आगरी सेनेचे लोकप्रिय नेते मा.श्री.राजाराम साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेल्या व्याख्यानमालेतील चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या व्याख्यानाचा कळव्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी यायला उशीरच झाला त्यामुळे सकाळी उठायला उशीरच झाला.डोळ्यावर झापड असतानाच मोबाईल वाजला.रिमा आयरे नाव बघून बरेच दिवसात बोलणं न झाल्याचं आठवलं पण एवढ्या सकाळी काय बरं असावं ? असं मनात आलेलं मनातच विरघळलं.मोबाईल कानाला लावून नमस्काराचा सोपस्कार उरकला.
" सुभाषजी आज तुम्हाला वेळ आहे काय ? "
आज घरात लोळूनच काढायचा असं ठरवलेलच असल्यानं " हो आज घरीच आहे." असं सांगताना आलेली जांभई थोडी चोरल्यागत पूर्ण केली.
" आज अक्षयचा गीत रामायणाचा कार्यक्रम राजा शिवाजी विद्यालयात आहे.तुम्ही यावं असं वाटलं म्हणून फोन केलाय."
" अरे व्वा मला बघायचाचं आहे अक्षयचा कार्यक्रम."
" आज सकाळी आणि दुपारनंतर दोन शो आहेत.दुपारचे पासेस आहेत.किती ठेवू तुमच्यासाठी ? "
" दोन ठेवा."
" आठवणीने या हं."
सुसंस्कृत आणि आदरयुक्त बोलणं हे रिमा ताईंचं संभाषण गेल्या तीन वर्षांपासून कधीतरी ऐकायला मिळतं.आम्ही एकाच गावचे आहोत हे नातं मुंबईत आपलेपणाची शाल पांघरल्यासारखं असतं.मी तर जगाच्या पाठीवर कुठे कुठे जातो तिथे तिथे आपल्या गावाकडची माणसं शोधत असतो.
कोरोनाच्या काळात कधीतरी रिमा ताईंचा फोन आला होता.कुणाकडून तरी त्यांना माझी माहिती मिळाली.त्या फारशा गावाकडे जात नसल्याचं कळल्यावर त्यांना आपल्या गावाकडे यावं म्हणून बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि पुढे संपर्क सुरु राहिला.त्यानंतर आमच्या अमित खोतने मला फोन करुन " तुमच्या गावचा माझा मित्र माझ्यासोबत आहे.बोला त्यांच्याशी." असं बोलून त्याने त्याच्याकडे फोन दिला.नारदीय किर्तन करणाऱ्या अक्षय आयरे ची तेव्हा ओळख झाली.मग कधीतरी स्नेहल आयरेंनी फोन करुन " आमचे एक मित्र गीत रामायणाचा कार्यक्रम बघायला गेले होते.तो कार्यक्रम आपल्या गावच्या अक्षय आयरेचा आहे.तुम्ही ओळखता का त्याला ?"
" होय,मला प्रत्यक्ष भेटायचंय त्याला ."
यु ट्युबवरचे कार्यक्रम आणि बाहेरुन कुणी ना कुणी अक्षयचे कौतुक सांगत असतांना अक्षयला भेटण्याची माझी उत्सुकता वाढत होती.आणि आज त्याच्या आईनेच मला त्याला भेटण्याचा पास दिला होता.
दुपारी दोन वा.स्नेहल आयरेंचा फोन." तुम्ही अक्षयच्या कार्यक्रमाला येताय ना ? सुंदर कार्यक्रम आहे.मी त्याच्या आईला सांगितलंय ग्रामीण साहित्य संमेलनात अक्षयचा कार्यक्रम ठेवू म्हणून."
अडिच वाजता नीनावी फोन" मी अक्षयचा भाऊ राहुल बोलतोय,तुमचे पास माझ्याकडे आहेत.आल्यावर फोन करा."
त्याने वाॅटसअपलाच फोटो टाकल्याने आम्ही तडक सभागृहात पोहोचलो. सी सोळावर आमचे मित्र सुरेशजी हांडे व सतरावर मी बसलो.नुकताच कार्यक्रम सुरू झाला होता.लगेच लक्षात आलं सुत्रधार आणि निवेदनाची भुमिका पार पाडत लिलया पदलालित्य करीत विषय पुढे नेण्याचं काम अक्षय करीत होता.अक्षयने मला गावाकडे नेलं.आमच्या गावात उद्या रामनवमीचा उत्सव आहे. रणरणत्या उन्हात पांढऱ्या व लाल चाफ्याच्या फुलांचे हार काठीवर अडकवून मी उभा असायचो.पाच पैसे,दहा पैसे मिळाले तरी भरपूर काही मिळाल्याचा आनंद घेऊन जत्रेतल्या दुकानात बेचक्यात मावणार नाहीत एवढे मोठे कुरमुऱ्याचे लाडू नाहीतर उलट्या रंध्यावर बर्फाचा तुकडा घासून त्या किसाचा गोळा बांबूच्या काडीवर घट्ट दाबून वर रंग मारलेला गोळा खातांना अंगातल्यावर पडलेले डाग समोर दिसू लागले.रात्रीच्या नाटकाकरीता जागा अडवण्यासाठी घरातलं बारदान घेऊन पळत जातो आहोत असा भास क्षणभर व्हायचा.राम नवमीचं नाटक हे गावच्या नाट्यपरंपरेतील पहिलं नाटक.त्यानंतर हनुमान जयंतीची नाट्य परंपरा.ही परंपरा पुढे प्रत्येक वाडीत, प्रत्येक घरात सुरू झाली.ती नाट्य परंपरा जागवणाऱ्या व वाढवणाऱ्या रिंगणे गावचा सुपुत्र आज दादर मधल्या राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रा.बी.एन.सभागृहातील गच्च भरलेल्या सुज्ञ प्रेक्षकांच्या समोर ' सुस्वागतम् रामायणम् ' या नृत्य नाट्याच्या बाराव्या खेळात सर्वांच्याच कौतुकाचा वर्षाव टाळ्यांमधून घेत होता.माझी अभिमानाने छाती फुगवीत होता.'कलाकार, दिग्दर्शक ,नृत्य दिग्दर्शक आणि निर्माता अक्षय आयरे.'
काल एका किर्तनात ऐकले ' आपण आलो कुठून आणि जाणार आहोत कुठे? आणि उत्तर होतं.माती.' मला ही ते पटलं.जशी माती असते तेच गुणधर्म घेऊन धान्य उगवते आणि तेच संस्कार तिथे जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवावर होतात.रिंगणे गावात पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, विनोदी अगदी सगळेच नाट्य प्रकार हाताळले गेलेत.दिवसभर कमरेला आखडी बांधून झाडावर चढून कौलं तोडणारा माणूस रात्री नाटकात नटीच्या वेषात 'ईश्श' म्हणताना तो पुरुष आहे हे म्हणण्याची हिंमत होत नसे.इथल्या प्रत्येक वाडीचा किंवा मंडळाचा नाटकाचा प्रवास एकेक प्रबंध ठरेल इतके कलाकार,इतके नाट्यप्रयोग, इतके प्रसंग,इतके अनुभव इथे मिळतील.
गावातच काय पण या गावातून दुसरीकडे वास्तव्यास गेलेल्या लोकांनीही ही नाट्यपरंपरा तिकडे नेली.भिवंडीत गेलेले तसेच जव्हार येथे गेलेले आयरे तिथे नाटकात कामं करतात.हे मी तिथे जाऊन जाणून घेतलंय.
आज अक्षयच्या कल्पनेतून साकारलेलं नृत्यनाट्य बरोबर अडिच तास चाललं मध्यांतर न घेता.सकाळचा प्रयोग जेवढ्या उत्साहात झाला तोच उत्साह दुपारच्या प्रयोगातही.यातील प्रत्येक कलाकाराला पुर्णवेळ रंगमंचावर वावरायचं असतं नव्हे नाचायचं असतं ते सुद्धा तंत्रशुद्ध पद्धतीने, बरं एकट्यानेच नृत्य करायचं असतं तेव्हा त्याला स्वातंत्र्य असतं पण इथे कधी दहा बारा तर कधी वीस बावीस जणांनी सांघिकपणे नृत्य करतांना यंत्रवत एकसारख्या हालचाली होतात ते दृश्म्हय विलोभनीय होते.ही अनुभूती इथे होती म्हणूनच प्रत्येक नवीन गाण्यावर टाळ्या मिळत होत्या.बरे किती गाणी आणि किती नृत्य यांची गणती करायचं भानच राहात नाही.गाणं संपलं तरी त्या विषयाला पुढे नेणारं निवेदन वेगळा ठेका घेऊन सुरू होतं.निवेदक सहज उजव्या विंगेजवळ जाताच जादुच्या गुहेतून बाहेर पडाव्यात तशा ओळीने नृत्यांगना बाहेर येतात आणि अवघा रंगमंच व्यापून टाकतात.कोणतेही नृत्य पुन्हा पाहतोय असं वाटतं नाही तसंच गीत रामायणातील सगळी गीतं तोंडपाठ असली तरी कोणताही प्रेक्षक ते गाणं गुणगुणंत नाही तर तेच गाणं नवा संगीत साज ल्यालेले असल्याने गदीमा आणि बाबूजींच्या बद्दलचा कृतज्ञता भाव ठेवून प्रत्येक गाणं रिचवीत जातो.काही सेकंदही रंगमंच रिकामा न ठेवता आणि कुठेही काही राहून गेले असे म्हणण्याची उणीव न ठेवता,टाळ्या वाजवायचेही भान हरपून टाकणारी ही अजरामर कलाकृती ही केवळ नी केवळ अक्षयच्या कल्पकतेतून साकारली आहे हे जाणवते म्हणुनच त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते.
एवढ्या सर्व नाट्यात प्रत्येकाने जीव ओतला आहे.अनेक भुमिका यामध्ये असतात.पण त्यातील एखादी नृत्यांगना कधी वेष बदलून नव्या भुमिकेत येते ते कळतच नाही.अधिक लक्ष वेधते ती चार वर्षांची गोड चिमुरडी मृण्मयी छोट्या रामाच्या भुमिकेत येते आणि खारुताई होऊन सरसर चालत वाळू टाकते तेव्हा.ही चिमुरडी आपल्या काकाचा वारसा पुढे चालवणार हे वेगळं सांगायलाच नको.
अयोध्येचं रामलल्लाचं मंदिर हे भारतीयांपुढचे आव्हान होते.यावर्षी ते पूर्णत्वास गेले.तसेच गदिमा आणि बाबूजींच गीतरामायण हे गायक,वादक आणि नृतकांना आव्हान असते.त्यांच्या सादरीकरणातून रामायण ह्रुदयात बसले म्हणजे ते सादरीकरण यशस्वी झाले असे म्हणावयास हरकत नाही.रामायणातील रामाने स्वयंवरातील धनुष्य पेलले तसे रिंगणे गावच्या रामाने गीतरामायण सादर करण्याचे धनुष्य पेलले हे मी पाहिले आणि अक्षयची गळाभेट घेऊन त्यांस शुभेच्छा दिल्या.
सुरेशजी हांडे यांचे डोळे भरुन आले.म्हणाले माझ्या आयुष्यातला हा एकमेव प्रयोग आहे जो जराही लक्ष विचलीत करीत नाही.पूर्ण टॅक्सी प्रवासातही तेच नाट्य आमच्या सोबत होतं.घरी आलो तेव्हा मोबाईल मध्ये रिमाताईंचा मजकूर होता.'अभिप्राय पाठवा.' मला तर शब्दच सापडत नव्हते आणि कार्यक्रमाची छाप डोक्यातून बाहेर जात नव्हती.
दोन महिन्यांपूर्वी मला काही ओळी सुचल्या...
रिंगण साधून वस्ती वसली
सजली गाव पांढरी
गाव रिंगणे ओळख झाली
विविध कला पंढरी ll
अक्षयने भरतनाट्यम ने त्यात आणखी एका कलेची भर टाकलीय.
आपल्या अमोघ कर्तृत्वाने कामगार रंगभूमीवर आपलं नाव अजरामर केले ते नाटककार ला.कृ.आयरे याच मातीतले हे सांगतांना मान उंचावते.तसं अक्षय
" सुस्वागतम् रामायणम्" या आणि अशा नृत्य नाटिकांमधून असं काही नाव कमविल की प्रत्येक रिंगणेकर अभिमानाने सांगेल होय अक्षय आमच्या रिंगणे गावचा आहे.
सुभाष लाड
९८६९१०५७३४
राम नवमी २०२४
विशेष आभार - इंडियन एज्युकेशन सोसायटी ही नामांकित आहे.ती का नामांकित आहे याचे उत्तर आजच्या कार्यक्रमामुळे कळले.आपल्या शिक्षकांना काहीतरी वेगळं द्यायचं आहे या भावनेतून त्यांनी हा संस्कारक्षम, विविध कलांचा संगम असलेला हा कार्यक्रम शिक्षकांसाठी पर्वणीच ठरला असणार.या संस्थेचे मी मनापासून आभार मानतो.
काका मी तुझ्यासोबत आहे.
अभिप्राय -------
श्री.एकनाथ विश्वासराव
🙏🌹🙏🚩जय श्रीराम
लाड साहेब नमस्कार, फार सुंदर, अप्रतिम अशी अनेक रत्न आमच्या पंचक्रोशीत जन्म घेवुन अनेकविध कलाकार जगासमोर आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. उणीव एकच आहे.त्यानचा शोध घेणं ही पण एक कला आहे. आणि ईश्वर कृपेनं ती आपल्या अंगी साक्षात परिपूर्ण भरलेली असल्या मुळे आपणास धन्यवाद देतो.
श्री राम जन्मदिवस निमित्त आपणांस सुखमय आनंदमय निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थनीय अभिवादन.
रिमा आयरे......
सुप्रभात सुभाष जी, आपल्या अभिप्रायाद्वारे दिलेली दाद वाचून खूप आनंद झाला. कृतकृत्य झाले. मी काय बोलू. निःशब्द आहे. एक कलाकारच समजू शकतो त्या मागची मेहेनत. अक्षय चा शिष्य परिवार इतका मेहनती आणि उत्साही आहे की , सरांना हे असं हवं आहे आणि ते तंतोतंत करतात. त्या मुळेच अशी कलाकृती निर्माण होते. आभारी आहे🙏
श्री विठ्ठल कुसाळे, कवी
सुप्रभात सुभाष जी, आपल्या अभिप्रायाद्वारे दिलेली दाद वाचून खूप आनंद झाला. कृतकृत्य झाले. मी काय बोलू. निःशब्द आहे. एक कलाकारच समजू शकतो त्या मागची मेहेनत. अक्षय चा शिष्य परिवार इतका मेहनती आणि उत्साही आहे की , सरांना हे असं हवं आहे आणि ते तंतोतंत करतात. त्या मुळेच अशी कलाकृती निर्माण होते. आभारी आहे🙏
कवी अशोक कांबळे.
लाड सर अत्यंत हृदयस्पर्शी रचना👍
रमेश तुपे, नाशिक.
रिंगणे गावातील कलावंत शोधण्याचं महत्वाचे काम आदरणीय सुभाषजी लाड करतात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शनही करतात सलाम त्या कलावंतांना आणि आमचे परममित्र सुभाषजी लाड यांना!!!!💐💐💐🙏🙏🙏
श्री गायकवाड सर,
शुभ रात्री, श्री, लाडसरजी,
नमस्कार,
" गीतरामायण आणि अष्टपैलू कलाकार श्री अक्षय आयरे, " खरचं सर आपल कौतुक करावयास शब्द फुले ही कमीच पडतात, ग्रामीण भागातील बालपणातील आठवणीतील सूक्ष्म निरीक्षणे , मनात, भावनाचा कल्लोळ
श्री.अक्षय आयरे, प्रथम आपल्या मेहनतीला आलेलं यश ऐकूनच मन भरलं ,आपण सांगिक एक संघ कलाकारांची मुठ बांधुन कार्यक्रमाची उच्च पातळी गाठणे, मेहनत ,स्पुर्ती , सहकार्य आणि ज्या मातीत जन्माला त्या मातीचे ऋण ,आपल्या यशाला कारणीभुत आहे,माझ्याकडून आज हा कार्यक्रम हुकला.यामुळे मन खुप हळहळले . सकाळीच सुरेश हांडे साहेबांचा फोन आला. गीत रामायण हा कार्यक्रम आहे ,पास उपलंब्ध आहेत. मी वैयक्तीक महत्वाच्या कामात असल्यामुळे हा पौराणीक वारसा जपलेला मौलीक कार्यक्रम माझ्या
ReplyDeleteकडून चुकला. मनाला खूप हूरहूर लागून राहिली. सुभाष लाड साहेबांनी अगदी तंतोतंत गीत रामायण खूप सुंदर शब्दात कार्यक्रमाचा अभिप्राय दिला .माझ्यासारखे कितेकजन आवाक झाले असतील . अक्षय आयरेजी ,आपले ,व आपले सहकलाकार आणि आपल्याला ज्यांची प्रेरणा मिळाली त्यांना सुरेश डुंबरे एक कलाकारांकडून मन:पुर्वक अभिनंदन सुरेश गे. डुंबरे ९९६९०२४५१९ मुलुंड