Sunday, May 19, 2024

भारतातील 18 व्या लोकसभेची निवडणूक आणि मी


            जगातील सर्वात मोठी लोकशाहीची निवडणूक म्हणून भारताच्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. एकूण सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार असून महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया आज पार पडते आहे.मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये आजची निवडणूक आहे. 
           मी जिथे राहतो तो मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ आहे. आज २० मे २०२४, कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दुपारच्या धगधगत्या उन्हात उभे राहण्यापेक्षा सकाळच्या शीतल, शांत वातावरणात मतदान करणं अधिक चांगलं असं समजून आम्ही सकाळी लवकरच मतदान करण्यास जाण्याचं ठरवलं. आमच्या केंद्रासमोर फार मोठी रांग नव्हती मात्र ईव्हीएम मशीन मध्ये काही तात्काळ बिघाड झाल्यामुळे काही वेळ थांबावं लागलं तरीही साडेआठ वाजता आम्ही मत देऊन बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर आम्ही एकत्रीत फोटो  काढून घेतला. 
         यावर्षीच्या महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीत बरंच काही आगळवेगळं, काही चमत्कारिक, काही मनाला न पटणारं असं बरंच काही घडत गेलं. एक तर गेल्या दोन वर्षात लोकशाहीचे संकेत धुळीला मिसळून राजकारण ज्या दिशेला जात होते त्यामुळे महाराष्ट्रातील जनता संभ्रमित होती. कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं हे कळून येण्यास वाव नव्हता. माध्यमाने सुद्धा आपला विश्वास गमावला आहे की काय असे वाटते आहे.कधी कधी माध्यमे लाचार झाल्यासारखी वागतात तेव्हा मनाला यातना होतात.त्यामुळे एखादी बातमी खरंच खरी असेल का अशा साशंक अवस्थेत सामान्य माणूस आहे. माझ्या दृष्टीने सारेच राजकीय पक्ष मतांचे राजकारण करू पाहत आहेत आणि हे उत्तम लोकशाहीला पोषक नाही त्यामुळे सामान्य जनता मत तरी कोणाला द्यायचे ? या प्रश्नाभोवती फिरते आहे असो अधिक बोलून दगडावर डोके आपटून का घ्या? त्यापेक्षा आज ना उद्या यात बदल होईल, जगातली सर्वात मोठी लोकशाही निवडणूक म्हणून जसं पाहिलं जातं तसं जगातली एक उत्तम लोकशाही म्हणून सुद्धा एक दिवस पाहिलं जाईल या आशेवरती थांबलो आहोत. 
          हे असं काही मनात असलं तरी भारतीय सुजाण नागरिक आपली लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावत असतो .आता तर नोटासारखा एक अधिकारही आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे पर्याय नाही म्हणून थांबण्याची गरज नाही. पूर्ण देशभर यावर्षीची मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे आढळून येते मात्र मुंबईसारख्या पुढारलेल्या नगरीत, सुजाण नगरीत ही टक्केवारी अधिक असेल याची खात्री वाटते. शेवटी मतदार हा राजा असतो. मताद्वारे त्याने आपले मत प्रकट करायचे असते. त्याच्या मतानुसार कोणत्या पक्षाने राज्यकारभार करावा हे ठरविले जाते आणि म्हणून माझ्या एका मतामुळे मला हवा असलेला राजकीय पक्ष त्याच्या अधिकारापासून दूर जाऊ नये म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. 
        आम्ही आज मतदान केले. मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा आम्ही तिघेही एकाच गाडीतून मतदान केंद्रावर गेलो. एकाच केंद्रावरती असल्यामुळे एकाच रांगेत राहिलो. मतदान झाल्यानंतर एकत्र नाश्ता केला पण कोणी कोणाला मत केलं किंवा कोणी कोणाला मत करावं याबाबत आम्ही चकार बोललो नाही कारण मत देणे हा प्रत्येकाचा स्वतंत्र विचार आहे, स्वतंत्र अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. अमुक पक्षाची विचारधारा चांगली आहे अमुक पक्षाची विचारधारा पटत नाही अमुक पक्षाचा उमेदवार योग्य आहे किंवा अयोग्य आहे, एखाद्या उमेदवाराची पार्श्वभूमी याबाबत आम्ही चर्चा करतो मात्र कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं हे प्रत्येकावर सोपवतो. ही तर आपली खरी लोकशाही आहे.
           अठराव्या लोकसभेसाठी आम्ही आमचे अमूल्य मत देऊन आलो आपणही आपले मत देऊन यावे ही नम्र विनंती. जय लोकशाही ! जय भारत !

No comments:

Post a Comment