*कोकण रेल्वे स्थापना दिन*
प्रा.मधु दण्डवते,जॉर्ज फर्नांडिस आणि ई श्रीधरण यांच्या कर्तृत्वाने साकारलेली कोकण रेल्वे लवकरच कोकणवासियांची जीवनवाहिनी ठरली.सुरक्षीत आणि आरामदायी प्रवास म्हणून कोकण रेल्वेच्या गाड्या प्रवाशांनी ओसंडून जाऊ लागल्या ती गर्दी एवढी वाढली की एकेरी रेल्वेमार्गाचे रुंदीकरण करण्याशिवाय पर्याय नाही असे वाटू लागले आहे.
कोकण रेल्वेच्या निर्मितीत महाराष्ट्राचे ७०टक्के योगदान आहे.लोकसहभागातून उभारलेल्या निधीत धनदांडग्याबरोबर कोकणातल्या सामान्य चाकरमान्यानेही त्याच्या त्यावेळच्या ऐपतीप्रमाणे एक हजार रूपयाचे बॉंड विकत घेतले व आपली कोकण रेल्वेची मागणी अधोरेखीत करतांना आपलाही आर्थिक सहभाग दिला.स्थानिक जमिनदारांनी आपआपल्या जमिनी हस्तांतरीत केल्या.आर्थिक मोबदल्याबरोबर रेल्वेत नोकरीची संधीही पदरात पाडून घेतली.अनेक अभियंता,ठेकेदार,कामगार यांनी भगीरथ प्रयत्न करून कोकणवासिंयाचे स्वप्न साकार केले.
या अतिविशाल प्रकल्पावर काम करीत असतांना अनेक कामगारांना त्यांच्या जिवाला मुकावे लागले.रेल्वे साकार झाल्याचा आनंद साजरा करण्यापूर्वी हुतात्म्यांचा स्मृतिस्तंभ उभारून त्यांच्या प्रती आदरांजली व्यक्त करण्यात आली ती परंपरा दरवर्षी १४ आक्टोबरला पाळली जाते.तर १५ आक्टोबर हा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर उत्कृष्ठ सेवा देणा-या अधिका-यांना व कर्मचा-यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे हे एक महत्त्वाचे स्थानक असून या स्थानकाशी जवळजवळ ६० गावे जोडली गेली आहेत.इथे दिवा - सावंतवाडी,कोकण कन्या व तुतारी या गाड्या थांबतात.सणासुदीच्या काळात विशेष गाड्यांपैकी काही गाड्यांना इथे थांबा दिला जातो.पण ब-याच प्रवाशांना रत्नागिरी गाठावी लागते.इथल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता इथे मांडवी,जनशताब्दी ,नेत्रावती या गाड्यांना थांबा मिळावा ही इथल्या प्रवाशांची मागणी आहे.याचबरोबर स्थानकावर वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करीता 'विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण प्रयत्न करते आहे.
रेल्वे आपली आहे तिची स्वच्छता व सुरक्षितता ही आपली जबाबदारी आहे हे लोकांमध्ये ठसविण्याचे कामही ही संघटना करते आहे.विलवडे स्थानकाच्या परिसरातील रूक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात जाऊन स्वच्छता केली तर २ आक्टोबर या म.गांधी जयंतीचे निमित्त साधून प्रवासी संघटना व रिक्शा संघटना यांनी स्वच्छता अभियान राबविले.
राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ मुंबई ही एक प्रथितयश संस्था असून कोकणच्या विकासाचा ध्यास घेऊन विविध उपक्रम राबवीत असते.या संस्थेने प्रवासी व रिक्शा संघटनांना सोबत घेऊन कोकण रेल्वे स्थापना दिनाचे औचित्य साधून १६ आक्टोबर २०२३ रोजी विलवडे रेल्वे स्थानकावर एका कार्यक्रमाचे आयोजन करून रेल्वे कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या,स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे कौतुक केले व सर्वांना खाऊ वाटप केले.यावेळी संघाचे अध्यक्ष श्री.सुभाष लाड,ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष श्री अमोल रेडीज,रिक्शा संघटनेचे श्री उमेश पडीलकर,उपाध्यक्ष सुरेश शिगम,सरचिटणीस अमोल पळसुलेदेसाई, व्हेळ हायस्कूलचे महेंद्र साळवीसर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खामकर , उपाध्यक्ष तुषार पालकर हे उपस्थित होते.कार्यक्रमात स्टेशन प्रबंधक शिरीष जाधव,संजय खरीवले,गिरीश सावंत यांच्या सहीत सर्व कर्मचा-यांना सन्मानीत करण्यात आले.
सुभाष लाड यांनी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे व कार्ययकर्त्यांचे भरभरून कौतुक करताना " विलवडे स्टेशन हे आपले स्टेशन आहे असे म्हणतांना हे स्टेशन स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे हा संदेश व्हेळ हायस्कूलच्या मुलांनी दिला आहे. "असे सांगितले तर अमोल रेडीज यांनी इथल्या सुविधांसाठी संघटनेच्या माध्ययातून आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.टेक्निशयन संजय खरीवले यांनी इथल्या कर्मचा-यांना आपण सन्मानीत केलेत त्यामुळे आम्हांस आनंद मिळाला अशी कृतज्ञता व्यक्त केली.
महेंद्र साळवी सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून अलंकारीक शब्दांत कार्यक्रमाची सांगता केली.










No comments:
Post a Comment