Friday, September 26, 2025

🌺🌷🌺नवोपक्रमाचा पुरस्कर्ता अस्तंगत 🌺🌷🌺

      

     

कोकणातील जुनी आणि गुणी संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचे माजी अध्यक्ष श्री.धोंडू पांडुरंग खांडेकर यांचे १८ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाले.एक चांगली व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या परिघातील लोकांना दुःख वाटते.त्या व्यक्तिच्या आठवणींना उजाळा देऊन ते दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला जातो.श्री खांडेकर हे एक सामाजिक कार्यकर्ता, मितभाषी म्हणण्यापेक्षा ते शांत आणि अबोल व्यक्तिमत्त्व म्हणणेच अधिक योग्य वाटावे असे आमचे खांडेकर प्रामाणिकपणा आणि  चोख व्यवहार या गुणांमुळे सामाजिक क्षेत्रात नावलौकिक कमवून होते.ते बैठकीत रोखठोक पण संयमाने बोलायचे पण सभेत कधीच बोलले नाहीत.ते सगळी कामे निष्ठेने, तळमळीने  करीत पण त्यांनी व्यासपीठावर येऊन खुर्चीत बसावे अशी कधीच अपेक्षा धरली नाही.

      १९८७ च्या दरम्यान मी संघात गेलो.संघाच्या स्थापनेच्या काळातील मंडळी तेव्हाही कार्यरत होती.माझे मामा तुकाराम पेडणेकर यांनी मला संघाचे सभासद होण्यास सांगितले.छबीलदास हायस्कूल दादर मध्ये असलेल्या एका सभेत आ.म.नी माझी आस्थेने चौकशी करून मला संघात क्रियाशील होण्यास सांगितले. त्या काळात  दादर परेल या भागात संध्याकाळी सभा होत.तेव्हा अशी फोनाफोनी नव्हती.आ.म.हांदे यांच्या सुवाच्य अक्षरातले सभेचे निमंत्रण पोस्टाने घरी येत असे.   मी भायखळा येथील बापूराव जगताप मार्ग मनपा  शाळा क्र २ मध्ये कार्यरत असल्याने शाळा सुटल्यावर तडक सभेला जात असे.

    

    संघाने स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात गाव खेड्यात अधिवेशन भरवून, तत्कालीन लोकप्रतिनिधीना गाव खेड्यात आणून इथल्या स्थानिक विकासाच्या कामाकडे लक्ष वेधले.त्यातून रस्ते,एस् टी वाहतूक, पोस्ट, आरोग्य सुविधा, प्राथमिक शाळा निर्मिती असे असंख्य प्रश्न धसास लावले.अणुस्कुरा घाट फोडून राजापूर कोल्हापूर जोडणे, शेतकरी सारा माफ करणे,कोकण रेल्वे साठी सातत्याने पाठपुरावा करणे अशी संघाची ठळक कामे आहेत.१९७५ ते १९८५ हा दहा वर्षांचा काळ संघ थांबला होता.पण त्यानंतर पुन्हा ती जाणती मंडळी कामास लागली.१९८७ पासून नव्या दमाच्या तरुणांना संघाचे सभासदत्व देऊन त्यांना कार्यकारिणीवर घेऊन सामाजिक संस्थेच्या कामाचा अनुभव देण्यास सुरुवात केली.माझ्यासह वडवलीचे तुकाराम शिंदे,आरगावचे रा.सू. खामकर व कोचरीचे धोंडू पांडुरंग खांडेकर हे नव्या यादीत होते.यानी पुढील काळात संघाचे अध्यक्ष पद भुषविले. नि:स्वार्थी वृत्ती, प्रामाणिकपणा आणि सांघिक भावनेने काम करण्याचे संस्कार मागील पिढीकडून आत्मसात केलेल्या या सर्व माजी अध्यक्षांनी त्यांचा कार्यकाल यशस्वीपणे पार पाडला.  कार्यकर्त्याचा अनुभव,त्याचा सामाजिक कार्यातील वावर,तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भावना लक्षात घेऊन त्यांची वर्णी कोणत्या पदावर करावी संघामधील कार्यकर्ते ठरवत ती परंपरा आजही चालू आहे.त्यामुळे संघांचा कोणताही उपक्रम यशस्वी होत असतो.सुरुवातीच्या काळात   कोणतेही काम करतांना पुढे असणारा कार्यकर्ता सर्वांच्या नजरेत येतो.तेव्हा त्याला पुढच्या पायरीवर अलगद आणून ठेवले जाते.खांडेकरही त्याच मुशीतून पुढे आले.वेळेचे भान जपण्याचे, चोख हिशोब ठेवण्याचे आणि मांडण्याचे कौशल्य यामुळे त्यांनी रितसर खजिनदार पद अठरा वर्षे सांभाळले पण पद नसूनही शेवटपर्यंत खजिनदार पदावर कुणीही असला तरी हिशेबाची जबाबदारी त्यांनीच सांभाळली.

          खांडेकराचा शांत स्वभाव तसे बोलणेही कमी.मात्र सगळ्यांच्या प्रती ममत्व असल्याने त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याची जादू त्यांच्याबद्दल आदर निर्माण करुन जायची.एखाद्याचे कौतुकही ते त्याच्या कानाजवळ जाऊन  हळू आवाजात करायचे.कुणाबद्दल कधी आकस नसल्यामुळे " तुमचं हे म्हणणं बरोबर नाही " हे वाक्य सुद्धा समोरच्याला खरोखर आपण चुकलो आहोत का याचं आत्मपरीक्षण करायला भाग पाडत असे.त्यामुळे सर्वांमध्ये आपोआप त्यांची उंची वाढली. तुकाराम शिंदे यांनी अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा आपण अध्यक्ष पद किंवा इतर कोणतेही पद घेणार नाही असं सांगितल्यावर सर्व सभासदांनी खांडेकरांच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्याकडे संघाचे अध्यक्ष पद दिले.त्यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला पण " कामे आम्ही करु तुम्ही फक्त पद भुषवा " असा सभासदांनी आग्रह केल्यानंतरच त्यांनी होकार दिला.कधी कधी वेगळा विचार डोकं वर काढतो तसा प्रकार त्यांनी अध्यक्ष पदाचा अर्ज भरल्यानंतर दिसल्यावर ते अर्ज मागे घेतो असे म्हणू लागताच सभासदांनी अधिक ताकद त्यांच्यामागे लावली त्यामुळे निवडणूक न होताच खांडेकर अध्यक्ष झाले. फारसे काही न बोलता काम करणाऱ्याला प्रोत्साहन द्यायचे या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या कार्यकाळात संघाने नवे उपक्रम सुरू केले. काम असेल तर हातांना राबण्याची संधी मिळते, नवीन काही करायची हिंमत असेल तर नव्या कल्पना लढवण्याची संधी मिळते.एकतर संघाने गावपातळीवर सक्रीय सभासद जोडून त्यांच्या सहकार्याने उपक्रम राबवावे असे ठरवले.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम सुरू करण्याचे ठरल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पुरस्कर्ता म्हणून पहिली वीस हजाराची देणगी खांडेकरांनी दिली आणि मग अनेक पुरस्कर्ते संघाला मिळाले. संघाचा पहिला पुरस्कार वितरण कार्यक्रम २०१४ मध्ये ओणीतील नुतन विद्यामंदिरात स्थानिक कार्यकर्ते श्री महादेव पाटील सर यांच्या सहकार्याने संपन्न झाला.या कार्यक्रमापासून व्यासपीठावर खुर्च्या व लावता कार्यक्रम करण्याची पद्धत अवलंबली गेली. या कार्यक्रमाकरीता संघाचे मुंबईतील कार्यकर्ते वीस आसनी गाडी घेऊन प्रथमतःच एकत्रीतपणे गावाला गेले.तो सुंदर कार्यक्रम पाहून " पुढच्या वर्षी असा कार्यक्रम  आमच्या गावात करा " असे आमंत्रण लांजा तळवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री दिगंबर तथा बाप्पा पाटोळे यांनी दिल्याने संघाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले.अर्थात संघाचे नूतन अध्यक्ष श्री धोंडू खांडेकर यांच्या शिरपेचात नवोपक्रमाच्या यशस्वीतेचा तुरा खोवला गेला. पुढील वर्षापासून त्याच पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे रुपांतर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात झाले.कोरोना काळ सोडल्यास प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावात संमेलने पार पडत आली.एकूण दहा संमेलने अजूनपर्यंत यशस्वी झाल्याने संघाचा लौकिक सर्वदूर झाला आहे.

       संघाने १९९४ ला वाटूळ येथे अधिवेशन भरविले.त्यात शेतकरी मेळावा व मोफत आरोग्य शिबीर केले होते.त्यावेळेला आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यामध्ये खांडेकरही उपस्थित होते.१९९५ चे राजापूर हायस्कूल मध्ये नवीन अभ्यासक्रमाकरीता आयोजित केलेले शिक्षक मार्गदर्शन शिबिर,१९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव लांजा येथे आयोजित करण्यात आला.२०१० मध्ये व्हेळ गावात प्राथमिक शाळेत आयोजित केलेला शेतकरी मेळावा, वाटूळ परिसरातील शेतकऱ्यांच्या सातबारावर खाण मालकाचे चढलेले नाव कमी करण्यासाठी केलेले आंदोलन या संघाच्या चळवळीत खांडेकरांचा सहभाग होता.

        १९७८ पासून गाव खेड्यातल्या प्रत्येक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयतून प्रथम आलेल्या १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके मनीऑर्डरनी दिली जायची.पुढे ती ९४ नंतर राजापूर किंवा लांजा येथे कार्यक्रम करून मुलांना देण्याचे सुरू झाले.त्या मुलांना खाऊ वाटप म्हणून दादरच्या लाडू सम्राट मधून लाडू करंडीत बांधून घ्यायचे व एस टी तून ते गावी न्यायचे.या कामाची जबाबदारी सिताराम शिंदे , खांडेकर यांच्याकडे असायची.कार्यक्रम स्थळी माझ्यासहीत ही मंडळी स्वयंसेवकाप्रमाणे बैठक व्यवस्था बघणे, चहापान बघणे, पारितोषिकाची पाकिटे भरणे, हारतुऱ्याची व्यवस्था करणे या कामात व्यस्त असे. कार्यक्रम संपल्यावर आम्ही सर्व मुंबईकर कोत्रे हाॅटेलमध्ये जेवत असू.जेवणाचे बील खांडेकर आपल्याकडेच घ्यायचे व बिलाची रक्कम अदा करायचे.संस्थेच्या हिशेबात त्याचा उल्लेख नसायचा तेव्हा कळायचे ते बिल खांडेकरांनी आपल्या खिशातून भरले आहे.

      खांडेकरांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकालात अगदी तरुण कार्यकर्ते संघाला मिळाले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, वृक्षारोपण असे उपक्रम करतांना ही तरुण मंडळी प्रसंगी रजा काढून गावाला जाते.त्यांना एक विरंगुळा म्हणून पावसाळी सहल काढण्याची बुम निघाली.यामध्ये अनेक जण सहभागी होतात.नवीन प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद असतोच पण कार्यकर्ते अधिक एकमेकांच्या जवळ आले.एकमेकांच्या सुखदु:खाला प्रगट करण्याची संधी मिळाली.त्यातून संघाचा एक परिवार निर्माण झाला.खांडेकरांसारखी वयोमान असलेल्या व्यक्ती आणि नवीन पिढी यामधली दरी दूर करण्याचे काम त्यांच्या हसऱ्या बुजऱ्या पण हृदयात जागा निर्माण करणाऱ्या स्वभावाने केले.पावसाळा सुरू होताच ही मंडळी ओलेचिंब होण्याची वेळ आणि ठिकाण ठरवतात.एक दिवस एक बस खचाखच भरून प्रवासाला निघते.त्या बसमध्ये आजोबा आजी असतात, नुकतीच सेवानिवृत्ती झालेले असतात.हात सोडून पळणाऱ्या मुलांबरोबर अंगावर खेळणाऱ्या लेकरांना घेऊन त्या त्या वयाचे पालक असतात.तर या सगळ्यांना मोकळेपणाने मदतीसाठी धावणारे, वयोवृद्धांची काळजी वाहणारे तरुण असतात.कुणीतरी अंताक्षरी सुरू करतो आणि अवघी बस सांसारिक विवंचना खिडकीबाहेर ठेवून सुरू धरु लागते.मध्येच मान फिरवून एखादं गाणं खांडेकर  गाणं सुचवितात तेव्हा जगण्याचा निरलस आनंद काय असतो याची प्रचिती येते. संघाने या अजातशत्रूला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले पण त्यांच्या पंचाहत्तरीचा उत्सव करण्याची संधी गमावल्यांची खंत कार्यकर्त्यांना अस्वस्थ करते आहे.

          त्यांचे कुटुंबही त्यांच्या संघ कार्यात हसत मुखाने सहभागी होत असे.तेवढीच त्यांची काळजीही घेत असे.त्यांना पाठीचा आजार असल्याने त्यांचा मुलगा नितीन त्यांच्या सुरक्षीत प्रवासाची काळजी घेत असे.

एवढी काळजी घेऊनही गणपती उत्सवात गावी गेलेले खांडेकर घरातच पडले आणि त्यांच्या मेंदुला मार लागला.नितीनने त्यांना तात्काळ मुंबईला आणून ऑपरेशन केले पण खांडेकर अबोल राहून भरल्या डोळ्यांनी सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक नजरेत साठवून इहलोकीचा प्रवास संपवून ईश्वर लोकी गेले.त्यांचे चाहते शोकाकुल झाले.

         अध्यक्ष कसा असावा याचा आदर्श पाठ घालून देणारे स्वर्गस्थ श्री.धोंडू पांडुरंग खांडेकर अर्थात डी.पी. खांडेकर त्यांच्या विस्तीर्ण परिघात  नवोपक्रमाचा पुरस्कर्ता म्हणून अजरामर झाले आहेत.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

सुभाष लाड

अध्यक्ष

राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई


कोकण मिडियाने सदर लेखाला प्रसिद्धी दिली.

     


संघाने वाहिलेली श्रद्धांजली 


            

          

No comments:

Post a Comment