आज माझा वाढदिवस आहे.
माझ्या पिढीतल्या लोकांना तसं स्वतः:च्या वाढदिवसाचं कौतुक वाटत नाही कारण एक वेळेच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या त्या काळात वाढदिवस कसे साजरे होणार होते.मला वाटतं त्यातूनही माझ्या आघईनं माझा वाढदिवस साजरा केला असता पण ती पद्धत गावालाच काय मुंबईतही सर्वसामान्य माणसांत नव्हती.१९९० च्या दशकात ती चोर वाटेनं नवीन जन्मलेल्या मुलांच्या सोबत आली.आणि तो महत्त्वाचा संस्कार होऊन बसलाय. पूर्वी ती मेणबत्ती ही विझवली जायची पण मग हिंदू संस्कृतीत दिवा विझवणे हे अशुभ मानले जाते हे गळी उतरवले गेले व मेणबत्ती गायब झाली पण केकने आपलं स्थान बळकट केलं.आश्चर्य एवढंच वाटतं कि न शिकलेली म्हातारीही नातवा बरोबर ' हॅप्पी बर्थडे टू यू करीत टाळ्या वाजवते.' मराठीचा पुळका असलेली मंडळी ' वाढदिवसाच्या शुभेच्छा 'अशा गोड ठाशीव भाषेत का बोलत नाहीत?.या छोट्या छोट्या गोष्टींतूनच भाषेची गोडी वाढवायची असते.काळाच्या बरोबर जाताना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणे हे ही आवश्यक आहेच ना! 'तुम जियो हजारो साल' म्हणताना जन्मदिनाचं गाणं मराठीत का होऊ शकलं नाही.असो आम्ही लवकरच मराठी गाणं आपल्याकडे पोहोचवू.
आता नातवंडं सुद्धा आजोबाच्या वाढदिवसाची वाट बघतात आणि आजोबांना शुभेच्छा देतात हे दृश्य निरागस,मंगलमय असतं.त्यातून आजोबांना जगण्याची प्रेरणा मिळतेच पण सुरक्षीततेच्या भावनेला आश्वासकतेची झालर चमकताना दिसते त्यांतून मिळणारा आनंद हा शब्दातीत असतो.आज सकाळीच नातींच्या सोबत वाढदिवस साजरा केला.माझ्या आयुष्यात सदैव आनंद खळाळत ठेवणाऱ्या नाती जगण्यातलं समाधान देतात.त्यांना सोडून बाहेर जाताना आतल्याआत गलबलून येतं.त्यात गुंतलो तर त्यांना सुद्धा मायेच्या माणसांना कधीं कधीं सोडून राहण्याची सवय लागणार नाही.म्हणून ती रडतात तेव्हा आपण कठोर आहोत हा खोटा भाव दाखवताना डोळ्यांच्या कडांनाही रुक्षपणा दाखवावा लागतो.आज मी आणि माझी पत्नी दोघेही त्यांना सोडून केरळचा प्रवास करीत आहोत.माझ्या जवळचा मित्र श्रीकुमार मेनन यांची मुलगी तशी आमची विद्यार्थीनी श्रीलक्ष्मी हिच्या लग्नसमारंभा करीता केरळला जात आहोत.
काल दिवसभर एक विवाह समारंभ आणि पंच्याहत्तरीचा कार्यक्रम असल्याने रात्री लवकर झोपून गेलो.सकाळी पुन्हा निघण्याची तयारी यामुळे आलेले शुभेच्छांचे फोन घेण्यापलीकडे वाॅटसअपच्या शुभेच्छा बघायला वेळ नव्हता.नेत्रावतीने ठाणे सोडले आणि मोबाईल हातात घेतला आणि एवढ्या साऱ्या शुभेच्छा बघून मी भारावून गेलो.
राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम राबविले जातात त्यातून जमलेला हा कांरवा प्रतिवर्षी वाढतो आहे त्यामुळे मी लोकसंग्रहाने श्रीमंत होत चाललो आहे.
नाहीतरी जन्मल्यापासून प्रत्येक पावलावर नवनवीन माणसं भेटतच असतात.जन्मल्यानंतर प्रथम आर्ईचा स्पर्श ही आईची ओळख ठरते तसंच पुढे भेटलेल्या माणसांचा सहवास त्यांची ओळख देतो.त्यातून आपण ठरवितो आपण कोणाच्या सोबत राहायचं. मी यात स्वतः:ला भाग्यवान समजतो.जगातल्या चांगल्या माणसांच्या मी सहवासात आहे.त्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे.मला माझे कुटुंब चांगले मिळाले, नातेवाईक चांगले मिळाले. समाज,गाव चांगला मिळाला.मला मिळालेले शिक्षक ,मित्र आणि संस्थांच्या माध्यमातून मिळालेल्या प्रत्येकाकडून मला कांहीतरी मिळालं आहे.म्हणून मी सगळ्यांचा ऋणी आहे.
आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणा सर्वांसाठी मी एक गीत पाठवतो आहे.तोच आपल्यासाठी माझा सलाम समजावा.
मनापासून धन्यवाद!
ते जलामृत विसरलो नाही
ज्या चिखलातून रूजलो फुललो त्यास विसरलो नाही
गुणगान कराया त्या मातीचे कधीच कचरलो नाही।।
अर्ध नागडे उघडे होतो सारेच सवंगडी
मातीमधले खेळ खेळलो खोखो हुतुतू लंगडी
परस्परांचे उष्टे खाल्ले आजही धुसरलो नाही ।।
भल्या पहाटे जात्यावरती आई गाई गाणी
शेण काढूनी गुरे पांगवी राबे बाप गव्हाणी
आवरून मी माझे दफ्तर शाळा चुकविली नाही ।।
कोंडा मांडा भाकर तुकडा वरती डांगर गोळा
रंगवून शिंगे भरवून उंडे बैलांचा सण पोळा
दिवाळी दसरा जुनाच सदरा नव्यास हटलो नाही ।।
रूतला काटा रडलो नाही अवघेची हो अनवाणी
ना करवादला कधी कुणी शोधता डुर्यातील पाणी
आला नळ घरात परंतु ते जलामृत विसरलो नाही ll
सुभाष लाड
२ मे २०२४
निवडक शुभेच्छा !
१)
ऋषितुल्य लाड सर,
कालच्या आपल्या जन्मदिनाच्या शुभेच्छा प्रीत्यर्थ आपण आपल्या ब्लॉग वर लिहिलेला कृतज्ञतापूर्वक लेख मनाला भावला. त्यातील कविता, आपली नाळ आजही आपल्या मातीशी,कशी जोडली असल्याचा पुरावाच आहे.
समाजिक बांधिलकी म्हणून, राजापूर - लांजा नागरिक संघाच नेतृत्व करून,त्यायोगे अतिशय सर्जनशील कार्य आपण आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने करीत आहात.साहित्यिक चळवळीची अक्षय परंपरा खेडोपाडी रुजवून खेड्यातील तरुण विचाराने प्रगल्भ करण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी सातत्याने ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करीत असता.गावागावातील नद्या,पाणवठे यांचं जतन आणि संवर्धन करून, आपण त्यातील पाण्याची तुलना आपण अमृताशी करता आहात. ही अभिनंदनाची गोष्ट आहे. समाजातील गोर- गरिबांची सेवा करताना डोक्यावर बर्फ, पायाला चक्री, आणि जिभेवर साखर ..... हा आपल्या यशस्वी समाजकार्यांचा त्रिसूत्री मुलमंत्र आहे.
आपल्या स्वभावातील सात्विक विवेक,ऋजुता आणि मुग्धता गुंतवुन् ठेवते आपल्यात........ मूर्तीच्या स्वरूपातील देवापेक्षा देवत्वाचा प्रत्यय देणारी तुमच्यासारखी असामान्य व्यक्तिमत्व आमच्या पिढीला नक्षत्रांच्या देण्यासारखी लाभतात. हे आमचं भाग्य आहे. जन्मदिनानिमित्त आपलं पुनःच्छ अभिनंदन!!!
किशोर आयरे
रिंगणे
२)
३)
स्वतःसाठी जगणारी माणसं घरच्यांसाठी प्रिय असतात.
पण काही माणसं संपूर्ण समाज जागृत व्हावा आणि समाजाला नवविचारांची नवी दिशा द्यावी या ध्येयाने प्रेरित होऊन काम करतात. ती माणसं समाजाला प्रिय असतात आणि समाजाचीच होऊन जातात. अशा माणसांचं सानिध्य ज्यांना लाभतं त्यांचंही आयुष्य उजळून जातं. कापरासारखं दुसऱ्यासाठी जळून आपला अनमोल वेळ संपवून परिसर निरोगी व सुगंधित करणारं आणि राजापूर लांजा परिसराला पर्यटनाच्या नकाशावर आणणारं, कोकणच्या विकासाचं स्वप्न हृदयात जपणारं, आणि त्यासाठी अहोरात्र धडपडणारं आमचं दैवत सुभाषजी लाडसर यांना वाढदिवसाच्या मनभर शुभेच्छा🌹
प्रा.विकास पाटील
पाचल
४)
५)
आदरणीय सुभाषजी लाडसर,
एक असामान्य व्यक्तीमत्त्व, सर्वसामान्य माणसांमध्ये सहज मिसळणारा व त्यांच्या व्यथा जाणून सर्वोतपरी मदत करणारा,मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस.सतत कामात गर्क असूनही नाती जपणारा व समाजसेवा हे व्रत मानून त्यासाठी अथक मेहनत घेणारा एक तत्वनिष्ठ माणूस म्हणजेच आदरणीय लाड सर आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐🌹🌹आपले सामाजिक कार्य अधिक बहरत जावो, यासाठी आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
गणपत शिर्के
माजी प्राचार्य
न्यू इंग्लिश स्कूल,लांजा
सुभाष लाड वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
६)
तुझी समाजसेवा मला नेहमी प्रेरीत करते व ती माझ्या तुझ्याबद्दलच्या कौतुकाचा विषय आहे.
मी सेवानिवृत्त झाल्यावर तुझ्या गावी येऊन तुला भेटण्याचा मानस करत आहे.
तुझ्या कार्यात तुला कायम यश मिळून माणूस व निसर्गाची सेवा करण्याची तुझी इच्छा सफल होवो,ही सदिच्छा!
अपर्णा बांदकर/अनुजा पराडकर
७)
अप्रतिम..
ReplyDeleteअतिशय मार्मिक. खुप छान लिहिले आहे सर. आपण जे जगलो. ते खरच सुंदर जिवनगाणे होते. वाढदिवस नव्हे तर येणारा सर्व क्षण आपण जगत होतो. अनुभवत होतो.
ReplyDeleteतुम्हाला वाढदिवसाच्या अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा सर. फार अभिमान वाटतो तुमचा. आयुष्याचे हे जिवनगाणे असेच गात रहा.
आनंदी रहा. तुमचे हे माणसाळलेले जीवन असेच ओतप्रोत भरुन राहो.
ऋषितुल्य लाड सर,
ReplyDeleteकालच्या आपल्या जन्मदिनाच्या शुभेच्छा प्रीत्यर्थ आपण आपल्या ब्लॉग वर लिहिलेला कृतज्ञतापूर्वक लेख मनाला भावला. त्यातील कविता, आपली नाळ आजही आपल्या मातीशी,कशी जोडली असल्याचा पुरावाच आहे.
समाजिक बांधिलकी म्हणून, राजापूर - लांजा नागरिक संघाच नेतृत्व करून,त्यायोगे अतिशय सर्जनशील कार्य आपण आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने करीत आहात.साहित्यिक चळवळीची अक्षय परंपरा खेडोपाडी रुजवून खेड्यातील तरुण विचाराने प्रगल्भ करण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी सातत्याने ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करीत असता.गावागावातील नद्या,पाणवठे यांचं जतन आणि संवर्धन करून, आपण त्यातील पाण्याची तुलना आपण अमृताशी करता आहात. ही अभिनंदनाची गोष्ट आहे. समाजातील गोर- गरिबांची सेवा करताना डोक्यावर बर्फ, पायाला चक्री, आणि जिभेवर साखर ..... हा आपल्या यशस्वी समाजकार्यांचा त्रिसूत्री मुलमंत्र आहे.
आपल्या स्वभावातील सात्विक विवेक,ऋजुता आणि मुग्धता गुंतवुन् ठेवते आपल्यात........ मूर्तीच्या स्वरूपातील देवापेक्षा देवत्वाचा प्रत्यय देणारी तुमच्यासारखी असामान्य व्यक्तिमत्व आमच्या पिढीला नक्षत्रांच्या देण्यासारखी लाभतात. हे आमचं भाग्य आहे. जन्मदिनानिमित्त आपलं पुनःच्छ अभिनंदन!!!