जिव्हाळ्याची दोन टोके,
किती जवळ जवळ!
शंखातले तीर्थसुद्धा,
नाही याहून निवळ!
दृष्टीमधून कळते,
दोघातली भाववीण!
जिथे घट्ट जवळिक,
आणि दुरावाच क्षीण!
वठलेले नि कोवळे,
किती गोड एका जागी!
संवेदना झोपे कुठे,
रात्रंदिन टक्क जागी!
एक खांब ओलांडून,
भेटतात आजा नातू!
नाही भक्कम याहून,
जगी कोणताही सेतू!
चित्र मौनातून बोले,
आणि ठरले सु-भाष!
कुठे घाईला कळते?
भेट घ्यावी सावकाश!
तीन पिढ्यांची ही शिडी,
त्याला पायऱ्याही तीन!
दोन पिढ्या दिसणाऱ्या,
अदृष्याच्याच आधिन!
एका फांदीवरचीच,
चारी नेत्री करवंद!
रिमझिम डोळ्यातली,
त्याला स्वच्छंदसा छंद!
पारंबी नि वटवृक्ष,
घडे दर्शन चित्रात!
भाव आणि अक्षरांचा,
जसा मिलाप पत्रात!
प्रमोद जोशी,देवगड,9423613604
प्रतिभावंत कवी मा.श्री.प्रमोद कवी यांनी केलेली शीघ्र कविता.या महान कवीच्या मुखात साक्षात सरस्वती असल्याने त्यांच्या कवी कल्पना वसंत ऋतुचा सहवास देतात.ते ज्यांच्यासाठी काव्य करतात त्यांना त्यांच्या अंगणीच्या आम्रवृक्षावर कोकीळ कुंजन करीत असल्याचा भास होतो.त्यातून स्वर्गसुखाचा आनंद मिळतोच आणि तो एक बहुमान समजून आठवणींच्या कप्प्यात गोंदवून ठेवतो.
धन्यवाद प्रमोदजी !
सुभाष लाड
अभिप्राय -----
विठ्ठल कुसाळे सर,
अप्रतिम शब्दरचना!....... आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल कविवर्य प्रमोद जी यांनी जणूकाही एक एक शब्द वेचून त्यांची सुंदर अशी माला तयार केली आहे.
ही शब्दमाला पुन्हा पुन्हा स्पर्शावी वाटते ;कारण ती शब्दमोत्यांनी नटलेली आहे, सजलेली आहे.
संपन्न आणि समृद्ध व्यक्तिमत्वाबद्दलची चित्रऒळख म्हणूनच हृदयस्पर्शी आणि भावस्पर्शी झाली आहे असेच म्हणावेसे वाटते............ 👌👌🌹🌹🙏🙏
** वृंदा कांबळी
अप्रतिम! आजोबा आणि नातू यांची घट्ट भाववीण फार सुंदर रितीने सांगितलीत.
No comments:
Post a Comment