छपाईच्या कामाच्या निमित्ताने वरचेवर मला ठाण्याला जावे लागते. ठाण्यातील कोठावळे प्रेसच्या जवळच सुहास खामकरांचे घर असल्यामुळे दुपारच्या वेळी बऱ्याचदा विश्रांतीसाठी त्यांच्या घरी जात असतो. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांतदादा खामकर यांचे हे कनिष्ठ बंधू. यांना सुद्धा सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये ठाणे विभागाचे हे काम सांभाळतात. एक दिवस सुहास खामकर म्हणाले," दादा मुंबईला आले आहेत, काल तुमची त्यांनी आठवण काढली होती."
"अरे व्वा, भेटूया आपण त्यांना. तशी बरेच दिवस आमची भेट झालेली नाही."
तिथून पाच मिनिटांवर दादा राहतात हे सांगितल्यामुळे आपण त्यांना भेटायला जाऊ या असा मी म्हणालो आणि निघालोही त्यांना भेटायला. दादांच्या घरी जाणे म्हणजे आदर सत्काराच्या एका पर्वणीस सामोरे जायचे असते हे गावाकडच्या अनेक भेटीतून मी अनुभवले होते. मुंबईत त्यांना मी आज प्रथमच त्यांच्या घरी भेटत होतो. त्यांच्या शिरस्त्या प्रमाणे दादांनी आमचे स्वागत केले. आपल्या घरच्या माणसांची ओळख करून दिली. आपल्या छोट्याशा गोंडस नातवाची ओळख करताना " हा रेयांश ,आता तो स्विमिंग पूल ला चाललेला आहे. त्याला पुढच्या आठवड्यात थायलंड स्पर्धेसाठी जायचं असल्याने त्याची जोरदार तयारी चालली आहे."असे सांगितले.
सहाव्या वर्षातला रेयांश जिल्हा नवे राज्य नव्हे तर देश ओलांडून तो परदेशात चाललेला आहे. पोहण्याच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी. भारताचे प्रतिनिधित्व तोच करणार होता हे ऐकून मी तर अवाक झालो. माझ्या डोळ्यांसमोर सातवी आठवीपर्यंतच्या मुलांचं दप्तर आपल्या पाठीवर घेऊन शाळेपर्यंत जाणारे पालक दिसू लागले. आपल्या मुलाला कोणताही त्रास होऊ नये याची आपण अनावश्यक काळजी घेत असल्याचं कौतुक दाखवणारे पालक एकीकडे आणि दुसरीकडे अथांग समुद्रात एक छोटासा मुलगा मोठ्या हिंमतीने आणि आत्मविश्वासाने एकटाच पोहतो आहे आणि दूर काठावर आपला मुलगा समुद्राला कवेत घेऊन सुखरूपपणे किनाऱ्यावरती येणार आहे असा दुर्दम्य आत्मविश्वास असलेले पालक किनाऱ्यावर त्याची वाट पाहत उभे असलेले मला दिसले. निरागस वयातल्या रेयांशचे मी भरभरून कौतुक केलेच त्याचबरोबर छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या जिजाबाईचं काळीज घेऊन जन्मास आलेल्या रेयांशच्या आई-वडिलांना मी सलाम केला. मुलं रांगू लागतात तेव्हा तो डावा आहे की उजवा आहे हे जसे कळून येते तसेच त्याला काय खेळायला आवडते हे सुद्धा लक्षात येते. मुलांच्या आवडीच्या क्षेत्राप्रमाणे त्यांना तशा अनुभूती निर्माण करून देणे, संधी निर्माण करून देणे हे तर खरे पालकांचे कर्तव्य आहे मात्र आजकालचे पालक स्वतःची स्वप्न मुलांच्यावर लादताना ' मला या मुलाला डॉक्टर करायचे आहे, मला या मुलाला इंजिनियर करायचे आहे' असे स्वतःच ठरवतात आणि त्याप्रमाणेच त्याला वाढवतात. तसे पाहिले तर पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त एखाद्या कलेत आपल्या मुलाला पारंगत करावे असे कुणाला वाटत नाही. ज्या क्षेत्रातून पैसा मिळेल तेच क्षेत्र आपल्या मुलांनी निवडावे असा पालकांचा हट्ट असतो. म्हणूनच ऑलिंपिक सारख्या क्षेत्रात लोकसंख्येने मोठा असलेला भारत देश पिछाडीवर असलेला दिसतो. रेयांशच्या पालकांनी लहानग्या रेयांशला टबातल्या पाण्यात रमताना पाहून, त्याची पाण्याशी असलेली दोस्ती पाहून त्याला त्याचे क्षेत्र मिळवून दिले. ठाण्यातल्या तरण तलावावर त्याने अधीराज्य प्रस्थापित केले. रेयांशने अल्पावधीतच छोट्या छोट्या स्पर्धा पार करत राष्ट्रीय पातळीवरचा सर्वात कमी वयाचा जलतरणपटू म्हणून स्वत:चे नाव नोंदवले ही केवढी अभिमानाची गोष्ट आहे. थायलंडच्या तयारीसाठी रेयांशला भरपूर सरावा करावा लागत असल्याने त्याचे वडील त्याला घेऊन गेले. माझ्या समोरून मात्र एक योद्धा पुढच्या युद्धाच्या सरावासाठी जातोय असा भास झाला.
थायलंडमध्ये सहा वर्षीय रेयांशने भारताचा तिरंगा फडकवला.आता त्याला मोठ्या मैदानातील लढाईचा अनुभव घ्यायचा होता. ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलावात स्टार फिश ( फाउंडेशन) स्विमिंग क्लब कडून रेयांश सराव करीत असतो. जलतरणपटू कैलास आखाडे हे त्याचे मार्गदर्शक आहेत. वयाच्या सातव्या वर्षात पदार्पण करताना त्यांनी रेयांशला अरबी समुद्रात उतरण्यासाठी त्याच्यात निर्माण केलेला आत्मविश्वास कौतुकास्पद आहे.नुकताच पंधरा किमीच्या पोहण्याच्या शर्यतीत त्यांने भाग घेतला. सिंधुदुर्गातल्या विजयदुर्ग सागरी किल्ल्याच्या किनाऱ्यावरील खोल समुद्रात आयोजित केलेल्या या स्पर्धेत छोट्या रेयांशने सहजच अरबी सागराला कवेत घेतले.हे अंतर त्यांने तीन तास दहा मिनिटात पार करुन तो प्रथम आला.सुवर्णपदक मिळवून आणखी एक मानाचा तुरा त्याने आपल्या शिरपेच्यात खोवला. त्याच्या या पराक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
( विशाल समुद्रात स्वतःला झोकून देऊन सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला जलतरणपटू रेयांशचा फोटो)त्याच्या या कामगिरीचे कौतुक स्थानिक वर्तमानपत्रानी भरभरून केले. त्या बातमीत त्याचा उल्लेख करताना लांजा तालुक्यातील आरगावचा सुपुत्र रेयांश असे लिहिल्याने कोकण भूमीचा अभिमान असलेल्या प्रत्येकाचा ऊर भरून आला. सर्वांनी त्याचे भरभरून कौतुक केले. सह्याद्रीच्या पायथ्याजवळ असलेल्या आरगावचे नाव यापुढेही भारताच्या नकाशात अधिक ठळकपणे दिसेल अशी कामगिरी रेयांश कडून होईल याची खात्री वाटते.
( गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निवृत्तीवेतनातील पैसा खर्च करणारे थोर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा खामकर आपल्या नातवाच्या पराक्रमाने प्रफुल्लित झालेले )
रेयांशचे आजोबा श्री चंद्रकांत दादा खामकर हे राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे एक सक्रिय ज्येष्ठ सदस्य आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा राजापूर आणि लांजा तालुक्यामध्ये नावलौकिक आहे. गाव खेड्यातल्या गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते उचलत असतात. आपल्या निवृत्तीच्या वेतनातील अर्धा अधिक भाग लोकोउपयोगी कामासाठी वापरणारा असा सामाजिक कार्यकर्ता दुर्मिळ आहे. संघाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये योगदान देणारे दादा खामकर येथील ग्रामस्थांची सरकारी कचेऱ्यातील कामे करण्यासाठी, सरकारी योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी स्वतःची पदरमोड करून मदत करीत असतात. त्याच संस्कारात वाढलेले त्यांचे कुटुंबीय सुद्धा सेवाभावी वृत्तीने जगत असतात. त्यांचा मुलगा दीपक आणि सून सानिका उच्च विद्या विभूषित असून आपल्या पाल्याला कोणत्या प्रकारचे संस्कार द्यावेत याचा आदर्श त्यांनी रेयांशच्य माध्यमातून जगासमोर ठेवला आहे. मुलांना शालेय शिक्षण देणे आवश्यकच आहे मात्र त्याचबरोबर मुलांच्या अंगी एखादी कला असेल तर त्यांचं जगणं अधिक समृद्ध होऊ शकेल. जगण्यातला आनंद अधिक मोठा असेल. छोट्या रेयांश बरोबर त्याचे पालक सुद्धा समाजासाठी आदर्श आहेत. रेयांशने आपल्याबरोबर आपल्या गावाचे, देशाचे नाव रोशन करावे यासाठी मनापासून शुभेच्छा !
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
अभिप्राय -------------------💐💐💐💐💐💐💐💐💐💐-💐💐-💐💐
१)🙏श्री.चंद्रकांतदादा खामकर यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम.चि.रेयांशचे कौतुक करावे तेवढे थोडेच.त्याच्या ध्वजाची उंच पताका अशीच फडकत राहो.ही मनापासून शुभेच्छा.💐
सुप्रिया मोरे,गुहागर, मुंबई
२)पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. रेयांश गर्व आहे, तू असलेल्या आरगांवचा, अभिनंदन💐💐💐💐👍👍👍👍
भिकाजी स.पेडणेकर, रिंगणे, मुंबई
३)रेयांशचे मनापासून अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा.💐💐💐
रमेश तुपे, नाशिक
४)छोट्या पण निडर रेयांश ला लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
तसेच त्याच्या माता - पित्याना सलाम ! 🙏
अं.ना.रसनकुटे,विरार
५)मोठी झेप घेतली आहे अभिनंदन ! आईवडिलांचे पण खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
आशा सुरेश हांडे, जुन्नर, मुंबई
६)रेयांश व माता पिता...गुरू यांचे...अभिनंदन....!🚩🙏🛕🌹
धैर्यधर पाटील,पेण, मुंबई
७)सर, आपण शोधक पत्रकार आहात, आपणा कडून आम्हास आपल्याच परिसरातील विविध विषयाचे व होतकरू लोकांची ओळख मिळते. धन्यवाद. 🙏🙏
विनोद साळुंके,कोर्ले, मुंबई
८)छोटा पण मोठा जलतरणपटू रेयांश , त्याचे बाबा दीपक, आई सानिका, आजोबा चंद्रकांत व संपूर्ण खामकर कुटुंब यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छाही!
जय कोकण!जय महाराष्ट्र! जय भारत! जय तिरंगा!
- पुष्पा कोल्हे, जळगाव, मुंबई
९)खूपच लहान वयात चमकदार कामगिरी करतोय. भविष्यात आॅलिम्पिक मध्ये भारताचे नाव नक्कीच गाजवेल.
खूप खूप शुभेच्छा! खरंच पालक म्हणून मुलांमधील गुण हेरून योग्य मार्गदर्शन योग्य वेळी झाले तर ते मूल चमकदार कामगिरी नक्की करू शकतं याचं रेयांश उत्तम उदाहरण आहे.
रेयांशला खूप खूप शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा!🌹🌹🌹🌹👍👏👏👏🍫
स्नेहल आयरे, रिंगणे, मुंबई
१०)खूप प्रेरणादायक
रेयांशच खूप खूप अभिनंदन💐✨
विनय गुणे, रत्नागिरी
११)हार्दिक अभिनंदन पुढील वाट चालीस शुभेच्छा 💐💐👌👌
अशोक भोसले, सातारा
चंद्रकांत दादा आपल्या नातवाच कौतुक आणि अभिनंदन!
ReplyDeleteछोट्या रेयांश चे अभिनंदन...
ReplyDeleteआपल्याकडून फार महत्वाची माहिती मिळते...