कोकणातल्या राजापूर लांजा तालुक्यातल्या गावागावातून संपन्न होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे हे दहावे वर्ष. काळ कसा सर्रकन पुढे सरकला हे कळलेच नाही असं आपण सर्रास म्हणत असतो पण मी तसं म्हणणार नाही. कारण प्रत्येक गावच्या साहित्य संमेलनाच्या अनेक आठवणींचा संचय सोबत घेऊन फिरत असताना प्रत्येक क्षणी मला कुठल्या ना कुठल्या गावाची आठवण येत असते. ते क्षण आठवल्यानंतर त्या त्या गावाचे मिळालेले सहकार्य ते आठवण सुखद करून जाते.
सुरुवातीची चार संमेलने पहिल्या दिवशी संध्याकाळच्या दरम्यान सुरू व्हायची पुढे ती सकाळपासून आयोजित करण्यात आली. पुढे आणखीन अनुभवात शिदोरी पडल्याने संमेलनाच्या पूर्वसंध्येला काही कार्यक्रम आयोजित केले गेले. त्यामुळे स्थानिक महिलांना रांगोळी स्पर्धेचा अनुभव मिळतो, त्यांच्या पाक कलेचा आस्वाद घेता येतो आणि संध्याकाळी स्थानिक कलाकारांना संधी दिली जाते. मग कुठेतरी पर्यावरणाचा विचार करताना आपल्या गाव कुसावरून वाहणाऱ्या नद्यांना कचरा टाकण्याची जागा अशी किंमत देत असल्याचे निदर्शनास आले.जी नदी आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जीवनदायी म्हणून आपली आपल्या आई इतकीच काळजी घेते त्या नदीला आपण असे एक स्थान द्यावे का ? तिचे पावित्र्य आपण कधी लक्षात घेणार ? आयुष्यभर जिने बाराही महिने वाहित राहावं अशी अपेक्षा करताना आपल्या मृत्यूनंतर अस्थिविसर्जनाकरीता जी नदी कधी आयुष्यभरात पाहिलेली नसते तिचा शोध घेत मृत व्यक्तीचे वारसदार गंगा,गोदावरी, भीमातीर किंवा हरिहरेश्वर अशा ठिकाणांचा आग्रह धरतात अर्थात आमच्या हिंदू धर्माच्या संकल्पनेप्रमाणे मृत व्यक्तीला स्वर्गप्राप्ती व्हायचे असेल तर तिच्या अस्थी गंगार्पण करायला हव्यात असे आपण मानतो मग ती गंगा आपल्या गावकुसाला वाहणारी नदी असू शकत नाही का ? आपल्याच मातीतल्या माणसाला आम्हीच मोठं करणार हे ब्रीदवाक्य घेऊन गेली दहा वर्षे ग्रामीण साहित्य संमेलनात आपल्या मातीतल्या कर्तबगार माणसांचा सन्मान करीत आलो आहोत. मग आमच्या मातीतल्या पर्यटन स्थळांना, डोंगरदर्यांना आणि नद्यांना ते मोठेपण द्यायला नको का ? तेच मोठेपण देण्यासाठी राजापूर तळवडे गावच्या साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला अर्जुना नदीचे जलपूजन करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कोकणात स्थायिक असलेल्या मुलांच्या लग्नाची समस्या समोर आल्यानंतर ज्या मुली गावाकडच्या मुलांसोबत संसार थाटत आहेत अशा नववधूंचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपरा प्रभानवल्ली- खोरनिनको येथील साहित्य संमेलनातून सुरू झाली. त्याच संमेलनात प्राथमिक-माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या आणि कविता करणाऱ्या मुलांच्या कवितांच पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रघात सुरू झाला. अशा तऱ्हेने साहित्य संमेलन विस्तारत गेले.त्यामुळे अनेकांचा सहभाग वाढल्याने साहित्य संमेलनाची आवश्यकता अधोरेखित होत गेली.
यावर्षीचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन वाटूळ या गावी होत आहे. मुंबई - गोवा हम रस्ता या गावाच्या मध्यातून जातो. याच रस्त्याला नव्वद अंशाचा कोन करून दाभोळकडे जाणारा रस्ता असल्याने तिथे तिठा तयार झाला आहे, त्याचे नाव 'वाटूळतिठा 'असे आहे. आजचे वाटूळ आज वाहतुकीचे बेट आहे तसे ते पूर्वी बैलगाडीने प्रवास करत होते त्यावेळी पासूनच ते आहे त्याची साक्ष देणारी धर्मशाळा आजही तिथे उभी आहे. या तिठ्यावर रविवारचा आठवडे बाजार भरतो. या गावात वारकरी संप्रदायाची १३० वर्षांची परंपरा असून कार्तिक एकादशीला कोकणातून सह्याद्रीच्या पाजीतून जाणारी पायी दिंडी ही वाटूळपासून सुरू व्हायची. ती वारी आजही चालू आहे. अनेक कीर्तनकार, वादक, समाजसेवक, देशभक्त तसेच प्रवचनकार या गावातून निर्माण झालेले आहेत. राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाच्या निर्मितीतील एक संस्थापक सदस्य स्व. श्री. गो.ना. चव्हाण हे याच गावचे असून त्यांना संघाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता.
इथे अनेक प्रार्थना स्थळे असून सण उत्सवांच्या वेळी गाव गजबजून जातो. प्राथमिक शाळांबरोबर येथे एक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. गावात धरण झाल्याने पाण्याची मुबलकता आहे. इथल्या गगनगिरी महाराजांच्या मठाच्या शेजारी भव्य मैदानात दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर येथे उपस्थिती लावणार आहेत. पुस्तक प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शन याचबरोबर अनेक विक्री कक्ष येथे असणार आहेत. संमेलन यशस्वी करण्याकरता अवघा गाव एकवटला असून ' न भुतो न भविष्यती' अशी अनुभूती देणारे हे साहित्य संमेलन ठरेल असा आयोजकांचा विश्वास आहे.
नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणारे हे बिन खुर्चीचे संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी असे असले तरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १ तारखेला सकाळी १० वाजता होणार आहे. आपण सारे जण मिळून वाटूळ गावच्या या अक्षरयात्रेत सहभागी होऊन अक्षर दिंडीचे भोई होऊया आणि अभिजात मराठी भाषेला गावखेड्यातून सन्मानीत करूया. चला तर मग येताय ना ! आपण तिथेच प्रत्यक्ष भेटूया !
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
ता.क.
दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण मी आपल्यापर्यंत प्रत्यक्ष येऊन पोहोचवू शकत नाही. त्यामुळे हे निमंत्रण स्वीकारून आपण वेळीच उपस्थित राहावे हे संमेलन यशस्वी करण्यास सहकार्य करूया. धन्यवाद
ग्रामीण भागात मराठी भाषिक चळवळ नांदावी यासाठी आपण आणि आपले सर्व सहकारी घेत असलेल्या प्रयत्नांचे खूप कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा!
ReplyDelete