*कृतज्ञता नदीबद्दलची*
पितृपक्ष हा कोकणात मोठ्या धार्मिकतेने साजरा केला जातो.कुणाकडे श्राद्ध तर कुणाकडे तिथीस मिळवणे तर कुणाकडे महाळाचे जेवण असते.बदलत्या काळानुसार केळीच्या किंवा चवईच्या पानांऐवजी चाकरमान्यानं आणलेल्या कागदी ताटांमध्ये बाजारी धान्य आणि बाजारी भाज्यांचे पदार्थ सजतात.परस बागेतील दोडका,भेडी, पडवळ मिरची पालेभाज्यांची सद्दी केव्हाची संपली आहे.असो पण पितरांच्या नावाने कावळ्यास वाडी ठेवणे आणि आप्त स्वकियांना भोजन देण्याची परंपरा शाबूत आहे.
अशाच एका श्राद्धाचे जेवण झाल्यानंतर यजमान त्या वापरलेल्या खरकट्या कागदी पत्रावळी त्याच्याबरोबर भाज्यांचा कचरा एका पिशवीत भरून नदीत टाकायला जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले.मी त्यांना थांबवून परसदारी एका झाडाच्या बुंध्याजवळ पिशवी रिकामी करून भाज्यांचा कचरा पसरवला "आठदहा दिवसांनंतर त्याचे खत होणार आहे व कागदी ताटे ग्लासे सुकल्यानंतर जाळून टाकायची" असे त्यांना सांगितले आणि त्यांनी ते ऐकले.
कोकणातल्या विविध उत्सवात,धार्मिक सणात असा बराच कचरा निर्माण होतो आणि ते निर्माल्य समजून नदीतच विसर्जन करायचे अशी श्रद्धा आहे.त्यात बदल करायला सांगणे म्हणजे वादाचा विषय होतो.कोकणातल्या नद्या विशेषत: वलाटीकडच्या भागात आक्टोबर पासून आकुंचन पावतात.पाण्याची पातळी कमी होत जाते आणि नदीचे वेगळेच चित्र नजरेस येते.शेरणीच्या झुडुपात,कातळांच्या खोबणीत माणसांच्या घरातल्या जुन्या तुटक्या वस्तू,गोधड्या, कपडे,प्लॅस्टीकच्या वस्तुंचा खच पडलेला दिसतो. पावसाळ्यात पुरूषभर असलेल्या कोंडी तळ गाठायला जातात आणि ज्यांना महापुजेचा मान देऊन मुर्तीच्या रूपात घरात बसवून,पाच सहा दिवस हजारो रूपये खर्चून आरास,गाेड धोड पदार्थ ,आरत्या,भजन, जाकडी सारखे कार्यक्रम करून आपण अधिक चांगले भक्त आहोत हे दाखवलेले असते त्या गणपती बाप्पाच्या मुर्ती न विरघळल्यामुळे विचित्र अवस्थेत दिसू लागतात. त्यावेळी मात्र गणेशभक्त मौनात जातो हे पाहून मन विषण्ण होते.याचा परिणाम नदीचे पाणी अशुद्ध होण्यात दिसतोच पण बरेच स्त्रोत बुजले जाऊन नदीला अकाली मरणकळा येतात.त्याचाच कहर म्हणजे अतिवृष्टीत नदी तिचा काठ ओलांडून दिशा मिळेल तिकडे वाहू लागते.मग कोणाच्या घरात घुसते तर कधी उभे पिक आडवे करते किंवा धुवून नेते.त्यावेळेला निसर्गाचा कोप झाला या विषयावर मोठ्या चर्चा रंगतात.मात्र या विनाशात आपलाही हात आहे हे मानायला कुणी तयार नाही.
तसे पाहिले तर कोकणी माणूस कोकणातल्या नद्यांना महत्त्वच देत नाही.त्यांचे पावित्र्य समजण्याचे तर दूरच राहिले. आपल्याकडे माणसाच्या मृत्युनंतर त्यांच्या अस्थी नदीच्या प्रवाहात विसर्जीत करण्याची परंपरा आहे.त्यामुळे दहाव्याच्या क्रियेनंतर नातेवाईकांत चर्चा होते.अस्थी विसर्जन कुठे करायचे ? नाशिक गोदावरी की पंढरपुरात भिमेच्या काठी, हरिहरेश्वर की सरळ उत्तरेत गंगाघाट गाठायचा.पण ज्या माणसाच्या जन्मानंतर त्याच्या मुखात पडलेला पहिला थेंब ते शेवटचे पाणी पाजले गेले ते पाणी आणि जीवनभर ज्या पाण्यामुळे तो चांगले जीवन जगला त्या आपल्या गावाला संपन्न करणा-या नदीचे श्रेय आहे हे विसरून ज्या नदीच्या पाण्याची उभ्या आयुष्यात ओंजळही घेतली नाही ती नदी यांना कशी आठवते?याचे आश्चर्य वाटते.
आपल्या नदीला कमी लेखल्यामुळेच या नद्यांना आपण कचरा वाहिनी करून टाकली आहे.हे आता बदलायला हवंय."इथेच माझे पंढरपूर " म्हटल्याप्रमाणे आपल्या गावाला सुजलाम सुफलाम करणारी नदी हीच आपली गंगा आहे,गोदावरी आहे.जसा गंगेला संगम आहे तसे कोकणातल्या नद्यांचे ठिकठिकाणी संगम आहेत.हिंदु शास्त्रात कोणत्याही नद्यांच्या संगमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या संगमावर केलेले स्नान गंगेच्या स्नानाइतके पवित्र मानले जाते.मग ती कोकणातली नदी असो किंवा जगाच्या पाठिवरच्या नद्या असोत.नदी संगम हा पवित्रच असतो.पण आम्ही आमच्या भागातल्या संगमांचा शोध घेतलेला नाही किंवा माहित असले तरी त्या ठिकाणाला त्या नजरेतून पाहिलेले नाही.म्हणुनच आता त्या संगमांचा शोध घेऊन त्यांचे पावित्र्य जपून तेथील स्नानाचे भाग्य मिळवले पाहिजे.इतरांनाही तिकडे वळवले पाहिजे.जेव्हा आपला वावर नदीवर होईल तेव्हाच आपल्याला नद्यांची दुरावस्था लक्षात येईल.जमलेले वाळुचे ढिगारे,कच-याच्या रांगोळ्यांनी घुसमटून गेल्याने तिला होणा-या वेदना आपल्याला जाणून घेता येतील.चाळीस वर्षांपूर्वी आपल्या गावाला तालुक्यालाही जाेडणारा नव्हता तेव्हा बाहेरच्या कोणत्याही वस्तू गावात येत नव्हत्या,प्लॅस्टिक आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस आम्हांस माहित नव्हते त्यामुळे त्यापासून बनविलेल्या वस्तूही आपल्या वापरात नव्हत्या.त्यावेळी बारमाही पुरूषभर उंचीचे डोह काचेसारखे स्वच्छ होते.तळातले दगड गोटे निळ्याशार डोहाला देखणे रूप द्यायचे.आज डोह संपलेच पण कुठे पाणीसाठा असलाच तर चिखल साचल्यासारखा दिसतो.माणूस काय पण प्राणी पक्षीही त्या पाण्याला तोंड लावत नाहीत.जंगल तोड करून प्राण्यांचे खाद्य संपविले तसेच नद्यांचे पाणी दुषित केल्याने इथले प्राणी पक्षी स्थलांतरीत झालेत.दसपिंडाला कावळा येत नाही म्हणून दर्भाचा कावळा करतांना कावळा पुन्हा यावा यासाठी कुणी कधी बोलत नाही.अनेक प्रश्नांची जंत्री दिवसेंदिवस जटील होत असतांना माणसांची वस्तीसुद्धा कमी होत चालली आहे तरी सुद्धा आम्ही विचार करण्याचे,प्रश्नांची उकल करण्याचे सोडून दिले आहे.मुंबई पुण्यास गेले ते केवळ जीवाची मजा करण्यासाठी सणांच्या नावाखाली गावाकडे येताहेत. त्यांना गावच्या समस्या काय आहेत या जाणून घ्यायच्या नाहीत.पण आपण इथे राहतो ना !निदान आपण तरी यात लक्ष घालू या !
म्हणुनच राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेने आपल्या परिसरातील नद्यांच्या स्वच्छतेबाबत ,त्यांच्या संरक्षणाबाबत जागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.त्याचा एक भाग म्हणून इथल्या नद्यांच्या संगमांचा शोध घेऊन त्या संगमावरती लोकांना एकत्रीत करून नदीचे पूजन करणे ,तिची आरती करणे व ती देवाइतकीच महान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे.
दि.१४ आक्टोबर २०२३ रोजी सर्वपित्री अमावास्येच्या सायंकाळी राजापुरातील रायपाटण ,पाचल व तळवडे गावच्या सिमेवर असलेल्या निवाचा नदी व अर्जुना नदीच्या संगमावर *'संगम नदी जलपूजन व आरती'* हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.रायपाटणचे सरपंच महेंद्र गांगण,तळवड्याच्या सरपंच गायत्री साळवी व पाचल चे माजी उपसरपंच किशोर नारकर यांच्या पुढाकाराने आयोजीत केलेल्या या कार्यक्रमात लांज्याहून महेंद्र साळवीसर,मंगेश चव्हाण,हकाश हरचेकर सर,चंद्रकांत खामकर,अमर खामकर,सुधाकर पेडणेकर,सचिन लाड,पत्रकार शरद पळसुलेदेसाई,माय राजापूरचे पवार,माजी मुख्याध्यापक महादेव पाटील,शरद देसाई तसेच संगनाथेश्वर मंदिराचे व मठाचे प्रमुख स्वामी,पुरोहित,मनोहर खापणे कॉलेजचे प्रा विकास पाटील व अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्न मान्वयवरांच्या स्वागतानंतर विजय हटकर यांनी नदीचे महत्व विषद केले तर सुभाष लाड यांनी भविष्यात नदी अशीच वाहात राहावी असे वाटत असेल तर नदीला देवता मानून त्यात कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी हे सांगितले.सर्वांनी नदी स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली.नदीपूजन झाल्यानंतर आरती गायन सुनीलबुवा जाधव,राजू कुलकर्णी,नागेश साळवी व मंदार जाधव यांनी केले.त्यानंतर जमलेल्या सर्व नदीप्रेमींनी नदीप्रवाहात आदराने प्रज्वलीत दीप सोडले.हे विहंगम दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेरॅत बंदिस्त करून घेतले. अशा कार्यक्रमांचे आपणही आपल्या परिसरातील नदी काठावर आयोजन करून नदीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी ही नम्र विनंती.
विशेष आभार - श्री.आप्पा साळवी,वसंत प्रभुदेसाई,संदीप गुरव,सुनील गुरव, पुरोहित - बाळाकाका जोशी,मनोहर खापणे कॉलेजचे एन सी सी विद्यार्थी
९८६९१०५७३४
















No comments:
Post a Comment