राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई पंच्याहत्तरीच्या च्या उंबरठ्यावर असलेली आणि लोकोपयोगी उपक्रम राबवून कोकणात नावलौकिक मिळवलेली संस्था असून याच संस्थेच्या माध्यमातून २०१४ पासून लांजा- राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातून वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम करणाऱ्या कर्तुत्वान माणसांचं पुरस्कार देऊन कौतुक करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
२०१४ साली संघाचा पहिला विविध पुरस्कार वितरण समारंभ ओणीच्या नूतन विद्यालयात संपन्न झाला. त्यावेळेला केवळ ६ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले त्यांनी संघाच्या प्रती काढलेले कृतज्ञचे शब्द आजही आठवतात. संघाचे तत्कालीन अध्यक्ष मा. श्री धोंडू पांडुरंग खांडेकर यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात असे पुरस्कार देऊन आपण कर्तुत्वान व्यक्तींच्या कार्याप्रती आदर व्यक्त करणे आवश्यक आहे असे सुचवून त्यांनी स्वतःच एक रक्कम संघाकडे ठेव म्हणून ठेवत असल्याचे जाहीर केले. त्यानी केलेल्या चांगल्या सुरुवातीला प्रतिसाद म्हणून अनेकांनी या पुरस्कारांच्यासाठी संघाकडे ठेवी ठेवलेल्या आहेत. ते सर्व पोस्ट करते संघासाठी आदरणीय आहेत. त्यातून एक चांगली रक्कम संघाला मिळाली. पहिल्या वर्षाचे सहा पुरस्कार पुढे पुढे वाढत गेले. आज संघाच्या माध्यमातून १४ क्षेत्रातून निवडलेल्या कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, महिला सामाजिक कार्यकर्ता, सरकारी निम सरकारी कर्मचारी, गृहिणी,शेती, कला, साहित्य, उद्योग आणि वारकरी संप्रदाय या ११क्षेत्रातून प्रत्येकी दोन पुरस्कार असून, संघाच्या क्रियाशील सभासदांमधून एक पुरस्कार दिला जातो तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांमधून दोन जीवनगौरव दिले जातात. यावर्षी एक नवीन पुरस्कार संघ सुरू करीत आहे.कोकणचं नाव सर्व दूर करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तीला कोकण भूषण पुरस्कार देऊन गौरवित करण्याचे संघाने ठरविले आहे.
संघाचा २०१४ चा पहिला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेले एक पुरस्कर्ते श्री.बाप्पा पाटोळे मु. पो.तळवडे तालुका लांजा
याने पुढील वर्षीचा कार्यक्रम आपल्या तळवडे गावी करावा अशी संघाकडे मागणी केली. त्यांच्या मागणीचा संघाने विचार करून पुढील वर्षीचा कार्यक्रम तळवडे गावी करण्याचा निश्चय केला मात्र. पहिल्या वर्षीचा कार्यक्रम हा केवळ तीन तासाचा असल्याने आपल्याला पुरस्कार प्राप्त व्यक्तींशी फार काही बोलता येत नाही. येणाऱ्या लोकांच्यासाठी मनोरंजन करता येत नाही अर्थात या कार्यक्रमाला अधिक वेळ असावा अशी अनेकांची मागणी झाली. त्यातूनच मग ग्रामीण साहित्य संमेलनाची कल्पना पुढे आली. सलग दोन दिवसाचा कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. माननीय बाप्पा पाटोळे यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी संमती दर्शवून संघाचे पहिले ग्रामीण साहित्य संमेलन लांजा तालुक्यातील तळवडे गावी संपन्न झाले. या साहित्य संमेलनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले पाचलगावचे सुपुत्र माननीय श्री सिद्धार्थ जाधव याने पुढील वर्षी पाचल या गावी साहित्य संमेलन घ्यावे अशी जाहीर मागणी केली आणि त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावातून साहित्य संमेलने आपल्या गावात करण्याची मागणी येऊ लागली त्यामुळे एक वर्ष राजा पूर लांजा अशी साहित्य संमेलने संपन्न होत गेली. तिसरे साहित्य संमेलन लांजा येथे झाले,चौथे ताम्हाणे, पाचवे कोट, सहावे नाटे , सातवे प्रभानवल्ली- खोरनिनको, आठवे तळवडे राजापूर, नववे शिपोशी अशी वेगवेगळ्या गावात साहित्य संमेलने यशस्वी होत गेली. त्या प्रत्येक साहित्य संमेलनातील शेवटचा दिवस हा पुरस्कार वितरणासाठीचा विशेष समारंभ असतो.यावर्षीचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील वाटूळ या गावी दिनांक ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. अर्थात संघाचा अकरावा पुरस्कार वितरण समारंभ हा २ फेब्रुवारीला असणार आहे.
संघाचा पुरस्कार हा विशेष मानाचा पुरस्कार समजले जाते. आज पर्यंत ज्या अनेकांना पुरस्काराने गौरवीत करण्यात आले ते स्वतः आनंदीत होते मात्र त्यांना पुरस्कार मिळाल्याने अनेकाने समाधान व्यक्त केल्याचे आमच्या निदर्शनास येत होते. हे पुरस्कार निवडताना कोणत्याही व्यक्तीला याची कल्पना असत नाही. किंबहुना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती मागवली जात नाही.संघाची एक निवड समिती कार्यरत असून या समितीतील लोक आपल्या आजूबाजूच्या लोकांच्याकडून त्या त्या व्यक्तींच्या बद्दलचे मत जाणून घेतात त्यांचे समाजातील स्थान समजून घेतात आणि त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीची निवड करून ती संघाच्या मुख्य समितीकडे पाठवली जाते.मुख्य समिती त्याला अंतिम स्वरूप देते आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ती पुरस्कार यादी जाहीर केली जाते.त्यामुळे वर्तमानपत्रातून किंवा माध्यमांमधूनच आपली एखाद्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे हे विजेत्यांना प्रथम कळते. त्यानंतरच संघाचा रितसर पत्र व्यवहार त्यांच्याकडे जातो. त्या त्या वर्षीच्या पुरस्कार निवड समितीत कोण कोण आहे याची वाच्यता संघाकडून केली जात नाही.ही संघाची पुरस्कार निवड पद्धत सर्वांनाच आवडली आहे आणि म्हणूनच त्या पुरस्कारांची महती वाढलेली आहे.
यावर्षीच्या पुरस्कार निवड समितीत श्री. महेंद्र साळवी, श्री. गणपत शिर्के, श्री.संदीप हांदे, श्री. किशोर नारकर व श्री. दीपक नागवेकर यांनी काम पाहिले तर मुख्य निवड समितीत श्री. सुभाष लाड, श्री.सुरेश पेडणेकर,श्री प्रमोद पवार,श्री गणेश चव्हाण व श्री प्रमोद मेस्त्री हे होते.
आज राजापूर येथे वाटूळच्या ग्रामस्थांच्या सोबत संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पुरस्कारांची नावे जाहीर करण्यात आली.पुरस्कार विजेत्यांची यादी सोबत दिली आहे. त्या सर्व पुरस्कार विजेत्यांना मनापासून शुभेच्छा !
आपण करीत असलेले पवित्र काम अधिक जोमाने पुढे न्यावे यासाठी आपणास परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे ही प्रार्थना.
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
सर्वांचे अभिनंदन 🌹🌹🌹
ReplyDelete