Wednesday, July 9, 2025

💐🏵️💐🏵️💐🏵️💐जाईल तिथे कर्तुत्वाचा ठसा उमटवणारी शिक्षिका स्नेहल आयरे💐🏵️💐🏵️💐🏵️


             शेवटी जनतेच्या रेट्यामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या बाल विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या शिक्षण घेण्याच्या सक्तीला सरकारकडून  तात्पुरता स्थगिती देण्यात आली असली तरी जनतेने तिला कायमची तिलांजली दिली आहे.हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा देवनागरीतून लिहिल्या जातात. मराठीतील 'ळ' हे अक्षर सोडल्यास मुळाक्षरे व त्यांचे व्याकरणही सारखेच आहे. भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये सहज बोलली जाणारी भाषा म्हणून हिंदीकडे पाहिले जाते. मुंबईत तर उत्तर भारतीय माणूस जितक्या चांगल्या पद्धतीने हिंदी बोलतो तितक्या चांगल्या पद्धतीने हिंदी बोलणारी मराठी किंवा अन्य भाषिक माणसे आहेत. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने सुरू झालेली राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा आणि हिंदी भाषा प्रचार समिती, पुणे यांच्यामार्फत हिंदी विषयाच्या वेगवेगळ्या परीक्षा आयोजित केल्या जातात.कोविद,रत्न तसेच विद्यावाचस्पती अशा पदव्या मिळविल्या जातात, अनेक मराठी विद्यार्थी या भाषेचा अभ्यास करत असतात. याचा अर्थ मराठी माणूस हिंदी वरती प्रेम करतो. पण म्हणून बालवयातल्या मुलांना हसत खेळत शिक्षण देताना मुलांना केवळ मातृभाषेतूनच शिकवायचे असते. असे असताना इंग्रजी शिवाय जगात पर्याय नाही असा जावई शोध लावणाऱ्या आणि गरीबांना आमिश दाखवून प्रचंड फिया उकळून श्रीमंतीचे मजले चढवणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या धन दांडग्या मालकांना उचलून धरण्यासाठी पहिलीपासून इंग्रजी विषयाचे शिक्षण सुरू केले गेले आहे. इंग्रजी हीच आता जगण्याची भाषा आहे असं समाजात सर्व स्तरावरती जाणून बुजून पेरलं गेलं असल्याने त्या विरोधात कुणी आवाज उठवायला तयार नाही. त्याचा फायदा घेत मुंबईची भाषा ही हिंदी आहे हे भविष्यात सांगायला मोकळे व्हावे यासाठी राजकारण्यांनी हिंदी भाषेची सक्ती करणारे सरकारी आदेश जारी केले. मराठी भाषिकांच्या अन्यायाच्या निवारणार्थ सुरू झालेल्या पक्षांनी वेळीच उठाव केला. जनतेला त्याची जाणीव करून देऊन जनमत तयार केले आणि शेवटी ते जीआर रद्द करण्याची वेळ सरकारवर आली. मात्र यापुढेही डोळ्यांत तेल घालून मातृभाषा द्रोह्यांवरती नजर ठेवणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र सरकारचा सातवी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार नामदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडून स्वीकारताना

          जशी हिंदी विरोधात आपण जागरूकता दाखवली तशी जागरूकता मराठी जगविण्यासाठी का दाखवत नाहीत ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. ज्यांना  मराठी भाषेच्या मरणकळा जाणवल्या ते अनेक कलाकार, विद्वान एकत्र येऊन वेगवेगळ्या संस्था स्थापन करून, वेगवेगळे उपक्रम राबवून मायमराठीसाठी प्रयत्न करत आहेत. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या चारकोपच्या प्राथमिक शाळेतून प्रभारी मुख्याध्यापक पदावरून ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या स्नेहल आयरे या त्यापैकी एक आहेत.

         पंधरा-वीस वर्षांपूर्वी चारकोप सेक्टर २ मधील मराठी भाषिक शाळा एक नामांकित शाळा म्हणून विद्यार्थ्यांचा मोठा पट मिरवत होती. पण आजूबाजूला इंग्रजी शिक्षणाच्या व्यापाऱ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आणि या शाळेच्या पटावरती परिणाम होऊ लागला. या शाळेचा दर्जा उत्तम आहे, या शाळेत वेगवेगळ्या कलागुणांचे शिक्षण दिलं जातं, इथलं शिक्षण मुलांना चतुरस्त्र  बनवतं,स्वावलंबी बनवतं, इथून शिकलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पगाराच्या आणि मोठ्या मानांच्या नोकऱ्या करताहेत. उद्योग व्यवसायामध्ये नाव कमवत आहेत, कलाक्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा निर्माण करत आहेत. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेची इमारत आणि शालेय परिसर सुद्धा आदर्शवत आहे. शिक्षणाला पूरक वातावरण, उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक वर्ग इथे आहे. मराठमोळ्या संस्कृतीचे जतन करणारं शिक्षण इथं आहे मात्र इथे एक कमी आहे ते म्हणजे इंग्रजीच्या गुलामगिरीचे प्रदर्शन करणारा गळ्यातला टाय इथल्या मुलांच्या गळ्यात असत नाही.एवढं असून सुद्धा मुलांच्या भवितव्यापेक्षा पालकांचा पोकळ स्टेटस भारी पडला.

हळुहळु शाळा बंद पडण्याची वेळ आली.पण स्नेहल आयरे यांनी वेळीच लोकांच्या घरोघरी जाऊन मराठी माध्यमातून अर्थात मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा काय फायदा आहे हे लोकांना पटवून देताना दुरच्या मुलांना आणण्यासाठी आपल्या पगारातील पैसे खर्च करून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली. त्यांच्या गणवेशाबरोबर वह्या- पुस्तकांची व्यवस्था केली आणि शाळेचा विद्यार्थीपट वाढवला. विशेष म्हणजे स्वतः आयरे बाईंच्या मुलीही त्यांच्याच मराठी शाळेत जात असल्याने पालकांचाही त्यांच्यावरती विश्वास बसला. आज मराठी शाळा बंद पडण्याला अनेक कारणे असतील. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे मराठी शाळांमधील शिक्षकच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवत आहेत त्यामुळे ' माझ्या शाळेत मुलांना पाठवा ' असे सांगण्याचा अधिकार त्या शिक्षकांना राहात नाही. या शिक्षकांचा आदर्श घेऊन पालकही आपली मुलेही त्या शाळेतून काढून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू लागले तर यात त्यांचे काय चुकले ? म्हणूनच मराठी शाळेतील शिक्षक मराठी शाळा बंद पाडण्यास कारणीभूत आहेत असे आम्ही म्हणतो आहोत.

  

      ३९ वर्षांचा प्रामाणिकपणे किंबहुना विद्यार्थ्यांसाठी अधिक झोकून देऊन काम करण्याचा हा प्रदीर्घ सेवाकाल पूर्ण करून सौ. स्नेहल विजय आयरे आज शाळेच्या उपस्थिती पुस्तिकेत शेवटची सही करून निरोपाच्या समारंभासाठी सभागृहातील व्यासपीठावर संस्थेचे काही पदाधिकारी, आजी माजी मुख्याध्यापक यांच्या मधोमध आपले पती श्री विजय जगन्नाथ आयरे यांच्यासोबत स्थानापन्न होत्या. उद्यापासून त्या या शाळेसाठी सेवानिवृत्त असतील पण शाळेच्या सेवेच्या बरोबर किंबहुना शाळेतील सेवेला पूरक असे त्यांचे सामाजिक कार्य सुरू होते त्या कार्यात त्या आता पूर्ण वेळ देऊन आनंद घेतील याची आम्हास खात्री वाटते.

         रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावच्या दत्ताराम लक्ष्मण पवार यांच्या त्या कनिष्ठ कन्या. दौलतराव पोलीस दलात सब इन्स्पेक्टर या पदावर होते.पोलीस आणि चिरीमिरी यांची नेहमीच सांगड घातली जाते मात्र दत्तारामरावांनी स्वत:च्या शुद्ध चारित्र्यातून चांगली माणसे पोलीस दलात असतात हे दाखवून दिले. आयुष्यभर ते धुतल्या तांदळासारखे राहिले.कष्टाच्या मीठ भाकरीवरच त्यांनी समाधान मानले.पदरी चार मुली, दोन मुलगे , पत्नी आणि आई वडील अशा मोठ्या कुटुंबाचं पालन पोषण करणं ही तारेवरची कसरत असतांनाही नीतीमत्तेला त्यांनी अधिक प्राधान्य दिले.सेवानिवृत्तीनंतर गावी राहून शेती करणे पसंत गेले. त्यांच्या कर्तृत्वाला दाद देतांना ग्रामस्थांनी शिवणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काम करण्याची त्यांना संधी दिली. एका अर्थाने सरपंचाने निष्पृह भावनेने काम केल्यास गावाचा विकास अधिक चांगला होतो हे दत्तारामराव पवार यांनी दाखवून दिले त्यामुळे गावकऱ्यांचा त्यांच्याकडेच नव्हे तर त्यांच्या सर्व कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराचा राहिला आहे.

 

       त्यांनी सर्वच मुलांना शिक्षित केले. मुलांनी त्यांच्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून नाव कमवल्याचे दिसून येते.स्नेहल आयरे यांचं माहेरचं नाव लता. लहानग्या लताला शिक्षणाकरीता कधी मुंबई तर कधी गावी अशी फिरती अनुभवावी लागली. पाचवी ते दहावी या शिक्षणासाठी बुरंबी येथे असलेल्या माध्यमिक शाळेत स्थिरता मिळाली. याच शाळेत त्यांना  शारदोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने नाट्य अभिनयाचे धडे मिळाले. नेतृत्व गुणाबरोबरच वक्तृत्व कलेचे इथेच भरण पोषण झाले. शिक्षकी पेशाची आवड असल्यामुळे दहावी नंतर डी.एड. प्रशिक्षण पूर्ण केले आणि मुंबईत इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली.

 

       इंडियन एज्युकेशन सोसायटीचे दादरचे राजा शिवाजी विद्यालय (पूर्वाश्रमीचे किंग जॉर्ज स्कूल ) हे पूर्वीपासूनच दर्जेदार शिक्षणासाठी ख्यातनाम पावलेले. त्यामुळे या संस्थेच्या अन्य शाळांकडेही बघण्याचा तोच दृष्टिकोन होता. इथल्या शिक्षकांच्या बाबतीत तोच आदर होता. कुमारी लता दौलत पवार  वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांच्या आवडीनुसार इथे शिक्षक म्हणून रुजू झाल्या.अल्पावधीतच त्यांच्यातील कलागुण, अभ्यासू वृत्ती, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सवय आणि विद्यार्थ्यांच्या पोटात जाऊन त्यांना आपलेसे करून त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या आणि त्यांचे नाव सर्व शाळांमध्ये एक हरहुन्नरी शिक्षिका म्हणून गाजू लागले.

 

        वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह रिंगणे गावचे श्री. विजय जगन्नाथ आयरे यांच्याशी झाला आणि त्यांची ओळख सौ. स्नेहल विजय आयरे  अशी झाली. विजय आयरे व्होल्टाज या नामांकित कंपनीत कामाला होते. एकत्रित कुटुंबात वाढलेले विजय आयरे हे मितभाषी व शांत स्वभावाचे असून स्वतःच्या आनंदासाठी गायन करणे हा त्यांचा छंद आहे. पत्नीचा मनमिळावू स्वभाव, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बद्दलची आत्मीयता कौटुंबिक सेवाभाव आणि नाविन्याचा शोध घेण्याची उत्सुकता हे सगळे गुण पाहिल्यानंतर पती विजय आयरे यांनी पत्नीच्या पुढील शिक्षणासाठी मोकळीक दिलीच परंतु तिच्या प्रत्येक उपक्रमात त्यांना मोलाची साथ देत राहिले.

          पहिली ते चौथी पर्यंतची मुलांना शाळेत शिकवण्या अगोदर त्यांच्यात शाळेची आ व निर्माण करणे गरजेचे असते. लिहिणं वाचणं हा जेव्हा अभ्यासाचा भाग होतो त्यावेळेला मुले कंटाळा करतात. परंतु नाचण्या गाण्यातून, खेळातून बोलणं वाचणं होतं त्यावेळेला मुलं लिहिण्यासाठी उत्सुक होतात. लहान मुलं उशिरा शाळेत येतात त्याचे कारण मुले नसून त्यांचे पालक असतात हे ज्यांना समजले ते शिक्षक उशिरा येण्याचं कारण मुलांना न विचारता त्यांच्या पालकांना विचारतात त्यावेळेला आपले ' शिक्षक आपल्याला रागवतील म्हणून आपण शाळेत जाणार नाही' असं मुलं म्हणू शकत नाहीत.मुळात चेहऱ्यावर नेहमीच हास्य असणाऱ्या आयरे बाईंच्या नावाप्रमाणेच हृदयातही तितकाच स्नेहभाव असतो. त्यामुळे मुले त्यांच्यात आपली आई किंवा आपली ताई शोधतात. बालवयातच मुलांच्या हृदयात बसलेल्या आयरे बाईंना आज चाळीशी पन्नाशीत वावरणारे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी परदेशात वास्तव्य करून राहिलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी माध्यमाद्वारे त्यांना दिलेल्या शुभेच्छा त्यांच्या वरच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या होत्या. आयरे बाईना आदर्श शिक्षकांसाठीचा राज्य सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला, मुंबई महानगरपालिकेचा महापौर पुरस्कार मिळाला. अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कामाची दखल घेतली. त्या पुरस्काराने आयरे बाईंना आनंद झाला असेलच त्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रति व्यक्त केलेल्या कृतज्ञेच्या शब्दांनी झाला असेल.


         अभ्यासक्रमातील घटक पूर्ण करणे म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे इतका संकुचित अर्थ आयरे बाईंनी कधीच घेतला नाही.आयरेबाईं समोर असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे निरीक्षण करीत, प्रत्येकाच्या घरच्या परिस्थितीची माहिती करून घेत. एखादा विद्यार्थी एखाद्या कलेत प्राविण्य दाखवतोय असे वाटताच ते त्याच्या पालकांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या पाल्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे सांगतानाच काही वेळेला पालकाची परिस्थिती नसेल तर स्वतःच पालक होऊन त्या विद्यार्थ्याला पुढे नेण्याचे काम आयरे बाईं करीत. आज कलाक्षेत्रात त्यांचे काही विद्यार्थी पुढे येताना दिसत आहेत. ते विद्यार्थी एखादी नवीन गोष्ट करताना आयरे बाईंचा सल्ला घेतात. यशस्वीता मिळाल्यावर तो आनंद आयरे बाईंना प्रथम सांगतात. त्यांचे पालक सुद्धा तेवढ्याच जवळच्या नात्यांन आयरे बाईंशी जोडून आहेत. खऱ्या अर्थाने बाई शिक्षकी पेशा जगल्या आहेत. काल कुणीतरी सहज बोलण्याच्या ओघात "आम्ही ते साने गुरुजी पाहिले नाहीत परंतु आयरे बाईंच्या रुपात आम्हाला दुसरे साने गुरुजी पाहायला मिळाले हे आमचे भाग्य आहे " ते सहज बोलून गेले परंतु सर्व सभागृह त्या भाषणाने हेलावून गेले.

 

       आयरे बाईंचं वाचनही अफाट आहे म्हणून त्यांचं वक्तृत्व अभ्यासपूर्ण आणि विलोभनीय आहे. त्यांचे अध्यापन कसदार बनले आहे. शाळेचे विविध उपक्रम हे अधिक लक्षणीय व अभ्यासपूर्ण कसे होतील यासाठी त्या अहोरात्र मेहनत करीत आल्या. त्यामुळेच विविध प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून राज्य पातळीवर त्यांची निवड केली गेली. शिष्यवृत्ती अभ्यासक्रम असेल, पाठ्यपुस्तक निर्मितीतील त्यांचा सहभाग असेल.त्यांचे काम नेहमीच कौतुकास्पद राहिलेले आहे.

          शिक्षक केवळ विद्यार्थ्यांकरता शिक्षक नसतो तर समाजही त्याला शिक्षकाच्या रूपात पाहत असतो म्हणून प्रत्येक शिक्षकाला समाजात वावरताना पोटात एक आणि ओठात दुसरे असे वागून चालत नाही. समाज स्वास्थ्य टिकवायचे असेल तर प्रत्येक कुटुंब हे गुण्यागोविंदाने नांदले गेले पाहिजे. त्याची सुरुवात ही आपल्यापासूनच झाली पाहिजे असं ज्यांना वाटतं ते समाजाचेही शिक्षक होतात. आयरे बाईंच्या सासुबाई या संततीच्या बाबतीत काहीशा जुन्या विचारांच्या होत्या. आपल्या मुलाला एखादा मुलगा व्हावा ही त्यांची इच्छा होती. जेव्हा लागोपाठ दोन्ही नाती जन्माला आल्या त्या वेळेला त्या काहीशा नाराज झाल्या. त्यांची चिडचिड वाढली. त्याचा परिणाम कुटुंबातल्या स्वास्थ्यावर्ती झाला. परंतु आयरे बाईंनी आपल्या सासूबाईंचा राग न धरता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. एवढेच काय तर सासूबाईंच्या व सासर्‍यांच्याही  वार्धक्यातील त्यांच्या आजारपणात मुलीप्रमाणे सेवा केली. दोन्ही नातींनी सुद्धा आपल्या आजी आजोबांची मायेने केलेली देखभाल त्यांच्यातील परस्पर प्रेमभाव आस्मादिकांनी प्रत्यक्ष पाहिला आहे. प्रत्येक पिढीची एक विचारधारा असते ती विचारधारा चुकीची असू शकते परंतु त्या विचारधारेचा पगडा पडलेल्या व्यक्तीचा त्यात दोष नसतो.त्यामुळे त्या व्यक्तीला समजून उमजून घेतल्यास ती व्यक्ती सुद्धा त्या पगड्यापासून दूर होऊ शकते हे आयरे बाईंनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे.

 

         एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते असं महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते. ते जेवढं सत्य आहे तेवढेच एखादी स्त्री सामाजिक क्षेत्रात उतरते त्यावेळेला तिचे सर्व कुटुंब तिच्या सामाजिक क्षेत्राचा अविभाज्य घटक ठरते हे आयरे बाईनी आपल्या सामाजिक क्षेत्रातल्या वावराने दाखवून दिले आहे. त्यांचा एका दिवाळी अंकात एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्याबाबत आमच्याच गावच्या दीपक आयरे यांनी मला त्याबद्दल माहिती पुरवली. मलाही त्यांच्याबद्दल जाणून घ्यावयाचे होते. पंधरा वर्षांपूर्वी मी त्यांच्या घरी गेलो तेंव्हा त्या त्यांच्या अंथरुणात असलेल्या सासऱ्यांना औषध देत होत्या. त्यांची आणि त्यांचे पती विजय आयरे यांची ही पहिलीच भेट होती. त्यांचं बोलणं आणि त्यांचे सामाजिक विचार पाहून मी त्यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याची मोठी संधी आहे असे सांगून त्यांना संघाचे सभासदत्व स्वीकारण्यास भाग पाडले. स्थानिक विकास कामांबाबत पत्रव्यवहार करणे आणि दहावी बारावीच्या उत्तीर्ण  मुलांचा सन्मान करणे एवढ्या पुरताच सीमित राहिलेला संघ पुढे वृक्षारोपण, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप , त्यांना शिष्यवृत्ती देणे आणि विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील साहित्यिक क्षेत्रात पुढे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजनामुळे संघ घराघरात पोहोचला. आयरे बाईंच्या सहभागामुळे अनेक महिला कार्यकर्त्या संघाला जोडल्या गेल्या. एखाद्या कार्यक्रमात महिलांचा वावर असतो त्या वेळेला तो कार्यक्रम अधिक नियोजनबद्ध आणि उठावदार होतो हे आयरे बाईंच्या सहभागामुळे अधोरेखित झाले. ग्रामीण भागातील प्रत्येक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्याची संकल्पना संघाने पुढे आणली त्यावेळेला त्या पुरस्कारांसाठी आवश्यक असलेला निधी गोळा करण्यात आयरे बाईंचा पुढाकार होता. यात सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईकातील देणगीदार मिळवण्याचे काम त्यांनी केले. संघाच्या प्रत्येक उपक्रमात त्या जोडीने उपस्थित राहतातच परंतु त्यांच्या कुटुंबातील व नात्यांतील अनेक सदस्य अशा कार्यक्रमात आवडीने येतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची सुकन्या डॉ. सायली हिचा विवाह झाला. सिंधुदुर्गातील दळवी कुटुंब आयरे कुटुंबाशी जोडले गेले तसेच त्यांना संघाच्या उपक्रमात जोडण्याचं काम आयरे बाईंनी  केलं.स्वत:च्या कर्तुत्वामुळे संघाच्या पहिल्या महिला सरचिटणीस होण्याचा मान सौ. स्नेहल विजय आयरे यांना मिळाला. संघाच्या इतिहासात रिंगणे गावचे अखिल रिंगणे ग्रामस्थ सेवा मंडळ, संघाचे संस्थापक नाटककार ला.कृ. आयरे, संघाचे दीर्घकाळ सरचिटणीस राहिलेले थोर समाजसेवक आ. म.हांदे आणि संघाची पहिली महिला सरचिटणीस म्हणून आयरे बाईंचे नाव अजरामर झाले आहे. सेवानिवृत्तीनंतर संघाचे कार्य पुढे नेण्यासाठी त्या अधिक वेळ देतील याची आम्हास खात्री वाटते.

  

      सौ स्नेहल विजय आयरे यांचे अध्यापन, त्यांचे लेखन, त्यांचे एकांकिका सादरीकरण, शिक्षण प्रशिक्षणातील त्यांचे मार्गदर्शन, मराठी शाळा वाचूया अभियानातील त्यांचा सहभाग, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठीच्या मदत निधीसाठी त्यांची धडपड, सामाजिक कार्यातील त्यांचा प्रामाणिकपणा अशा सर्व क्षेत्रात त्यांचा वावर सहज लक्षात येण्याजोगा राहिलेला आहे. या क्षेत्रात त्या गेल्या त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्या शाळेतून सेवानिवृत्त झाल्या असल्या तरी बाहेरच्या दुनियेत फार मोठे अवकाश त्यांची वाट पाहते आहे. त्या अवकाशात त्यांना यशस्वी भरारी घेण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो त्याचबरोबर आयुरारोग्य त्यांना प्रदान करो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

सुभाष लाड

९८६९१०५७३४

       



  💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️

अभिप्राय 

१) सुप्रिया मोरे, गुहागर मुंबई 

🙏सौ.स्नेहल विजय आयरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल दिसून येणारी ओढ,आवड.त्यांच्या कुटुंबाने त्याना दिलेली साथ आणि समाजाकडून मिळालेली कर्तृत्वाची थाप सर्वच कौतुकास्पद आहे.त्यांच्या या ऊतुंग भरारीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

        श्री.लाडसर व सौ.स्नेहल मॅडम यांना "गुरुपौर्णिमेच्या"अन॔त शुभेच्छा.🌹

1 comment:

  1. लाड सर,
    स्नेहल ताईनं विषयींचा,त्याच्या अध्यापन कार्याचा,समाजिक,कौटुंबिक बांधिलकीचा गौरव करणारा आपला गौरव लेख छान जमलाय. माणसांच्या अंतरंगात डोकावण्याची प्रचंड क्षमता आपणामध्ये आहे.त्यामुळेच स्नेहल ताईंविषयीच समाजिक जाणीवेचं हे लेखन आपल्या आतून,आंतरीक विवेक उर्मीतून आलेलं आहे. आपला ताईंविषयी असलेला आंतरीक प्रेमादार यातून प्रकट होतो. आपल्या लेखनाला एक आगळ निरीक्षणमूल्य आहे.त्यामुळेच ताईंच्या प्रभावामुळे हा लेख एकांगी किंवा केवळ स्तुतीप्रधान होत नाही. हे विशेष!!! स्नेहल ताईंच्या कार्याच वस्तुनिष्ठ मूल्यमापण करून,आपण आपलं मैत्र जोपसलंय त्याबद्दल आपलं कौतुक व अभिनंदन!!
    स्नेहल ताईंच्या व्यक्तिमत्वातील ऋजुता आणी सचोटी हे पैलू फारच विलोभनीय आहेत.प्राथमिक शिक्षकांना अध्यापणासाठी पुरेसा वेळ न देता बहुतांश वेळा त्यांना शासकीय कामात गुंतवून ठेवण्यातच आपलं सरकार धन्यता मानत. हे दुर्दैवी आहे. मात्र या साऱ्या उणीवांवर मात करून,विद्यार्थ्यांना केवळ पाठयापुस्तकातील छापील अभ्यासक्रम न शिकवता, स्नेहल ताईंनी विद्यार्थ्यांच्या विचारांच स्फुलिंग चेतवून, त्यांच्यातील जे उत्तम आहे ते कायम फुलवत ठेवलं. त्यामुळेच असेल आजही त्यांचे माजी विद्यार्थी त्यांचं आवर्जून स्मरण करतात.............स्नेहल ताईंना त्यांच्या पुढील समाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

    ReplyDelete