Tuesday, May 21, 2024

नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे जयंती

         
           रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पूर्वेकडील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या रिंगणे गावचे सुपुत्र व गिरणगावचे थोर नाटककार लाडकोजी कृष्णाजी तथा ला.कृ.आयरे यांची आज ( २१मे १९१८)  जयंती आहे या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना त्यांचे कर्तृत्व काव्यातून मांडण्याचा सुभाष लाड यांनी केलेला प्रयत्न.
          ll नाटककार ला.कृ. आयरे ll

उभ्या महाराष्ट्रामाजी
ठावा माझा लाडकोजी 
चालवा रे त्याचा वसा
सांगे लेकरांना आजी ll

             याच रिंगणे गावच्या 
              एका आयरे कुटुंबी 
              झाले नवस सायास 
              बाळ जन्मले रे गुणी ll

त्याने गाठली मुंबई 
चार चोपड्या शिक्षण 
काय बुद्धिवान तरी 
मोह पाडी ते लिखाण ll

           कुण्या रावाचा ' जुलूम '
           याने नोंदली ' फिर्याद '
           एका ' मायेचा संसार '
           रहावा पिढ्या पिढ्या याद ll 

कामगार रंगभूमी 
गाजविली एकेकाळी 
नावलौकिक जाहला 
दिली संस्थांना उभारी ll

              तेव्हा गिरण गावात 
              त्यांचे नाट्य प्रबोधन 
               उत्सवात व्हावी गर्दी 
               आणि व्हायचे सन्मान ll

त्यांचे नाटक सांगते 
अंधश्रद्धा निर्मूलन 
आहे जीवनाला शाप 
सोडा दारूचे व्यसन ll

             कार्य बघून शासन 
             गेले तेव्हा भारावून 
              एका भल्या नाटक वाल्या 
              दिला मोठा बहुमान ll

मराठीचा अभ्यासक
यांसी वाचेल लवून 
रिंगणे गावच्या पुत्रांनो 
स्मृति ठेवा रे जपून ll

सुभाष लाड
९८६९१०५७३४

**नाटककार ला.कृ. आयरे यांच्या नाट्याकृती*****

नाटकाचे नाव, नाटकाचा विषय आणि प्रकाशित केल्याचे वर्ष 

१) फिर्याद- कोर्टकचेऱ्यांचे दुष्परिणाम (१९४८)
२) मायेचा संसार- एकत्र कुटुंब पद्धती  ( १९४८ )
३) जुलूम- वेठबजार व कर्जमुक्ती (१९४९)
४) मंगल दिव्य - पुनर्विवाह (१९४९) 
५) लाख माणूस - माणुसकी (१९५०) 
६) बुद्धिभेद - अस्पृश्यता निवारण (१९५१) 
७) शेतकरी दादा - अधिक धान्य पिकवा (१९५१ )
८) स्वराज्य रवी - स्वराज्य निर्मिती ऐतिहासिक (१९५१ )
९) कुलकलंक - करंटी संतती (१९५२ )
१०) माय माऊली - खेड्यात वैद्यकीय मदत (१९५३) 
११) वडील माणसं - जुन्या नव्यांचा संघर्ष (१९५३ )
१२) नवलाची गोष्ट - हुंडाबंदी  ( १९५५ )
१३) अमर त्याग - बहुजन सेवा (१९५६) 
१४) इर्षा अहंकार - (१९५७) 
१५) जया अंगी मोठेपण - कौटुंबिक जबाबदारी (१९५९) 
१६) कसोटी - दारूचे दुष्परिणाम (१९६२) 
१७) सुख पाहता जवा पाडे -  गरिबांच्या यातना (१९६३ )
१८) निर्धार - स्वराज्याचे सुराज्य (१९६४ )
१९) संसार असावा छान - कुटुंब नियोजन (१९६८ )
२०) हेचि माझे सर्व सुख - बहुजनातील अबला स्त्रिया (१९६८) 

*मृत्यूनंतर प्रकाशित ******"
१) स्वप्न साकार झालं 
२) बहुरूपी लोकनाट्य 
३) प्रगतशील महिला

अभिप्राय -

लाड सर,
      नमस्कार! 
       नाटककार श्री. लाडकोजी कृष्णाजी आयरे यांची आज 106 वी जयंती.या निमित्ताने आजही आपण त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिलात.हे निश्चितच कौतुकास्पद आहे. गेली कित्येक वर्ष आपण त्यांच्या स्मृती - जागृतीचं अभिनव कार्य अविरतपणे , सातत्याने करीत आहात. यातूनच त्यांच्याविषयींची आपली आत्मीयता,जिव्हाळा व जवळीक जाणवते.
             आमच्या संपूर्ण रिंगणे गावामध्ये आपण केवळ एकमेव विभूती आहात ज्यांना नाटककार श्री.ला.कृ.आयरे यांच्याविषयीं,  त्यांच्या साहित्याविषयीं अतीव आदर आहे.( आम्ही फक्त त्यांचा वारसा सांगण्यापीकडे काहीही करीत नाही. ही शरमेची गोष्ट आहे) कामगार रंगभूमीवरील या राजहंसाच्या यशस्वी कारकिर्दीचा वास्तुनिष्ठ इतिहास नवीन पिढीपुढे यावा म्हणून आपण सातत्याने  करीत असलेले प्रयत्न अनमोल आहेत. आपल्या राजापूर - लांजा नागरिक संघाच्या वतीने आपण प्रति - वर्षी त्यांच्या नावे नाट्यकर्मीना पुरस्कार देऊन त्यांच्या नाट्यकलेचा गौरव करता.ही अभिमानाची गोष्ट आहे. 
           नाटककार श्री.ला.कृ.आयरे आणि आपल्या ऋणानुबंधाचे बरेच जादुई क्षण हे वहीच्या पानामध्ये ठेवलेल्या मोरपीसांसारखे अनमोल आहेत.आपणास हवं तेव्हा त्यांना बाहेर काढून मायेन कुरवाळावं ........ आणि पुनः जपून ठेवावं मोरपीसासारखं, कलासक्त जीवन जगण्याची ऊर्जा मिळवण्यासाठी............ यापेक्षा वेगळा भाग्योदय तो काय असावा??? लाड सर, सलाम आपल्या निरपेक्ष बांधिलकीला!!!!! म्हणूनच तर आम्ही आपले followers आहोत.
👏👏👏
किशोर आयरे
सामाजिक कार्यकर्ते,रिंगणे


२)
मा. सुभाष भाई,
🙏🙏
आपले सहित्य, कला , व सामाजिक क्षेत्रांतील योगदान अनेकाना व आम्हास निश्चित प्रेरणादायी आहे.

शुभेच्छा 🙏
शिवाजी सयाजी पेडणेकर 


*❀ २१ मे ❀*
*रंगकर्मी लाडकोजीराव आयरे जन्मदिन*

जन्म - २१ मे १९१८ (वाटूळ,राजापूर,रत्नागिरी)
मूळगाव -रिंगणे,ता.लांजा.
स्मृती - १५ नोव्हेंबर १९८४

मराठी कामगार रंगभूमीचे कलाकार लाडकोजीराव कृष्णाजी आयरे यांचा जन्म वाटूळ, ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे झाला. मुंबईच्या लालबाग, परळ, नागपाडा, लोअरपरळ, काळाचौकी, शिवडी, सातरस्ता, वरळी, आगारबझार अशा विस्तृत मध्य मुंबईतल्या भागावर विस्तारलेल्या कापड गिरण्यांनी रंगभूमीला दिलेली देणगी म्हणजे कामगार रंगभूमी. २० व्या शतकात अडीच लाख कामगारांना या कापड गिरण्या रोजगार पुरवित होत्या. मुंबईच्या व्यापारात या गिरणी कामगारांचे योगदान अनन्यसाधारण आहे. या गिरणीत मास्तर, मुकादम, जॉबर इ. पदावर कोकणातील चाकरमानी लोक राहू लागले. या कोकणी कामगारांच्या वस्तीने चाळ संस्कृती निर्माण झाली आणि मग कोकणातील तरुणा मध्ये उपजत असलले नाट्यवेड गिरणगावात रूजू लागले. चाळी चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवात, शिवजयंती, गोकुळाष्टमी, सत्यनारायण इ. प्रसंगी नाटके सादर होऊ लागली. गिरणगावात सादर होणाऱ्या या नाटकाच्या कथानकातून कोकणच्या ग्रामीण जीवनाचा, बोलीचा, मनोवृत्तीचा परिचय महानगरातील लोकांना होऊ लागला. यामध्ये नाटककार आबासाहेब आचरेकर, टी.एस. कावले, वसंत दुधवडकर, वसंत जाधव, आत्माराम सावंत, मु.गो. शिवलकर, कृ.गो. सुर्यवंशी, बाबुराव मराठे, ना.ल. मोरे, दत्ता साटम, प्रेमानंद तोडणकर, ना.रा. जोशी, इ. नाटककारा सोबत मामासाहेब वरेरकर, मो.ग. रांगणेकर, आचार्य अत्रे अशा दिग्गज नाटककारांची नाटके सादर होऊ लागली. या सर्वामध्ये अग्रभागी होते ते कोकणातील नाटककार ला.कृ. आयरे. म्हणूनच त्यांना 'गिरणगावच्या रंगभूमीचा मुकुटमणी' असे संबोधले जाते.

नाट्यमहर्षी मामा वरेरकर व नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांना गुरूस्थानी मानणाऱ्या ला.कृ. आयरे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी कोर्ट कचेऱ्यांचे दुष्परिणाम या विषयावर 'फिर्याद' हे नाटक लिहिल्या नंतर मागे वळून पाहिलेच नाही. १९४९ मध्ये त्यांनी 'जुलूम' हे नाटक रंगभूमीवर आणले. या नाटकाचे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातुन हजारो प्रयोग होऊन संबंध महाराष्ट्रात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे १९४५ ते १९५७ या मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी आपल्या 'स्वस्तिक नाट्य मंदिर' या संस्थेतर्फे स्वत:ची १५ नवी नाटके रंगभूमीवर आणून चैतन्य निर्माण केले. बुद्धीभेद, शेतकरीदादा, मायमाऊली, कुल कलंक, इर्षा, अमरत्याग, कसोटी, मायेचा संसार, स्वराज्य, निर्धार, आदि २३ नाटके, ०४ लोकनाट्ये, ६ एकांकिका व ३०० श्रृतिकांचे त्यांनी लेखन केले. कथानकातील विविधता, प्रभावी व्यक्तिमत्त्वे, सुंदर चैतन्यपूर्ण स्वभाव रेखाटन, वेधक प्रसंग योजना, वातावरण निर्मिती, खटकेबाज चटकदार संवाद, उच्च प्रतीची संवाद रचना, आंतरिक संघर्ष, मानवी मनोवृत्तीची विविध रूपे, श्रृंगारप्रचार, विनोदात्मकता, आकर्षक शेवट, कलात्मक दृष्टी, कोकणच्या बोलीवर विविधांगी दर्शन, आदि लेखन वैशिष्ट्यामुळे नाटककार ला.कृ. आयरे यांची नाटके त्या काळी महाराष्ट्र, गुजरात, म्हैसूर राजस्थान, आसाम, मद्रास पर्यंत तेथील मराठी भाषिकांनी केली.

प्रा. ना.सी. फडके यांच्या मतानुसार संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो. या संघर्षात गुंतलेल्या व्यक्ती या तुल्यबळ असायला हव्यात आणि नाटककाराने त्यांची स्वभावचित्रे निरपेक्षपातीपणे रंगवायला हवीत तरच ते नाटक स्वाभाविक उंची गाठते. नाटककार ला.कृ. आयरे यांच्या नाटकांचा तर संघर्ष हा स्थायीभाव आहे. हा संघर्ष प्रस्थापित खोत, जमीनदार, सावकार विरोधात श्रमजिवी शेतकरी वर्गाचा होता. अन्याया विरोधात न्यायाचा आहे. आयरेंनी नाट्यलेखनाव्दारे शोषित, वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतानाच ग्रामीण भागातील कष्टकरी, श्रमजीवी वर्गामध्ये आत्मभान निर्माण करण्याचे कार्य केले आहे. त्यामुळेच समाज प्रबोधनाचे दर्शन घडविणारे श्रेष्ठ नाटककार म्हणून ते प्रसिद्धिस पावले. ला.कृ. आयरे यांना मराठी कामगार रंगभूमीचे 'शेक्सपिअर", गिरणगावच्या रंगभूमीचे 'मुकुटमणी' आणि ' ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजाच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालु ठेवणारी पहिली व्यक्ती; असे आचार्य प्र.के. अत्रे यांनी गौरविले होते. नाट्यलेखना शिवाय 'मराठा सेवक' या मासिकाचे संपादन करताना आयरेंनी आनंदवन, रसरंग, कोकण दर्शन, ललित, किर्लोस्कर, मनोहर, नवशिक्षण आदि मासिकं व साप्ताहिकातुन अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले. बायोग्राफी इंडिया १९८०, लीडर्स ऑफ इंडिया, साहित्य अकादमी नवी दिल्ली या ख्यातनाम पुस्तकातुन त्यांच्या दखलपात्र साहित्यिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या अनेक नाटकांनी विविध पारितोषिके पटकाविली. महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाट्य लेखनासाठी 'राज्यस्तरीय  पुरस्कारा सोबत' अखिल भारतीय नाट्य परिषद, भारत सरकार, कामगार कल्याण मंडळ, आंतरगिरणी कामगार स्पर्धा, नटवर्य चिं. कोल्हटकर नाट्यस्पर्धा, भारतीय साहित्य सभा पुणे या विविध स्पर्धेत आयरेंच्या नाटकांनी समीक्षकांच्या, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत अनेक पुरस्कार प्राप्त केले. 

आयरे एक प्रतिभाशाली नाटककार होतेच पण त्याबरोबर एक उत्कृष्ट नट, दिग्दर्शक, निर्माता, प्रकाशक, कथाकारही होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते. त्यांनी त्यांच्या मुळ गावी रिंगणे येथे अखिल रिंगणे ग्रामस्थ सेवा मंडळाची स्थापना केली. कोकणात दुर्लक्षित राहिलेल्या राजापूर लांजा तालुक्यातील २२८ गावांच्या विकासासाठी त्यांनी 'राजापूर लांजा तालुका नागरिक संघा 'ची स्थापना केली. आज या संस्था उल्लेखनीय कार्य करित आहेत. साहित्य संघ मंदिर, शिवाजी मंदिर मुंबई, मराठी  ग्रंथ संग्रहालय, साने गुरुजी कथामाला आदि अनेक संस्था मध्ये त्यांनी समर्पित भावनेने कार्य केले. १६ डिसेंबर १९५१ रोजी झालेल्या दक्षिण कोकण नाट्य संमेलनाचे आयरे स्वागताध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी स्वागताक्षीय भाषणातून मांडलेले मराठी रंगभूमी व नाट्यचळवळीच्या उर्जितावस्थेसाठीचे अभ्यासपूर्ण विचार आजच्या काळातही तितकेच महत्वाचे वाटतात. आपल्या नाट्यलेखनाचे कोणतेच मानधन न घेणारे आयरे त्या काळात संप्रेषणाच्या मर्यादित सुविधा असतानाही आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांच्या प्रेमाखातर व नाट्यचळवळीच्या प्रचारार्थ स्वखर्चाने नागपूर, चंद्रपूर, म्हैसूर आदि ठिकाणी आपुलकीने पोहचत असत. साहित्य, समाज विकासाचा ध्यास घेतलेल्या नाटककार आयरे यांचं निराळंपण त्यांच्या अशा निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन वर्तमान पिढी समोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे. ला.कृ. आयरे यांचे १५ नोव्हेंबर १९८४ रोजी निधन झाले.सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड यांनी रिंगणे गावी त्यांची जयंती साजरी करण्यास १९८९ पासून सुरुवात केली. पुढे ला.कृ. आयरे यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी व हितचिंतकांनी स्व.आत्माराम हांदे यांच्या मार्गदर्शनाखाली 'नाटककार ला.कृ. आयरे स्मृति ट्रस्ट' ची स्थापना जुलै १९९१ रोजी केली. नाटककार ला.कृ. आयरेंच्या आठवणी सदैव ताज्या ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या ट्रस्टने गत तीन दशकात एकांकिका स्पर्धा, एकांकिका लेखन, नाट्यस्पर्धा, नाटयलेखन, एकपात्री स्पर्धा आदि विविध उपक्रम राबवून मराठी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली आहे. 
       २०१९ मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त मराठा मंडळ मुलुंड च्या सहकार्याने नाटककार ला.कृ. स्मृति ट्रस्ट ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाशित केलेले विजय हटकर व सुभाष लाड संपादित  'नाटककार ला.कृ. आयरे गिरणगावच्या रंगभूमीचे मुकुटमणी' हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे.

विजय हटकर 


No comments:

Post a Comment