गगन भरारी !
होय ! आज मी एका आगळ्या वेगळ्या गगन भरारी विषयी लिहिणार आहे. आपण आता हा लेख वाचत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातील गोरगरीब पालकांची आणि उपक्रमशील प्राथमिक शिक्षकांच्या प्रयत्नातून पुढे आलेली वीस मुले अमेरिकेतल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना भेट देत आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा काय किंवा एखाद्या महानगरपालिकेच्या शाळा काय यांच्याबाबत यांच्या यांच्यामध्ये मिळणाऱ्या शिक्षणाबाबत सगळ्या स्तरातून निराशा दर्शवण्यात येते या शाळातून शिक्षण कमी दर्जाचे आहे किंवा ते जगण्यास पूरक ठरणार नाही असे नाही तर बदलत्या जगण्याच्या पद्धतीनुसार आजका लोकांकडे आलेल्या पुरेशा पैशामुळे आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. लोकांकडे पैसा आहे आणि त्या पैसेवाल्यांना तुम्ही सामान्यांपासून वेगळे आहात असे सांगितले की त्यांना आपण खरंच वेगळे आहोत असा त्यांना भास होतो. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत किंवा विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या व लोकांच्याकडून पैसे उकळण्याच्या निमित्ताने वातानुकलीत वातावर निर्माण करणे शाळेला वेगळ्या प्रकारची रंगरंगोटी करणे ते कार्पोरेट ऑफिस सारखे सजवणे हे केल्यावर लोक त्यामध्ये आपल्या पालकांना पाल्यांना दाखल करून आपण काही वेगळे आहोत हे दाखवण्याची स्पर्धा सुरू करणार याची पक्की खात्री शिक्षणाचा व्यापार करणाऱ्या शिक्षण सम्राटांना माहित आहे आणि म्हणूनच अशा शिक्षण सम्राटाच्या शाळांचे जाळे सगळीकडे पसरलेले दिसते आहे. या शाळांच्या जोरावर हे धन दांडगे निवडणुकीच्या रणांगणात उतरतात आणि मते विकत घेऊन निवडणुकाही जिंकतात हे सगळं आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्यांच्या नादी का लागतो आहोत हे अनाकलनीय आहे.
माझा लेख वाचणारे बरेच जण हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेऊनच पुढे आले आहेत. माझी खात्री आहे की आपण ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले ते शिक्षण आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होते, आयुष्याच्या उंच शिखरावर जाण्यासाठीचे ज्ञान किंवा त्याची पायाभरणी ही जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच झाली आहे याबद्दल आपणास अभिमान असेलच. त्या काळातील शिक्षकांचे पगार हे फारच कमी होते ज्या गावात शाळा होती त्याच गावात ते राहायला होते त्यांच्यासाठी आपल्या परसबागेत उगवलेल्या भाजीपाला , फळभाज्या किंवा धान्य स्वरूपात सुद्धा आपण गुरुजींना भेटवस्तू देण्यात आपल्याला आनंद वाटत असे. त्या गुरुजींबद्दल त्या काळात जेवढा आदर होता तो आदर आज आपण आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर पोचले असतांना सुद्धा तेवढाच आहे कारण गुरुजींचे आपल्या जीवनातील उपकार आपण मानत आलेलो आहोत. आज मात्र परिस्थिती बदललेली आहे शिक्षकांचे पगार चांगले आहेत जगण्याच्या पद्धती बदल्या असल्यामुळे आजचे बरेचसे शिक्षक हे त्या गावात राहत नाहीत तर जवळच शहर वजा असलेल्या गावात राहतात कारण जगण्यासाठीच्या आवश्यक सोयी सुविधा त्या ठिकाणी त्यांना मिळत असतात आणि म्हणून या प्राथमिक शिक्षकांच्या बद्दल बरेच लोक वेगवेगळ्या वावड्या उठवत असतात. कुणीतरी एखादा शिक्षक शाळेत दांड्या मारणं किंवा शाळेच्या दिवसांत आठवडे बाजारात फिरणं अशा गोष्टींमुळे शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे परंतु आपण हेही लक्षात ठेवायला हवं की असं करणारे जर असतीलच तर ते काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असू असतात मात्र आपल्या पेशाशी प्रामाणिक राहून आपल्यासमोर असलेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न करणारे उपक्रमशील शिक्षक बरेच आहेत. कोकणचा दहावी बारावीचा निकाल हा नेहमीच महाराष्ट्रातल्या अन्य बोर्डांपेक्षा काकणभर सरस राहिलेला आहे याचा अर्थ कोकणातील माध्यमिक शाळांतील शिक्षक चांगल्या तऱ्हेनं अध्यापन करत असतात म्हणून हा निकाल आपल्याला बघायला मिळतो तसेच आपण हे ही लक्षात घ्यायला हवं की माध्यमिक शाळांत जाणारी मुलं ही ज्या प्राथमिक शाळेतून येतात त्या शाळांत सुद्धा चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे अर्थात ते देणारे प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत हे मान्य करायला हवे.
प्राथमिक शिक्षकांच्या कामगिरीचं कौतुक करावं असा उपक्रम गेल्या दोन वर्षात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याकडून राबवला जातोय. इस्त्रो आणि नासा या जागतिक किर्तीच्या व जिथे प्रचंड ज्ञानी शास्त्रज्ञ असलेल्या संस्थांना भेटी देण्यासाठी काही मुलांची निवड केली जाते.त्या निवड परीक्षेकरीता प्रत्येक शाळेतील शिक्षक आपल्या मुलांची तयारी करून घेत असतो. त्या परीक्षेतून पुढे आलेली निवड मुलं हे इस्त्रो आणि नासा या संस्थांना भेटीसाठी पाठवली जातात.
नुकताच मी लांजा येथे असताना प्राथमिक शाळा जावडे येथे काम करणाऱ्या एक आदर्श शिक्षिका म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो त्या प्रिया मांडवकर यांच्याकडून नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होणार आहे हे कळले. शिपोशी येथे संपन्न झालेल्या संघाच्या नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात या मुलांना सन्मानित करुन त्यांचे कौतुक करण्यात आले होते.त्यांना आता नासा येथे पाठवले जाते आहे हे कळल्याने मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देण्याचे ठरवले. लांजातील शिरवली गावच्या पूर्ण प्राथमिक शाळा नं १ व जावडे येथील पूर्ण प्राथमिक शाळा नं १ मधील अनु. कुमार सुमेध सचिन जाधव व कुमार प्रणव लक्ष्मण कोलगे हे विद्यार्थी आपले पालक व शिक्षक अनु . श्री.उमेश केसरकर व सौ.प्रिया मांडवकर यांच्यासोबत गटविकास अधिकारी कार्यालयात उपस्थित होते. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाची तयारी केली होती.मा.गट विकास अधिकारी श्रेणी एक चे सन्माननीय श्री.संतोष म्हेत्रे यांनी या मुलांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात आणि केवळ रत्नागिरी जिल्हा परिषदेतच राबवला जातोय.या उपक्रमाचे जनक रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.किर्तीकुमार पुजार हे असून त्यांनी उपक्रमाच्या माध्यमातून जिप शाळांत सुद्धा हुशार विद्यार्थी असतात हे दाखवून दिलेच पण त्याचबरोबर येथील गोरगरिबांच्या मुलांना जागतिक उच्च श्रेणीच्या संस्थाचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देतांना अमेरिकेत दहा दिवस वास्तव्य करतांना विमान प्रवासाची सोय केलुच पण सरकारी पाहुण्यांसारखी त्यांची बडदास्त ठेवली जाईल अशी ही व्यवस्था केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातून दोन मुलांची निवड केली जाते.जि.प.च्या २३हजार विद्यार्थ्यांमधून निवडलेले एकूण वीस विद्यार्थी हे आज नासा येथे गेलेले असून ते ज्या ज्या ठिकाणांना भेट देणार आहेत त्या ठिकाणांची नावे अर्थात त्यांची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका याच लेखासोबत आम्ही देत आहोत ते पाहिल्यानंतर आपणच म्हणाल किती भाग्यवान आहेत ही मुले ! आणि त्यांना भाग्यवान ठरवताना ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील हे मुले आहेत त्या मुलांच्या शिक्षकांचेही आपण कौतुक कराल कारण त्यांच्याच प्रयत्नांमुळे ही मुले त्या निवड प्रक्रियेतून पुढे आली.
आज कोकणातील घरे बंद होत असताना केवळ रोजगार हे कारण नसून अनेक कारणे त्याच्या पाठीमागे आहेत. त्यातील आपल्या मुलांना गावच्या शाळेत योग्य शिक्षण मिळणार नाही आणि म्हणून मी मुलांना घेऊन मुंबईला जातो आहे असे म्हणणारे महाभाग आम्ही पाहिलेले आहेत. त्यांच्यासाठी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांचे योग्य ते शिक्षण होतेच परंतु या शिक्षणाबरोबर त्यांना कोण कोणत्या संधी उपलब्ध आहेत हेही आम्ही त्यांचा निदर्शनास आणू इच्छितो. आज नासाच्या प्रयोगशाळेत अभ्यासासाठी गेलेल्या या वीस मुलांच्या आकांक्षांचे पंख मजबूत होणार आहेत त्यांच्या स्वप्नांची उंची वाढणार आहे समोर ठेवलेल्या यशाचे शिखर गाठण्यासाठी आपल्याला अविरत मेहनत करावी लागणार आहे याची त्यांना जाणीव होणार आहे याच मुलातून एखादा नामवंत शास्त्रज्ञ निर्माण होणार आहे आणि तो त्याच्या यशाच्या शिखरावर उभे राहताना जगाला ओढून सांगणार आहे होय मी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेऊन या उंच शिखरापर्यंत पोहोचलेलो आहे त्या वेळेला त्याच्या डोळ्यासमोर त्याचे गरीब आणि काबाडकष्ट करणारे आई वडील असते प्रेमाने आणि कौशल्यपूर्ण अध्यापन करून समजावून सांगणारे त्याचे शिक्षक असतील ज्या माती खेळलो बागडलो ती माती म्हणजेच त्याचा प्रिय गाव असेल. अपेक्षा एवढीच असेल की तो विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याने आपल्या मायभूमीतील घर उघडे कसे राहील याची काळजी घ्यावी. त्यांच्या गगन भरारीला मी शुभेच्छा देतो !
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर -लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
अमेरिकेतील क्षणचित्रे -
१)
धन्य ते विद्यार्थी,धन्य ते गुरूजन आणि धन्य त्या विद्यार्थी मित्रांचे माता
पिता! सगळ्यांचं मन समाधानानं,
आनंदानं सुपापेक्षाही भरून आलं
असेल !
शेवटी काय "रत्नागिरीतील "मुलं !
रत्ना'ची खाणच ती !
आम्ही भाग्यवानच, आमचाही जिल्हा
रत्नागिरी आहे,आणि त्याचा
आम्हाला सार्थ अभिमान आहे !
भाई,नमस्कार! आणि धन्यवाद सुद्धा.शुभ रात्री !
विश्वनाथ चव्हाण,
सामाजिक कार्यकर्ते,कोंडगे
२)
आदरणीय लाड सर...
धन्यवाद...🙏🙏
आपल्या सिद्धहस्त लेखणीतून मोलमजुरी.. काबाडकष्ट करणाऱ्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांच्या नासा भेटी विषयी आपण भरभरुन लिहिलात. खरंच जिल्हा परिषद शाळाही दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तत्पर आहेत सर. आपण ब्लाॅगद्वारे घेतलेली दखल उल्लेखनीय असून निश्चितच प्रेरणादायी व उत्साहवर्धक आहे.आपल्यासारख्या विचारवंतांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असल्याने धन्यता वाटते सर.
मन:पूर्वक आभारी आहे सर....🙏🙏
उमेश केसरकर
शिक्षक-जि.प.शाळा,नं १,शिरवली
३)
*खरंच खूप कौतुकास्पद, रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील या मुलांची झालेली निवड ही पूर्ण जिल्ह्याला अभिमानास्पद आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे,,,, त्यांच्या पालकांचे आणि गुरूजनांचे मनःपूर्वक अभिनंदन*, 💐💐💐💐
शाहिर मधुकर खामकर,शिपोशी
जि.प. शाळा आपला अभिमान. रत्नागिरी जि. प. चा आदर्श उपक्रम. खूप प्रेरणादायी लेखन
ReplyDeleteजि. प. रत्नागिरी चा स्तुत्य उपक्रम आहे 💐त्याबद्दल जि. प. रत्नागिरी चे खूप खूप अभिनंदन 💐💐👍👍पण यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या गुरुजनांचा ही योग्य असा सन्मान शिक्षण विभाग यांच्याकडून व्हायला हवा, असं मला वाटते... गुरुजनांना ही nasa, isro ला जायची संधी जि. प. रत्नागिरीने द्यायला हवी, असं मला वाटतं 👍
ReplyDelete