Tuesday, June 18, 2024

रोजगाराची हमी - कल्पना कॉलेज ! 🏵️🍽️🍹🧶👗👘🏵️🍽️🍹🧶👗👘🏵️


रोजगाराची हमी - कल्पना कॉलेज !
          " काका,आज मी शेर्लीन मोंटो ला चार मुलांना घेऊन जाणार आहे.तिथून परत यायला दुपारचे तीन वाजतील.आपण तीन वाजता रत्नागिरीला निघालो तर चालेल का ? " मंगेश चव्हाण सरांचा बदललेला कार्यक्रम ते मला सांगत होते. मी त्यांना होकार दिला आणि फोन ठेवला. दुपारी बरोबर तीन वाजता आम्ही रत्नागिरी तिकडे निघालो. मी बदललेल्या कार्यक्रमाबद्दल चौकशी केली तेव्हा मला कळले की मंगेश चव्हाण सर आपल्या कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मधून बाहेर पडलेल्या मुलांना योग्य ठिकाणी नोकरी मिळवून देण्याचंही काम करतात. कोकणात ओणी पासून चार किलोमीटरवर असलेल्या पाचलकडच्या रस्त्यावर शेरलीन मोंटो  हे फाइव्ह स्टार हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये त्यांच्या कॉलेजमधल्या चार मुलांना नोकरी मिळाली होती त्या मुलांच्या सोबत चव्हाण सर स्वतः उपस्थित राहिले.त्यांच्या नोकरीचा मार्ग सुकर केला तेव्हाच त्यांना समाधान मिळाले. मग मी अधिक चौकशी करता " गेल्या तीन वर्षात हॉटेल मॅनेजमेंट आणि नर्सिंग हे कोर्स पूर्ण करून जी मुले बाहेर पडली त्या प्रत्येक मुलाला नोकरी मिळवून देण्याचं काम मी शंभर टक्के केलं आहे ". हे ऐकताच मला थोडे नवलच वाटले.

                   ( बौध्दिक )
           गेल्या मार्चमध्ये साखरप्यात काही कार्यक्रमा निमित्त मी आणि सोबत साळवी सर व हटकर सर असे मिळून गेलो असता रस्त्यावरच असलेल्या संकेत हॉटेलमध्ये आपण जेवण करू असे आम्ही ठरवले. पुणे मुंबई सारख्या टाप टीप आणि बाहेरून आकर्षक वाटणाऱ्या त्या हॉटेलमध्ये आम्ही शिरलो. बाहेरच्या प्रमाणे आत मध्ये सुद्धा आपण एका चांगल्या हॉटेलमध्ये आलो आहोत याचं समाधान मिळालं. आम्ही टेबलवर बसलो. पाणी पीत असतानाच एक मुलगा समोर आला."सर मला ओळखलं ?". मी थोडा संभ्रमित पण त्याच्याकडे हसरा चेहरा करत बघत  राहिलो. चेहरा पाहिल्यासारखा होता पण आठवत नव्हतं.
" मी लांजातल्या कल्पना कॉलेजचा विद्यार्थी. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आला होतात." 
त्या मुलानं आपली स्वतःची ओळख स्वतःच करून देऊन माझी सुटका केली होती.
" हो का ! छान. इकडे कुठे ? " 
" सर मी इथेच काम करतोय ".
" कोणतं काम करतोस ?' 
" मी इथे शेफ आहे."
" किती दिवस झाले ?"
" गेल्या वर्षी परीक्षा झाल्याबरोबर चव्हाण सरांनी मला इथे पाठवलं. पुढच्या महिन्यात वर्ष होईल."
" कसं चाललंय."
" छान चाललंय सर, मी बनवलेले मेनू लोकांना आवडू लागलेत. माझे मालकही खुश आहेत."
         ऑर्डर घेणाऱ्या मुलाने आम्हाला हवे असलेले मेनू टिपून घेतले व तो निघून गेला.अशा हॉटेलमध्ये नव्याने बनवूनच पदार्थ मिळतात त्यामुळे आम्ही गप्पागोष्टी करत बसलो. आम्ही सांगितलेले बटर चिकन आणि पराठे आमच्यासमोर आले. मला तर मेनू फारच आवडला पण साळवी सर आणि हटकर सर यांचे मत आजमवावं म्हणून त्यांच्याकडे पाहिले.
" खरच सुंदर ,चवदार, पण त्यानेच बनवले असेल का?."
" मला वाटतं त्यानेच बनवले असणार.'
आम्ही बिल देऊन निघता निघता परत तो मुलगा भेटावयास आला.
" सर आवडलं का जेवण ?."
" अरे ,आवडलं हे सांगण्यासाठी मी तुला बोलावणार होतो पण तूच आलास. छान आहे. असंच नाव कमव मोठा हो."
" हो सर, चव्हाण सरांना सांगा मी भेटलो होतो म्हणून."
" नुसता भेटला होतास म्हणून सांगणार नाही तर तुझं कौतुकही करेन."
जेवढ्या आपुलकीने तो मुलगा समोर आला तेवढ्याच अदबीनं  तो चार शब्द बोलला आणि तेवढ्याच नम्रतेने वाकून नमस्कार करत , आम्हाला निरोप देत तो माघारी फिरला.
.                    ( सभागृह )

        गाडीत बसल्यावर आमची चर्चा मंगेश चव्हाणसर आणि त्यांचे कल्पना काॅलेज याच भोवती फिरत राहिली. मंगेश चव्हाण यांचे वय बत्तीसच्या आसपास असावं. या वयात त्यांनी स्वतःचं कॉलेज निर्माण करावं आणि ते दर्जेदार कसं ठरेल तिथे प्रवेश घेतलेला मुलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी कसं साहाय्यभूत ठरेल, त्यांच्यात आत्मविश्वास कसा वाढेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून गेल्या तीन वर्षात या कॉलेजनं नाव तर कमावलच पण एक वेगळा ठसा निर्माण केला. तो वेगळा ठसा म्हणजे इथं येणाऱ्या आणि उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक उमेदवारास नोकरी मिळवून देण्याचं त्यांचं आश्वासन ते शंभर टक्के पूर्ण करतात. 
    ( इथे मान्यवरांची उपस्थिती असते )
         या कॉलेजच्या शुभारंभाच्या कार्यक्रमापासून ते प्रत्येक वर्षाच्या वेगवेगळ्या थीम घेऊन सादर करणाऱ्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात मी सहभागी असतो. एक तरुण मुलगा प्रभानवल्लीतल्या प्राथमिक शाळेत शिकून तिथल्याच माध्यमिक शाळेत पुढचं शिक्षण पूर्ण करून मुंबईत येऊन हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण घेतो. परदेशात जाऊन मोठ्या पगाराच्या नोकरीचा  समोर रस्ता असताना " मला नोकरी करायचे नाहीये तर मला अनेकांना नोकरी उपलब्ध करून द्यायची आहे."
असा निश्चय करून हा तरुण परत गावाला येतो. एम एस सी आय टी चे वर्ग सुरू करतो. अशाच एका हॉटेल मॅनेजमेंट मध्ये अनुभवासाठी शिक्षक म्हणून काम करतो आणि आत्मविश्वास बळावल्यावर स्वतःच कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे लांजा मध्ये सुरू करतो. हे पाहून मला या तरुणाबद्दल फारच कौतुक वाटते. आज मुंबई पुण्यामध्ये तशा नोकऱ्या फार राहिल्या नाहीत आणि मराठी माणसाने नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करून गुजराती मारवाड्यांसारखे उद्योजक व्हावं असं मला वाटतं. मंगेश चव्हाण त्या मार्गावर आहेत म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. 
( चविष्ट खाद्य पदार्थांची सुसज्ज कार्यशाळा)

          हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग कोर्स किंवा फॅशन डिझायनिंग कोर्स देणारी अनेक कॉलेजेस आपल्या आजुबाजूला असतात पण त्या कॉलेजांपेक्षा कल्पना कॉलेज हे काही वेगळं आहे. इथे प्रवेश घेणारी मुलं वर्षभर वेगवेगळ्या हॉटेल्स ना वेगवेगळ्या हॉस्पिटल्स ना किंवा वेगवेगळ्या कंपन्यांना  शैक्षणिक भेटी देत असतात.गतवर्षी बारामतीच्या कॉटन किंग ला सुद्धा या कॉलेजच्या फॅशन डिझायनींगच्या वर्गातील मुलांनी शैक्षणिक भेट दिली. या शैक्षणिक भेटीकडे नुसतं सहल म्हणून पाहिले जात नाही तर त्यातून सहप्रवासाचा आनंद मिळतोच पण एखादे हॉटेल किंवा हॉस्पिटल किंवा कंपनी यांची मॅनेजमेंट कशी चालते याचा अभ्यास केला जातो. परक्या व्यक्तीशी बोलण्याचा त्यातल्या त्यात अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तींशी बोलण्याचा वेगळा अनुभव आणि आत्मविश्वास मुलांना मिळतो. आपले गाव किंवा शहर आणि इतर ठिकाणची गावे आणि शहरे यांच्या मधला फरक अभ्यासला जातो. त्यातून पर्यटन ही घडते आणि नेहमीच पर्यटन केल्याने अनुभवाची शिदोरी वाढते हे मुलांच्या प्रत्ययास येते.शालेय जिवनात जेवढा आनंद सहलीमधून मिळाला नसेल तेवढा आनंद यांच्या शैक्षणिक भेटीतून मिळतो म्हणून आनंदाने या शैक्षणिक भेटीसाठी आतुर असतात.

  ( वार्षिक महोत्सवाची शानदार तयारी)
           या काॅलेजचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मुलांच्या कलागुणांचा आविष्कार असतो.या कार्यक्रमाद्वारे कधी कोळीवाड्यात तर कधी गोव्यात तर कधी कश्मिर मध्ये वावरल्याचा भास अनुभवताना तिथले खाद्यपदार्थ ही चाखता येतात.विद्यार्थ्यांनी सादर केलेले तिथले सांस्कृतिक जीवन पाहून विद्यार्थ्यांचे पालक व हौशी प्रेक्षक आनंदून जातात.ते तीन तास आपण खरंच त्या त्या प्रदेशात वावरतो आहोत की काय असे वाटल्यावाचून राहात नाही.ते सर्व खाद्यपदार्थ हाॅटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी बनवतात तर त्या त्या प्रदेशात वापरला जाणार पेहराव म्हणजे ते कपडे फॅशन डिझायनिंग चे विद्यार्थी स्वतः शिवतात.ते पाहून त्यांचे पालक सुखावले नाहीत तरच नवल.
         ( संगणक कक्ष )

        मंगेश चव्हाण एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे या काॅलेज मधून कमविण्यापेक्षा त्याचा फायदा अधिकाधिक मुलांना कसा होईल याकडे त्यांचा कल असल्याने अगदी माफक शुल्कात ते शिक्षण देत असतात.याच शुल्कात दुपारचे जेवणही असल्याने दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. हाॅटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना लग्नसमारंभात किंवा हाॅटेलच्या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळवून दिली जाते.त्याद्वारे मिळणाऱ्या पैशातून मुलांच्या पाॅकेट मनीची सोय होते.संपूर्ण कोर्स हसत खेळत पार पाडल्यानंतर नोकरीची हमी असतेच पण कुणाला स्वतंत्र व्यवसाय उभारायचा असेल तर त्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
    ( इथं वाचन संस्कृती जोपासली जाते )

        लांज्यातल्या मुंबई गोवा हमरस्त्यावर लांजा हायस्कूल लगेच नजरेत भरते.तिथून पुढे दोनशे मीटर वर उजव्या बाजूच्या तीन मजली इमारतीवर कल्पना कॉलेज चे मोठे फलक झळकताना दिसतात तिथेच दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर या काॅलेजचे वर्ग भरतात. एखाद्या शाळेचा किंवा काॅलेजचा दर्जा ठरवितांना परिक्षक प्रथम स्वच्छता गृहात जाऊन येतात.मुलांच्या या सुविधेचा ज्यांनी गांभीर्याने विचार करुन ते अधिक आनंददायी करण्याचा  प्रयत्न केलेला असतो त्यांचे पुढील परिक्षण केले जाते.मी मुद्दामहून अचानक कल्पना काॅलेजच्या स्वच्छतागृहात जाऊन आलो.आधुनिक पद्धतीने बनविलेले हे स्वच्छतागृह स्वच्छ असल्याचे,पुरेसे पाणी असल्याने आणि बेसिन वर आरसा लावल्याने मला केसांवर हात फिरवत याचा मोह आवरता आला नाही.
       प्रिन्सिपॉलच्या ऑफिसच्याबाहेर पुस्तकांची केलेली मांडणी पाहून कुणालाही पुस्तक चाळण्याची इच्छा होतेच.वाचनाची आवड निर्माण करतांना काही पुस्तके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे हे या काॅलेजने कृतीत आणले आहे.दर आठ दिवसांनी तिथली पुस्तके बदलली जातात.त्यांच्याकडे बऱ्यापैकी पुस्तक साठा असल्याचे पाहायला मिळाले.सगळ्याच वर्गात नैसर्गिक प्रकाश व हवा असल्याने अधिक आल्हाददायक वाटते.
( मंगेश चव्हाण -इथं व्यवसाय शिक्षणाची गरज आहे.)
         कोकणातील मुलांना त्यांच्या पायावर उभे करणारे शिक्षण हवे आहे.मंगेश चव्हाण यांनी सध्या तरी हे नेमके कोर्स उपलब्ध केले आहेत.असे अनेक कोर्स किंवा असे पदवी अभ्यासक्रम इथे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी अशा मंगेश चव्हाणांची गरज आहे.तूर्तास मंगेश चव्हाणांचं कौतुक करताना त्यांनी अधिकाधिक कोर्स इथे आणावेत व असंख्य तरुणांचे दीपस्तंभ व्हावे अशा शुभेच्छा देतो!.

सुभाष लाड 
अध्यक्ष 
राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 

******** विविध शाखा ********

अभिप्राय --------

आत्यंतिक आदर, प्रशंसनीय, कौतुकास्पद कार्य!
कोकणकरांच्या काही पिढ्या मुंबईत आहेत.
ते शिकलं. पद, प्रतिष्ठा,मानसन्मान आणि मुख्य म्हणजे आर्थिक स्थैर्य आले.
पण त्यांची समाजसेवा फक्त शाळा, कॉलेज मधील मुलांना शैक्षणिक साहित्य इत्यादी पुरवणे किंवा स्पर्धा,उत्सव प्रायोजित करण्यापुरता मर्यादित राहिली.
खरी गरज आहे ती रोजगार निर्मिती आणि स्थानिकांना उद्यमी बनविणे याची! 
आपोआप शहरांकडे येणारे लोंढे अडविणे!
तुमची वरील पोस्ट म्हणूनच मला एक आशेचा किरण वाटते.
अश्या लोकांची समाजच असायला हवा.
धन्यवाद!

विश्वनाथ धों.पेडणेकर, रिंगणे 

1 comment: