Friday, February 16, 2024

देशावरून आले आणि कोकणचं भलं केले.

 

            



             देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि शिक्षण सार्वत्रिक करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या अगोदर ब्रिटिश राजवटीत 1940 च्या दशकात गावखेड्यात प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यात आले.त्यावेळी ज्या गावात दूरदृष्टीचे धुरीण होते त्यांनी गावातल्या देवळात तर कुठे मोठ्या चौसोपी घराच्या पडवीत तर कुठे मेतके,वासे,बांबू आणि टाळ्यांचा उपयोग करून कावण काढून शाळा सुरू केल्या. शिक्षकांची एवढी उपलब्धता नसल्याने सुरूवातीला गावातल्याच चारदोन बुकं शिकलेल्या माणसांनी त्यांच्यापरीने धुळाक्षरे गिरवण्याचे ज्ञान,बोटं मोजण्याचं कसब शिकवलं किंबहुना शाळेत जाऊन काही शिकायचं असतं हा सामाजिक संस्कार रूजविला त्यामुळे त्यानंतर काही दिवसांनी किंवा वर्षानी सरकारकडून आलेल्या शिक्षकासाठी वातावरण सुलभ झालेच पण मुका कपड्यात रानोमाळ हुंदडणाऱ्या  मुलांना काहीतरी ज्ञान मिळतंय याचं कौतुक वाटू लागले आणि या मुलांसाठी शाळा इमारत हवीशी वाटू लागली.मग कुणी जमीन दिली.कुणी झाडेमाडे दिली.कुणी वर्गणीदार पैसे किंवा धान्य विकून,श्रमदान करून  दगडी मातीची आणि छपरावर कुठे गवत शाकारून तर कुठे नळे वापरून शाळा इमारती उभारल्या.आमच्या रत्नागिरीतल्या शाळात देवगड सावंतवाडीकडील शिक्षक मंडळी येऊन प्राथमिक शिक्षणाला चांगला प्राप्त करून दिला.गावखेड्यात असलेल्या चौथीपर्यंत शिकून काही मुले ज्यांची घरची परिस्थिती बर्‍यापैकी असे ती तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी पहिलीत जाऊन व्ह.फा.म्हणजे व्हर्नाक्युलर फायनल होत.त्यातूनच कुणी मास्तर,लेखनिक नाहीतर मुंबईत नोकरी करण्यास जात.
         पुढे सातवी पर्यंतच्या शाळा गावात किमान एक निर्माण करण्यात आली. बरेच ग्रामस्थसुद्धा आपल्या मुलांना एवढं शिक्षण पुरेसं आहे या मानसिकतेतच असल्याने काही मुलांच्या पुढील शिक्षणासाठी मुंबईचा रस्ता अधिक सुखदायी वाटत होता. तिथे नोकरी करून शिक्षण घेण्याची संधी होती.कुणी लांबचा नातेवाईक सुद्धा जेवणाची खोलीबाहेर पथारी टाकून झोपण्याची सोय करीत असे.जवळचा नातेवाईक असेल तर हक्काने नातवाईकांच्या मुलांना आधार दिला आहे.आमच्या आणि आमच्या अगोदर जे कुणी मुंबईत आले त्यांनी त्या पद्धतीने दिवस काढले.त्या आधार देणाऱ्या चाकरमान्यांच्याप्रती सदैव कृतज्ञेची भावना असे.
         1960 च्या दशकात मुंबईतल्या चाकरमान्यांच्या एकत्र येण्यातून गावच्या विकासाबाबत चर्चा होऊन अनेक गाव मंडळे स्थापन झाली पुढे काही मंडळानी माध्यमिक शिक्षणाची सोय गावात करण्यासाठी पंचक्रोशीतील किंवा दशक्रोशीतील मंडळे,लोक एकत्र येऊन मध्यवर्ती  शिक्षण संस्था निर्माण करून आठवी पासूनच्या वर्गांची सुरूवात झाली पुढे त्या अकरावी किंवा दहावी पर्यंत शिक्षण देऊ लागल्या.सुरूवातीला त्यांचा वावर हा घराच्या ओसरीत किंवा देवळातच झाला. आणि पुढे पक्क्या इमारती.पण इथपर्यंतचा दैदीप्यमान इतिहास निर्माण करण्यात कोकणातल्या प्रत्येक शाळेचा पहिला शिक्षक हा देशावरचा होता हे कदापी विसरून चालणार नाही
          रिंगणे येथील मध्यवर्ती टेकडीवर आज शोभून दिसणारे शिक्षण संकुल आहे. त्यातील सरस्वती माध्यमिक विद्यामंदिर ची स्थापना  ही 1969 ची आहे.दिवाळीनंतर भात कापणी झाल्यानंतर बैलगाडीच्या वाहतुकीस सुरूवात व्हायची.अर्थात सगळा पावसाळ्यात पायवाटेशिवाय अन्य पर्यायच नव्हता. अनेक शिक्षक देशावरून यायचे काही दिवस किंवा महिने थांबायचे आणि निघून जायचे.सातत्याने शिक्षक भरतीच्या जाहिराती वर्तमान पत्रात दिल्या जायच्या. प्रभानवल्लीतील प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाच्या नजरेस ती जाहिरात नजरेस आली.दिवस पावसाळ्याचे होते.तिथल्या ग्रामस्थांकडून त्यानी अंतर आणि पायवाटेवरची गावांची नावे विचारून एका दिवसाचे कपडे व भाकरी एका पिशवीत टाकून ते मास्तर निघाले.कोर्ले,भांबेड पेठदेव,हर्दखळे अशी थोडी माळरानावरील वाट तुडवत हर्दखळे व रिंगणे गावच्या मध्ये पूर्व पश्चिम असलेल्या उंच डोंगरातील घाटवाटेने ते ईशापुर्ली या ठिकाणाहून उतरणीची वाट उतरून  तीनतासांची पायपीट करीत गर्दझाडीत विसावलेल्या केदारलींग मंदिराच्या पश्चिमेकडून वळसा घालून दगडी मातीच्या इंग्रजी सी आकाराच्या इमारतीच्या दरवाज्याच्या उजव्या बाजूला भिंतीवर लढणाऱ्या लाकडी फलकावर लिहिलेले 'सरस्वती माध्यमिक विद्या मंदिर रिंगणे ' हे वाचून पोहोचलो बाबा एकदाचा असा नि:श्वास  टाकला.गंगाराम दाजी हे शिपाई होते.त्यानी चौकशी करून शिक्षकांना बोलावून रूजवात करून दिली.त्यांना पाणी चहा दिली.त्यांनी आणलेली भाकरी खाल्ली. तोपर्यंत त्यावेळचे संस्था अध्यक्ष श्री.शांताराम तुकाराम आयरे आले.त्यांनी विचारले आणि मास्तर म्हणाले "मी एम.आर.ढेकळे,बी ए बी एड.राहणार निपाणी "
        गोल गुबर्‍या सावळ्या चेहर्‍यावर सदोदित  हास्याची लकेर असलेल्या ढेकळे सरांच्या भाषेत बेळगावी टच होता त्यातील मार्दवता कुणालाही आपलेपण दर्शवायची त्यात अगदी लहान मुलांनी अहो जाहो करून बोलण्याची पद्धत, त्यांच्यातील नम्रभाव ही सगळी वैशिष्ट्ये त्यांच्यात एकवटली होती.त्यातून आपण सहज संभाषण करतो आहोत अशी शिकवण्याच्या पद्धतीमुळेच ते मुलांमध्ये प्रिय होते तसेच संस्थेतल्या लोकांनाही ते आवडू लागले.आणि लवकरच ते सहशिक्षकाचे मुख्याध्यापक झाले.75 ची शेवटची अकरावीची तुकडी बाहेर पडली. दहावीच्या पहिल्याच तुकडीने सर्वांची निराशा केली.केवळ दोन टक्के निकाल लागला.ढेकळे सरांच्या पुढे शाळा टिकवण्याचे आव्हान होते.सरांनी सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन पुढील चांगला निकाल दिलाच पण आता शाळेकडे बाहेरगावचेही विद्यार्थी येऊ लागले.सरांनी विद्यार्थी वसतिगृहाची निर्मिती करून शाळेचा डंका सर्वदूर पोहोचवला. कोल्हापूरातूनही विद्यार्थी येऊ लागले.
मात्र राखीव जातीतले विद्यार्थीच मिळनासे झाले व ते वसतीगृह बंद पडले.
         या शाळातून शिकून शिक्षक म्हणून येईपर्यंत कोकणातील सर्व शाळांची मदार देशावरच्या शिक्षकांवरती होती.सगळेच शिक्षक इथे नोकरी करायला खुष होते अशातला भाग नाही पण अमुक विषयाचा शिक्षक आपणास आणावयाचा हे सरांनी ठरवलं की सर त्यात यशस्वी होतं. मुलांच नुकसान टाळावं ही त्यांची तळमळ होती.

अपूर्ण......

       सर,वार्धक्याने आपणातून निघून गेले असले तरी चांगल्या गुणांचं कौतुक करताना त्यांनी पाठीवर मारलेली थाप सदैव सोबत राहिल.

सुभाष लाड
9869105734


         
           

1 comment: