंदच होतो परंतु आगाऊ कळवलंस तर अधिक चांगली व्यवस्था करता येते."
मला माझ्या ठिकाणी वारंगसर दिसले आणि वारंग सरांच्या पत्नी त्यांच्या आईच्या रूपात दिसल्या.
मी या बाबतीत कधी सुधारलो नाही पण अशी न सुधारलेली माणसं जगात आहेत. वारंग सर हे त्यापैकी एक आहेत.
या नाटकात माझीही एक भूमिका असल्याने दुपारी थोडावेळ थांबून मी तालीम दिली आणि साळवी सरांना घेऊन आम्ही वेगळ्या गाठले. आज इथे नाटकाचा पहिला प्रयोग होता. आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेरूळ मराठी या शाळेत पोचलो. इथल्या पूर्वतयारीच्या कामात गुंतलो. माझा मेकअप चालू होता.मी उठल्यावर बघतो तर साळवी सर माझ्याहाठी थांबले होते.मी बाजूला आलो.हळू आवाजात साळवी सर म्हणाले वारंग सरांचा फोन होता ज्या हॉटेलमध्ये आपण या लोकांना पाठवलं त्या हॉटेलमध्ये बसण्याची पुरेशी जागा नाही तसेच तिथलं मर्यादित जेवणाने त्यांचे पोट भरणार नाही त्यामुळे मी उद्यापासून माझ्या घरीच एक दोन कामगारांना स्वयंपाक करायला लावतो. जाग्यावरच चहापाणी व जेवण मिळाले तर त्यांनाही बरे वाटेल आणि पैशाच्या दृष्टीने आपल्यालाही ते परवडेल असं वारंग सरांचं म्हणणं झालं. मी काही बोलण्या अगोदरच साळवी सर म्हणाले " मी त्यांना ओके म्हणालोय. चालेल ना?"
मी नुसताच हसलो.'तुम्ही तर दोघेही माझे बाप निघालात ' हे मला सांगायचं होतं.मी मोबाईल च्या सेल्फी कॅमेऱ्यात स्वत:ला न्याहाळत म्हटले " सर तोंडाला रंग फासून अभिनय करणं जेवढं कठीण आहे तसंच एखाद्या नाटकाचा दौरा आखणं हे त्याहीपेक्षा कठीण आहे हे मला आज कळलं. तरीही तुमच्यासारखी माणसं माझ्यासोबत आहेत त्यामुळे माझं ओझं मला ओझं वाटत नाहीये.संघाच नाव आज झालं आहे तुमच्यासारखी अनेक माणसं नि:स्पृह भावनेनं झटताहेत म्हणुनच."
वेरळ,पाचल, रत्नागिरी आणि लांजा असे चारही प्रयोग यशस्वी झाले.वारंग दांपत्याने नाटक कंपनीच्या जेवणा खाण्याची व्यवस्था आपल्याच घरी करायचं ठरवल्याने घरी कामाला येणाऱ्या माणसांना सोडून त्यांना नाट्यप्रयोगाला हजर राहता येत नव्हतं मग त्यांनीच ठरवलं रत्नागिरीच्या प्रयोगाला नाटक कंपनीच्या गाडीतून वारंग बाईंनी तिथला प्रयोग पहावा. व लांजा लांजातल्या प्रयोगाला वारंग सरांनी थांबायचं ठरवलं. एव्हाना नाटक कंपनीतल्या मुलींबरोबर वारं बाईंची चांगलीच गट्टी जमली होती. रत्नागिरीतला प्रयोग संपल्यानंतर बाईने त्यांचं भरभरून कौतुक केलं मला म्हणाल्या " वाटत नव्हतं हे असे दर्जेदार कलाकार आहेत ते. खरंच कौतुक आहे त्यांचं."
मंगळवारच्या बाजारात वारंसर आले होते तिथून त्यांनी फोन केला " आपण बुधवारी या सर्व कलाकारांना मच्छी आणि मटणाचे जेवण देऊ. दुपारी मटण आणि रात्री मच्छी करू तुम्ही सुद्धा जेवायला इकडेच या." बुधवारी दुपारी परत सरांचा फोन आला " अहो ते सगळेजण रिसॉर्ट ला पोहायला गेले आहेत त्यांचा फोन लागत नाहीये जेवण तयार आहे. तुम्ही सुद्धा निघा आणि त्यांनाही लवकर यायला सांगा."
त्या रिसॉर्ट चा फोन मंगेश चव्हाण सरांच्या कडे असल्याने आम्ही त्यांना संपर्क साधला आणि पोहायला गेलेल्या सर्व कलाकारांना लवकर परत यायला सांगितलं. दुपारी सगळे वारण सरांच्या त्या घराच्या अंगणात गाव जेवण जसं चालतं तशा पंगती बसल्या आणि चवदार मालवणी पद्धतीच्या मटणाचा आणि तांदळाच्या भाकरींचा सर्वांनी आस्वाद घेतला."
आजचा शेवटचा प्रयोग लांजा येथील विद्यार्थी रंगमंचावरती होता. रात्री एक वाजता प्रयोग संपला पण सर्व आवरेपर्यंत दोन वाजले. आम्ही सगळेच वारंग सरांच्या घरी जाऊन जेवण घेतले. नाटक कंपनीतला प्रत्येक जण वारंसर आणि वारंग बाईंना भेटून आम्हाला आमच्या घरी आल्याचा आनंद मिळाला असं भरभरून सांगत होता शेवटी या नाटकाचे निर्माते संजय मांडवकर आणि बाजीप्रभूंची भुमिका करणारे संदीप शिंदे या दोघांनी वारंग बाईंना पुष्पगुच्छ देऊन त्यांना धन्यवाद दिले.
त्यावेळी प्रदीप रेवाळेंच्या ओठांवर सहज कवितेच्या ओळी आल्या.
' घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती '
कंपनीची गाडी जरा मागे पुढे झाली आणि अंधार कापत सर्रकन पुढे सरकली.खिडक्यातून बाहेर आलेले निरोपाचे हलणारे हात वारंग बाई पाहात उभ्या होत्या.त्यांचाही हात वर आला पण त्यात जीवंतपणा नव्हता.चार दिवस किलबिलाट करून घरटं सोडून जाणाऱ्या त्या अनोळखी चिमण्यांनी त्यांच्या ह्रुदयात घर केलं होतं हे त्यांच्या नजरेतून दिसत होतं.ज्यांना घर भरलेलं हवं असं वाटतं तीच माणसं माणसांवर प्रेम करतात. त्यांच्या दृष्टीने घराला तेव्हाच घरपण येतं.
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर -लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
९८६९१०५७३४
******* अभिप्राय ********""
१)
सुभाष दादा तुमच्या लेखणीतून जे काही शब्द येतात ते वाचतात त्या काळातील लोकांचे दुःख सामर्थ्यदर्शन होते. आपल्या कुटुंबाची काळजी घेत दुसऱ्याही कुटुंब कसे आपले पाय या मुंबापुरीत रोवेल याचे प्रयत्न करत होते. त्यामुळे कोकणातील बरेचशे कुटुंब आज मुंबईत येऊन आपल्या मुलांचे शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे, काही जणांनी या संधीचे सोने केले. ज्यांनी शिक्षण नाही घेतले पण काही कला घेतल्या तेही या मुंबापुरीत सामावून गेले तुम्ही लिहिलेल्या लेखात फार जिव्हाळ्याचं नातं निर्माण होत आहे. असेच तुम्ही लिहीत राहा ज्यांना जो संदेश घ्यायचा असेल ते घेतील व त्यातून काही शिकतील. नमस्कार तुमचा दिवस शुभ जावो ही परमेश्वरचरणी इच्छा
संदीप बारस्कर,
कोंडगे
२)
खूप छान अनुभव.
दुर्मिळ झाले आहे आता.
कल्पना वाघमोडे
मुंबई
३)
व्वा सर अप्रतिम दुसरा शब्दच नाही बघा. भेटू तेव्हा बोलू.
नारायण जाधव
सुप्रसिद्ध अभिनेते
४)
छान...
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भींती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती....
अधिकची माहितीही उत्तम
ज्ञानवर्धक ........
सुनिल वागळे
चित्रकार, भांडुप
५)
आपण पाठवलेला लेख वाचला. खूप छान आहे. लेख वाचताना पुन्हा एकदा कोकण दौरा केल्याचा भास झाला. ज्या ठिकाणी राहण्याची, जेवण्याची व्यवस्था केली होती खरच अप्रतिम होती. आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या नाटकाच्या माध्यमातून कोकण दौरा करण्याची संधी मला दिलीत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद🙏😊
अविनाश गोसावी
नाट्यकर्मी, भांबेड
५)
भाई,नमस्कार!
मी नतमस्तक होऊन आपणास
धन्यवाद देत आहे.
प्रस्तुत लेखातील,"बाईशिवाय घराला
घरपण नसते ."ही ओळ वाचून खूपच
भावुक झालो आणि आमच्या सौ'च्या
फोटोकडे पाणावलेल्या डोळ्या'नी क्षणभर पहात राहिलो.
भाई,आपली लेखणी सतत लिहित
राहून देत.
मी सुध्दा उनाडक्या करणे,झाडावर
चढणे,यातच बाद होत असतानाच
कै.दिनकर तुकाराम चव्हाण यांनी
मुंबईला आणले आणि पाटेकर कुटु'बिया'नी माझे नशीब घडवले.
मी या सर्वांचा कायमच ऋणी आहे.
शुभ रात्री !!!
विश्वनाथ चव्हाण, कोंडगे
सामाजिक कार्यकर्ते
अप्रतिम
ReplyDelete