Thursday, February 20, 2025

माझी दिल्ली वारी !

        कोकणातल्या माणसाला मुंबईचं आकर्षण फार म्हणूनच गावातल्या शाळेत शिकता शिकताच मुंबईला जाऊन आपण काहीतरी करणार अशा प्रकारची स्वप्न तो बघू लागतो. कोकणातील पारंपारिक शेती करून कुटुंबातल्या चार माणसांचं पोट भरणं आहे मुश्किल असतं, त्यातून  तिथे राहून वेगळं काही स्वप्न बघणं हे धारिष्ट्याचं काम असतं. आजकाल काही तरुण मंडळी गावात राहून पारंपारिक शेतीला परिवर्तित करण्याचा प्रयत्न करीत आहे हा एक मोठा आशावाद आहे. मी गावाकडे करावी पर्यंत शिक्षण घेऊन मुंबईत आलो आणि मुंबईकर झालो. पण गावाकडची ओढ काही कमी झाली नाही. सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ गावाकडे राहण्याचा बेत तडीस गेला नाही तरीही सामाजिक कार्याची आवड असल्याने आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा अनेक सक्रिय कार्यकर्त्यांमुळे विविध उपक्रमामुळे माझे गावात जाणे इतके झाले आहे की बरेच लोक मला मुंबईत पाहिल्यानंतर गावाकडून कधी आलात ? असेच विचारतात. किंवा मुंबईत किती दिवसासाठी आला आहात असेही विचारतात.असो. जसे कोकणातल्या माणसाला मुंबईचं आकर्षण तसं मुंबईतल्या माणसाला देशाची राजधानी म्हणून दिल्लीचं आकर्षण असतंच असतं. शिरोडकर अध्यापक विद्यालय दुसऱ्या वर्षाला असताना आमची सहल दिल्लीसाठी आयोजित केली होती.आज मी दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीला जाण्यासाठी मुंबई सेंट्रल या स्थानकांवरील एक नंबर फलाटावर आलो आणि मला १९८२ सालातल्या पहिल्या दिल्ली वारीची आठवण झाली.माझ्यासोबत असलेल्या विजय हटकर यांना मी ती आठवण सांगितली आणि एक छायाचित्र काढून घेतले.
(माझे मोठे बंधू विजय लाड,नंदा कॅटरर्सचे मालक.)

          पंचेचाळीस वर्ष लोटून गेली. त्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. ती दिल्ली वारी माझा मोठा बंधू विजय याच्यामुळेच शक्य झाली होती. अर्थात त्यानेच मला मुंबईमध्ये आणून शिकवण्याचे काम केले त्याचबरोबर माझ्या अनेक हौशी मौशी पुरवल्या. माझी मोठी बहीण अरुणा सावंत हिने आपल्या घरी ठेवून घेतल्याने आपण मुंबईत बेघर आहोत असे कधी वाटले नाही. तिच्या विक्रोळीच्या घरी पाच वर्षाच्या कालावधी मला माझ्या घरीच असल्यासारखे वाटले त्यामुळे मला माझे स्वच्छंदी जीवन जगता आले.
          माझा भाऊ एका इंजिनियर कंपनीत कामाला होता. त्याचा पगार तीनशे रुपये होता.तर माझी खानावळ तीनशे रुपये होती. मग त्याची खानावळ आणि इतर खर्च यासाठी तो आपल्या मोकळ्या वेळेत वेगवेगळे व्यवसाय करायचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून बाकी सारा खर्च करायचा. कॉलेज कडून दिल्ली आग्रा सहल काढण्याचे निश्चित झाले आणि सर्वांनी आपापले पैसे जमा करायला सुरुवात केली. मी त्यावेळी कॉलेजचा मॉनिटर होतो आणि मी पैसे भरलेले नाही हे शिरोडकर सरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला बोलावून घेतले आणि मला लवकरात लवकर पैसे भरण्यासाठी सांगितले.
      तिनशे रुपये म्हणजे  त्याकाळी केवढी मोठी रक्कम होती. मी संकोचानेच भावाशी बोललो. तोही थोडा चिंतित झाला. प्रयत्न करूया म्हणाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने आमच्या  जवळच्या आणि एवढी रक्कम देऊ शकतील अशा नातेवाईकांशी बोलणे केले. पण त्यांच्याकडून नकार आला.तेव्हा आपल्या नातेवाईकांची एकत्र बैठक घेऊन वर्गणी काढण्याची सूचना त्यांनी केली. मी असे करण्यास नकार दिला. आपल्या परिस्थितीचे असे प्रदर्शन मांडणं मला नको होतं. त्यापेक्षा आपण सहलीला न जाण्याचे निश्चित केले असल्याचे मी बावाला सांगितले. मी तसे कॉलेजलाही कळवले.पण दोन दिवसांनी बावाने माझ्या हातात तिनशे रुपये दिले.आपण आपल्या कंपनीतून आगाऊ उचल म्हणून घेतल्याचे  सांगितले.तेव्हा मला फार आनंद झाला. मी कधी कॉलेजला जातो आणि ही गोष्ट माझ्या मित्रमंडळीला सांगतो असे मला झाले होते.
( अष्टपैलू शिक्षक घडवणारे हेच ते क्षा.म. स.अध्यापक विद्यालय परेल)
        आज मी दिल्लीला निघत असताना माझ्या पत्नीने माझ्या प्रवासासाठी काय काय आवश्यक होतं ते सगळं भरून माझ्या प्रवासाची तयारी केली होती. त्यावेळी कॉलेजच्या प्राध्यापकांनी आपल्याला सोबत काय काय बरोबर घ्यायचे आहे याची यादी दिली होती त्या यादीप्रमाणे माझ्या भावाने आणि बहिणीने ही सर्व तयारी करून मला दिली होती. माझ्या सोबतच्या मित्रमंडळीची फार काही श्रीमंतीची परिस्थिती नव्हती परंतु माझ्यापेक्षा चांगली होती. कोकणातून आलेला दादू पाताडे हा सुद्धा आपल्या काकांकडे आलेला असल्याने आणि तो विक्रोळी पार्क साईटला राहत असल्याने आम्ही मित्र झालो होतो. घाटकोपरच्या सीजीएस कॉलनी मध्ये राहणारा महेंद्र पवार  त्यांचे वडील माजी सैनिक असल्याने त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती तसेच त्याचे बालपण मुंबईत गेले असल्याने आमच्यातला अधिक समजदार होता त्याच्याकडे एक बॉक्स कॅमेरा होता.त्या कॅमेऱ्यात रिळ टाकावी लागे. २४ किंवा ३६ फोटो काढण्याची त्याच्यामध्ये क्षमता असे. फोटो क्लिक केला की ती रिळ फिरवावी लागे. किती फोटो काढले हे लक्षात ठेवल्याशिवाय रिळ किती शिल्लक आहे हे समजत नसे.त्यामुळे तो फोटो काढताना कुणाच्या हातात कॅमेरा देत नसे मात्र कुतुबमिनारचा फोटो काढताना कुतबमिनार या कॅमेरात बसत नाही असं तो म्हणत होता. मी त्याच्याकडे कॅमेरा मागितला फोटो बसतो किंवा नाही हे मी पाहून घेतो असं म्हटल्यानंतर त्यांनी मला कॅमेरा दिला.मी तो कॅमेरा सरळ न  धरता थोडा तिरका धरून त्यामध्ये कुतुबमिनार बसवला आणि फोटो क्लिक केला. आणि तोच फोटो बऱ्यापैकी आला होता.मी नंतरच्या आयुष्यात अनेक कॅमेरे घेतले. अनेकांच्या समारंभात फोटो काढले, अनेकांच्या लग्नाचे फोटो काढले. मात्र पहिला फोटो काढण्याचा आनंद मी माझ्या पहिल्या दिल्लीवारीत कुतुबमिनार चा फोटो काढून घेतला तो माझा मित्र महेंद्र पवारच्या कॅमेऱ्यामुळे. माझ्या पहिल्या दिल्लीवरीत कुतुबमिनार, ताजमहाल, सिक्री, लोटस मंदिर, लाल किल्ला अशी अनेक प्रेक्षनीय स्थळे आम्ही पाहिली. एके रात्री मिलन  हा चित्रपट सुद्धा दाखवण्यात आला. मध्येच वीज गेली होती.मी मात्र पहिल्याच पाच दहा मिनिटात झोपून गेलो.तो चित्रपट संपल्यानंतर मला मित्रांनी उठवले. आम्ही तेव्हा हिंदू महासभेच्या धर्मशाळेत उतरलो होतो. 

( १९८२ च्या दिल्ली वारीचे विद्यार्थी )
         शिरोडकर कॉलेजच्या त्या दोन वर्षात मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले, शिबिरे केली आणि अनेक जण एकमेकांच्या जवळ आलो तसेच सगळेच एकमेकांचे मित्र बनले. पण आमचा एक स्वतंत्र ग्रुप बनला त्यामध्ये दादू पाताडे, महेंद्र पवार, शैला घाडगे, वनिता कुऱ्हाडे , रजनी घोसाळकर, प्रदीप शेंबेकर, रमेश तुपे,आडिवरेकर,उषा चव्हाण, वाघमोडे, नार्वेकर ही मंडळी त्यात होती.पुढे एकमेकांच्या भेटीगाठी घेत राहिलो. या दिल्ली वारीमध्ये शैला घाडगेला सहलीचा पुरेसाआनंद लुटता आला नाही. दिल्लीला जाताना तिला एलर्जीचा त्रास झाला. त्याबद्दल तेव्हा आम्हाला वाईट वाटायचे.आज कधी आम्ही भेटतो तेव्हा तो विषय मस्करीत नेत असतो.
बसलेल्या रांगेत उजवीकडून चौथा मी आहे. उभ्या रांगेत डावीकडून प्रथम दिसतोय तो स्व. महेंद्र पवार
           त्यानंतर मी अनेक वेळा दिल्लीला गेलो. विशेषत: प्राचार्य एम.पी.पिल्लई यांच्यासोबत दोन वेळा राष्ट्रभाषा हिंदी परिषदेच्या अधिवेशनाच्या  निमित्ताने गेलो.तेव्हा तीच पर्यटन स्थळे पुन्हा पाहण्याची संधी मिळाली. आज मात्र मी पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जात नसून आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला आयोजित केले गेल्याने एक मराठी प्रेमी, वाचक म्हणून मला तिथे उपस्थित राहायचे आहे. मराठीचा जागर खेडोपाड्यात व्हावा या हेतूने गेले दहा वर्ष राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित केली जातात. ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची छोटी प्रतिकृती शोभावी अशा प्रकारची असतात. त्या संमेलनांचा एक कार्यकर्ता म्हणून मराठीच्या अखिल भारतीय पातळीवरच्या जागरात राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा एक पोत असावा
या हेतूने मी दिल्लीला जात आहे.मी जाणार आहे हे समजताच संघाचे कार्यकर्ते विजय हटकर हे सुद्धा या वारीत सहभागी झाले आहेत. माझ्या पहिल्या दिल्ली वारीची आठवण ऐकताना याच्यावरती लिहा असे ते म्हणाले म्हणून हा लेखन प्रपंच.

       पंचेचाळीस वर्षांपूर्वी सहा दिवसांची दिल्ली सहल तीनशे रुपयात झाली. आज मला मुंबईला मुंबई सेंट्रल या स्टेशनवर येण्यासाठी पवई वरून उबेर गाडी आरक्षित केली त्या गाडीचे भाडे ३९९ रुपये द्यावे लागले. तेव्हा  साध्या स्लीपर कोचने २४ तासांचा प्रवास करावा लागला. आज आम्ही आज आम्ही एसी कोचने सुपर एक्सप्रेस गाडीने बारा तासात दिल्ली गाठणार आहोत.तेव्हा तिनशे रुपये साठी मोठे कष्ट उचलावे लागले.ते ते मिळाले नसते तर हा आज अनुभव मला लिहिता आला नसता. माझ्या पितृतुल्य भावासाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे. परमेश्वर त्याला आयुर आरोग्य देवो ही प्रार्थना!

सुभाष लाड 
९८६९१०५७३४

अभिप्राय:-
१) विनोद आयरे , रिंगणे 
भाई 
अप्रतिम 
खरंच तुमच्या वेळचा काळ अगदी डोळ्यासमोरून गेला 
वाजता वाजता डोळे केव्हा पाणवले कळलेच नाही
ही फक्त दिल्ली वारी नसून आठवणींच्या जगातली तुम्ही पुन्हा एकदा सहल करून येत आहात 
धन्यवाद 🙏🏻

२) भाऊ कांबळे, शिपोशी 
अहो सर 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जात आहात तुम्ही साहित्यिक लेखक नाटककार असे अनेक पैलू आपण सामाजिक जाणीव असलेले कार्यकर्ते आहात आपण 1982 चा दिल्ली प्रवास कथन केलात 1982 पासून ते आता 2025 पर्यंत आपला रेल्वेचा प्रवास सर आपण या वयात सुद्धा रेल्वेने दिल्ली ते पण बारा तास असा हा खडतर प्रवास आपण करत आहात खरोखर आपल्याला ईश्वर शक्ती देवो आणि आपले सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि साहित्य विषयाची सर्व ध्येय धोरणे यशस्वीरित्या पार पडू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्याला चांगली शक्ती मिळो आणि सामाजिक कार्यात ऊर्जा मिळो हीच अपेक्षा व्यक्त करीत आहे आपला प्रवास सुखाचा होवो
          
           
         
             

4 comments:

  1. सामान्य परिस्थितीचे चटके ज्यांना बसलेत तीच माणसे असे अनुभव ह्रदयापासून लिहीतात.खुप छान अनुभव कथन.सोबत विजय आहेच.या दिल्लीवारीचे अनुभव कथन त्यांच्याकडून होईलच.मराठ्यांनी झेंडा अटकेपार नेला.आपल्या मराठी चा झेंडा आपण आपण साहित्य संमैलनात उमटवा.तुम्हाला खुप खुप शुभेच्छा🌹🌹💐

    ReplyDelete
  2. अत्यंत तरल असा हा आठवणीचा यथार्थ ठेवा आयुष्याच्या प्रवासाच्या गर्तेत कायमच संग्रही रहाणार आहे.. एक संजीवक म्हणून..!!

    ReplyDelete