राजापूर - लांजा तालुका नागरिक संघाला तरुण कार्यकर्त्यांची फळी लाभली असल्याने संघ स्वतःला श्रीमंत समजत आलेला आहे. या तरुणाईच्या श्रीमंतीत एक चमकणारे नाव म्हणजे वाटुळ गावचे सुपुत्र विराज चव्हाण होय. तसे पाहिले तर संघाच्या स्थापनेपासून रिंगणे गावच्या नाटककार ला.कृ.आयरे यांच्याबरोबर वाटुळ गावचे स्व.गो.ना चव्हाण आणि त्यानंतर अनेक मंडळीनी संघाच्या प्रत्येक कार्यकारणीत आपला सहभाग दिलेला आहे. आजच्या घडीला विराज चव्हाण हे संघाच्या मुख्य कार्यकारणीत सहचिटणीस पदावरती कार्यरत आहेत.
ते नोकरीनिमित्ताने मुंबईत असले तरी त्यांचा जन्म बालपण आणि शिक्षण हे वाटुळ गावातच झाले असल्याने त्या माती वरती त्यांचे नितांत प्रेम असल्याने ते महिन्यातून दोन-तीन वेळा तरी गावी असतातच. त्यांच्यात एक विनम्र साहित्यिक लपलेला आहे याचा शोध मला पाच-सहा वर्षांपूर्वी लागला. माझी गाणी यु ट्युवरती येत असताना त्याने एक दिवस मला व्हाट्सअप वरती त्याची स्वत:ची कविता पाठवली आणि कशी वाटते याचा अभिप्राय द्यायला सांगितला. मी कविता वाचली आणि मला तेव्हाच कळले या तरुणात एक साहित्यिक आहे त्याला प्रोत्साहन दिले तर तो मोठ्या आत्मविश्वासाने या क्षेत्रात भरीव कामगिरी करील.," व्वा, सुंदर ". एवढाच अभिप्राय देऊन मी थांबलो.मी अधिक काही सुचवू शकलो नाही कारण त्याच्या कल्पनेची झेप आणि आत्मविश्वासपूर्वक पंख पसरून स्वच्छंद विहरण्याचा त्याचा आत्मविश्वास त्यांच्या काव्यातून दिसल्याने उगाच मळलेल्या वाटांवर त्याला परत फिरवणे मला चुकीचे वाटले.घरात आजोबा किर्तनकार, प्रवचनकार असल्याने आणि विराजला त्यांच्या संगतीत राहण्यात आनंद वाटत असल्याने बरंच शब्द भंडार त्याच्या कानावर पडले आहे.त्याला वाचनाची आवड असल्याने शब्दसंग्रह आपसूकच मोठा झालेला आहे.तो नुसताच गावात वाढला नाही तर इथले उन्हाळे पावसाळे तो जगला आहे.इथली माणसंही त्याने वाचली आहेत.तो जसं गावावर प्रेम करतो तसं गावाच्या विकासाचा विचार करतांना पारंपरिक रुढी समजून घेऊन त्यावर चिंतन करतो,टिपण्णी करतो आणि कधीतरी त्यावर लिहिता होतो.त्याने लहानपणी पाहिलेली माणसं,त्यांचं एकमेकांशी आपलेपणानं वागणं, निव्वळ बोलीभाषा वापरून केलेल्या व्यवहारामुळे त्यातला अनुभवलेला निखळ गोडवा हे त्यांच्या लिखाणातून प्रत्ययास येते.माझ्यासारख्यानं आयुष्याच्या सुरवातीची वीस वर्षे गावातच काढली असल्यानं विराजचं ललित वाचताना गावाकडे गेल्याचा आनंद मिळतो.तो जसा माझ्याशी मोकळेपणाने बोलतो तसे त्याचे साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी बोलतो.एवढ्याशा वयात त्यांच्या मित्रसंग्रहात कलाकार, साहित्यिक विशेषतः कवी मित्रांची संख्या मोठी आहे.तो नेहमीच स्वतः:ला विद्यार्थी समजून चर्चा करीत असल्याने त्यांच्यावर सावली धरणारे हात भरपूर आहेत.
संघाच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाची जबाबदारी त्यांचीच असल्याने ते अनेक नवकवींचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ देतातच पण त्या व्यासपीठाला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रथितयश साहित्यिकांनाही हजेरी लावण्यास ते भाग पाडतात. एवढंच काय आपल्याच घरात आपली काकी स्वतः:च काही गुणगुणत आसल्याचं कळल्यावर त्यांना लिहितं करण्याचाच नव्हे तर त्या आशयगर्भ कवितांचे पुस्तक प्रकाशित करीपर्यंतची त्यांची धडपड त्यांच्या निर्व्याज व्यक्तिमत्वाची ओळख ठरली.वीणा चव्हाण यांचा 'अजूनही काही भावतं मला ' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या एकत्रीत कुटुंबाने केलेले नियोजन पाहून आम्ही भारावून गेलो होतो.तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवरांसाठी हे बांबरकर कुटुंब कौतुकाचा विषय ठरलं होतं.
सध्या यु ट्युबवरती वाटुळ हा काव्य लघुपट धुमाकूळ घालतो आहे. हा लघुपट एक काव्य घेऊन पुढे जातो. कोकणातलं एक निसर्ग सौंदर्य असलेलं गाव ज्याचं नाव वाटूळ आहे त्या संपूर्ण गावाचं चित्रण या लघु पटात पाहायला मिळतं. ह्या लघुपटातील काव्य या लघुपटाची संकल्पना हे सर्व काही विराज चव्हाण यांचा आहे. केवळ आपल्या गावाची महती सांगावी एवढाच उद्देश यामागे नसून आपलं कोकण हे एक चांगलं पर्यटन स्थळ होण्याचं ठिकाण आहे. कोकणातील प्रत्येक गाव हा असाच निसर्ग सौंदर्याने नटलेला असून त्या त्या गावाचं वैशिष्ट्य पुढे आलं तर इथे येणारा पर्यटक त्या त्या गावात विसावेल तिथल्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटेरे तिथे मिळणारी भाजी भाकरी खाईल आणि तिथल्याच एका अंगणात पथारी टाकून स्वर्गीय सुखाचा आनंद घेत निद्राधीन होईल असा या लघुपटामागचा उद्देश आहे.
हा लघुपट सर्व अंगानी उत्कृष्ट झालेला आहे.प्रणय शेट्ये यांच संगीत जेव्हा कोकण गाव खेड्यात बंदिस्त होतं,स्वयंपूर्ण जीवन जगत होतं त्या काळात घेऊन जातं.याच गावचे सुबोध वळंजु हे एक नवी दृष्टी असलेले व्हिडिओ ग्राफर आहेत. त्यांनी नेमकं काय गावात पाहायचं याच अचूक चित्रण केलेले बघायला मिळतं, त्यातूनच गावची संस्कृती ही समजून येते. प्रथीत यश अभिनेते अनिल सुतार यांनी आपल्या गोड आवाजाने या लघुपटाला प्रवाही केले आहे.त्यामुळे हा लघुपट आजच्या काळात जरी बनविला असला तरी पुढील अनेक पिढ्यांसाठी एक महत्वाचा दस्तऐवज ठरला आहे.आपण सर्वांनी लघुपट आवर्जून पाहायचा आहे.इतरांनाही पाहण्यास सांगायचे आहे कारण आपणच आपल्या कोकणाला पर्यटनाच्या नकाशावर आणावयाचे आहे.
सुभाष लाड
९८६९१०५७३४
लघुपटाची लिंक copy करून वाॅटसअप वर घ्या.
https://youtu.be/a_W9i_Tr17o?feature=shared
+91 99 87 954937
विराज चव्हाण, आपलं कौतुक सुभाष लाड सरांनी, वास्तव केले आहे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete