Saturday, December 6, 2025

📚✒️📚✒️📚श्रमाची आवड असलेले काशिनाथ चव्हाण📚✒️📚✒️📚


       श्रमाची आवड असलेली माणसं सतत कामात असतात.काम करीत राहण्यातच त्यांना आनंद मिळत असतो. त्यामुळे ती माणसं कधी दुःखी असत नाहीत. शेती करणारी माणसं दिवस उगवायच्या आधी घराबाहेर पडतात आणि दिवस मावळेपर्यंत रानातच राबत असतात. कोकणात लावणीच्या वेळेला आणि ऐन सुगीच्या वेळेला इथल्या माणसांची तारांबळ बघण्यासारखी असते. भात लावणीच्या वेळेला पाऊस असेपर्यंत पाण्याची सोय होत असल्याने अधिक वेळ देऊन लावणी करायची असते. आणि सुगीच्या वेळेला पाऊस येण्याच्या आधी भात कापणी करून , त्याचे भारे बांधून ते सुरक्षित ठिकाणी हलवायचे असतात. दोन्ही वेळेला शेतकऱ्याला पळायला लावणारा पाऊसच असतो आणि म्हणून कोकणातील पावसाला ' आला तरी मेला आणि नाही आला तरी मेला ' असे ऐकून घेण्याची सवय झालेली आहे. हे असे वेळेबाहेर काम करणे शेतकऱ्याच्या आवडीचे असले तरी त्याच्याकडे कामास आलेल्या मजुरांना तेवढेसे देणे घेणे असत नाही आणि आठ तास कार्यालयात काम करणाऱ्या माणसाला याचे सोयर सुतकच असत नाही. भारतावर राज्य करून गेलेल्या इंग्रजांनी बऱ्याच काही गोष्टी भारताला दिल्या त्यातील आठ तासाची नोकरी हे इंग्रजांचे देणं आहे. एका दृष्टीने शरीर प्रकृतीसाठी ठीक असलं तरी या नियमाचा लाभ उठवताना कामाचं गांभीर्य आणि माणुसकी विसरणारे ही कर्मचारी आपल्याला दिसून येतात. पण वेळेच्या बाहेर जाऊन काम करणारे ही काही लोक आढळतात. पण त्या व्यक्ती अपवादात्मकच असल्यामुळे अशा लोकांना इतर लोक नावं ठेवत असतात किंवा टोचून बोलत असतात.


         कोंडग्याचे काशीनाथ चव्हाण रिंगणे हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असल्यापासूनचे आमचे मित्र पण त्याही अगोदर त्यांचे आई वडील आणि माझे आई-वडील हे वाट्याने शेती करीत असल्यामुळे कौटुंबिक घरोबा होता हे आजही आम्ही विसरलेलो नाही. त्यांचे वडील लवकर वारले आणि वाट्याने शेती करणे बंद झाले. पुढे आम्ही मुंबईला आलो आणि काशिनाथ चव्हाण हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून त्यांच्याच गावच्या रामेश्वर विद्यालयात विज्ञान परिचर या पदावर नोकरीस लागले. तिथे असलेले मुख्याध्यापक गो.ना चव्हाण सर हे आम्हा दोघांनाही रिंगणे हायस्कूलला शिक्षक असल्याने आणि विशेषता मुलांत मिसळून वागण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते नेहमीच आमचे आवडते राहिले. कोंडगे हायस्कूलला गेल्यानंतर चव्हाण सरांचीही भेट होई आणि काशिनाथ चव्हाण ही भेटत.


         काशिनाथ चव्हाण दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. पण त्या शाळेच्या पदावरून ते निवृत्त झाले असले तरी शाळेबाबत असलेली त्यांची ' माझी शाळा ' ही आपुलकीची भावना त्यांना नेहमीच शाळेकडे ओढत असते. काशिनाथ चव्हाण यांना तशी सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे गावातल्या अनेक संस्थांमध्ये त्यांचा नेहमी वावर असतो. नोकरीमुळे त्यांना त्या काळात वेळ देता येत नव्हते म्हणून त्यांना जबाबदारीची पदेही स्वीकारता येत नव्हती. आता सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पुरेसा वेळ आहे आणि मुळात श्रम करण्याची आवड आहे त्यामुळे आता ते सार्वजनिक संस्थांमध्ये अधिक सक्रिय झालेले असल्याचे दिसते.

         कोंडगे गावात १९९४ च्या दरम्यान ज्ञानगंगा वाचनालयाची निर्मिती झाली.पहिल्या अध्यक्षस्थानी गो.ना.चव्हाण होते. वाचनालयाच्या निर्मितीमुळे गावातील शिकल्या सवरलेल्या लोकांना वाचनाची आवड जोपासण्याची चांगली संधी मिळाली. शाळेत शिकणाऱ्या मुलांना अवांतर वाचनाची भूक भागवता आली आणि शाळेतील शिक्षकांना संदर्भ ग्रंथ किंवा अभ्यासक्रमास पूरक असलेली पुस्तके मिळू लागल्याने शिक्षकांना प्रकल्भतेकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला. संघाचे ११ वे ग्रामीण मराठी  साहित्य संमेलन रिंगणे गावी होत असून त्या संमेलनात कोंडगे, कुरंग , झर्ये या गावातील लोकांनाही जोडून घ्यायचे असल्यामुळे गेल्या महिन्यात कोंडगे गावी महेश विश्वासरावांच्या अंगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेला ज्ञानगंगा वाचनालयाच्या संदर्भात चर्चा झाली. वाचनालयाचे अध्यक्ष श्रीधर विश्वासराव यांनी काही चांगल्या सूचना केल्या. पुढे जाऊन या वाचनालयात दिवाळी अंकांचं प्रदर्शन मांडून ते दिवाळी अंक सुरक्षित जपून ठेवण्याचा उपक्रम सुरू करावा या दृष्टीने वाचनालयाचे अध्यक्ष श्रीधर विश्वासराव यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी होकार दिला. त्या अगोदर मी वाचनालयाचे ग्रंथपाल गौतम जाधव यांच्याशी बोलणे केले होते त्यांना तो उपक्रम चांगला वाटला. त्यांनी मी अध्यक्षांशी बोलावं असं मला सांगितलं आणि म्हणून मी श्रीधर रावांशी बोललो. अध्यक्ष या पदावरून घेतलेला झटपट निर्णय मला कौतुकास्पद वाटला. श्रीधरराव हे सुद्धा रामेश्वर विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले त्यांचा सुद्धा येथील अनेक संस्थांमध्ये उत्स्फूर्त सहभाग मी पाहिलेला आहे. ही गावाकडे राहणारी मंडळी गावच्या संस्था अधिकाधिक पारदर्शी असाव्यात, संस्थांद्वारे जनतेला प्रामाणिक सेवा मिळावी यासाठी झटत असते. या मंडळींना पदाची गरज वाटत नाही मात्र काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा असते कारण यांना श्रम करावेसे वाटतात. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर मराठी माणसाबद्दल ' आम्हाला पगार हवाय आम्हाला काम नकोय ' असे बोलतात त्यावेळेला ते खरेही वाटते मात्र त्यालाही काही अपवाद असतो हे काशिनाथ चव्हाण आणि श्रीधर विश्वासराव यांच्याकडे बघितल्यानंतर हे ठामपणे सांगता येते.


         त्यानंतर काही दिवसांनी मी श्रीधर विश्वासराव यांना फोन लावला पण तो लागला नाही म्हणून त्यांना निरोप द्यावा या हेतूने काशिनाथ चव्हाणांना फोन लावला. श्रीधर विश्वास रावांना काय निरोप द्यावा हे मी जे सगळं सांगितलं ते त्यांनी ऐकून घेतलं. शेवटी मला म्हणाले " मी हे सगळं श्रीधर रावांना सांगतो पण वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून आता माझी निवड झालेली आहे. तेव्हा आपल्या उपक्रमाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी पूर्ण करीन याची खात्री बाळगा. "

        एक सरकार बदलते त्यावेळेला मागच्या सरकारने घेतलेले निर्णय अंमलात आणायचे नाहीत अशा प्रकारचे नवीन पायंडे महाराष्ट्रात दिसून येतात. इथे मात्र मला वेगळेच चित्र दिसले. निर्णय चांगले असतील तर ते कोणीही घेतलेले असोत त्यांचा पाठपुरावा आम्ही करू असं जेव्हा ऐकायला मिळतं त्यावेळेला आजही साधन शुचिता शिल्लक आहे याचा आनंद वाटतो.

         असो. ज्ञानगंगा वाचनालय अधिकाधिक वाचकांकडे कसे जाईल यासाठी आपण प्रयत्न करूच पण सध्या या वाचनालयाच्या बदललेल्या कार्यकारणीचे अभिनंदन करताना वाचनालयाचे अध्यक्ष श्री काशिनाथ विनायक चव्हाण यांचेही मनापासून अभिनंदन करतो.आणि शेवटी एवढंच म्हणतो,

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपु: l

नास्त्युद्यमसमो बन्धु: कृत्वा यं नावसीदती ll


सुभाष लाड

अध्यक्ष

राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई


अभिप्राय*********

नमस्कार,

श्री. काशिनाथ चव्हाण यांच्या कार्याबद्दल आपण लिहिलेले गावात राहणाऱ्या तरुण पिढीसाठी  प्रेरणादाई होईल. आज ते कोंडगे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. फारच आनंद वाटला.

  श्री काशिनाथ चव्हाण हे माझ्या भाचीचे चुलत सासरे. तिच्या लग्नाच्यावेळी कोंडग्याला अचानक भेटले. अचानक एवढ्यासाठी की ते माझे एकेकाळचे मित्र ! आजही भेटी होत नाहीत . लांज्याला केंव्हातरी चुकून भेट होते. माझी मावस बहिण कोंडग्याला चव्हाणांकडे दिलेली , तिची मुलगी जून मध्ये पुनस येथे काजळी नदीत बुडून वारली. तिचे सांत्वन करण्यासाठी कोंडग्याला गेलो होतो; पण ही वेळ वेगळी असल्यामुळे काशिनाथ यांना भेटता आले नाही. 

 काशिनाथ हे सहृदयी आणि मितभाषी. त्यांच्या इतर कार्याबद्दल आपण लिहिले आहे . त्याशिवाय त्यांचं हस्ताक्षर फारच सुंदर! ती त्यांची आवड अजूनही जोपासत असावेत. 

धन्यवाद🙏




         

1 comment:

  1. सामाजिक बांधिलकीची सेवाव्रत परंपरा जोपसणारे मा. श्री. काशिनाथ चव्हाण सर यांचं व्यक्तिमत्व प्रबोधनात्मक आहे. त्यांच सामाजिक यश ही त्यांच्या रचनात्मक कार्याची पोहोच आहे. माणसांच्या अंतरंगात डोकावण्याचं कसब लाड सरांकडे ओतप्रत भरलेलं आहे

    ReplyDelete