एकोणीसशे सत्याण्णव हे साल आमच्या कुटुंबियांकरीता दुःखप्रद होते.आम्ही तिघे भाऊ आणि माझ्या पाठच्या तीन बहिणी.एक बहिण दिव्यांग असल्याने तिला सोडुन सर्वांचे लग्नविधी पार पडून आपआपल्या संसारात व्यग्र होते.मी सहावीत असतांना वडील निवर्तले आणि आईने मोठ्या कष्टाने आम्हा सर्वांना सांभाळले.मोठा भाऊ विजय सातवीत असताना मुंबईत आला.आपले पोट भरून उरलेले पैसे गावाला पाठवू लागला.दोन नंबरचा भाऊ पंढरी आठवीत आल्यानंतर त्यांने जोत धरायला सुरुवात केली.त्यासाठी आमचे मावळ चुलते पुढे झाले.आम्ही सगळेच शेतातली कामे करु लागल्यामुळे घरात धान्य येऊ लागले.मग आईने घरात दारु गाळून विकण्याचा व्यवसाय बंद केला.पंढरी व मी एकाच वर्षी दहावी उत्तीर्ण झालो.फापे गुरुजी आम्हाला पुढील शिक्षणासाठी शिपोशीला घेऊन जायला आले.पंढरीने ॓॓मी शेती करतो तू शिकायला जा.॔ असे सांगितल्याने मी एक वर्ष शिपोशी व पुढे मुंबईत येऊन शिक्षण घेऊन नोकरीस लागलो.पंढरीने गावाकडे राहून पावसाळी शेती, उन्हाळी शेती करतांना गाई गुरांचे धन गोळा केले. बहिणीही अभ्यास करुन आवडीने शेतात राबून लागल्या. एवढ्यानेही आपल्या कुटुंबाचे भागणार नसल्याने पंढरीने चिरे तासून घरांचे बांधकाम करणे,लाकूडकाम यात कौशल्य संपादन केले.लवकरच ज्या घरात एकशेर धान्याबरोबर एक शेर भाताचा कोंडा मिसळून त्या पिठाची भाकरी थापली जात होती तिथे पौष्टिक अन्न मिळू लागले.सणसमारंभाची हौस होऊ लागली.जिथं उसनवारीशिवाय दिवस जात नव्हता तिथं दुसऱ्यास उसने देण्याची ताकद आली.सोबत माणसांचा गोतावळा जमा करण्याचे आजोबांपासूनचे आलेले संस्कार कायमच असल्यानं रस्त्यावरच्या घराला शोभणारी वर्दळ होऊ लागली.
झाड बहरुन आले असतानाच एखाद्या फांदीवरची पाने कोमेजून जावी तसं पंढरीच्या प्रकृतीबाबत घडू लागले. बिनधास्त बेडर जगणाऱ्यास छोट्या मोठ्या जखमा छू मंतर केल्यासारख्या फुंकाव्याश्या वाटतात.पंढरीने ते गांभीर्याने घेतले नाही.मुळव्याधीचे दुखणे म्हणून गावठी दवादारू घेऊनही आराम पडेनासा झाला.रमेश पेडणेकर त्यास मुंबईस घेऊन आले.उपचार लागू पडला नाही.मग आमचे डाॅ.नितीन शहा यांच्या सल्ल्यानुसार घाटकोपरचे सर्वोदय व त्यानंतर टाटा इस्पितळ गाठले.मग कळले की कर्करोगाची शेवटची पायरी आहे.आम्ही दोघा भावांनी त्यास काहीच कळू न देता टाटाचे उपचार चालू ठेवले.येथे टाटामध्ये काम करणारे सुरेश पेडणेकरांनी मोठे सहकार्य केले.
टाटामधून शेवटी सहा महिन्यांची मुदत सांगण्यात आली.पायाखालची जमीन सरकली.हृदयात कंप सुरु झाला.डाॅक्टर म्हणाले ताडून बघावे म्हणून हिंदुजा॑ हाॅस्पीटलचे ( सौ.नेहाचे नातेवाईक)डॉ .नाईक यांना भेटलो. त्यांनी सर्व पेपर्स पाहिले.पण ठरल्याप्रमाणे 'तुम्ही हिंमत हारु नका.यातूनही बरे व्हाल ' असे पंढरीला सांगितले. औषधे विचारण्याच्या बहाण्याने मी पुन्हा डाॅक्टरना भेटलो. ' तुम्हाला खंबीरपणे उभं राहणं व त्यांना धीर देणं गरजेचं आहे.यापुढील दिवसांत त्यांना केवळ आनंद द्यायचा आहे.' डोळ्यातले आसू डोळ्यांतच अडवून जणू काही झालेच नाही असा आव चेहऱ्यावर आणून हिंदुजा हॉस्पिटलमधून सर्वजण बाहेर पडलो.
एव्हाना पंढरी साईनाथ चाळीत रुळला होता.पोटावर बांधलेल्या रबरी पिशवीला कधीपण धुवावे लागत असल्याने तो चिडचिड करायचा.सतत कामात राहण्याची सवय असल्याने दिवसभर टिव्हीसमोर बसून कंटाळायचा.एक दिवस मला भाईंदरच्या नवजीवन आयुर्वेदिक उपचार केंद्राची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तिथे जाऊन आलो.त्यांनी आजार वाढला आहे असे सांगितले.मात्र पंढरीला लवकर बरे व्हाल हे ठामपणे सांगण्याचे मान्य केल्याने त्यांचा कोर्स सुरु करण्यासाठी पंढरीला दाखवून आणले.ती काही वेगळीच चूर्ण घेतल्याने पंढरीला थोडा उत्साह वाटत होता.
पंढरीला भजनाची आवड होती. बऱ्यापैकी सुरांचे ज्ञान असल्याने गावाकडे भजन आवडीने म्हणायचा.आमचे आजोबा भिवाजी पेडणेकर हे भजनीबुवा होते तो वारसा त्याच्याकडे आला असावा.मुंबईत बरेच दिवस झाल्याने त्याला भजन म्हणण्याची संधी उपलब्ध करावी आणि त्याच्या आवाजाचे रेकॉर्डींग करावे म्हणून छोट्या पुतण्या शामचा बळेच वाढदिवस साजरा करायचे ठरले.तो खराच वाढदिवस आहे सर्वांनाच भासविले.आमच्या गावचे गायक श्री.शां.तु.आयरे यांना कुर्ला येथील कमानी कंपनीत भेटून सर्व बेत समजावला.त्यांनीही येण्याचे मान्य केले.ते पाचसहा दिवस तयारी प्रत्यक्ष कार्यक्रम व नंतर चर्चा यात निघून गेले. व्हीडियो रेकॉर्डींग बघून त्याला आनंद झाला. पुढे होळीचा सण आला.आमच्या गणेश नगरात मोठी होळी असते.पंढरीने प्रथमच मुंबईची होळी पाहिली.होळीत नारळ ही दिला.ही होळी त्यास आवडली.गावात होळीसाठी हजारो कोवळ्या आंब्याची झाडे तोडण्यापेक्षा अशी कचरा,गवत जाणारी होळीची संकल्पना आवडल्याचे मत त्याने नोंदविले.
लवकरच गुढीपाडवा येणार.कोकणातून मुंबईत आलेले लोक आपल्या गावच्या घरी होणारे सण मुंबईतल्या घरी साजरे करीत नाहीत.त्यासाठी ते गावी जाणे पसंत करतात.तसे साईनाथ चाळीत कुणीही गुढी उभारीत नव्हते. पंढरी या निमित्ताने गावी जाण्याचा हट्ट धरेल याची जाणीव झाल्याने " आपण यावर्षी आपल्या घरी गुढी उभारुया " असे पत्नी नेहाला सांगितले.त्यामागचा माझा हेतू तिला कळल्याने तिनेही होकार देऊन चाळीला जेवण देऊन पंढरीला सार्वजनिक पंगतीत जेवण्याचाही आनंद द्यायचा हे पक्के ठरविले.मोठ्या बंधुना त्याची कल्पना देऊन त्यानांही पवईला बोलावून घेतले.
कोकणात गुढीसाठी जास्तीत जास्त उंचीचा बांबू गुढीला वापरतात.तो सुद्धा हिरवा.आय.आय. टी. त बांबूची बेटे आहेत.त्याकाळी आय.आय.टी.त जायला आजच्यासारखी बंधने नव्हती.आमच्या मागच्या चाळीत राहणारे सुपल आय.आय.टी.त कामाला होते.त्यांना सांगून मोठा बांबू आणला.पंढरीनेच गुढी उभारुन पूजा केली.दुपारी मधल्या गल्लीत जेवणाची पंगत बसली. पंढरीसुद्धा त्या पंगतीत मध्ये बसला.कुणाला माहित असते पुढचे भविष्य? पण दुर्दैवाने ही पंगत पंढरीसाठी शेवटची होती.हे खोटं ठरावं असा आशावाद बाळगायचा आणि डोळ्यांतील आसवांना रोखून धरायचं एवढंच आमच्या हातात होतं
१ मे ला मी सकाळी लवकर उठून कुर्ल्याला शाळेत गेलो. झेंडागीत संपले होते.पाताडे सरांची पत्नी गीता शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आल्याचे शिपायाने कानात सांगितले." वहिनींचा फोन आला होता,त्यांनी तातडीने घरी बोलावलंय." गीताने निरोप दिला नी मी बाहेर येऊन रिक्षा पकडली.घरी आलो तेव्हा पंढरी अस्वस्थपणे तळमळत होता.त्याला आग आग झाल्यासारखे वाटत होते व माझी पत्नी नेहा त्याच्या अंगावर खोबरेल तेल चोपडीत होती.पंढरीने मानेवर आलेली गाठ दाखवली.ही गाठ मृत्यू जवळ आल्याची खूण असेल हे डॉक्टरांकडून ऐकल्याचे आठवले.मन चरकले. " हरकत नाही, डॉक्टरांना विचारुन घेऊ."
असे आधारासाठी बोलून मी फोन फिरवला. भाईंदरच्या डॉक्टरांनी काही काळजी करु नका असे सांगितले आहे खोटेच सांगत असताना वाडीतले डॉक्टर आले.त्यांनीही धीर देऊन वेदनाशामक इंजेक्शन दिले. बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलून गावी जायचा निर्णय घेतला.बंधु विजय व घाटकोपरहून शिवाजी दादा आले.विक्रोळीच्या सोपान पाटलांची सुमो गाडी घेऊन निघेपर्यंत संध्याकाळ झाली.पंढरीला त्रास होऊ नये म्हणून गाडी सावकाश धावत होती.रिंगण्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोहोचलो.जाताना लांज्यात मोठे कलिंगड घेतले.पंढरीस बघायला येणाऱ्या लोकांना ते द्यायचे ही पंढरीची सूचना.त्याप्रमाणे घरी पोहोचल्यावर कलिंगड कापून लोकांना दिलं." पंढरी तू खाणार असशील तरच आम्हीं खाऊ" असं सर्वजण बोलू लागले.शेवटी अर्धी शेड त्याने बळेच खाल्ली. रात्री उशिरा पुन्हा तो अस्वस्थ झाला.गावच्या इस्पितळात जाऊन वेदनाशामक इंजेक्शन दिले व परत घरी आणले.दुसरी रात्र तशीच चिंतेत गेली.
No comments:
Post a Comment