गतवर्षी बरोबर याच दिवशी पवई पंचकुटीर येथे एका घरगुती कार्यक्रमात मी मशगुल होतो. गेली अनेक वर्ष ज्यांच्या सहवासात बरंछ काही शिकायला मिळालं, अनुभवायला मिळालं आणि त्याचबरोबर एका सामाजिक कार्यात मनाजोगतं नेतृत्व मिळालं म्हणून मी आनंदीत होतो. तो आनंद देणारे मा. श्री सुरेशजी हांडे यांच्या पंच्याहत्तरीचा तो कार्यक्रम होता. वास्तविक पाहता हा कार्यक्रम अधिक मोठ्या स्वरूपात करता आला असता परंतु मुळातच प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून सरळ धोपट मार्गाने प्रामाणिकपणे काम करणे आणि उरलेल्या वेळात आध्यात्मिक क्षेत्रात रममान होणे एवढ्या पुरतीच जगण्याची दिशा ठरवलेल्या हांडे यांना गाजावाजा करून आपण पंच्याहत्तर वर्षाचे झालो हे सांगण्यात रस नव्हता. त्यांचे संस्कार त्यांच्या कुटुंबीयांवरही असल्यामुळे माझी सूचना त्यांनी धुडकावून लावली. एकादृष्टीने त्यांच्या निर्णयाचा मी आदरच केला.
तसं पाहिलं तर कोरोना काळाने आमच्या मैत्रीत अधिक दृढता आणली. त्याला कारण ते काही दिवस पुण्याला असताना त्यांचे आणि माझे मोबाईल वरून संभाषण व्हायचे, एकमेकांचे कुशल पुसायचो. एकदिवस त्यांनी मला एक लेख वाचायला पाठवला तो वाचून मी फार आनंदित झालो.एका प्रथीतयश साहित्यिकाप्रमाणे त्यांनी केलेले लेखन मला फारच भावले. वयाने मोठे असल्यामुळे मी दबकतच त्यांना काही सूचना केल्या मात्र त्यानी कुणाच्यातरी सांगण्यावरून घाई गडबडीत त्यांच्या सर्व लेखांचे एकत्रित पुस्तक केले आणि त्याला नाव दिले 'एव्हरग्रीन.' ठरल्याप्रमाणे त्यांनी एक प्रत मला वाचायला दिली ती वाचल्यानंतर हांडे साहेबांचे समग्र चरित्र माझ्यापुढे आल्यासारखे वाटले.त्यातून त्यांचे बालपण, कॉलेज शिक्षणासाठी झालेली धडपड, शिक्षक म्हणून भिवंडी येथे केलेली दहा वर्षाची सेवा, त्यावेळेला जोडले गेलेले विद्यार्थी आजही त्यांच्या सोबत आहेत त्यातील अनेकांच्या आयुष्याला वळण देण्याचं काम हांडे साहेबांनी केलं त्याबद्दलची कृतज्ञता वेळोवेळी व्यक्त करणारे त्यांचे विद्यार्थी - विद्यार्थिनी, वडिलांच्या हट्टामुळे जम बसलेली शिक्षकी नोकरी सोडून त्यांच्या भाजी व्यापारात मदत करण्यासाठी भायखळ्याला येणं. एक प्रामाणिक व नवनवीन प्रयोग करणारा व्यापारी म्हणून व्यापारी म्हणून मिळवलेली समाज मान्यता, त्या व्यापारात आलेले भले बुरे अनुभव आणि हे सगळं जगताना स्वतःच आगळं वेगळं व्यक्तिमत्व कोणत्याही प्रकारचा डाग न लावू देता इथपर्यंत जपणं हे सगळं वाचल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा असलेला आदर अधिक दुणावला.
त्यांचं ते जाडजूड पुस्तक अनेकांच्या पर्यंत जावं आणि त्यांना लेखक म्हणून मान्यता मिळावी यासाठी माझ्या परीने साहित्य क्षेत्रातील योग्य माणसांपर्यंत हे पुस्तक पोहोचवण्याचं मी काम केलं याचा मला अभिमान आहे.
कोरोना काळातील माझा पहिला 'मोडी दर्पण' दिवाळी अंक मी पवई इंग्लिश हायस्कूल येथे प्रकाशित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये नामवंत साहित्यिकांना बोलावले होते. हांडे साहेबांना सुद्धा निमंत्रण देताना आपण आपल्या पुस्तकाच्या प्रती बरोबर घेऊन या अशी सूचना दिली होती. याच कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक- अभिनेता मा. श्री नारायण जाधव हेही आले होते. ज्येष्ठ चित्रकार माननीय सुरेश जी डुंबरे यांनाही बोलावलं होतं .एकी कडे कार्यक्रम पुढे जात असताना पाहुणेमंडळीत बसलेले हांडे साहेब हे आपले पुस्तक पाहुण्यांना देऊन त्यांच्याशी ओळख करून घेत होते.सुरेश डुंबरे हे त्यांच्याच गावाकडचे असल्याचे त्यांना कळले आणि तिथून त्यांची मैत्री झाली. नारायण जाधव यांनी हे पुस्तक वाचले आणि ते सुद्धा त्यांच्या प्रेमात पडले अशाप्रकारे मी जिथे जात असे तिथे मी हांडे साहेबांना माझ्यासोबत नेत असल्यामुळे त्यांचे एव्हरग्रीन हे पुस्तक अनेकांच्या हाती पडले तशी त्यांची साहित्य क्षेत्रातील मित्रमंडळी सुद्धा वाढली.
पुढे काही दिवसांनी नारायण जाधव यांच्या ' तुझ्या आठवणीचे स्मरण चांदणे ' ही कादंबरी प्रकाशित झाली त्या कादंबरीची प्रत मी हांडे साहेबांना भेट म्हणून दिली हांडे साहेबांनी ती एक हाती वाचून काढलीच पण त्यातील अनेक विषयांवर जाधव साहेबांशी बोलून आपलं समाधान करून घेत असत. त्यातून त्यांच्याशी मैत्री झाली. अशातूनच एकदा जाधव साहेबांनी आपण बदलापूर येथील अपंग अनाथ प्राण्यांची सेवा करणाऱ्या पाणवठा या संस्थेला भेट देण्यासाठी बदलापूर येथे जात आहोत असे सांगितल्याने हांडे साहेब, डुंबरे सर प्रासादिक कुलकर्णी आणि जाधव साहेब असे आम्ही चौघेजण डुंबरे सरांच्या गाडीतूनच बदलापूरला पोहोचलो. तिथे आम्हाला येऊन भेटले ज्येष्ठ चित्रकार लेखक कवी माननीय विजयराज बोधनकर. पाणवठा या संस्थेचे कार्य पाहून दुपारच्या जेवण करता व विश्रांतीसाठी बोधनकर सरांच्या बदलापूर येथील स्टुडिओमध्ये थांबलो. न संपव्यात अशा गप्पा, काव्यमैफल आणि प्रवासातील गमतीजमतीने तो दिवस आठवणीत राहिला आणि मग जाता जाता आपण असं वरचेवर फिरायला जायला हवं असं ठरलं. त्याप्रमाणे आमचे खेळण्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. प्रत्येक सहलीत नवीन मित्र जोडले जात आहेत.
हांडे साहेब आज शहात्तर वर्षांचे झाले त्यांना मनापासून शुभेच्छा! पण याही वयात त्यांचा उत्साह पन्नाशीच्या माणसाचा असतो.मला ते आज सहज म्हणाले फक्त शहात्तर वर्षे मागे सरली.या पुढचं सत्र हे वानप्रस्थाश्रमाचं असणार आहे .आज काल ही आश्रम व्यवस्था नष्ट झाली असली तरी या संस्कृतीचा पगडा आजही आपल्या वरती आहे आणि म्हणूनच हिंदू व्यक्ती या विचारा प्रमाणे वागत असते.कुटुंबाची जबाबदारी मुलांकडे सोपवली आहेच. गेली पंचवीस वर्षे ते आपला व्यापार उदीम सांभाळून गणेश नगर मध्ये असलेल्या दुर्वाप्रिय गणेश मंदिरात सकाळी साडेसहा वाजता व संध्याकाळी आठ वाजता आरतीला उपस्थित असतात. श्रावण महिन्यामध्ये ते एखाद्या ग्रंथाचे पारायण करतात. देवळामध्ये असलेल्या प्रत्येक धार्मिक कार्यात ते पुजाऱ्यासारखे मदत करत असतात त्या कामात त्यांना आनंद मिळतो. तसे ते संत वृत्तीचे असल्यामुळे त्यांचे देवळात जाणे हे त्यांना अधिक शोभून दिसते.
हांडे साहेब हे कष्टाळू वृत्तीचे आहेत त्याचबरोबर कोणत्या गोष्टीत समाधान मानायचे यांचे त्यांचे वेगळे ठोकताळे आहे.आपल्या कष्टाच्याच पैशावरती आपण आनंद मानायचा असतो हे त्यांच्याकडून शिकायला मिळते. आवश्यक तेथे दानधर्म करणे, सामाजिक उपक्रमात सहयोग देणे यामुळे त्यांच्या जगण्याला अधिक उजाळा मिळालेला आहे. नेहमीच स्वच्छ सफेद कपड्यात वावरणारे हांडे साहेब दुसऱ्याकडूनही तशाच वागण्याची अपेक्षा करतात परंतु आजचे जग हे त्यांच्या विचाराशी मिळते जुळते नसल्यामुळे ते ज्या सामाजिक क्षेत्रात काम करतात तिथे काही वेगळ्या वृत्तीची माणसे भेटली तर ते चिडचिड करतात. तसं पाहिलं जगण्याच्या धडपडीत आजचा समाज नीती मूल्य विसरत चाललेला आहे आभाळ फाटलेला आहे आपण कितीसं ठिगळ लावणार आहोत याची त्यांना जाणीव आहे परंतु जमेल तेवढं पेरावं म्हणून ते जागरूक असतात
एका जिंदादिल मित्राचा मला सहवास मिळतोय यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो आहे. मा. श्री सुरेश हांडे यांना पुढील आयुष्यात चांगले आरोग्य मिळावे त्यांचा शतकपूर्तीचा कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात करण्याची आम्हाला संधी मिळावी असे माझ्याकडून, माझ्या कुटुंबीयांकडून आणि नव्या मित्रमंडळी कडून परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आहे.
सुभाष लाड. २० मे २०२४
९८६९१०५७३४
No comments:
Post a Comment