Saturday, May 25, 2024

वृक्षवेडा पेटून उठलाय !

           
         परवा पाचलला 'वीर रत्न बाजी प्रभू ' नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने फिरत असताना किशोरभाई नारकरांनी संघाने लावलेली झाडे कौतुकाने दाखवली.पुरुषभर उंचीपेक्षा वर गेलेली हिरवीशार झाडे बघून संघाचे सल्लागार अॅड.सदानंद शेट्ये साहेबांची आठवण झाली.कारण त्यांनीच दहा वर्षापूर्वी फोन करून संघाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे असा आदेश दिला होता.त्याचवेळी अनेकांनी कोकणात झाडे लावायची गरजच काय ? तिथे तर झाडेच झाडे आहेत.अशी टिकाही केली होती.तरीही आम्ही वृक्षारोपण करीत आहोत.
            बारा वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्ग रुंदीकरणाचा रेडा रस्त्यात बसलेला आहे,तो अजूनही उठून चालू लागेल अशी शास्वती देता येत नाही मात्र शंभर दिडशे वर्षांची हजारो झाडे मात्र त्याने खाऊन टाकली.एवढ्या वर्षांत निदान नवीन झाडे लावण्याचा प्रामाणिकपणा जरी दाखवला असता तर आज त्या झाडांचे आंबे किंवा काजुची बोंडे खाण्यात प्रवासी गुंतले असते आणि करत्या धरत्यांच्या नावाने जो आक्रोश केला जातोय तो तरी कमी झाला असता.पण केवळ ओरबाडून खाणाऱ्यांना दुसऱ्याला काही द्यायचे असते याचे भानच नसते हे काही नवीन नाही फक्त पुनर्प्रत्यय आला एवढेच.तसेच वाटूळ दाभोळ रस्त्यावरही घडले.काहीसा उशीरा आणि भ्रष्टाचाराची तीट लागूनही का होईना रस्ता मात्र इतका जबरदस्त झाला की परराज्यातील ठेकेदाराचे गुणगान गात मुंबई गोव्याच्या खाजगी प्रवाशी गाड्या सुसाट साखरपा देवरुख करत संगमेश्वरात बाहेर पडताहेत.तिथेही जायवळ केल्यासारखी झाडे कापून टाकली.व्हेळ तिठ्यावरचे सरकारी प्रवासी निवाऱ्यास लाजवेल अशी शंभरेक माणसांना सावली देणारी आणि फळेही देणारी झाडे वाचविता आली असती इतकी कोपऱ्यात असलेली दोन आंब्याची झाडे ठेकेदाराच्या नावाने हंबरडा फोडत गतप्राण झाली.ते पाहून यापूर्वी त्या सावलीत कितीदा तरी बसलेले झर्ये पाचल कडे जाणारे प्रवाशी अक्षरशः रडले.तो एक प्रकारचा शाप आहे तो ठेकेदाराला कधी भोगावा लागेल याची निश्चिती सांगता येणार नसली तरी सध्या तिथल्या प्रवाशां ओलना तो त्रास सहन करावा लागतोय. आज तिथे बांधलेल्या प्रवासी निवाऱ्यामध्ये ती शीतलता कुठून मिळणार आहे?
          त्याच रस्त्यावर गतवर्षी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला मात्र या वेळेला एक प्रामाणिकपणे वृक्ष जगविण्याची जबाबदारी एका वृक्षवेड्यांने घेतली होती. त्या वृक्षवेड्याचे नाव आहे अमर गणपत खामकर.व्हेळ तिठ्यावरचे ते डौलदार आंब्याचे झाड तोडल्याची खबर मला फोन वरुन देतांना त्यांनी चीड व्यक्त करतांना आपण पुन्हा ती वृक्षसंपदा निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी मजपाशी व्यक्त केला होता म्हणूनच दाभोळ वाटूळ रस्त्यावर झाडे लावण्याचा संघाने उपक्रम जाहीर करतांना त्या उपक्रमाचे नेतृत्व अमर खामकर यांचेकडे देण्यात आले.
        आरगावचे सुपुत्र असलेल्या अमर खामकर यांचा जन्म,बालपण आणि शिक्षणही मुंबईत लालबाग परळ भागात झाले.क्रिकेटमधला उत्तम खेळाडू म्हणून नावलौकिक ही मिळवला होता.वडील मुंबईत बॅंकेत कामाला होते.त्यांना आपल्या गावाकडच्या जमिनीत राबण्याची इच्छा असल्याने त्यांनी आपली बदली गावाकडे करून घेतली.बरीच वर्षें पाचलमधल्या शाखेत काम करतांना आपली वडिलोपार्जित जमिनीत आंबा आणि काजूची लागवड केली.शनिवार रविवारी ते आरगावातच थांबायचे.कुटुंब मुंबईतच असल्याने मुलांना हिवाळी आणि उन्हाळी सुट्टी पडली की त्यांना गावाला बोलावून घ्यायचे. आंब्याच्या - काजूच्या बागा जशा मोठ्या होत गेल्या तसे पीक देऊ लागल्या .अमर वडिलांच्या बरोबर बागेत कामाला जाता जाता त्यालाही त्या कामाची आवड निर्माण झाली .जवळच असलेल्या ओढ्यावरच्या कोंडीत यथेच्छ आंघोळ करायची आणि बागेत फेरफटका मारायचा. वडिलांना मदत करायची याच्यातच त्याची सुट्टी जायची. मुंबईला जाताना मात्र त्याचे पाय गावातच थांबण्याचा हट्ट करायचे. पुरेसे शिक्षण पुरे झाल्यानंतर आता नोकरी करणं हा आपल्याकडच्या मुलांचा प्रघात आहे. अमरनेही मुंबईत ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या परंतु त्यामध्ये त्याचे मन रमेना. त्याने वडिलांशी सल्लामसलत केली.मुंबईला रामराम केला आणि थेट आरगावातल्या मातीत स्वतःला झोकून दिले. येथे बागकाम करताना इथे नवनवीन प्रयोग करण्याचे त्याने तंत्र अवलंबले आणि आपल्या बागेतून अधिकाधिक पीक कसे मिळेल याचे गणित जुळवू लागला त्यात त्याला दिशा सापडली. आता त्याचे लग्नाचे वय झाले शेतकऱ्याच्या मुलाला पोरगी कुणी देत नाही हे त्यालाही ठाऊक होते तो मुंबईला आला पुन्हा एका कंपनीत नोकरी करू लागला. त्याला स्थळ चालून आले.पण अमरने आपण खोटं बोलायचं नाही, जे काही मला करायचं आहे ते आपण सांगायचं ,जी मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होईल तिच्याशी लग्न करायचं असा निर्णय अमरने घेतला.पाहायला आलेल्या मुलीशी  एकांतात बोलणं केलं, मला काय करायचं आहे हे तिला समजून सांगितलं आणि त्या माऊलीनही आपण तयार आहोत लग्नाला असं सांगितल्याने अमरला आकाश ठेंगणे वाटले.लवकरच दोनाचे चार हात झाले.
          काही दिवस पत्नी गावाला राहायची तर काही दिवस मुंबईला सासूबाईंकडे राहायची असे करता करता मुले झाली. मुले मुंबईला शिक्षण घेत आहेत. अमरही आपल्या मुलांना उन्हाळी व हिवाळी सुटीत गावाला बोलावतो.त्यांना मातीत राबण्याची सवय लावतोय.
         दोन वर्षांपूर्वी राजापूर आणि लांजा तालुक्यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रेशीम शेती करण्याचे ठरवले. त्यामध्ये अमरही आघाडीवर होता. त्याने आपल्या मळ्यात तुतीची बाग फुलवली आणि रेशीम शेती केली. सौंदळ चे वासुदेव घाग आणि आरगाव चे अमर खामकर यांनी कोकणातही रेशीम शेती चांगली होऊ शकते हे दाखवून दिले. योग्य त्या हंगामात अमर खामकर रेशीम शेती करत असतात. राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने अमर खामकर यांना बळीराजा पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यानंतर अमर खामकर यांना राज्य पातळीपर्यंत बक्षिसे मिळू लागली. अमर खामकर यांच्या कष्टाचे चीज झाले. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांना अनेकापर्यंत पोहोचवता आली याचा त्यांना आनंद वाटतो. संघाने त्यांच्या कामाची दखल घेतली याबद्दल नेहमी कृतज्ञतेने ते बोलत असतात .संघाच्या अनेक उपक्रमात ते सहभागी होतात. शिपोशी येथे नववे ग्रामीण साहित्य संमेलन पार पडले. त्या साहित्य नगरीत विशेष कौतुकाची बाब म्हणून ज्या गोष्टीकडे लोक कुतूहलाने पाहत होते ती होती झोपडी. पूर्वी कोकणात घरे, गुरांचे गोठे आणि लाकूडफाटा ठेवण्याची खोप ही लाकूड आणि गवत वापरून करत तशी झोपडी प्रभानवल्लीचे मारुती मुकुटराव, गोठणे दोनिवडे येथील हनुमंत विचारे आणि आरगावचे अमर खामकर यां तिघांच्या मेहनतीतून बनवलेली होती. ही सर्वच मंडळी संघाचा बळीराजा पुरस्कार प्राप्त करणारी असून संघाच्या सोबत काम करण्याची त्यांची इच्छा असल्याने ते नेहमीच संघाच्या विविध उपक्रमांत सहभागी असतात याचा आम्हास अभिमान वाटतो.
        

   गेल्यावर्षी संघाने घेतलेल्या वृक्षारोपणात अमर खामकर यांनी गावठी काजूची रोपे लावली.अनेक ठिकाणी वृक्षारोपण हा कार्यक्रम केला जातो.वृक्षदिंडी काढून गाणी म्हटली जातात,घोषवाक्याचे फलक दाखवून गाणी म्हटली जातात.मान्यवरांनी भाषण करुन झाडांचे व झाड लावण्याचे महत्त्व सांगितले जाते.हे सगळे फोटोत घेऊन त्याला प्रसिद्धी दिली म्हणजे सांगता झाली असे समजले जाते.संघाची विचारधारा वेगळी आहे.झाड जगण्याची शास्वती,संरक्षणाची हमी आणि निगा राखण्याची जबाबदारी घेतली जाते तिथेच वृक्षारोपण केले जाते.गेल्यावर्षी व्हेळ तिच्या आसपास शंभर गावठी काजूची रोपे लावण्यात आली. त्यांच्या आजूबाजूचे गवत काढण्यात आले. त्यांना जनावरे खाऊ नयेत म्हणून करवंदीचे काट्याचे संरक्षण दिले गेले. उन्हाळा सुरू होताच त्यांना पाणीही दिले जात आहे याबाबतीत व्हेळ गाव चे सामाजिक कार्यकर्ते माननीय दिलीप भाऊ पळसुले देसाई यांच्याकडून सहकार्य मिळते आहे. हे सर्व अमर खामकर माझ्या बागेतील झाडे असे समजून हे काम करत आहेत याची आम्हास कौतुक आहे. 
        अमर खामकर आणखी एक काम आवर्जून करतात ते म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गावातील स्मशानभूमीं च्या आसपासचे पावसाळ्यात वाढलेले गवत स्वतः जाऊन कापतात.त्याकरीता आपला एखादा कामगारही सोबत नेतात.माणसामध्ये लपलेला सेवाभाव त्याला कधीही स्वस्थ बसू देत नाही.
        आज सकाळीच अमर खामकर यांचा फोन आला.  " येत्या पावसाळ्यात लावण्याकरीता शंभर झाडे वडाची, चाळीस पिंपळाची आणि काही झाडे रायवळ आंबा व जांभूळाची जमविली आहेत "  याचा अर्थ यावर्षी दोनशे झाडे संघाच्या मार्फत लावली जातील आणि ती वाढवलीही जातील हे आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण एक वृक्ष वेडा आता पेटून उठला आहे.

सुभाष लाड
९८६९१०५७३४

      प्रगतशील शेतकरी 
अमर गणपत खामकर      
+91 93701 66922

*******अभिप्राय*********
१)****
         सर्वसामान्य माणसात लपलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देऊन त्याला अधिक कार्यानमूख करून , त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकताना इतरांनाही अशा कार्यासाठी प्रेरित करणारी आपली कार्याची हातोटी  वेगळीच आहे सर. यावर्षी अनुस्कुरा  घाटात वड पिंपळाची रोपे महाविद्यालय व संघ यांच्या विद्यमाने लावू. त्याचवेळी अनुस्कुरा घाट ते येरडव हा शिवकालीन ऐतिहासिक मार्ग पर्यटनाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करूया. या ऐतिहासिक मार्गानेच  छत्रपती संभाजी राजांना पकडण्यासाठी मूखबर खानाचे सैन्य उतरल्याचा उल्लेख संभाजी कादंबरीत विश्वास पाटील यांनी केला आहे. सध्या प्रचंड पर्यटन वाढले असून या ऐतिहासिक मार्गाचा उल्लेख करणारा फलक या घाटाच्या पहिल्या वळणावर लावण्याची गरज आहे. सर आपली मान्यता असेल तर वृक्षारोपण आणि या मार्गाचे  फलकाचे प्रदर्शन तिथेच त्या पायवाटेवर घेऊ . उगवाई मंदिर, या मार्गाच्या जकात वसुलीचा शिलालेख, करकेचे अर्जुना धरण, पलीकडे असणारा अर्जुनेचा उगम अशी कितीतरी पर्यटनस्थळे या परिसरात आहेत. त्याचा उल्लेख करूया. आज घाटात दर्डी कोसळणे, घाट खचणे, घाटात गाड्यांना अपघात होणे हे प्रमाण वाढत असल्याने वृक्षारोपणाची गरज आहे . घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या पांगरी ग्रामस्थांशी चर्चा करून ' *चला करूया वृक्षारोपण,   सह्याद्रीचे करूया रक्षण'* ही थीम घेऊन पुढे जाऊया.
प्रा.विकास पाटील 
खापणे महाविद्यालय,पाचल 

*****अभिप्राय*****
२)***

मला आठवतंय,आम्ही, आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, प्राथमिक वैद्यकीय सेवांबाबेत केलेल्या आंदोलनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेत असताना, अचानक एक पिळदार शरीरसौष्ठावाचा रुबाबदार     तरुण bike वर येऊन कोंडात, रस्त्यात आमच्या समोर थांबला. माझ्यासोबत असणारे आमचे पत्रकार मित्र श्री. शरद आयरे यांच्याशी ते परिचित असल्याने ते शरद कडून आंदोलनाची माहिती घेत होते. तेव्हा शरद ने माझा आणि अमर सरांचा परिचय करून दिला. ही आमची पहिली भेट!!! काही - काही माणस ही स्वभावतः अबोल असतात मात्र ती तुमच्याशी बोलायला लागली ही उजळत जातात. त्या पैकीच अमर सर!! त्यांच्या शेतीतील आधुनिक प्रयोग आणि संशोधन याविषयीं ते माझ्याशी भरभरून बोलले. त्या दिवसापासून या व्यक्तिमत्वाविषयीं मला नितांत आदर वाटू लागला. आमच्या श्री.हिरोजी स्मारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ' गौरव कर्तृत्वाचा ' पुरस्कारही आम्ही त्या वर्षी अमर सर यांना देऊन त्यांच्या अभिनव कार्याचा सन्मान्ही केला. याचा मला अभिमान वाटतो.
               एकाच वेळी अनेक स्तरावर काम करणाऱ्या अमर सरांविषयीं माझ्या मनात नेहमीच आदरभाव असतो.मात्र लाड सरांच्या  आजच्या या गौरव लेखातून अमर सरांचा जीवनप्रवास समजून घेतांना, आदरासोबत माझं कुतूहलही जागृत झालं. शेतीचा,वृक्ष संगोपणाचा वडिलांचा वारसा स्वप्रतिभेच्या स्पर्शाने उज्जवलं करणारे , शेती - फळ  बागेला आधुनिक प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण नवता प्रदान करून देणाऱ्या अमर सरांची शेती क्षेत्रातील सृजनशिलता ही नेहमीच आमच्यासाठी कौतुकाचा विषय बनून राहिलाय. शेती संकल्पनेवर आधारित आधुनिक प्रयोगशीलता, प्रेम,मेहनत,जिद्द ही त्यांच्या अंतर्मनाला सुखावत असते, आणि त्यातूनच त्यांच्या अंतर्मनाचा 'स्व' फुलत असावा.
          सध्या आयुष्याला आलेल्या अफाट वेगामुळे आखिव- रेखीव जगणं ही आपली जीवनशैली बनलीय.मात्र या जगण्याच्या साचेबद्ध सिमारेषा ओलांडून,शेतीमध्ये नव- नवीन प्रयोगशीलता आणून, त्यातून निखळ आनंद शोधणारा हा 'आनंदघन' म्हणजे युवकांसाठी सुंदर वस्तूपाठ आहे. स्वयंप्रज्ञेे,जिद्दीने व मेहनत - चिकाटीने त्यांनी आधुनिक शेतीला समृद्ध केले आहे. त्यामुळेच त्यांच्याप्रति आमच्या मनात रुजलेला आदरभाव सदैव वृद्धिंगत होतो. त्यांच्या विवाहापूर्वी सहचारीनेशी हितगुज करताना,स्वतःच्या आंतरीक स्पंदनाशी इमान राखून, आपल्या करिअर विषयी भावी पत्नीशी सत्यता ठेवणारा हा अवलीया, आजच्या युगाचा खऱ्या अर्थाने राजबिंडा नायक आहे.  
            आपल्या निरपेक्ष वृक्ष संगोपणाला मानवानंदना देणारे सुभाष लाड सर म्हणजे पक्का रत्नपरखीच!!! अमर सरांसारखी असंख्य अनमोल रत्न आज त्यांनी राजापूर - लांजा तालुक्यातून तावून सलाखून एकवटली आहेत.त्याबद्दल त्यांचं कौतुक.

किशोर आयरे,
सामाजिक कार्यकर्ते, रिंगणे 

*****अभिप्राय **********
३) ******

अप्रतिम लेखन.....
तेव्हढेच अप्रतिम कार्य.....
कोकणात निसर्गसंपन्न माती, नाती, माणसे आणि वातावरण आहे. त्याचा पुरेपूर उपयोग आपण करून घेत आहात. शिक्षकी पेशात आपण विद्यार्थी घडाविले आता माणसे घडवित आहात.....
आपल्या या शुभ कार्यात देव पाठीशी आहेच पण तुमचा मित्रांचा गोतावळाही पाठीशी आहे. 
आपल्या सर्व कार्यास आमच्या शुभेच्छा....

सुनील वागळे 
चित्रकार, मुंबई 

1 comment:

  1. मला आठवतंय,आम्ही, आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, प्राथमिक वैद्यकीय सेवांबाबेत केलेल्या आंदोलनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेत असताना, अचानक एक पिळदार शरीरसौष्ठावाचा रुबाबदार तरुण bike वर येऊन कोंडात, रस्त्यात आमच्या समोर थांबला. माझ्यासोबत असणारे आमचे पत्रकार मित्र श्री. शरद आयरे यांच्याशी ते परिचित असल्याने ते शरद कडून आंदोलनाची माहिती घेत होते. तेव्हा शरद ने माझा आणि अमर सरांचा परिचय करून दिला. ही आमची पहिली भेट!!! काही - काही माणस ही स्वभावतः अबोल असतात मात्र ती तुमच्याशी बोलायला लागली ही उजळत जातात. त्या पैकीच अमर सर!! त्यांच्या शेतीतील आधुनिक प्रयोग आणि संशोधन याविषयीं ते माझ्याशी भरभरून बोलले. त्या दिवसापासून या व्यक्तिमत्वाविषयीं मला नितांत आदर वाटू लागला. आमच्या श्री.हिरोजी स्मारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ' गौरव कर्तृत्वाचा ' पुरस्कारही आम्ही त्या वर्षी अमर सर यांना देऊन त्यांच्या अभिनव कार्याचा सन्मान्ही केला. याचा मला अभिमान वाटतो.
    एकाच वेळी अनेक स्तरावर काम करणाऱ्या अमर सरांविषयीं माझ्या मनात नेहमीच आदरभाव असतो.मात्र लाड सरांच्या आजच्या या गौरव लेखातून अमर सरांचा जीवनप्रवास समजून घेतांना, आदरासोबत माझं कुतूहलही जागृत झालं. शेतीचा,वृक्ष संगोपणाचा वडिलांचा वारसा स्वप्रतिभेच्या स्पर्शाने उज्जवलं करणारे , शेती - फळ बागेला आधुनिक प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण नवता प्रदान करून देणाऱ्या अमर सरांची शेती क्षेत्रातील सृजनशिलता ही नेहमीच आमच्यासाठी कौतुकाचा विषय बनून राहिलाय. शेती संकल्पनेवर आधारित आधुनिक प्रयोगशीलता, प्रेम,मेहनत,जिद्द ही त्यांच्या अंतर्मनाला सुखावत असते, आणि त्यातूनच त्यांच्या अंतर्मनाचा 'स्व' फुलत असावा.
    सध्या आयुष्याला आलेल्या अफाट वेगामुळे आखिव- रेखीव जगणं ही आपली जीवनशैली बनलीय.मात्र या जगण्याच्या साचेबद्ध सिमारेषा ओलांडून,शेतीमध्ये नव- नवीन प्रयोगशीलता आणून, त्यातून निखळ आनंद शोधणारा हा 'आनंदघन' म्हणजे युवकांसाठी सुंदर वस्तूपाठ आहे. स्वयंप्रज्ञेे,जिद्दीने व मेहनत - चिकाटीने त्यांनी आधुनिक शेतीला समृद्ध केले आहे. त्यामुळेच त्यांच्याप्रति आमच्या मनात रुजलेला आदरभाव सदैव वृद्धिंगत होतो. त्यांच्या विवाहापूर्वी सहचारीनेशी हितगुज करताना,स्वतःच्या आंतरीक स्पंदनाशी इमान राखून, आपल्या करिअर विषयी भावी पत्नीशी सत्यता ठेवणारा हा अवलीया, आजच्या युगाचा खऱ्या अर्थाने राजबिंडा नायक आहे.
    आपल्या निरपेक्ष वृक्ष संगोपणाला मानवानंदना देणारे सुभाष लाड सर म्हणजे पक्का रत्नपरखीच!!! अमर सरांसारखी असंख्य अनमोल रत्न आज त्यांनी राजापूर - लांजा तालुक्यातून तावून सलाखून एकवटली आहेत.त्याबद्दल त्यांचं कौतुक.
    श्री. किशोर आयरे
    समाजिक कार्यकर्ता

    ReplyDelete