गेल्या अनेक शतकात सामाजिक आणि कौटुंबिक नकाराचा सामना करीत स्रियांना जीवन जगावे लागत होते.पुरूषप्रधान संस्कृतीने स्त्रियांच्या शक्तीला वजा केलेले असल्याने अबला म्हणून संबोधून चूल आणि मूल या दोन कामापुरताच त्यांचे जगणे मर्यादित करून टाकले होते.खरे पाहता वैदिक काळात पुढारलेल्या स्त्रिया होत्या याचे दाखले असूनही केव्हातरी मनू संस्कृतीचा पगडा आपण स्विकारला.सुखाचा संसार या स्वप्नाला आकार देण्याच्या भावनेपोटी सहनशील स्त्रीने पराभुताच्या मानसिकतेतही चेहर्यावर हासू आणत अनेक शतके घालवली आणि तीच स्त्रीची ओळख ठरली.
परंतु त्याही परिस्थितीत काही स्त्रियांना स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली.राजमाता जिजाबाई यांनी आपल्या पुत्राला शिक्षण आणि संस्कार दिल्याने तो हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकला.छत्रपती शिवाजीमहाराज म्हणताच करोडो लोकांची छाती अभिमानाने फुगते तेव्हा डोळ्यासमोर जिजाबाई सुद्धा असतात.पुढे राणी ताराबाई,राणी अहिल्याबाई,राणी
लक्ष्मीबाई याच बरोबर साध्वी सावित्रीबाई अशा अनेकांनी पुरूषांच्याही पुढे जाऊन काम केले असले तरी सार्वजनिक जीवनातच त्यांचे कौतुक केले जाते. त्यांचा दाखला देऊन आपल्या मुलींनी तसे कर्तृत्व करावे ही अपेक्षा सोडा पण वैयक्तिक जीवनात सातच्या आत घरातचा पाठ गिरवताना पुरूषांबरोबर स्त्रियाच पुढे दिसतात.किंबहुना घरंदाजपणा दाखविण्यासाठी अशा अनेक बंधनांचे काटेकोरपणे पालन केले जाते. घराचा वंश हा मुलगाच पुढे नेतो या विचारांचा पगडा हा स्त्रियांवरती अधिक असल्याचे जाणवते.
अशाच परिस्थितीत जन्मलेल्या सायली व किमया आयरे या दोन मुलींचे स्नेहल आणि विजय आयरे हे आई वडील मात्र नव्या विचारांचे असल्याने ( ते सुशिक्षित आहेतच पण सगळेच सुशिक्षित नव्या विचाराचे असतात असे म्हणता येत नाही ) त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना योग्य ते शिक्षण दिलेच पण व्यवसाय वा नोकरीकरीता पूर्ण स्वातंत्र्य दिले. मोठी मुलगी सायली डाॅक्टर असून दंत वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचा दवाखाना चालवून नाव कमविते आहे.तर किमयाने मात्र अगदी वेगळेच क्षेत्र निवडले आहे.तिला चित्रकलेची आवड असल्याने स्त्रियांच्या दागिन्यांचे नवनवीन प्रकार ती बाजारात आणते आहे.सुरूवातीला तिने सुप्रसिध्द जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स मध्ये अनुभवासाठी इंटर्नशिप केली.वामन हरी पेठे मध्ये मर्चन्टडायझर म्हणून काम पाहिले. त्यानंतर तिने पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला, असून सोन्या-चांदीपासून ते रियल डायमंड दागिन्यांपर्यत नवनवीन प्रकार ती तयार करते.आताच्या तरूणींना त्यांच्या लग्नात किंवा सणसमारंभात दागिन्यांच्या सहाय्याने नव्या पद्धतीने सजता यावे यासाठी नवनवीन डिझाईन तयार करून दागिने बनवण्याचेही काम करून देते..मराठी युवा युवतींना नोकरीतच स्वारस्य असते हा विचार खोडून काढण्याचे काम या दोघी बहिणीनी केले आहे.
नुकतेच बृहन्मुंबई महानगरपालिका महिला व बाल कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या " आकांक्षीत महिला सक्षमीकरण " योजनेचे पाठबळ देऊन ज्वेलरी व्यवसायातील उत्तम कामगिरीबद्दल कु.किमया हिस मा.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे किमयाच्या कल्पकतेचे व जिद्दीचे पंख अधिक बळकट झाले असून या क्षेत्रातील अवकाशात उंच भरारी घेण्यासाठीचा आत्मविश्वास दुणावला आहे.तिच्या पालकांना आपण आपल्या मुलीला दिलेल्या व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्याचे कौतुक आहे पण समाजातील पालकांसाठी तसेच तरूणींसाठी हा एक आदर्श नाही का ? मुलींना अथवा महिलांना एका विशिष्ट चौकटीत जगण्याचे सल्ले देणार्यांना ही चपराक नाही का ?
एक माणूस म्हणून या कुटुंबाकडे पाहतांना हे कुटुंब मला नेहमीच आदर्श वाटले आहे. या मुलींचे आजोबा आणि आजी यांच्यासोबत होते.त्यांच्या वार्धक्यात आपले आईवडील नोकरी सांभाळून त्यांची योग्य ती काळजी घेतात, त्यांची सेवा करतात हे त्यांनी जवळून पाहिले. आणि या मुलीसुद्धा तेवढ्याच प्रेमाने आणि आपुलकीने आपल्या आईवडिलांचा कित्ता गिरवत असल्याचे पाहून अस्मादिकाने अनेकदा त्यांचे कौतुक केले आहे. हे एवढ्यासाठी इथे नमूद करावेसे वाटते कारण स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतांना माणूस म्हणून जगताना आवश्यक ते संस्कारही देण्याचे काम प्रत्येक घरात झाले तर सायली आणि किमया प्रत्येक कुटुंबात निर्माण होतील.मुलीसुद्धा कुटुंबाच्या आधार ठरू शकतात याची प्रचिती येईल. तूर्तास किमयाच्या किमयागिरीला सलाम करून थांबतो.
सुभाष लाड
सौ.स्नेहल आयरे - आदर्श शिक्षिका
मान. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते
प्रमाणपत्र स्विकारताना किमया आयरे.
पालकमंत्री मान.मंगलप्रभात लोढा, शिक्षणमंत्री मान. दिपक केसरकर,महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल,डाॅ सुधाकर शिंदे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त , आमदार यामिनी जाधव यांच्या उपस्थिती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.






खुप छान.
ReplyDelete