Sunday, January 12, 2025

संघाच्या युवा कार्यकर्त्यांना वाहिलेला जीवन गौरव पुरस्कार . 🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁


🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁

          वेरवलीच्या हायस्कूलमध्ये मी आज दुसऱ्यांदा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होतो.ऐन पावसाळ्यात या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. वेगवेगळ्या गटातील त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मी सुद्धा एक परीक्षक या नात्याने उपस्थित होतो. विद्यार्थ्यांच्या इयत्तेप्रमाणे चार गटात या स्पर्धा आयोजित केलेल्या असल्याने या परिसरातील उमेदवारांबरोबर रत्नागिरी, देवरुख अशा लांबच्या ठिकाणाहूनही उमेदवार आलेले होते. तशी गर्दीच होती म्हणा. पण वेळीच कार्यक्रम सुरू करणे, प्रत्येक गटाची वेगवेगळ्या भागात विभागणी करून त्या स्पर्धा नियोजित वेळेत पार पडणे ही कसरत होती, मात्र या संस्थेने केलेले नियोजन इतके आखीव आणि रेखीव होते की, वेळेतच जेवणाचा कार्यक्रम, ठरलेल्या वेळेतच बक्षीस वितरण समारंभ आणि त्या समारंभात सुद्धा काही ठराविक लोकांची भाषणे असल्याने तोही कार्यक्रम कधी सुरू झाला आणि कधी संपला असे वाटावे अशा तऱ्हेने त्याची सांगता झाली. त्यावेळेला मी आयोजकांना भेटून समाधान व्यक्त केले होते.

            त्यानंतर काही दिवसांनी याच संस्थेकडून मला संपर्क करण्यात आला होता. मी करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना माहिती हवी होती. पण त्याचे प्रयोजन समजल्यामुळे मी त्यांना ती देण्यास नकार दिला. मला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे कळले परंतु मी उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला पुरस्कार मिळावा या हेतूने कोणतेही काम केलेले नाही आणि मला पुरस्कार मिळावा म्हणून कोणाकडे अपेक्षाही केलेली नाही. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी लांजा चे सुपुत्र स्व. सुरेश तेंडुलकर सरांनी मला एक अधिकार वाणीने कानमंत्र दिला होता तो म्हणजे "आपण काम करत राहायचं असतं आणि कधीही कोणाकडे पुरस्कार मिळावा म्हणून प्रस्ताव किंवा फाईल द्यायची नसते त्यामुळे आपल्या कामाचं महत्त्व कमी होतं." मुंबई महानगरपालिकेत असताना मी ज्यांना गुरुस्थानी मानले त्या तेंडुलकर सरांची शिकवण हा माझ्यासाठी एक पुरस्कारच होता. तो पुरस्कार मी आजही अभिमानाने मिरवतो आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने सुद्धा गेली अकरा वर्ष कोकणातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आम्ही पुरस्कार देतो ते सुद्धा कुणाकडूनही प्रस्ताव आम्ही घेतच नाही अर्थात संघाने निर्माण केलेली पुरस्कार निवड समिती ज्या व्यक्तीची निवड करते ती नावे जेव्हा प्रसिद्धी माध्यमाद्वारे लोकांच्या पर्यंत जातात त्याच वेळेला पुरस्कार  विजेत्यालाही आपल्याला पुरस्कार मिळाला आहे याची माहिती मिळते खऱ्या अर्थाने तेव्हा तो त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असतो. 

           माझ्यापुरता तो विषय संपला असेल असे मला वाटले होते परंतु पुढे काही दिवसांनी मला डॉ. पिसे यांनी फोन करून आपल्याला जीवनगौरव पुरस्कार निश्चित झाला असल्याचे कळवले. त्यावेळी मात्र मला आनंद झाला. पण मी ती आनंदाची बातमी कुणाला सांगितली नाही. त्याच वेळेला मी इतका कामात गर्क होतो की वाटुळ गावी एका सभेसाठी गेलो असताना तिथल्या लोकांनी माझं अभिनंदन केलं त्यावेळेला मला समजलं की आपली निवड झाल्याचे वृत्त जाहीर झाले आहे.
           संघाच्या माध्यमातून जोडले गेलेले कोट गावचे माजी सरपंच यांच्या उज्वल कारकीर्दीचा सन्मान म्हणून आदर्श सरपंच हा पुरस्कार जाहीर झाला होता,तसेच संघाच्या साहित्य संमेलनाचे आघाडीचे निवेदक आणि मोडी दर्पण दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक श्री विजय हटकर सर यांनाही आदर्श शिक्षकाचा पुरस्कार जाहीर झाल्याचे कळले. कार्यक्रम नऊ वाजता सुरू होणार असे पत्रिकेत असल्यामुळे आम्ही वेळीच वेरवली हायस्कूलला उपस्थित राहिलो. आयोजक मंडळी सुद्धा वेळेवर उपस्थित होती. मात्र कार्यक्रम सुरू व्हायला अकरा वाजले.गावाकडच्या प्रत्येक कार्यक्रमात वेळेबाबत कोणीच गांभीर्याने घेत नाही याचा अनुभव इथेही आला.आयोजक यजमान अमोलजी रेडीज हे त्यांच्या चेहऱ्यावरच्या ताणलेल्या रेषा लोकांशी बोलत राहून दडवण्याचा प्रयत्न करत होते हे माझ्या लक्षात आले. त्यांच्या भूमिकेत जेव्हा मीही असतो त्यावेळेला माझीही तिचा अवस्था झालेली असते. आपण सर्वांनीच वेळेबाबत कधीतरी गंभीर व्हायला हवे असे वाटते.

          चहापान झाल्यावर बेर्डे सरांनी फेटे बांधायला घेतले आणि वातावरणात चैतन्य निर्माण झाले. मुलांनी वाजवलेल्या ढोल ताशांच्या गजरात चालताना प्रत्येक विजेत्याला आपण गगनाला गवसणी घातल्याचा भास होत होता. क्षणभर का होईना आपण कोणीतरी वेगळे आहोत याची जाणीव करून देण्याकरता ढोल ताशांचा गजर, बांधलेले फेटे, आजूबाजूला कौतुकभरे चेहरे आणि अदबीने वागणाऱ्या गर्दीतून जाताना एखाद्या विजयी योद्धाचा थाट अंगात घुसल्यागत पावलात आपसूक दमदारपणा आला होता. सभागृह पहिल्या माळ्यावर आहे. जिन्यावरून जाताना पायऱ्यावर उभ्या असलेल्या पारंपारिक पोशाखातील मुलींनी केलेला फुलांचा वर्षाव झेलताना आपण खरेच का एवढे मोठे आहोत हा प्रश्न मनाला पडला. पण उत्तर शोधण्याआधीच औक्षणाला सामोरं जावं लागलं. प्रेक्षकांनी गर्दी केलेल्या सभागृहात टाळ्यांचा गजर  झाला. कुणीतरी कार्यकर्त्याने पुढे येत आदर दाखवत हात धरून नेमक्या खुर्चीवर बसवलं.' अरे लाजवता की काय ? ' असा प्रश्न विचारण्याचा मोह झाला परंतु आपलं बोलणं टाळ्यांच्या कडकडाटात  कुणाला ऐकू गेले नसते त्यामुळे मी गप्पच राहिलो.हा कार्यक्रम पुरस्कार विजेत्यांसाठीच आहे हे स्पष्ट जाणवत होतं.त्यामुळे इथे दाखवलेला आदर, केलेलं नियोजन सगळं काही भारावून टाकणारं होतं. कलाक्षेत्रात आयुष्य वेचलेल्या अनुभव संपन्न अमोल रेडीज यांची सर्वच नियोजनावर छाप आहे हे स्पष्ट दिसून येत होतं. संस्थेच्या पदामुळे त्यांना स्टेजवरच्या खुर्चीत बसावं लागलं तरी त्यांची नजर प्रत्येक गोष्टीकडे होती. त्यांना हवा असलेला यंत्रवत पुढे जाणारा कार्यक्रम प्रत्यक्षात उतरत होता हे या कार्यक्रमाचं नाविन्य होतं. 
          निवेदक करणारे बंडगर सर आणि कांबळे सर हे मुळातच शिक्षक असल्याने त्यांच्या वाणीला गोडवा आहे त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी किती बोलावे आणि कुठे थांबावे याचे भान त्यांना चांगलेच असल्यामुळे कार्यक्रम कुठेच रेंगाळला नाही किंवा ढेपाळला नाही. पूर्वतयारी जेवढी चांगली तेवढा कार्यक्रम अधिक रंगतो हे त्यांच्याकडून आज पाहायला मिळाले. पुरस्कार विजेत्यांच्या मानपत्रांचे वाचन करण्यासाठी मुलींच्या कडून करून घेतलेली तयारी प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. पुरस्कार विजेत्यांना संस्थेचा एखादा सभासद व्यासपीठापर्यंत घेऊन जातो, त्याच वेळेला ज्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे त्या व्यक्ती सुद्धा चटकन समोर येताच  सत्काराचं साहित्य घेऊन मुली बाजूला उभ्या राहतात. सन्मान केला जातो, फोटो काढले जातात. कृतकृत्य झाल्याचा भाव चेहऱ्यावर आणून पुरस्कार विजेता प्रेक्षकांना वंदन करतो आणि व्यासपीठावरून उतरतो.ते दृश पाहून राष्ट्रपती भवनामध्ये कार्यक्रम होतो आहे की काय असेच वाटत होते. गावाकडच्या कार्यक्रमात आणि नेमकी भाषणं याचं तर मला नवल वाटलं. व्यासपीठावरती नेमक्या पाच खुर्च्या याचं ही नवल वाटलं. बऱ्याच वेळेला सभागृहात त्या खुर्च्या रिकाम्या असतात पण स्टेजवर खुर्च्या लावायला जागा कमी पडते  हे चित्र प्रेक्षकांच्या मनात धडकी भरणारं असतं. इथे खुर्चीपेक्षा आपल्या कामामुळे संस्थेचा नावलौकिक कसा होईल हे समजून घेणारे श्री शैलेश डोळस, रवींद्र डोळस सारखे  पदाधिकारी आणि कार्यकर्ते धावपळ करताना बघावयास मिळाले. संस्थेकडून एक प्रास्ताविक(अमोलजी रेडीज), एक अध्यक्षीय भाषण( मारुती राव डोळस )आणि मुख्याध्यापक डोळे सर यांनी केलेले आभार हे सगळं आटोपशीर होतं.
             प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित आमदार किरणजी सामंत यांनी आपल्याला भाषण करण्याचा अनुभव नाही हे प्रामाणिकपणे सांगताना नेमक्या शब्दात केलेल्या कोट्या आणि विकास कामाबद्दल संवेदनशील असल्याची दिलेली ग्वाही यातूनच त्यांनी सभागृह जिंकून घेतले. पुरस्कार विजेत्यांमधून विजय हटकर यांनी केलेले भाषण म्हणजे त्यानी केलेले चौफेर वाचन, त्यांची इतिहासाची आवड आणि समोरच्या प्रेक्षकाला खिळवून ठेवणारी भाषाशैली या सर्वांचा गोफ होता. ज्येष्ठ अभिनेते श्री.महेश कोकाटे हे या कार्यक्रमातील आकर्षण होते. याच गावात जन्मलेले याच शाळेत शिकलेले आणि मराठी नाट्य क्षेत्रामध्ये नावारुपास आलेले महेश कोकाटे यांचे भारदस्त व्यक्तिमत्व सर्वात उठून दिसत होते. या माती बद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना मी नेहमी आपल्या सोबत राहणार असल्याची त्यांनी दिलेली ग्वाही प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन गेली. 
           नियोजनात मला बोलायला संधी मिळणार आहे असे आयोजकांनी अगोदरच सांगितले होते. मला मिळालेला जीवनगौरव पुरस्कार हा माझ्या एकट्याच्या कर्तृत्वामुळे मिळाला आहे असे मी समजत नाही. माझ्या जीवनप्रवासात अनेक लोक भेटत गेले. सामाजिक जीवनात मी काही नवीन कल्पना ,नवीन उपक्रम अमलात आणण्याचे ठरवले तेव्हा अनेकांनी ते उचलून धरले म्हणून यशस्वी झाले. विशेषतः राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ ही पुढील दोन वर्षात पंचाहत्तरीत जाणारी लांजा राजापूर मधील चाकरमान्यांची जुनी संस्था आहे. गेली पस्तीस वर्षे मी त्या संस्थेशी निगडित आहे. मुंबईत असलेल्या या संस्थेला गावाकडे आणण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेला संघाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मा.धोंडू खांडेकर यांनी चांगलं सहकार्य केलं. संघाकडून समाजातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम सुरू करण्याचे ठरले तेव्हा कार्यकारणीत असलेल्या तरुण कार्यकर्त्यानी झोकून काम करण्याचे ठरवले. २०१४ चा तो पहिला कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर सगळ्यांचा उत्साह वाढला.संघाच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. पुढील वर्षी याच कार्यक्रमाचे रूपांतर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात झाले. कोकणातल्या खेड्यापाड्यांना अनोळखी असलेल्या साहित्य संमेलनाचे औचित्य आणि त्याची रूपरेषा समजावण्यात बराच वेळ गेला पण उत्सव प्रिय असलेल्या कोकणातील प्रत्येक गावच्या गावकऱ्यांकडून प्रत्येक साहित्य संमेलन आपल्या पद्धतीने अधिक सरस कसं होईल याचा प्रयत्न केला गेला. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संघाकडून कोकणातल्या खेड्यापाड्यात जाऊन मदतीचा हात देण्यात आला. वृक्षतोडीमुळे कोकणातल्या भकास झालेल्या रस्त्यांवरती संघाकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले गेले आणि संघाला चांगल्या प्रकारची प्रसिद्धी मिळाली. संघाचा अध्यक्ष या नात्याने मी सुद्धा अनेकांच्या ओळखीचा झालो. माणसं वाढत गेली, संघाचे सर्वच उपक्रम यशस्वी होत गेले त्यामुळे सुभाष लाड हे नाव सर्वश्रुत झाले. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमात कै. गंगाधर धोंडू उर्फ भाईसाहेब लाड जीवन गौरव पुरस्कार घेताना मला प्रथम संघाच्या युवा कार्यकर्त्यांचं स्मरण झालं. संस्थेच्या कामासाठी आपला वेळ देणारे, खिशातील पैसा खर्च करणारे, संघाकडून प्रवास खर्चाची कधीही अपेक्षा न करणारे, आणि विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले युवा कार्यकर्ते व पदाधिकारी( मुंबई आणि स्थानिक) यांचा हा पुरस्कार आहे असे मला वाटले. त्यांच्या वतीने मी तो घेतला आहे असे मला वाटले. पण त्या पुरस्कारावरती सुभाष लाड असे नाव असल्यामुळे मी हा पुरस्कार संघाच्या युवा कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो आहे.
          आपण चांगलं काम करतो तेव्हा आई जसं कौतुकाने आपल्या पाठीवरती हात फिरवते तोच हात वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाने हा पुरस्कार देऊन माझ्या पाठीवरती फिरवला आहे असे मला वाटते. हा नेत्रदीपक कार्यक्रम, आयुष्यातला एवढा मोठा पहिला पुरस्कार 'वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाने' मला दिला तो आयुष्यभर संस्मरणात राहील.माझ्या सकस तांबड्या मातीतल्या अशा धडपडणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर ही संस्था असाच हात फिरवत राहो त्यासाठी या संस्थेचा उत्कर्ष होत राहो हीच सदिच्छा!

सुभाष लाड 
 अध्यक्ष 
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई
 🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁     
           
       १) शाहिर मधुकर खामकर 

🌳🌹 *आदरणीय श्री सुभाष जी लाड, आपणांस वेरवली शिक्षण मंडळाच्या वतीने "जीवन गौरव पुरस्कार" मिळाल्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन* 
💐🌹🌷🌹 
    *अगदी योग्य सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचा उचित गौरव या संस्थेने केल्या बद्दल संस्था पदाधिकारी आणि निवड समिती यांना धन्यवाद*
 *आपण संपूर्ण कार्यक्रमाचे केलेले वर्णन वाचून प्रत्यक्ष तो कार्यक्रम नजरेत समोर उभा राहिला*
   *खूप छान लिहिले आहे,*
 *आपले मनःपूर्वक अभिनंदन, अभिनंदन*
🌹🌺🌳🌻🌹🌻🌳🌺🌹🌸🌳
  २) अभिनय बोरकर 
किती छान सुंदर वर्णन.....
आपण निमित्त केवळ हे न सांगता वाचणा-याला ते समजून जाते 
राष्ट्रीय स्वयंमसेवक संघात मला हेच शिकायला मिळालं
तुमचे हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा 
🌸🌸

३)
सुभाष लाड आपल्याला जीवन गौरव ह्या अत्यंत महत्त्वाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपले खूप - खूप अभिनंदन ...! 💐💐
विजय अनंत चव्हाण , कुरंग.

1 comment:

  1. लिखाण इतके सकस आहे की, जणु आम्ही कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर असल्याचा आभास होत आहे...

    आपले कार्य अन् लिखाण दोन्ही ग्रेटच आहे...

    ReplyDelete