आता शाळा भरत नाहीत....
१३ जून किंवा १४ जून हा उन्हाळी सुट्टीनंतर आमच्या शाळा भरण्याचा पहिला दिवस. गेल्या काही वर्षापासून* *कोकणातल्या शाळा या उघडतात पण भरत नाहीत. शाळा भरण्याचे दिवस आम्ही पाहिलेत मात्र ते कधीच संपलेत आता फक्त शाळा* *उघडतात त्या सुरू असतात. शाळा भरून गेल्याचा आनंद या शाळा इमारतींना आता पारखा झालाय.*
*काय गंमत आहे पहा दहावी बारावीचा निकाल लागतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंदी कोण असेल तर तो कोकणी माणूस कारण काय तर महाराष्ट्रातल्या उभ्या शिक्षण विभागात अव्वल दर्जाचा निकाल कोणाचा असेल तर तो कोकणचा. याचा अर्थ कोकणातली मुलं हुशार आहेत, याचा अर्थ कोकणातल्या शाळेतले शिक्षक हे तज्ञ आहेत-मेहनती आहेत, याचा अर्थ कोकणातलं वातावरण हे शालेय शिक्षणासाठी पूरक आहे असं असून सुद्धा आमच्या शाळा भरत नाहीत का? आपण कधी विचार केलाय याचा? आम्ही विचार केला आहे पण आमच्या विचारांना कोण विचारतो, ज्यानी हा विचार करायला हवा आहे त्यांच्या गावी हा प्रश्न आहे का ? बरं त्यांना तरी आपण प्रश्न विचारू शकतो का? नाही .कारण त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण मत विकलं तेव्हाच गमावून बसलो आहोत. मग आता पुढे काय? आता पुन्हा एकदा लोकशाहीचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. आता पुन्हा एकदा आमच्या कोकणात आमच्याच सुपुत्रांना उद्योगधंदे आणावेत यासाठी साकडं घालणं आवश्यक आहे. आमच्या शिकल्या सवरल्या मुलांना पुढचं उच्च शिक्षण देण्याच्या सोयी सुविधा आपल्यालाच करायला हव्यात. यातून बाहेर पडलेली काही मुलं बाहेर जातील. काही मुलांनी तरी इथे थांबून इथे रोजगार करून इथे स्थायिक व्हायला हवंय. तो इथे स्थायिक झाल्यामुळे त्याचं इथल्याच मुली बरोबर लग्न होईल. त्याच्या संसार वेली वरती फुल येतील आणि मग इथल्या शाळा भरू लागतील.*
*आमच्या आमच्यासारख्या अनेकांचा त्याच काळात जन्म झाला ज्या काळात आमचे समाज धुरीण दूरदृष्टी असलेले, समाजातले- गावातले पुढारी एकत्र येऊन त्यांनी माध्यमिक शिक्षणाची आपल्या मुलांची गरज भागवण्यासाठी गावात शाळा उभारण्याचं स्वप्न बाळगलं. गावातलाच कुणीतरी दानशूर माणूस जमीन देतो. माध्यमिक शिक्षणाच्या स्वप्नाला पालवी फुटते. सारागाव जमा होतो.दगडमातीच्या पायासाठी आखणी होते. गावात चरी खणणारे, घरांचा पाया बांधणारे, घरांच्या भिंती बांधणारे, घरांचे लाकूड काम करणारे सगळे उत्साहातील वातावरणात एकत्र येतात आणि कामाला लागतात. हा हा म्हणता चरी खणली जाते, चरीमध्ये दगडांचा चिखलांचा खच भरला जातो, जमिनीलगत चरी भरून झाल्यावर दगड काम करणारे दगडांना योग्य तो आकार देतात दगडाला दगड आणि थरावर थर रचून पाया तयार होतो. मधल्या जागेत माती भरण्यासाठी बाया बापड्या डोक्यावरचे घमेली भरून माती टाकतात, दगड टाकतात, जमीन तयार होते. पाणी मारून लाकडाच्या धनु कली सारख्या वाकड्या काठीने जमीन ठोकली जाते, ती अधिक गुळगुळीत करण्यासाठी दांडगे पुरुष हातात चोपणे घेऊन बाजूला पाण्याचा टोप घेऊन ती जमीन दाण दाण करीत सरळ आणि निमुळती करतात. भिंती चढतात दरवाजे लागतात. सुतार लाकूड काम करतात आडं ठेवलं जातं, वासे मारले जातात रीप बसवली जाते आणि मग येतात गाडी भरून कौले. बस, शाळेची इमारत झाली.
गावातच काय पंचक्रोशीत - दशक्रोशीत ही शिक्षक नाही मग शाळा चालवायची कशीअसा प्रश्न निर्माण होतो. पण चार गाव फिरून आलेले धुरीण त्यांना सांगतात काही काळजी करू नका शिक्षकही आपल्याकडे येतील. आणि मग त्यांचा मोर्चा वळतो घाटमाथ्यावर कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे. वर्तमानपत्रात बातमी दिली जाते आणि मग एक दिवस दरवाजे नसलेल्या, कपाट -खुर्ची- टेबल नसलेल्या त्या इमारतीत घोंगड्या टाकून शिक्षकांच्या मुलाखती सुरू होतात. ऊसाचे मळे पिकवणाऱ्या, ज्वारी बाजरीचे माळांवरती पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं शिकून शिक्षकाच्या नोकरीसाठी कोकणातल्या या दुर्गम भागातही काम करायला तयार होतात.*
खरं सांगू तेव्हाही मुलं माध्यमिक शाळेत जायला तयार नव्हती.एक तर सातवी झाल्यानंतर आपल्या मुलाने शेती करावी. जास्तच मुलं असतील तर एखाद्याने मुंबईत जाऊन नोकरी करावी ,एखाद्याने शेती करावी आणि आपल्या घराला हातभार लावावा एवढेच स्वप्न आमच्या कोकणी माणसाचं त्यावेळेला होतं. मग हे धुरीण अशा माणसाच्या घरी जायचे. घरी भेट झाली नाही तर शेताच्या बांधावर जायचे. शाळा सुरू होण्याचा काळ आणि शेत नांगरणीचा काळ एकच असल्यामुळे शाळेपेक्षा आपल्या शेताची नांगरणी महत्त्वाची असा मानणारा हा कोकणी माणूस आपल्या मुलाच्या हातात नांगर देण्यासाठीच पुढे असायचा. आपल्याला भेटायला गावातला मोठा माणूस आणि त्याच्याबरोबर आलेला अनोळखी माणूस हे पाहून आमचा कोकणी शेतकरी जोत जाग्यावर उभं करून त्यांच्यासोबत बांधावर बसायचा. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा करत हातातल्या पान सुपारीची चंची पुढे करत कशासाठी येणं झालं याची विचारणा करायचा. आणि मग बोलू लागायचा अनोळखी माणूस तो शिक्षक असायचा हे त्याच्या बोलण्यावरून कळून यायचं कारण आपल्याकडचा शिक्षक हा देशावरचा असतो ही पक्की धारणा त्यावेळेला झालेली होती. मग आढेवेढे घेऊन का होईना आठवड्यातले एक-दोन दिवस शेतीसाठी रजा करण्याचे मान्य करून त्या मुलाला शाळेत प्रवेश दिला जायचा. आमच्या पिढीतील अनेक मुले आमच्याबरोबर माध्यमिक शाळेत न येता त्यानी नांगर धरणे किंवा मुंबईत जाऊन नोकरी करणे पसंत केल्याचे आजही आम्हाला आठवते. परंतु अशाही परिस्थितीत गावातली आणि गावाच्या शेजारच्या गावातली बरीच मुले शाळेत येऊ लागली आणि शाळा भरू लागली.अगदीच सुरुवातीला शाळेचा निकाल हा एक आकडीच असायचा कारण शेतीचं काम करून जमेल तेव्हा शाळेत जाणारे आणि शाळेतला पट टिकवण्यासाठी गैरहजेरी सहन करून शिक्षक शाळा चालवीत होते. मुलांचा आणि शिक्षकांचा शिक्षणाचा सूर जुळत नव्हता. हळूहळू घडी बसली. मिसरूड फुटलेली मुलं शाळेच्या मैदानावर हुतुतू खेळू लागली, हॉलीबॉल खेळू लागले, वादविवाद स्पर्धेत भाग घेऊ लागली, प्रयोगशाळेत बेडकं कापण्याचा आनंद घेऊ लागली, गायन कला -अभिनय कला -वाद्य कला यासाठी शाळेच्या वार्षिक महोत्सवात संधी मिळू लागली. हुशार विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू लागली. विद्यार्थ्यांच्यात अभ्यासात पुढे जाण्यासाठीची चुरस निर्माण झाली आणि हळूहळू शेतकी कामापेक्षा शाळा बरी असे मुलांनाही वाटू लागले आणि शाळा भरू लागली.
त्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीतच आनंद मानणारे लोक असल्याने सगळ्याच घरात नव्वदी शंभरी गाठलेले वृद्ध त्याचबरोबर नातवंड पणतवंड यांच्याबरोबर एक-दोन कर्ते पुरुष ,चार दोन रानात राबणाऱ्या बाया असा पंधरा-वीस माणसांचा गोतावळा एकेका घरात राहत असे. अकरावी किंवा दहावी उत्तीर्ण झालेला मुलगा हा रोजगार करण्यासाठी मुंबईला जायचा. गावातली पाच पंचवीस मुलं अशी प्रत्येक वर्षी बाहेर पडू लागली. सुरुवातीच्या दहा-पंधरा वर्षात त्यामुळे शाळेच्या पटावर तो परिणाम दिसत नव्हता पण पुढे मात्र दोन किंवा तीन तुकड्या भरेनाशा झाल्याने एकाच तुकडी वरती विद्यार्थी संख्या आली तेव्हा मात्र आमच्या शिक्षकांना, गाव धुरीणांना शाळेच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने काळजी वाटायला लागली. हे कशामुळे होत आहे याचा कोणीही विचार केला नाही कारण वयात आलेल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं हे सर्व मान्य आहे मात्र त्याने कुठे उभं राहायचं याबाबतीत ज्यांनी विचार करायला हवा होता त्यांनी केला नाही. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपल्याला गाव सोडावा लागतोय याचंही भान त्या तरुणांना नव्हतं कारण ज्या कष्टमय जीवनातून आपण आलेलो आहोत त्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवण्यासाठी मला काबाड कष्ट करायचे आहेत एवढेच त्याला माहीत होतं. कोकणात आजूबाजूला कुठला तसा उद्योग धंदा नव्हता, कुठलीच अशी कंपनी नव्हती, की कुठलंच असं कार्यालय नव्हतं की जिथे आपण जाऊ आणि मुलाखत देऊ. त्यामुळे गावातला रस्ता हा तालुक्यावरून थेट मुंबईकडे जातो एवढेच आपल्या कोकणी माणसाला आणि शिक्षण घेऊन पुढे आलेल्या तरुणाला माहीत होतं.
बरे आपली शिक्षण पद्धती ही इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी प्रशासकीय सेवेत कामात मदत होईल अशा तरुणाईला शिक्षण देऊन पुढे आणणं एवढंच त्यांचं काम होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपण कृषीप्रधान देशात कृषी क्षेत्र वाढवले पाहिजे, यासाठी कृषक वाढले पाहिजेत हा विचार करून शिक्षण पद्धतीत सुद्धा कृषी ज्ञान देणं गरजेचं होतं मात्र आपण ते करू शकलो नाही. उलट गळ्यातला टाय हा कुठल्याही मातीत राबण्यासाठी नाही, कुठल्याही पारंपारिक व्यवसायामध्ये काम करण्यासाठी नाही तर तो केवळ आणि केवळ पोशाखी जीवन जगण्यासाठीच असतो हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आलं होतं आणि म्हणूनच शाळेची पायरी चढणारं मूल हे कधीच शेतीची वाट धरणार नाही हे समजून जायला हव होतं. कारण तो संस्कार शाळेतून दिला जात नाहीच परंतु घरातूनही तो दिला जात नाही.
काही दिवसापूर्वी माझ्या ऐकण्यात आलं की शनिवारची शाळा सुटल्याबरोबर देशावरचे लोक घरी त्यांच्या गावी पळतात. ज्याने सांगितलं त्याचा दृष्टिकोन हे शिक्षक शनिवार रविवार शाळेला वेळ देत नाहीत हे सांगण्याचा होता. मी त्या दृष्टीने अभ्यास केला हे देशावरचे शिक्षक शनिवारी रविवारी आपल्या गावाकडे का जातात तर त्या गावात त्यांची शेती असते. त्या शेतीत राबण्यासाठी ते जात असतात जर त्याला शेतीसाठी राबणं आवडतं तर त्याने आपल्या विद्यार्थ्यांना शेतीत राबण्यासाठी तयार केले नसते का परंतु आमचा अभ्यासक्रम शेतीत राबण्याचे संस्कार देत नाही. दुसरीकडे आता कोकणातल्या शिक्षकांची संख्याही वाढलेली आहे मात्र त्यातील किती लोक आपल्या गावात राहतात किंवा आपली वडिलोपार्जित शेती करतात ? त्याचं उत्तर नाही असंच आहे. माझ्या माहितीतील गो.ना. चव्हाण सर हे रिंगणे आणि त्यानंतर कोंडगे येथील माध्यमिक शाळेत काम करत होते. त्यांचा जन्म मुंबईचा, शिक्षण मुंबईचं. वडिलांची सेवानिवृत्ती आणि त्यांचं पदवी शिक्षण पूर्ण होण्याचं वर्ष एकच. वडील सेवानिवृत्तीनंतर शेतीच्या कामासाठी गावी आले त्यावेळेला आपल्या मुलालाही घेऊन ते गावी आले आणि त्या पावसाळ्यात त्यांनी आपल्या मुलाला आपल्याबरोबर शेतीच्या कामात राहण्यासाठी गावीच ठेवले. त्या तरुणाला त्या शेतात राबणे आवडले. सुदैवानं पुढच्या वर्षी त्याला रिंगणे येथे शिक्षकाचे पद रिकामे असल्याचे कळल्याने त्याने तिथे नोकरीला सुरुवात केली. रिकाम्या वेळेत ते आई-वडिलांच्या बरोबर शेतीत राबू लागले. पुढे त्यांच्याच गावात अर्थात कोंडगे गावात हायस्कूल निर्माण झाल्याने त्यांनी तिथे नोकरी करणे पसंत केले. शाळेचा उत्कर्ष आणि त्यांच्या शेतीचा उत्कर्ष हा बरोबरीने चालत होता. शाळा गावातच असल्याने ते अधिकचा वेळेस शाळेसाठी देत होते मात्र फावल्या वेळेत ते भात शेती नाचणी इत्यादी पिके घेण्यात ते कमी पडले नाहीत. त्यांनी स्वतंत्र घर बांधले त्या घराच्या आसपास त्यांच्या श्रमातून फुलणारी शेती पाहून मन प्रसन्न वाटे. त्यांनी लावलेली नारळाची झाडे आजही त्यांच्या घराच्या सभोवार डौलाने उभी आहेत. चव्हाण सरांचा मी विद्यार्थी होतो याचा मला नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे आज चव्हाण सर नाहीयेत पण त्यांनी दिलेले संस्कार माझ्यासोबत आहेत, त्यांनी लावलेली झाडे त्यांच्या घराजवळ जाताच सरांसारखेच स्वागत करताहेत असे वाटते.
हर्चे येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालय हे दहावी व बारावीच्या शंभर टक्के निकालासाठी प्रसिद्ध आहे. याचा अर्थ गेली अनेक वर्ष तिथले शिक्षक, त्यांचे मुख्याध्यापक आणि इतर कर्मचारी वर्ग हा जीव तोडून काम करतो आहे. या शाळेचं मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. तिथले मुख्याध्यापक जयसिंगराव पाटील हे गणित विषयातले माहीर. त्यांनी गणित हा विषय मुलांना अधिक सोप्या पद्धतीने कसा शिकवावा यासाठी आयुष्यभर संशोधन करून तो उपक्रम राबवला. त्यावरती पुस्तकेही लिहिली. ती लोकप्रिय झाली. त्या पाटील सरांच्या घरी जाण्याची नुकतीच संधी मला मिळाली. हर्चे गावच्या बाजूलाच असलेल्या खानवली या गावात मी गेलो. पाटील सर या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहात असावेत असा समज करून मी गेलेलो. माझ्यासोबत लांजातल्या कल्पना कॉलेजचे सर्वेसर्वा मंगेश चव्हाण सर ही होते. पाटील सर आम्हाला घ्यायला रस्त्यावर आले होते. तिथे ते आमच्या गाडीत बसले,ते सांगतील तशा दिशेने आमची गाडी एका बागेत घुसली. आम्ही उतरलो समोर सुंदर असा टुमदार बंगला होता.' आम्हाला कुठे आणलं?' या नजरेने मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा ते म्हणाले '' हे माझं घर. २०२२ पासून मी इथे राहतो आहे"
चहापान आणि नाश्ता झाल्यानंतर सर म्हणाले
" तुम्हाला मी माझी बाग दाखवतो."
ती हापुस आंब्याची बाग एकूण आठ एकर वरती बहरलेली आहे.आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या बागा या शेतमजुरांच्या वरती अवलंबून असतात मात्र पाटील सरांच्या या बागेत स्वतः पाटील सर त्यांची पत्नी आणि कधी कधी त्यांची मुलं राबत असतात हे ऐकून आश्चर्य वाटले. मागे कुणीतरी म्हटल्याचे मला आठवले. 'देशावरचे शिक्षक हे इथला पैसा देशावरती घेऊन जातात 'मी सरांना विचारलं "तुमचं गाव कुठलं "
"बत्तीस शिराळ्याजवळ"
"तिथं शेतीवाडी?"
"आमच्या वाटणीस नऊ गुंठे आली आहे त्यात भाऊही आहे. शेतीत राबण्याची हौस असल्यामुळे त्या एवढ्याशा छोट्याशा जागेत मी काय करणार होतो त्यामुळे या ठिकाणी जागा मिळाली आणि गेली वीस वर्ष आम्ही या शेतीत राबत आहोत."
पाटील सरांच्या या भेटीतून मला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. सर गावातच राहत होते त्यामुळे त्यांची मुले सुद्धा या शाळेत जात होती. सर अधिकचा वेळ शाळेसाठी देत होते त्यामुळे शाळेचा निकाल हा कौतुकास्पद राहिलेला आहे.त्यातूनही मिळालेल्या फावल्या वेळेत ते शेतीत आनंद घेत होते. ३१ मे २०२४ रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यानी कोकणात मिळवलेला पैसा कोकणातच खर्च केला आहे. गावाकडे नोकरी करून गावाकडची शेती करता येते हा या आदर्श पाटील सरांनी घालून दिलेला आहे. याच खेडेगावात प्राथमिक मराठी शाळा व माध्यमिक शाळेत शिकलेली त्यांची मुले आज उच्च विद्या विभूषित असून पुण्यात नोकरी करत आहेत. ती मुले त्यांच्या सुट्टीत कोकणातल्या गावात येतात आणि इथल्या शेतीत ही राबतात.
माझ्या माहितीतील या दोन व्यक्ती ज्यांनी गावाकडे नोकरी करून आपली शेती फुलवली तशी आणखी काही शेती प्रिय नोकरदार माणसं असतील याचा अर्थ कोकणात नोकरी अथवा उद्योग व्यवसाय सांभाळून सुद्धा शेती करता येते. केवळ शेतीवरच जीवन जगता येणार नाही हे मान्य करताना रेशनवर दोन रुपये किलो धान्य मिळत असल्याने आपल्याजवळ बराचसा मोकळा वेळ असताना निदान शरीरातला घाम निघून जावा एवढ्यासाठी तरी आपल्या घराच्या आसपासच्या चार दोन मळ्या जरी भात लागवडीखाली आणल्या तरी वर्षातले काही दिवस तरी आपण सकस धान्य खाऊ शकतो याचा आनंद घ्यायला काय हरकत आहे. पण गंमत अशी आहे आपल्याला मिळणारे रेशनवरचे स्वस्त धान्य शेजाऱ्याला जमा करायला सांगायचे आणि चार दोन महिन्यांनी मुंबईवरून दिवा गाडीने प्रवास करून कोकणात जायचे आणि जाताना रेशनवरच्या धान्याचे बोचकं मुंबईला घेऊन जायचं. अशीही धड धाकट माणसं सरकारी योजनेचा असा फायदा घेताना पाहिलं की माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्या काळात आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऐंशी नव्वदीच्या वर्षाचे गृहस्थ किंवा स्त्रिया.काठी टेकत शेतात जायचे आणि आपल्याला जमेल ते काम करायचे याला मातीवरचं प्रेम म्हणायचं की याला श्रमावरचं प्रेम म्हणायचं की याला आत्मसन्मानाचे प्रेम म्हणायचं. आज ती माणसं दिसेनाशी झाली.आज मातीतले श्रम दिसेनासे झाले. आज तो आत्म सन्मान दिसेनासा झाला.आज कोकणातील अनेक मळे पडीक दिसतायत , उद्या शाळा पडीक दिसतील. तेव्हा ते आश्चर्यकारक असणार नाही कारण त्याची चाहूल आताच लागली आहे कारण आता शाळा भरत नाहीत तर शाळा फक्त चालत आहेत.*
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर -लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
🙏 सर धन्यवाद. पर्यावरण व मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी सेंद्रिय शेतीची नितांत आवश्यकता आहे.
ReplyDelete