Wednesday, March 6, 2024

वेड्यांचे जलपूजन

 


         ' मलाच कळते सारे' म्हणणारे गाव फिरत राहिले
कळत होते त्यांनी हाती पाटी कुदळ घेतले.
"अडेल कसे पाणी ? पूर्वी कुणी नाही अडविले " असे म्हणणार्‍यांनी कामास लागलेल्यांना वेडे ठरविले.नुसतेच वेडे ठरवून गप्प बसले नाहीत तर "बघा वेडे काय करताहेत ते." असे भेटेल त्याला सांगत सुटले.कोण हे वेडे लोक हे पाहण्यासाठी जो तो धावत सुटला. जिथे वेडे लोक पाणी अडवण्याचे काम करीत होते त्या नदीच्या काठावर आले.काही मोजके लोक मग्न होऊन नदी पात्रात दिसत होते.कुणी माती खणतोय,कुणी माती पाटीत भरतोय तर कुणी दगडांचा थर लावतोय.ते काय करताहेत हे सगळ्यांच्या  लक्षात आले पण ते आपल्या भल्यासाठी आहे आणि ते आपलेच काम आहे हे ज्यांना उमगले ते सहज खाली उतरले.आता राबणारे हात वाढत होते.
        दिवसभर रान उठवून वेड्यांची फजिती पाहायला शहाणे नदीकाठावर आले.काठावर कुणी दिसत नाही म्हणजे सगळाच बेत फसला आहे असे त्यांना खात्रीने वाटले,आता कुचेष्टेने हसणे आणि विचकट बोलणे सुरू झाले.ते तसेच आणखी पुढे आले आणि अचानक बोलती बंद झाल्यासारखे झाले.जे सकाळी आपल्यासोबत होते तेही त्या वेड्यांच्या सोबत गेलेले पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला.बंधारा पूर्ण होत आला होता.सगळा गाव एकवटला होता.पण हे शहाणेच होते.


घाम पुसत थकून बसलेल्या तरूणाला हिणवत " अरे एवढं काम करायचं होतं तर जेवणात खाण्याची व्यवस्था करायला नको होती का?" असे म्हणताच तो तरूण म्हणाला "कुणी कोणाची करायची व्यवस्था? हे सगळ्याचं, प्रत्येकाचं काम आहे.गावाचं काम आहे "
" हेच म्हणायचं होतं आम्हाला,गावाचं काम असतांना गावच्या मानकर्याला त्याची माहितीच नाही.देवाचा   कौल घेतल्याशिवाय कामाला सुरूवात केलीच कशी ? "
        तेवढ्यात दमलेले दोन तरूण मागे वळले " ती वेडी माणसं देवंच आहेत कामाला सुरूवात करतांनाच त्यांनी या मातीला आणि जलदेवतेला वाकून नमस्कार केला,आम्हीही नतमस्तक झालो."





          दूरवर ढोलताशांचा आवाज घुमत होता.कुणाकडे लग्नकार्य असावे असा एका शहाण्याने कयास बांधला.पण आपल्यास निमंत्रण नाही कसे? हळदीच्या तिखट जेवणाला आपण मुकलो याच त्याला दु:ख झाले.आवाज जवळ जवळ येत होता.काही क्षणात नटलेल्या थटलेल्या महिला हातात आरतीची ताटं घेऊन बंधाऱ्यापाशी जमल्या.मुलांना त्या तुंबलेल्या पाण्यात उड्या मारण्याचा मोह आवरला नाही.कुणीतरी त्यांना थोडावेळ थांबण्याचा इशारा केला.बंधाऱ्यावर माती भरलेलं शेवटचं घमेलं रिकामी झालं आणि वेड्यांचे चेहरे खुलून आले.सुर्य पश्चिमेकडे डुबण्यास चालला होता पण पलीकडच्या काठाकडून बंधाऱ्यावरून एका रांगेत चालत येणाऱ्या वेड्यांचा सावली बंधाऱ्यामुळे तुंबलेल्या पाण्यात चालत होती ते विलोभनीय दृश्य दाखवण्या साठीच सूर्य थांबला होता.
       महिलांनी कलश भरून काठावर  आणले, भटजींच्या मंत्रोचाराने अवघा नदीवर परिसर भारावून गेला.पानाच्या द्रोणात दिवे त्या जलात तरंगू लागले आकाश मंडल नदीत उतरल्याचे पाहून अवघ्या आबालवृध्दांनी कृतज्ञतेने हात जोडले." जय जय जय जलदाती " हे आरतीची स्वर घुमू लागले.काठावरच्या लोकांनी मोकळा केला होता.त्यांनी केलेल्या कुचेष्टेमुळे वेड्यांच्या हाताला अधिक हात मिळाले होते.म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी वेडे लोक त्यांचा शोध घेताहेत.

सुभाष लाड
9869105734














2 comments:

  1. तुमच्या कार्याला सलाम करावे तेवढे कमीच आहे.

    ReplyDelete
  2. जे एखाद्या ध्येयाने वेडे होतात तिच माणसे इतिहास घडवितात. लाड सर आपल्या कार्याला सलाम.

    ReplyDelete