होऊ द्यात मंदिरे उदंड
हरिनामाचा यज्ञ अखंड
समूह जीवनाचा पक्का पाया
मन:शांतीसवे प्रखर बलदंड ll
काही वर्षांपूर्वी एका पत्रकार मित्राने गावच्या देवळाच्या उभारणीत पुढाकार घेतला तेव्हा त्याच्या अनेक मित्रांनी " आजच्या विज्ञान युगात तुम्ही मंदिरे बांधून आपल्या समाजाला काही वर्षे मागे घेऊन जात आहात ." असे बोल ऐकवून त्याला पेचात पकडले. त्यांना काय उत्तर द्यावे आणि आपल्या कामाचं कसं समर्थन करावं हे तुमच्या मित्राला सुचेना. त्यांने मला रात्री फोन केला आणि आपली समस्या माझ्यापुढे मांडली. मी माझ्या पद्धतीने देऊळही किती महत्त्वाचे आहे हे त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांना ते पटले आणि तशाच प्रकारचे भाषण त्यांनी आपल्या गावकऱ्यांसमोर केले.
आपल्याकडे आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारचे लोक आहेत असं समजलं जातं. माझ्या मते हे दोन्ही प्रकार अस्तित्वातच नाहीत. देवाचं अस्तित्व मान्य करणारे देवाचे भजन पूजन करणारे सर्वजण आपल्या आई-वडिलांची सेवा करतात असे नाही. तर देवाचं अस्तित्वच नाही किंवा देवपूजा करत नाहीत असे अनेक लोक आपल्या आई-वडिलांची प्राणापलीकडे जपणूक करताना दिसतात त्यावेळेला आस्तिक आणि नास्तिक हे भाग बाजूला पडतात. ब्राह्मणांनी पूजा पाठच करावा असे ज्यांना वाटते त्या लोकांच्या मते ब्राह्मणाने चप्पलचे दुकान टाकलं तर धर्म बुडवला असे असते. परंतु हिंदू धर्माची बैठक ही कितीतरी प्रगल्भ आहे मात्र कोणताही अभ्यास न करता आपण बरंच काही बरळत असतो किंवा आपण विज्ञानवादी आहोत याची फुशारकी मिरवताना हिंदू धर्माच्या प्रथा परंपरांवरती ओरखडे मारून प्रसिद्धी घेण्यात त्यांना धन्य वाटते. कुणाला काय वाटते याचा विचार करत बसण्यापेक्षा मंदिरांची काय आवश्यकता आहे याच्यावरती आपण प्रकाश टाकताना मला माझ्या जीवनात माझ्या शेजारी असलेल्या मंदिराचा किती प्रभाव आहे हेच मी विशद केले तरी याचे उत्तर मिळू शकते.
( त्या मंदिराला 98 वर्षे पूर्ण झाली.)
माझ्या शिशु वयात चार भिंतींच्या बाहेरचा पहिला कुठला आवाज ऐकला असेल तर माझ्या घरालाच लागून असलेल्या श्री हनुमान मंदिरात होणारा घंटा नाद. त्या काळात पायवाटांशिवाय दळणवळणाचा अन्य मार्ग नव्हता. बैलगाड्या सुद्धा दिवाळीची भात कापणी झाल्यानंतर सुरू व्हायच्या आणि वाळवा च पाऊस सुरू होताच बंद व्हायच्या. श्री हनुमान मंदिराच्या अंगणातूनच भांबेड पाचलला सांधणारी पायवाट असल्याने या वाटेने या दोन ठिकाणांच्या आसपासच्या अनेक गावातील लोक येणे जाणे करायचे. तसेच देवळाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीवर साकव असल्याने पावसाळ्यात सुद्धा याच वाटेचा उपयोग केला जायचा.नदीच्या पलीकडे सुतार वस्ती असल्याने व प्रत्येक सुताराच्या स्वतंत्र शाळा असल्याने पावसाळ्यात त्यांच्याकडे रिंगणे कोंडगे कुरंग या परिसरातले शेतकरी नांगर दुरुस्तीसाठी या साकवा वरून जात असत. आजच्या पेक्षा त्या काळातली मंडळी जास्त श्रद्धाळू व भाविक असल्याने जाता येता मंदिराच्या दारात चप्पल बाजूला काढून मंदिरात घंटी वाजवून मारुतीरायाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नसे. त्यामुळे दिवसातून अनेक वेळा तो घंटेचा सुमधुर आवाज ऐकल्याने मला चांगले ऐकण्याची सवय झाली. मी मंदिरात जाऊ लागल्यानंतर मोठी माणसे जशी सहजपणे घंटा नाद करतात तसा आपल्यालाही जमायला हवा ही रिक मनात निर्माण झाली. हळूहळू वय वाढत गेले उंची वाढत गेली आणि कधीतरी मी देवळाची घंटी स्वत:च वाजवून देवाला साष्टांग नमस्कार करण्याचा आनंद घेतला.पुढे तर संध्याकाळच्या दिवे लावण्याच्या वेळेला देवळातला दिवा लावून आरती म्हणण्याचा आनंदही घेऊ लागलो. आरती म्हणण्याच्या तालांबरोबरच घंटी वाजवण्याचा ही ताल मला येऊ लागला त्याला कारण सुद्धा या देवळात होणाऱ्या भजनातील टाळांचा ताल, चकव्याचा ताल, मृदुंगाचा ताल आणि टाळीचा ही ताल मला समजला होता.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला पायी वारीने जाणारी वारकरी मंडळी देवळात थांबत तिथे अभंग म्हणत आणि त्यानंतर देवळात जमलेले लोक त्या जाणाऱ्या लोकांच्या पाया पडत आणि जाणारे वारकरी लोक सुद्धा निरोप द्यायला आलेल्या लोकांच्या पाया पडत हा विनम्र भाव मला देवळातच समजून आला. मला समजायला लागल्यानंतर ही वारकरी मंडळी वाटूळ आणि तीवरे या गावातून आलेली असे हे कळले. ती पायी वारी याच मार्गाने आजही सुरू आहे.
मी पंधरा सोळा वर्षाचा असताना आमच्या गावात हरिनाम सप्ताहाची सुरुवात होऊन वारकरी कीर्तन व प्रवचनाची परंपरा सुरू झाली. मात्र पहिले कीर्तन मला श्री. हनुमान मंदिरातच अनुभवता आले. संत गाडगे महाराजांचे शिष्य गावोगावी फिरून कीर्तने करत असत असेच त्यांचे एक शिष्य माझ्या लहानपणी आमच्या या मंदिरात आले. वाडीतील लोकांना त्यांनी गोळा करून आपण प्रवचन आणि भजन करीत फिरत असल्याचे सांगितले. मग आपल्या मंदिरात आहे त्यांची दोन दिवस प्रवचन आणि रात्री कीर्तन झाले. " गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला " हे म्हणताना ते तल्लीन झालेले संत तुकाराम महाराजांच्या पेहरावातले बुवा आजही माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात.
देवळाच्या उजव्या बाजूला नदीच्या काठावर आमची प्राथमिक शाळा होती. तीस फूट लांब आणि दहा फूट रुंद अशा दगडी मातीच्या भिंती असलेली वरती कौलारू छप्पर असलेली दोन दरवाजे व चार खिडक्या असलेली इमारत होती. या शाळेत जवळजवळ १४ वर्षे फापे गुरुजी कार्यरत होते. श्री.शिवराम श्रीपत फापे असे त्यांचे नाव असून ते आडवली गावचे रहिवासी होते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ते शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवायचे. शारदोत्सव आणि वनभोजन हे आठवणीत राहिलेले उपक्रम आहेत. शारदोत्सवाची महिनाभर तयारी केली जायची. मी तिसरीत असताना मला रंग पासून स्टेजवर नाचण्याचा आत्मविश्वास त्यांनी मिळवून दिला. शारदोत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रम देवळातच व्हायचा. . देवळाच्या पडवीच्या भागात पाठीमागे स्थिर पडदा व पुढे उघडणारा पडदा असा तो रंगमंच असे. पावसाची चिन्ह असतील तर प्रेक्षक देवळात बसायचे. पाऊस येणार नाही अशी खात्री असेल तर उजव्या बाजूच्या पडवीत रंगमंच करून शाळेच्या पटांगणात प्रेक्षक बसायचे.'जय जय रघुवीर समर्थ' ही एकांकिका मी माझ्या आयुष्यात प्रथम पाहिली. जयराज पेडणेकर प्रकाश पेडणेकर रमेश पेडणेकर दत्ताराम सरफरे विजय लाड मंगेश पेडणेकर ही त्यावेळी आमच्यापेक्षा चार-पाच वर्षाने पुढे असलेल्या मुलांनी ही नाटिका सादर केली होती. चार फुटाच्या आंब्याच्या डहाळी वरून मधून एका पात्राने उडी मारून प्रेक्षकांच्या टाळ्या घेतलेल्या आजही माझ्या स्मरणात आहे. याच मंदिरातल्या रंगमंचावर महारथी कर्ण हे नाटिका सादर झाली त्यामध्ये अशोक सरफरे , पंढरीनाथ लाड, अनंत पेडणेकर, सदानंद पेडणेकर, यांच्याबरोबर मलाही श्रीकृष्णाची भूमिका करण्याची संधी मिळाली. आम्हा लहान मुलांचं कौतुक करायला आमच्या पेडणेकर वाडी बरोबरच, सुतारवाडी आणि कोंडग्यातील बारस्करवाडीतील लोकही जमा व्हायचे. कारण या शाळेत तिथलीही मुलं मोठ्या संख्येने होती.
याच मंदिरात माझ्या जन्माच्या अगोदर पासून सुतारांची गणपतीची शाळा होती. नारायण मेस्त्री ज्याला आम्ही जीजी म्हणत असू. ते आणि त्यांचे भाऊ मिळवून देवळात गणपती मूर्ती बनवण्याचे काम करीत असत. आम्ही जसजसे मोठे होत गेलो तसतसे गणपती मूर्तीच्या बाबतीत कधी मूर्तीला पाण्याने तुकतुकीत पण आणणे, माती म्हणून देणे, मातीचे गोळे करणे, रंगकामात प्रथम डोंगा देणे, नंतर महिरप रंगवणे अशी कामे करता करता मी स्वतःच मूर्ती बनवायला शिकलो. आठवी आणि नववी मध्ये शिकताना आमच्या घरच्या गणपतीची मूर्ती मी स्वतःच या शाळेत करू शकलो. याबद्दल मी नारायण जीजी आणि त्याचबरोबर मंदिराचाही ऋणी आहे.
गावातले हे धनी केदार लिंगाचे एक ग्रामदेऊळ सोडल्यास सार्वजनिक देऊळ हे हनुमान मंदिरच होते. त्यामुळे त्याकाळी विकास सोसायटीच्या सभा या हनुमान मंदिरातच व्हायच्या. रिंगणे हायस्कूल उभारणीच्या काळात पंचक्रोशीतल्या लोकांच्या अनेक सभा झाल्या त्यापैकी बऱ्याच सभा श्री हनुमान मंदिरात झाल्या कारण पंचक्रोशीत मध्यवर्ती ठिकाण म्हणून श्री हनुमान मंदिर एकमेव होते. रिंगणे हायस्कूल मधून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापनेची पहिली सभा ही श्री हनुमान मंदिरातच झाले त्या सभेला ढेकळे सर, एस.टी. पाटील सर, डावरे सर मार्गदर्शक होते. अनेक माजी विद्यार्थी या सभेला उपस्थित होते. या सभेचे निमंत्रक म्हणून मी स्वतः व प्रदीप अपंडकर होते. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची निधन झाल्यानंतर त्याच्याप्रती सार्वजनिक शोक प्रकट करण्याची सभा कशी असते याचा आदर्श पाठ याच मंदिरानत स्व. शिवराम सक्राजी पेडणेकर यांच्या शोक सभेमुळे पाहायला मिळाला.
श्री हनुमान मंदिरात दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठ्या स्वरूपात हनुमान जन्मोत्सव साजरा होतो. त्या काळातली पाऊस सुरू होण्यापूर्वीची आणि वर्षभरातली शेवटची जत्रा म्हणून हनुमान उत्सवाकडे पाहिले जायचे. त्यामुळे या जत्रेला मोठी गर्दी असायची. उत्सवाच्या दिवशी ऐतिहासिक किंवा सामाजिक नाटक सादर व्हायचे. वाहतो हे दुर्वांची जोडी, एकच प्याला, दलितांचे तिमिर जावो, अश्रुंची झाली फुले अरे अशी दर्जेदार नाटके या उत्सवात आम्हाला बघायला मिळाली. नाटकांच्या तालमी बघायला मिळाल्या. आणि मोठेपणी आम्हालाही या रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः त्या काळात पुरुषांना स्रीपात्र करावे लागायचे. माझ्यामते वारणेचा वाघ या नाटकात मी केलेली स्त्रीपात्र हे शेवटचे पुरुषस्त्रीपात्र असावे. देवाच्या आवारातच दुकाने थाटली जायची. त्यामध्ये दोन-चार कासारांची दुकान असंत. बांगड्या भरायला स्त्रियांची मोठी गर्दी होत असे. जत्रेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुकानांच्या जवळ तुटलेल्या बांगड्यांचा खच पडलेला असे. आम्ही लहानपणी सकाळी लवकर उठून त्या तुटलेल्या बांगड्या गोळा करीत आणि पुढे महिनाभर त्या बांगड्याना टेंब्याच्या ज्योतीवर गरम करून त्या वाकवून त्यांच्या माळा करण्याचा खेळ खेळत असू.
या मंदिरात वर्षभर वेगवेगळे सण साजरे केले जातात. गोकुळाष्टमीचा मांड येथे भरला जातो. रात्री भजन आणि फुगड्या खेळल्या जातात. दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. हरितालिकेचा मांड, ऋषीपंचमीचा मांड पूजला जातो. दसऱ्याचे सोने लुटणे, तुळशी विवाह अशा सणांमुळे आपली हिंदू संस्कृतीचे पालन करण्याचे ज्ञान हे मंदिरातूनच मिळत असते.
ज्या काळात शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन होते. वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस शेतकरी कष्टात डुंबलेला असे. करमणुकीची अन्य काही साधने नव्हती अशा काळात मंदिर हेच त्याचे विश्रांतीचे, करमणुकीचे स्थान होते. आजच्या काळात मंदिरांची आवश्यकता नाकारता येत नसली तरी गावचा विकास हा अग्रक्रमाने व्हायला हवा. वीज, पाणी, रस्ते, दवाखाना आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाची व्यवस्था या सोयी झाल्यानंतर गावातल्या गावात रोजगार कसा निर्माण होईल याबाबत विचार करणे गरजेचे आहे. जेव्हा गाव स्वयंपूर्ण होईल त्याच वेळेला गावच्या देवाचं महत्त्व अधिक अधोरेखित होईल.
मी ज्या मंदिराच्या सावलीत वाढलो हे त्या मंदिरातून मला बरंच काही शिकायला मिळालं. असेच अनुभव आपले अनेकांचे असू शकतात मग मंदिरे उदंड झाली असे म्हणून हिंदू धर्मावरती आग पाखड करण्याचे कुणालाही कारण नाही. मंदिरे केवळ धार्मिक कार्यक्रम करत नसून त्यातून सामाजिक प्रबोधनाचे मोठे कार्य साधले जाते हे विसरून चालणार नाही.
म्हणूनच आम्ही म्हणतो ' होऊ द्या मंदिरे उदंड '.
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
🚩🍁🚩🍁🚩🍁🚩🍁🚩🍁
अभिप्राय _
१)
सर, आपल्या मंदिराची सविस्तर माहिती वाचली. खूप छान. सद्य पिढीतील समाजाला उपयुक्त, प्रेरणादाई. धन्यवाद !
चंद्रकांत दादा खामकर, आरगाव 🙏🙏
२)
श्री. लाडसर,
नमस्कार.
आपला 'हनुमान मंदीरा'वरचा लेख वाचला.
आवडला. किती बारीक सारीक तपशिलासह सुमारे पन्नासएक वर्षांपूर्वीच्या आपल्या खेड्यात गेलेल्या लहानपणातील व मंदीराशी संबंधित आठवणी आपण लिहिल्या आहेत त्या वाचून सानंद आश्चर्यचकित झालो : सानंद कारण ते जीवन माझ्याही अतिप्रिय कोकणच्या खेड्यातील जीवनाच्या आहेत.
इतके फिरता, इतके संपर्क व त्यासाठी वेळ देणं यातून लिहायला वेळ काढता कूठून? ईश्वर देत असेल तर आमच्या 24 तासातले थोडे द्यायची तयारी आहे!
लाडसर, आपल्याला कधी रक्ततपासणी करावी ( लागू नये पण ) लागलीच तर विज्ञानाची गोची अशी होईल की त्यात कोकण माती-प्रेमाशिवाय कोणताच घटक मिळणार नाही !
अनंत शुभेच्छा.
राजा देसाई
17.6.'25
देव माना या नका मानू परन्तु या मंदिरातील देवाकडून भले ती मृर्ती असेल पुर्व जात चालत आलेले संस्कार घेतले पाहिजेत तेच आपल्या पीढी कडून उद्याच्या पीढी साठी मार्गदर्शक ठरतील. चार बुख म्हणजे पुस्तक शिकलेकी नास्तिक होता येत पण आपल देह नियंत्रण कस होते ते सांगताना बोबडी वळते . अर्धवट ज्ञानानचे राजे निरुत्तर होतात . मंदिरात भले दगडाची मूर्ती असेल त्या मध्ये पवित्र अस्तित्व श्रद्धा आणि धर्म संस्कृती आहे. इतर समाज धर्माच्या अपमान झाला तर मित्र शत्रूत्व विसरुन हल्ला करण्यास एकजूट होतात. आपण आपल्याच बंधू भगिनींचे पिय खेचण्यासाठी उभे राहतात. हा फरक आहे. आपला जन्म झाला तेव्हा आपण दगड मातीचे गोळे होतो. धर्मानी संस्कृतीने आपल्या जन्म दात्यांनी भले अशिक्षीत असतील पण अनुभवाची पुस्तके शिकले होते. म्हणून आज आपण प्रगत आहोत शिक्षण जेवढे महत्वाचे तसे संस्काराचे मंदिर महत्वाचे आहे. आपण आजही दक्षिण उत्तर भागात धर्म संस्कृती जीवंत राहण्यासाठी हिंदू धर्म संस्कृती हजार बाराशे वर्षां पूर्वीची मंदिर पाहिल्यावर आपण आज किती आदिवासी आहोत याची कल्पना येईल. छत्रपती महाराजांनीही वास्तू किल्ले, मंदिर बांधली. त्या काळात दळणवळण यंत्रणा कशी नियंत्रित केली असेल. आज आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जोरावर बरच काही बरळतो. हे शोधाचे फलश्रूत बियान या पुर्वज्यांनी लावले आहे आपण त्या वर फुशारकी मारत आहोत. शिक्षणाने आणि संस्कृतीने एकत्रित चाललेतर आपली आणि जगाची धर्म समिजाची प्रगती होते हे विसरता कामा नये. मी कोणी तत्ववेत्ता नसून मला सद् विवेक बुद्धीने दिलेला संस्कार आहे.
ReplyDeleteसुरेश गे डुंबरे सरांकडून दि.१४-०६-२०२५