माझ्या रिंगणे गावाच्या उत्तरेला हर्दखळे गाव आहे.त्या गावात जाण्यासाठी ज्या डोंगरातून जावे लागते त्या डोंगरात ऐतिहासिक डोलारखिंड आहे. त्या खिंडीच्या वरच्या भागात असलेले आंब्याचे झाड माझ्या घराच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिराच्या कठड्यावरुन दृष्टीस पडते. हर्दखळ्याला लागून भांबेड गाव आहे. भांबेडची बाजारपेठ म्हणजे पेठ देव. इथे रविवारचा आठवडी बाजार भरतो. मी सहावी सातवीत असताना वाडीतील कोणाच्या तरी बरोबर या बाजाराला डोलार खिंडीतून चालत गेलेलो आहे. आठवीत असतानाह.भ.प. जयरामबुवा पेडणेकरांनी त्यांच्या कोर्ले गावाला दिलेल्या मुलीच्या सासरी पाठवले होते. शनिवारची शाळा सुटल्यानंतर त्यांचा नातू रमेश सावंत आणि मी याच खिंडीतून हर्दखळे गावातून पुढे भांबेडवरुन कोर्ले गावाला गेलो होतो. त्या दिवसाची ठळक आठवण म्हणजे त्या रात्री आम्ही त्यांच्याच घरी वस्तीला होतो. रात्री साडेचार पाचच्या दरम्यान घरात माणसांचा धावपळीचा वावर जाणवला. थोड्यावेळाने बाळाचा रडण्याचा आवाज आला. आणि आम्ही सकाळी एक सुखद निरोप घेऊन रिंगण्याला निघालो. रविवार असल्याने भांबेडच्या बाजारात ताजे बांगडे खरेदी करून आम्ही रिंगण्यास आलो. त्या दिवशी ते जन्मलेले बाळ म्हणजे मी ज्या राजापूर - लांजा तालुका नागरिक संघाचे काम करतो आहे त्या संघाचे सध्याचे सरचिटणीस श्री प्रमोद पवार हे होत.
तसं त्यानंतर अनेक वेळेला भांबेडच्या बाजाराला गेलो. एकदा गणपत बुवा पेडणेकर यांचे भजन हर्दखळ्यातल्या शांताराम मराठे यांच्या घरी झाले होते त्या वेळी रात्री आठ वाजता गॅस बत्तीच्या ( पेट्रोमॅक्स )उजेडात डोलार खिंडीच्या वाटेतून जाऊन रात्री भजन करून त्याच रात्री सकाळी चार वाजेपर्यंत त्याच खिंडीतून अर्ध्या झोपेत पेंगुळलेल्या अवस्थेत परत आल्याचे आठवते. माझ्या लहानपणी रानात जाऊन डुक्कर, भेकर यांची शिकार करण्याची फार मोठी परंपरा कोकणात होती. त्यानिमित्ताने आम्ही मुलं रानकाढ्याच्या भूमिकेत बरेचसे जंगल फिरलेलो आहोत. शिमग्याच्या सुरुवातीला गाव पारध व्हायची. शंभर दीडशे रानकाढे, पाच पंचवीस टेहेळके आणि तेवढेच बरकंदार रानात फिरायचे. दुपारच्या वेळेस जंगलातल्या ठरलेल्या पाण्यावरती एकत्र येऊन कमरेस बांधून नेलेली भाकरी खायचो. अगदी पार सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत जाण्याचा योग आला. अनेक वेळा मार्क्याच्या खिंडीतून हर्दखळ्यातल्या धनगर वाड्यावर या तुडुंब भरलेल्या विहिरीवरती जाऊन पाणी प्याल्याचे आठवते.
पुढे मी दहावी पास झाल्यानंतर माझे कौतुक करायला आलेले माझे चौथीपर्यंतचे शिक्षक फापे गुरुजी रिंगण्यात आले असताना मी अजून शेतीच करतो आहे हे पाहून त्यांनी मला शिपोशी येथील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे सांगून ते मला त्यांच्या सोबतच घेऊन निघाले. सकाळी दिवस उजाडायच्या अगोदरच आम्ही चालायला सुरुवात केली. डोलारखिंडीत येईपर्यंत सूर्य कासराभर वर आलेला होता. आम्ही हर्दखळ्यात उतरलो. वाट ओळखीची होती परंतु आज माझ्या आयुष्याच्या वेगळ्या वळणावर घेऊन जाणारी ती वाट मला तिच्या खांद्यावर घेऊन जाते आहे असे वाटत होते. मी कॉलेजला दाखल झालो. तिथल्याच वस्तीगृहात जेवणाची व्यवस्था झाली होती. मग पुढे वर्षभर शनिवारी दुपारनंतर गावाकडे यायचं सोमवारी सकाळी पुन्हा शिपोशीकडे पायी प्रयाण करायचं. या वर्षभराच्या काळात ही हर्दखळ्यातील पायवाट जवळची वाटू लागली होती. या प्रवासात अनेक वेळा प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या बाकावर बसलेले थोर सामाजिक कार्यकर्ते य.ना. देसाई यांच्याबरोबर बोलण्याचा योग आला. त्यातून त्यांचा झालेला परिचय मला पुढे बराच उपयोगी ठरला. मी पुढे मुंबईला आलो आणि मुंबईचा झालो त्यामुळे गावाकडे येणं कमी झालं आणि पायवाटा पण आपसूक दूर गेल्या.कालांतराने त्या गडपही झाल्या.
पुढे २५ वर्षानंतर माझे मामे बंधू ग्राम विकास अधिकारी श्री सुधाकर पेडणेकर यांची बदली भांबेडला झाली असताना मी त्यांना भेटायला म्हणून भांबेड ग्रामपंचायतीत गाडी रस्त्यानं गेलो. त्यांना भेटल्यानंतर मी परतीचा प्रवास करताना मी कॉलेजला असताना ज्या वाटेवरून आपण प्रवास केला त्या वाटेवरून प्रवास करावा असे मला वाटले आणि मी एकटाच हर्दखळे आणि डोलारखिंड वाटेने पायी प्रवास केला. त्यावेळी जुन्या आठवणीत हरकून गेलो. एकेकाळी लोकांच्या वर्दळीमुळे मळल्याने स्पष्ट दिसणारी ती पायवाट आज मात्र दुखद होऊन तोंड लपून बसल्यासारखी मला वाटली.मी धापा टाकत चढण चढून डोलारखिंडीत आलो. डोर्लोबाला पानं वाहिलं आणि नतमस्तक झालो. ती वाट त्यावेळेला मळली नसती तर आज इथपर्यंत आलो नसतो म्हणून माझ्या सुखद प्रवासाबद्दल डोर्लोबाच्या समोर कृतज्ञता व्यक्त केली.
फार पूर्वी हर्दखळे ते रिंगणे हा डोलारखिंडी मार्गे रस्ता जोडण्यासाठी मोठा प्रयत्न केला गेला. कुरंग गावचे कॅप्टन श्रीपतकाका विश्वासराव त्या समितीचे अध्यक्ष होते तर रिंगणे गावचे श्री शिवराम सक्राजी पेडणेकर उपाध्यक्ष व तुकाराम शिवाजी पेडणेकर हे चिटणीस म्हणून काम करत होते. माझा जन्म झाला त्यावर्षी अर्थात १९६१ मध्ये सरकारी मंजूर रकमेतून कच्चा रस्ता पूर्ण करण्यात येऊन श्री गणपत सजनाजी पेडणेकर(रिंगणे) श्री आप्पा बारस्कर, (कोंडगे) व श्री गणपत बारस्कर (कोंडगे) यांनी हर्दखळे ते रिंगणे डोलारखिंडीतून आपल्या बैलगाड्या आणून रस्ता सुरक्षित असल्याचे दाखवून दिले होते मात्र पुढे काहीतरी राजकारण झाले आणि तो रस्ता बेदखल करण्यात आला. आज त्या मार्गावर झाडे वाढली असली तरीही बांधकाम केल्याचे स्पष्ट जाणवते.मात्र बऱ्याच वर्षानंतर आता हर्दखळ्यातून डोलारखिंडीपर्यंत पक्का रस्ता आलेला असून पुढे तो कोंडग्यात उतरवण्याचे प्रस्तावित आहे असे कळते.
मी पुन्हा कधी डोलारखिंडीत जाईन असं वाटलं नव्हतं.पण हर्दखळ्यातले माझे मित्र आणि भांबेड हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री जयराज मांडवकर यांनी आपल्या हर्दखळे या गावाचं गीत लिहिण्यासाठी आग्रह केला. माझ्यासाठी एक आव्हान होतेच. हे गाव माझ्या जवळचं आहे याची मला जाणीव झाली आणि मी त्यांची विनंती मान्य केली. मी वेळ काढून मांडवकर सरांच्या बरोबर सर्व हर्दखळे गाव वाड्या- वस्तीवरून, दऱ्या डोंगरातून फिरून पाहिला. तिथला इतिहास जाणून घेतला. मी दुसऱ्या दिवशी मुंबईला आलो खरा पण पुढे सतत पंधरा-वीस दिवस मी त्याच गावात रेंगाळत होतो. आणि एक दिवस प्रवासात असताना गीताच्या ध्रुपदाने आकार घेतला. मी पुन्हा एक महिन्यानंतर त्याच गावात सरांच्या सोबत गेलो. त्यावेळेला तेथील तरुण शिक्षक महेश गुरव यांच्या घरी जेवणाचा योग आला. त्यांच्या घराच्या पाठीमागच्या भागात गुरांचा गोठा असल्याने त्या वासाने मला पुन्हा माझ्या बालपणात नेले. त्यांचे घर आणि त्यांच्या घरातील माणसांनी दिलेल्या आदर सत्काराने मी भारावून गेलो. दुसऱ्या दिवशी मी मुंबईत येताना माझ्यासोबत पुन्हा हर्दखळेच होते. रेल्वेच्या बाकावर पांढरी चादर अंथरली आणि ब्लॅंकेट ओढून मी झोपण्याचा प्रयत्न केला परंतु मला झोप येत नव्हती.हर्दखळे गावाच्या गाण्याच्या पुढच्या भागाची रचना मी त्या रात्री त्या प्रवासात पूर्ण केली. मी ते गीत पुन्हा पुन्हा बोलत राहिलो. मीटरमध्ये बसवत असतांना काही दुरुस्त्या केल्या. लगेच आमचे मित्र संगीतकार सुनील जाधव यांना ते पाठवले. मी ज्या चालीत ते बांधले होते याचे ते रेकॉर्डिंगही करून पाठवले. सुनील बुवांचा ' अप्रतिम ' हा शेरा मी ऐकला आणि एका संकटातून मोकळा झाल्याचा आनंद मला झाला. मग मात्र मी मांडवकर सर, हटकर सर, साळवी सर यांचे अभिप्राय घेतले आणि मग गाण्याच्या पुढच्या वाटचालीचा प्रवास सुरू झाला.
गाण्यासाठीचे व्हिडिओ चित्रीकरण करताना डोलारखिंडी जवळच्या धनगर वाड्यावरची मला आठवण झाली. तिथल्या कोकरे यांच्या घरात आपण काही वर्षांपूर्वी चवईच्या पानांवरती डांगर भाकरी आणि घरच्या घट्ट दह्याचा आस्वाद घेतल्याच्या आठवले. बालपणातला मी अनुभवलेला पिरशाचा धग मला तिथे पुन्हा अनुभव आला होता.त्यामुळे तिथले चित्रीकरण करण्याचा मी निर्णय घेतला. आम्ही मनसोक्त पुकारे मारत त्या घराजवळ पोहोचलो. त्या कोकरे काकी बाहेर आल्या.त्यांनी मला ओळखले आणि आणि सर्वांसाठी ओटीवर बसण्यासाठी घोंगडी पसरली. त्यांनी जेवणाचा आग्रह केला पण आमचा एक दुसरीकडे बेत ठरला असल्यामुळे आम्ही केवळ चहा घेऊनच त्यांचा आग्रह पुरा केला. गाण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी वठवल्या. दळण कांडण अजूनही त्यांच्या जगण्याच्या व्यवहारात आहे त्यामुळे ते चित्रण जिवंत वाटते आहे. कार्यक्रमाच्या गडबडीत मला त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही मात्र लवकरच सवड काढून त्यांचे कौतुक करणार आहे.
प्रभानवल्लीतील सुनील जाधव हे एक नामांकित भजनी बुवा असले तरी माझी अनेक गाणी त्यांनी दिलेल्या सुमधुर चालींमुळे लोकप्रिय झाली आहेत. माझी अनेक गाणी वेगवेगळ्या गायकांनी गायली असली तरी मी पहिली संधी कुमारी भैरवी जाधवला देत असतो. ती माझ्या मातीतील आहे याचे मला कौतुक आहेच परंतु तिचा आवाज आणि तिला असलेली गाण्याची जाण यामुळे तिने गायलेली गाणी ऐकतच राहावी असे वाटते. 'माझं हर्दखळे गाव ' या गाण्याचे रेकॉर्डिंग लोअर परेल येथील विधी व्हॉइस या स्टुडिओत होत असताना हे गाणे सर्वांना आवडेल याची खात्री वाटली होती. विधी व्हॉइस चे श्रीकृष्ण सावंत हे प्रत्येक गाणं हे दर्जेदार व्हावं यासाठी ते कितीही वेळ द्यायला तयार असतात, काही खुब्या तेही सांगतात हा आपलेपणा मी कधीही विसरू शकणार नाही.अरेंजर अशोक उर्फ दादा वायंगणकर हे संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव असूनही ते जमिनीवर राहून आमच्यासारख्या लोकांची गाणी इतक्या तन्मयतेणे आणि आवश्यक तो साज देऊन सजवतात यातच त्यांचे मोठेपण आहे. सुप्रसिद्ध तबलावादक आणि सर्वच वाद्यांवरती हुकूमत गाजवणारे सदा मुळीक हे मला लहान भावासारखे वाटतात. या सर्व मंडळी बद्दल कधीतरी कृतज्ञता व्यक्त करायला हवीय. आज थोडी संधी आहे म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.
माझ्या प्रत्येक गाण्याच्या वाटचालीत कुमार सोहम जाधव हा नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करीत आलेला आहे. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. भविष्यातील तो नामांकित ढोलकी वादक असणार आहे. या गाण्याच्या वेळेला मात्र त्याच्या परीक्षेच्यामुळे तो वेळ देऊ शकला नाही हे मला ठळकपणे जाणवत राहील.
हर्दखळे गावाचं गीत हे त्यांच्या गावातील जि.प.प्राथमिक शाळा क्रमांक एक या इमारतीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तच्या कार्यक्रमात वाजवायचं हे ठरलेलं असल्याने मुळात गीत तयार व्हायलाच फार वेळ लागल्याने पुढची प्रक्रिया मात्र घाई गडबडीत करावी लागली. आयत्या वेळेला वाटूळचे सुबोध वळंजू मदतीला आले. गाण्याचं संकलन वेळेत झाल्याने ते कार्यक्रमात दाखवू शकलो. यानिमित्ताने सुबोध वळंजू यांना मी मनापासून धन्यवाद देतो.
या गावात प्राथमिक शिक्षणाला १९३९ साली सुरुवात झाली असली तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतरच शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात सरकार यशस्वी ठरलं आणि गावागावातल्या शाळा मुलानी बहरू लागल्या तसेच चित्र हर्दखळे गावात दिसू लागले. गावातले बाळकृष्ण लिंगायत यांनी २५ गुंठे जागा शाळेला मोफत देऊन गावात येणाऱ्या शिक्षणाच्या गंगेला मार्ग मोकळा करून दिला. गावातल्या धुरीणांनी शाळा इमारतीसाठी प्रयत्न केले. १९४९ साली ही दगडी इमारत उभी राहिली.त्या शाळेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम नेत्र दीपक झाला. सारा गाव एकवटून कामास लागला म्हणूनच ते शक्य झाले.
शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाकरिता या शाळेत ज्यांनी ज्यांनी अध्यापनाचे काम केले त्या सर्व माजी शिक्षकांना आवर्जून बोलावण्यात आले होते. त्यामध्ये दूर दूर होऊन आलेले सेवानिवृत्त व वयोवृद्ध शिक्षकही होते. या शाळेतील त्यांचे विद्यार्थी आज मोठ मोठ्या पदावरती आहे त्या अनेक शिक्षकांनी आपल्या शिक्षकाचे चरणी नतमस्तक होऊन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचे ते दृश्य पाहून माझे डोळे भरून आले. या सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
त्यातील कवयित्री प्रिया मांडवकर यांनी या शाळाइमारतीचे मनोगत आपल्या काव्यपंक्तीतून मांडण्याचा सुंदर प्रयत्न केला. त्या कवितेला निमंत्रण पत्रिकेत विराजमान केल्याने ते सर्वश्रुत झाले आहे.इथून शिकून रोजगाराच्या शोधार्थ मुंबई -पुण्यात गेलेले अनेक माजी विद्यार्थी या कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाले होते. या शाळेत शिकलेले आणि गुजरात मध्ये एक उद्योजक म्हणून नावारूपास आलेले, या परिसरात एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक श्री रमेश गुरव हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनेकांचे सन्मान करण्यात आले पण ज्यांनी या शाळेसाठी जागा दिली त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला ते लक्षवेधक ठरले.
या शाळेचे मुख्याध्यापक श्री बंडबे सर व इतर सर्व शिक्षकांचे कौतुक करायला हवे कारण या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन रेखीव पद्धतीने करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. इथले विद्यार्थी गायन वादन करून सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा आपल्याकडे खिळवून ठेवत होते. व्यासपीठावर या गावचे सरपंच श्री गणेश इंदुलकर यांच्याबरोबर गावातील प्रमुख व्यक्तीही विराजमान होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी मेहेत्रे उपस्थित होते. त्यांच्या जोडीला माझेही नाव असल्याने मला दीप प्रज्वलन करण्याची संधी देण्यात आली. माझ्या विद्यार्थीदशेत दिशा शोधत असताना ज्या गावच्या वाटेवरून चालत होतो त्याच गावात मला आज बहुमान मिळाला होता, त्याच गावचे गाणे लिहिण्याचा मला मान मिळाला होता, त्या गाण्याचा आज लोकार्पण सोहळा होता हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असे मी समजतो.
या सर्व कार्यक्रमात गावातील अनेकांनी हिरीरीने काम केले त्यात श्री जयराज मांडवकर यांचाही मुलाचा वाटा असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्याने केलेल्या प्रास्ताविकात गावाचे आणि शाळेचे केलेले वर्णन सर्वजण शांतपणे ऐकत होते इतके ते सुरत होते. कार्यक्रम पुढे नेण्याचं, काम त्यात रंग भरण्याचं काम श्री. शेलार यांनी सुरेख पद्धतीने केले.
आज खेड्यापाड्यातील घरे बंद आहेत, शाळा बंद पडत चालल्या आहेत. मग कोकणचं हे वैभव, हे सृष्टी सौंदर्य याचा लाभ कोणी घ्यायचा आहे. हर्दखळे गाव एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येणे आहेत की इथे निसर्ग संपदा आहे. इथे बारमाही धबधबा आहे विशेष म्हणजे तो सात टप्प्यात आहे म्हणून त्याला सात रांजण धबधबा असे म्हणतात. येथे पाझर तलाव आहे. वरी, नाचणी अशा वरकस पिकांसाठी इथली जमीन सुपिक आहे. इथे गाई गुरे ,बकऱ्या पाळण्याइतकी गायरान जमीन मुबलक आह म्हणून यानिमित्ताने येथील गावकऱ्यांना मी एवढीच विनंती करतो. सरकारी रेशन वरती अवलंबून राहू नका. आपल्या आरोग्यासाठी सकस अन्न हवंय त्यासाठी शेती करा, गाईगुरे पाळा. हे नाहीच जमलं तर नोकरी कुठेही करा पण गावातलं घर उघडे कसे राहील याची काळजी घ्या.
ज्या हर्दखळे गावाने माझ्या कॉलेजच्या प्रवासात इथली पायवाट माझ्यासाठी सुरक्षितपणे पार करायला मदत केली आणि आज एवढ्या वर्षानंतर त्या गावाचे गीत करण्याची संधी देऊन प्रसिद्धीही मिळवून दिली. त्या हर्दखळे गावाचा सदैव ऋणी राहीन.तसेच याच गावचे सुपुत्र आदर्श शिक्षक श्री जयराज मांडवकर व त्यांच्या सुविद्य पत्नी कवयित्री सौ.प्रिया मांडवकर यांचा मी अत्यंत आभारी आहे.
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
*******************************
' माझे गाव हर्दखळे 'या गाण्याची लिंक
https://youtu.be/FfS1hMEhgdc?si=HJ3OJcAs520ZKkvk
********************************
************************
अभिप्राय -
अत्यंत हृदस्पर्शी, मन भरून यावा असा कृतज्ञतेने भरलेला खास लेख.
उत्कृष्ट शब्दांकन.
लेख वाचताना कुणाही वाचकाच्या मनात हर्दखळ्याला जाऊन भेट द्यावीच असा विचार आपोआपच यावा.
डोलारखिंड मनात रुतून बसते.
मस्त, सुंदर , पंचतारांकित लेख 👌👌👌👌👌
विजयालक्ष्मी देवगौजी
२)
सुंदर मिहीतीपूर्ण लेख.
गीतही वाचायला, ऐकायला आवडेल.
लिंक पाठवावी.
जय श्रीराम 🙏🙏
मेधानुज
******************************
३)
सर,आपणास माता सरस्वतीचा वरदहस्त असल्यामुळे आपले लिखाण मनाचा ठाव घेते.थोडक्यात पण समोरच्याला समजेल असे व हृदयाला भिडणारे आपले लेखन वाचताच राहावे असे वाटते. आपण ज्या डोलार खिंडि चा उल्लेख केलात त्या खिंडीतून मी ही बऱ्याच वेळा कोंडगे, झर्ये, कुरंग गेलो आहे. ती वाट तुम्ही खऱ्या अर्थानं जिवंत केलीत.आमचे प्रमोद पवार यांचे आजोळ तिकडे आहे हे आज समजले.तुमच्या सिद्ध हस्त लेखणीस मानाचा मुजरा.🙏🙏🙏
विनोद साळुंके, कोर्ले
***************************
४)
हर्दखळे गावाची कथा आवडली. आपल्या लेखणीला, गीताला व ध्वनिचित्रपट्टिकेला प्रयत्नांना आदरपूर्वक वंदन सुभाष लाडसरजी!
गीत व ध्वनिचित्रपट्टिका खूपच छान समर्पक, आकर्षक, औत्सुक्य वाढवणारी!
हर्दखळे गावाला भेट द्यावी असं वाटलं...नक्कीच एक पर्यटनस्थळ बनेल.. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छाही!
--पुष्पा कोल्हे
No comments:
Post a Comment