त्या दिवशी सकाळी अकरा वाजता एक सेवानिवृत्त चाकरमानी माझ्या घरी येऊन बसले. गेल्या काही वर्षातली माझ्या ब्लॉगच्या संदर्भाने झालेली ओळख. तेही कोकणातले असल्यामुळे जवळीक. त्यांनी फोनवरून " मला आपल्याला भेटायचं आहे, मी कधी येऊ शकतो ? " असे विचारल्याने मी त्यांना माझी वेळ दिली. त्याप्रमाणे ते त्या वेळेला आले. चहा पेक्षा सरबत बरा असे त्यांच्याकडूनच आल्याने पत्नीने त्यांना कोकम सरबत देऊन आपणही पक्के कोकणातले आहोत हे दाखवून दिले. त्यांनीही आपण कोकणातल्याच माणसाकडे आल्याचं समाधान व्यक्त केले.
गप्पागोष्टी करतांना आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. मी तडक कोरोना काळात जाऊन पोहोचलो. मुंबईतल्या गुदमरलेल्या वातावरणाला कंटाळून बरेच चाकरमानी मिळेल ते वाहन पकडून शक्य होईल तसा प्रवास करून आपली जन्मभूमी असलेल्या, आपलं बालपण व्यतीत केलेल्या, स्वर्गाहुनी प्रिय असलेल्या, वर्षाकाठी चार-पाच वेळेला सणासुदीच्या निमित्ताने हक्कानं जाणाऱ्या, गावाकडच्या आपल्या माणसांना मनी ऑर्डरने पैसे पाठवून माझा चाकरमानी हे बिरूदावली मिरवण्यात मश्गूल असलेला चाकरमानी जेव्हा आपल्या घराच्या अंगणाच्या बाहेर येताना दिसतो त्या वेळेला आपली जीवाभावाचे माणसे अंगणाजवळ पुढे येऊन " तुम्ही घरात येऊ नका " असं सांगतात त्यावेळेला या भूमीने दुभंगून आपल्या पोटात घ्यावं आणि या जीव घेण्या प्रसंगातून मुक्त करावं असं त्या चाकरमान्यांना वाटलं होतं. भाऊ भावापासून दूर होताना, गावची जाऊ बाई मुंबईच्या जाऊ बाईला गळा भेट न घेताच गुरं बांधण्याच्या वाड्यात थांबा म्हणून सांगतांनाची वृत्तं व्हाट्सअप च्या माध्यमातून फिरत होती.
गावातल्या अठरा विश्व दारिद्र्यात पिचून जाताना घरभरल्या मोठ्या कुटुंबाची दुरावस्था दूर करण्यासाठी गावातलं शिक्षण संपून मुलं मुंबईला आली. येथे फुटपाथवर झोपली. कुण्या नातेवाईकाच्या घरी खानावळी राहून मिळेल ती भाजी भाकरी खाल्ली. गिरणीत, कारखान्यात किंवा कुण्या श्रीमंताच्या बंगल्यात नोकरी करून महिना अखेरी मिळालेल्या पगारातला अर्धा पगार न चुकता गावाकडे पाठवणारा तो चाकरमानी भले तो झकपक कपडे घालून सणासुदीला गावात फिरायचा. परीट घडीच्या कपड्यात लपलेल्या त्याच्या शरीराकडे कोणीही पाहून " अरेरे ,किती वाळला तो "असे म्हणून कुणी आपल्याला सहानुभूती दाखवून त्याच्या हृदयात कालवाकालव करून घेऊ नये या भावनेने तो आपल्या हौशीमौशी बाजूला ठेवून पैसे वाचवताना पोटाकडे केलेले दुर्लक्ष आणि कुटुंबासाठी रात्रंदिवस करीत असलेली मेहनत याची कुणालाही कल्पना न देता " मला तर मुंबईत काही कष्टाचं काम नसतं, मी आरामाची नोकरी करतो, माझं फार चांगलं चाललं आहे " असं सांगून हृदयावर दगड ठेवूनच तो पुन्हा मुंबईचा प्रवास करीत असे. मुंबई सारख्या मायावी दुनियेत माझा चाकरमानी सुद्धा तेवढाच आनंदी, सुखी आणि विविध छंद जोपासण्यासाठी पैसे उडवणारा आहे हे नेहमीच कोकणातल्या माणसाला वाटत आले आहे. पन्नास वर्षांपूर्वी इथला कोकणी चाकरमानी हा खानावळीच असे. त्यानंतरच्या काही दिवसात कोकणी माणूस खोल्या घेऊ लागला त्या सुद्धा दहा बाय दहाच्या म्हणजे कोकणातल्या परसवातल्या लाकडं भरण्याच्या खोपी एवढ्या सुद्धा त्या खोल्या नसत. त्याही परिस्थितीत आपल्या गावाकडचं कोणी माणूस आलं तर त्याला त्या खोलीत राजासारखं राहता यावं या भावनेने तो त्याला वागणूक देत असे. मच्छी, मटण किंवा गोड गोड पदार्थांची रेलचेल करण्यासाठी, त्याला चांगले कपडे घेण्यासाठी, त्याला सिनेमा घरात येऊन सिनेमा दाखवण्यासाठी, राणीबाग किंवा गेटवे ऑफ इंडिया तिथे फिरवून आणण्यासाठी उधार उसनवारी सुद्धा तो करी. खरं पाहिलं तर आज सुद्धा अनेक चाकरमान्यांनी एक पर्यटन स्थळ म्हणून मुंबई पाहिलेली नाही. कामाच्या निमित्ताने एखाद्या भागात जाताना किंवा आपल्या नातेवाईकांना फिरून दाखवताना जे पाहता आलं तेवढीच मुंबई त्याने पाहिलेली आहे. खऱ्या चाकरमान्याला जीवाची मुंबई कधीच करता आली नाही किंबहुना त्याच्या साठी आपण आलो नसून माझ्या गावच्या कुटुंबाला कसे चांगले दिवस आणता येतील या स्वप्नाच्या मागे तो धावत राहिला. मिळेल ते काम करत राहिला. पैशास पैसा जोडत राहिला. महिना अखेरीस न चुकता गावच्या कुटुंबाकडे मनीऑर्डर पाठवत राहिला.
कोण होतं गावच्या कुटुंबात ? आई, वडील, भाऊ, बहीण, कुणाकडे आजी-आजोबा तर कुणाच्या एकत्रित कुटुंबात चुलत्या पुतण्यांनाही सखे म्हणून कुटुंबात प्रेम असे. शेती भाती केली जायची, गाई गुरांची संख्या बऱ्यापैकी होती. गाव भरलेले असल्याने मित्रमंडळी होती. कर्ती धर्ती आणि वयोवृद्ध माणसं सुद्धा मोठ्या संख्येने होती. गावातला रस्ता अजून पर्यंत झालेला नसल्याने वाहतुकीची व्यवस्था नव्हती. मुंबईला जाण्या येण्यासाठी वीस पंचवीस किलोमीटर वरती असलेल्या मुंबई-गोवा हम रस्त्यावरती जावे लागे. बोट वाहतूक बंद झाल्यानंतर एसटीची सुविधा झाली होती. संध्याकाळच्या वेळेला मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आणि सकाळच्या वेळेला मुंबईकडून गावाकडे येणाऱ्या गाड्या असत. चाकरमान्याचे गावाकडे येण्याचे निश्चित झाल्यानंतर तो गावाकडे पत्र पाठवीत असे. त्या पत्रात आपण कोणत्या गाडीने किती वाजता गोवा हम रस्त्यावरती कोणत्या एसटी थांब्यावर येणार आहोत हे कळवायचा त्याप्रमाणे त्याला आणण्यासाठी कुटुंबातल्या तरुणांपासून गावातली ही काही माणसं त्याला आणण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करीत असंत किंवा बैलगाडीची व्यवस्था होत असे. चाकरमानी घरी आला की त्या घराला उत्सवाचे स्वरूप येत असे. त्याला भेटायला गावातले, वाडीतले अनेक लोक येत. त्याच्याकडे कोणाची भेट वस्तू असेल किंवा पत्र असेल तर ते मिळवणे किंवा आपल्या चाकरमान्याची खुशाली समजून घेणे यासाठी पहिले एक-दोन दिवस चाकरमानी म्हणजे उत्सव मूर्ती असे. त्याला भेटायला आलेल्या माणसांसाठी चहापाणी आणि पानसुपारी होत असे. चाकरमानी आपल्या घरातल्या मुलांबरोबर इतरांच्या मुलांच्या हातावर खाऊ ठेवत असे. मुंबईला जाताना त्याच मुलांच्या हातावर आणे दोन आणे किंवा पाच पैसे दहा पैसे खाऊ साठी टेकवत असे. त्यामुळे चाकरमानी मुंबईला जात असताना आपलं माणूस आपल्यापासून दूर जात आहे याची वेदना घेऊन अनेक लोक आणि मुलं त्याला निरोप देताना बरेच अंतर चालत जायचे आणि रडवेल्या चेहऱ्याने हात दाखवत निरोप घ्यायचे.
या वातावरणात वाढलेले चाकरमानी गृहस्थ आज माझ्यासमोर बोलता बोलता एकाएकी भावूक झाले. मी त्यांना ती वेळ देऊन त्यांना मन मोकळं करण्याचा आग्रह केला.
" सगळं चांगलं चाललं असताना दोन वर्षापूर्वी माझी पत्नी माझी साथ सोडून निघून गेली. माझा मुलगा सून आणि मुलगी जावई यांनी मला माझ्या पत्नीची उणीव भासू दिली नाही. पण मी गावी गेलो असताना मला मात्र माझ्या घरात परकेपण जाणवू लागलं. याचं मला दुःख अधिक झालं." हे सांगताना त्यांनी आकाशाकडे पाहून डोळ्यात आलेली आसवं आपल्या आत जिरवून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने पुढे सांगायला सुरुवात केली.
मी घरातला मोठा मुलगा. माझा दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावातल्याच एका भल्या चाकरमान्या बरोबर मी मी मुंबईत आलो. शिवडीतल्या झोपडपट्टीतल्या त्या खोलीच्याबाहेर मी झोपायचो. ते गाववाले आणि त्यांचे कुटुंब फार चांगलं होतं. त्याने घरच्यासारखं मला वागवलं. दोन महिने मला नोकरी नव्हती. त्यानेच त्यांच्या अनेक मित्रांना सांगून एका चांगल्या कंपनीत कामाला लावले. गावाकडे आई-वडील शेती करत होते. पाठीचा एक भाऊ आणि बहीण शाळेत जात असत. आजोबांनी बांधलेले घर. दगड मातीच्या भिंतीचं आणि वरती गावठी नळे असलेले ते घर दुरुस्त करणे गरजेचं होतं. घरात दुसऱ्या खोलीत चुलतेही राहत. आजही त्याच घरात राहतात .चूल वेगळी असली तरी मनाने ते एकत्रच असतात. त्यांची मुलं लहान असल्यामुळे त्यांची तर अधिक गरिबी होती. पहिला दोन वर्षात मला गावी जाता आलं नाही कारण नोकरी ही नवीन होती. नोकरीला लागल्यापासून महिन्याला एक पत्र आणि एक मनीऑर्डर मी सुरू केली ती माझे आई वडील जिवंत असेपर्यंत सुरूच होती. मी दोन वर्षांनी जेव्हा गावी गेलो तेव्हा मला घ्यायला तालुक्याला वडील आणि काका दोघेही आले होते. मी सर्वांसाठी कपडे बटाटे, सुकेबोंबील बिस्किटांचे पुढे आणि बरच काही घेऊन गेलो होतो. त्यामुळे आम्हाला बैलगाडी करावी लागली होती. माझं त्यावेळी झालेलं स्वागत मी कधीही विसरू शकत नाही कारण त्या वेळेला मला भेटायला शेजाऱ्यांनीही गर्दी केली होती.
आजोबांनी बांधलेले घर आता फारच जिर्ण झालेले होते. आपण पुढच्या वर्षी घराची दुरुस्ती करूया असं मी घरी बोलल्यानंतर वडिलांनी आणि चुलत्यांनी फक्त सुतार कामाची मजुरी पाठवण्यासाठी सांगितले बाकीचे मेहनत आणि लाकूड साहित्य आम्ही उभे करू असे त्यांनी सांगितले. मी वर्षभर काही पैसे जमवले आणि गावाला पाठवले. मी दिलेल्या पैशातून मजुरी आणि नवीन कौलासाठी खर्च केला गेला. ते घर पुढे तीस वर्षांनी चांगलं चिरेबंदी केलं त्यावेळेला चुलते चुलते हयात नव्हते. त्यांच्या एकुलत्या एका मुलाला नोकरीही चांगली नसल्याने त्याला जमेल तेवढे त्याने पैसे दिले. माझ्या भावाकडून मी फार अपेक्षा केली नाही मात्र त्याने त्याच्या देखरेखीखाली ते काम करून घेतले.ते आजही तसंच आहे.
मी चांगले कमवत होतो त्याच वेळेला माझं लग्नाचं वय पाहून वडिलांनी गावाकडे मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. परंतु माझी मुंबईत खोलीची सोय झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असे सांगितले. मी दहा वर्षांनी मुंबईतल्या उपनगरात एक पत्र्याच्या भिंती असलेली खोली विकत घेतली. कागदपत्रं तयार करताना मात्र वडिलांना बोलावून घेतलं आणि आपले एकत्रित कुटुंब असल्याचं समाधान कायमचं राहावं यासाठी खोली वडिलांच्या नावाने केली. वडिलांनाही फार आनंद झाला. एवढं होईपर्यंत गावाकडची बहीण लग्नाच्या वयाची झाल्याने मुलाचं लग्न मागवून केलं तरी चालेल पण मुलगी योग्य वेळी सासरी गेली पाहिजे असं वडिलांनी म्हणताच मी बहिणीच्या लग्नासाठी पैशांची जमवाजव केली. घराचं कर्ज डोक्यावर असतानाही कंपनीने मला बहिणीच्या लग्नासाठी काही रक्कम दिली. दागिने आणि जत्ता हाच खर्च मोठा होता बाकी घरात धनधान्य पुरेसे असल्याने आणि लग्नही घरच्याच मांडवात होत असल्याने खर्चात मर्यादा पडली. पुढच्या वर्षी भाऊ दहावी उत्तीर्ण झाला. वडिलांनी त्याला मुंबईत नेऊन नोकरीस लावण्याचे सांगितले. भावाला मुंबईत आणले.काही महिने गेल्यानंतर त्याला मुंबईत करमेनासे झाले आणि त्यांने गावचा रस्ता धरला. त्याला शेतीत आवड असल्याने तो गावात वडिलांना शेतीत मदत करायला लागला. परंतु मी तेवढ्यावरती समाधानी नव्हतो. शेतीबरोबर पैसाही कमवता आला पाहिजे यासाठी आपल्या गावात दुकान नसल्याने भावाला दुकान थाटून दिले. तेवढ्यासाठी मी पंधरा दिवसाची रजा घेऊन दुकानघर बांधून घेतले. काही मांडण्या तयार केल्या आणि तालुक्याला घाऊक दुकानदाराला भेटून त्याच्या मार्गदर्शनाने किराणामाल आणून दुकानास सुरुवात केली. दुकानाचा परवाना काढताना वडिलांचे नाव पुढे केले. एव्हाना एक कर्तबगार चाकरमानी म्हणून गावभर माझी प्रसिद्धी झाली होती. एक दिवस गावातील एक वयोवृद्ध गृहस्थ घरात येऊन बसले. त्यांचं मोठं कुटुंब होतं. निव्वळ शेती वरती कुटुंब पोसनं कठीण वाटत होतं. मोठ्या नातवाचं लग्नही झालं होतं त्यालाच मुंबईला नेलं चार पैसे मुंबईला मिळू शकतात. असं त्यांचं म्हणणं होतं. मीही फार विचार केला नाही.मोठ्या नातवाला त्याच्या बायको सहित मुंबईला नेण्याचे ठरवले. मी त्यांना मुंबईत आणून माझ्या घरीच त्यांना ठेवून घेतले. लवकरच त्याला नोकरी मिळवून दिली. त्याच्या बायकोमुळे माझ्या जेवणाचा प्रश्न सुटला आणि माझं लग्न होईपर्यंत त्यांच्या राहण्याचा प्रश्न सुटला.
पुढे चार वर्षांनी मी माझं लग्न केलं अर्थात माझं वय जरी झालं असलं तरी मला येणाऱ्या स्वर्गती कमी नव्हत्या. मुलगी मुंबईतील असल्याने लग्न मुंबईलाच केले. त्या काळात आजच्या एवढा डामडौल नव्हता. आज हळदीचा जो कार्यक्रम होतो तेवढ्या खर्चात लग्नाचा कार्यक्रम होत असे. त्याकाळी जेवणाच्या पंगती बसत असत. दागिन्यांचा एवढा सोस नव्हता. मी मात्र घरच्या आणि पाहुण्यांच्या कपड्यालत्यासाठी चांगला खर्च केला.
पुढे चार वर्षांनी गावच्या भावाचं लग्न वडिलांच्या इच्छेप्रमाणे डामडौलात केले. त्याची बायको ही चांगल्या स्वभावाची मिळाली. माझ्या आई-वडिलांची उतार वयात त्यांनी सेवा केली यामुळे मी त्यांचा कायमचा ऋणी आहे. पुढे भावाला एक मुलगा व एक मुलगी झाली. मी माझ्या मुलांच्या प्रमाणेच मी त्यांना प्रेम दिले. गावाला गेल्यानंतर ती मुले एकत्र वागताना फार भरून येत असे. प्रत्येक पावसाळ्यात मी आठ ते दहा दिवसांची रजा काढून शेतीसाठी जातो पण हळूहळू शेतीही कमी झाली आणि आमचे पावसाळी जाणे थांबले. आई-वडिलांच्याच काय पण भावाच्या व त्याच्या मुलांच्या आजारपणात अनेक वेळा त्यांना मुंबईत आणून औषधोपचार केले.
पंधरा वर्षांपूर्वी प्रथम आई आणि त्यानंतर दीड वर्षाने वडील आम्हाला सोडून गेले. वडिलांनी जाण्याअगोदर 'जसं आजपर्यंत कुटुंब सांभाळत आलास तसंच यापुढेही सांभाळ' असं मला सांगून गेले. मी त्यांना तसे वचनही दिले. त्यामुळे भावाच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणात, त्यांच्या आजारपणात आणि लग्नात काही कमी पडणार नाही याची मी काळजी घेतली. भावाच्या मुलाचे दुकान चांगले चालत असल्याने त्याच्या लग्नात मला जास्त भार सोसावा लागला नाही. तसा मीही सेवानिवृत्त झाल्याने जास्त काही करू शकत नव्हतो. एकंदरीत सगळं काही आनंदात असताना दोन वर्षापूर्वी माझी पत्नी मलाऔ सोडून गेली. मला सर्व संसारात तिने चांगल्या तऱ्हेने साथ दिली. माझा एक पाय मुंबईला आणि दुसरा पाय गावाला, असे असतानाही तिने कोणतीही तक्रार केली नाही किंवा एकत्र कुटुंबात वागताना , गावाकडे पैसे देताना ती कधी नाराज दिसली नाही. तिच्या जाण्याने मी एकाकी पडलो असे वाटू लागले आहे. गावी गेल्यानंतर मला अधिक बरे वाटते म्हणून कोणताही सण कधी चुकवला नाही.
गेल्या वर्षी शिमगा साधून गावाकडे आलो. नेहमीप्रमाणे मी आल्याचा आनंद घरात दिसेना. कोणी माझी किंवा माझ्या कुटुंबाची चौकशी केली नाही. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी भावाशी त्याबाबत बोललो. त्याने तसं काही नाही असं म्हटलं. पण हळूच " आपली खोली सरकारी योजनेतून बांधून मिळणार असल्याचं कळलं ते खरं काय ?." असा त्याने प्रश्न केला. मी त्याला सविस्तर सांगितल्यानंतर "एकाच्या दोन खोल्या दाखवल्या तर दोन खोल्या मिळतात असं म्हणतात. मग आपल्या खोल्यांच्या दोन खोल्या कर आणि माझ्या मुलाला एक खोली दे." या प्रश्नानं मी अवाक झालो. खोली दाखवण्यासाठी त्याला काहीतरी जुनी कागदपत्रे दाखवावी लागतात. दोन दरवाजे दाखवावे लागतात. हे सगळं आपण करू शकत नाही असं मी म्हटलं. " मग माझ्या मुलानं काय करायचं ?". या त्याच्या प्रश्नावर मी निरुत्तर झालो.मात्र त्याच वेळेला स्वयंपाक खोलीत भांड्यांचा जोरजोरात आवाज येऊ लागला. आमचं बोलणं चोरून ऐकणाऱ्या सुनेने आपली निराशा भांड्यांवर काढली. मी रात्रभर झोपू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी वातावरणात अधिक गंभीरता दिसत होती. " चला काका जेवायला." ऐवजी " ताट वाढलंय म्हणून सांगा त्यांना." असे शब्द कानी पडले. कानात गरम तेल ओतल्याचा भास झाला. तात्काळ उठावं आणि मुंबई गाठावी असं एक वेळ वाटलं. पण माझं अचानक जाणं हा चर्चेचा विषय होऊ शकला असता. घरची इज्जत बाहेर गेली असती. मग कसाबसा आणखी एक दिवस काढून पालखीचे दर्शन घेऊन मी मुंबई गाठली. आजमितीस गावाकडून मला माझ्या चौकशीचा एकदाही फोन आलेला नाही मी मात्र पुतण्याला फोन करून चौकशी करत असतो. त्याचंही प्रश्नास उत्तर एवढंच संभाषण असतं.
नोकरीनिमित्त जबरदस्तीने मुंबईला यावं लागलं. सेवानिवृत्तीनंतर गावाकडे राहण्याचा आनंद लुटता येईल त्यावेळेला घरात सर्व सुख सोयी असाव्यात यासाठी गावाकडचे घर सुसज्ज केले. पण आपल्याच माणसांनी घराचं बेडंच माझ्यासाठी बंद केल्याचे दिसते आहे."
ते शांत बसले.मी त्यांची हतबलता पाहात होतो.एवढ्यात पत्नीने " वेळ फार झालाय,आधी जेवून घ्या, मग काय ते बोला" असं म्हटल्याने आमची तंद्री तुटली.ते गृहस्थ जेवायला तयार नव्हते.पण एवढा वेळ उपाशी राहणे त्यांच्या तब्येतीसाठी योग्य नव्हते.त्यामुळे त्यांना जेवणं भाग पडले.पण त्यांनी सुनेला अगोदर फोन करून " मला यायला उशीर होईल तुम्ही जेवून घ्या." सांगितले.
ते घराकडे जायला निघाले. मन मोकळे करायला आले खरे, पण गावाकडच्या आठवणींच्या त्या लाटा अधिकच उफाळून आल्या होत्या. त्या
लाटांवर त्यांचे नियंत्रण नव्हते त्यामुळे या वयात हिंदकाळतांना किती कुठे आपटावे लागेल हे माहित नाही पण त्यांना लवकरच किनारा मिळावा आणि सुखी शांती जीवन जगण्याचे दिवस यावेत अशी मनोमन प्रार्थना करून मी त्यांचा निरोप घेतला..
सुभाष लाड
९८६९१०५७३४
लाड सर निःशब्द करून टाकलंत. चाकरमान्याचं दुःख खोलवर सलत गेलं. कादंबरीचा आवाका तुम्ही छोट्या लेखात सामावलात. ही बाजू येत नाही हो कथानकात. खरं आहे. कामं खुपच आहेत तुमच्या कडे ती कधीच संपणार नाही पण असं काम फक्त तुम्हीच करू शकता याचं भान ठेवा. नाही तर ते कालौघात जाणार. मनावर घ्या. मनापासून शुभेच्छा!
श्रीराम हांदे, खोरनिनको
आमच्या पिढीतल्या चाकरमान्यांच्या [ म्हाताऱ्यांच्या ] व्यथा लाड सरांनी प्रभावी लयीत समर्थपणे मांडल्या आहेत .
आयुष्याच्या संधीकालातही सुखाच्या समेवर येताना दुःखाची दीर्घकालीन उदास विराणी मिळावी ❓
यापरते दुर्दैव ते काय ❗🌹👏
दिगंबर शिंदे, रत्नागिरी
खरं तर जून्या काळात कोकणातून मुंबईला गेलेल्या हरेक चाकरमान्याची ही कथा आहे. स्वतःच्या ईच्छा-आकांक्षा आणि गरजांवर अंकुश ठेऊन 'माझ्या गावातल्या कुटुंबासाठी' मला हे करायचंय, अमुक करायचंय.. तमुक करायचंय म्हणत अख्खी कारकीर्द ओढाताणीत घालवणाऱ्या मुंबईतल्या कर्त्या चाकरमान्याची ही व्यथा अत्यंत पोट तिकडीनं आणि वास्तवाचे यथार्थ दर्शन घडवणारी आहे. मी स्वतः चाकरमानी नसलो तरी अशा अनेक चाकरमान्यांचे अनुभव आणि उदाहरणे मी डोळ्यादेखत पाहिलेली असल्याने लाड सरांनी त्यांच्यातला 'चाकरमानी' आणि 'साहित्यिक' याची उत्तम सांगड या कथेत शब्दबद्ध केली आहे.
गंगाधर आयरे, रिंगणे विरार
मा. सुभाष लाड यांनी १०० टक्के वास्तव मांडलेले आहे. हे त्यांनी व आम्हीही अनुभवलेले आहे. .. त्या गृहस्थांची व्यथा वाचून प्रत्येकाने बोध घ्यावा असे मला मनापासून वाटते. सुभाष लाड यांचे वास्तवाचे अनूभव सर्वांनी वाचावे. खूप खूप धन्यवाद मा. सुभाष लाड. आमच्याकडून शुभेच्छा.
अस्मिता मांडवकर, माचाळ
श्री सुभाषजी लाड सर आपणं खुप छान व्यथा मांडल्या आहात लेख वाचून झाल्यावर एक गोष्ट सांगावीशी वाटते आहे समजावून सांगण्याणयासाठी अनुभवाचा कस लागतो आणि समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो तो प्रत्येक व्यक्ती मध्ये असतोच असे नाही अशा चाकरमान्यांच्या व्यथा लयाला जावोत हीच सदिच्छा धन्यवाद सर 🙏🙏💐💐
रजनी पवार, कळवा, ठाणे
खूप छान लिहिले आहेस सुभाष पुस्तक रूपाने प्रसिध्द झाले तर खूपच छान होईल 👍👍🙏
महेंद्र खंडागळे, मुंबई
छान लिहिलय … छोटे छोटे वाक्य….👌
डॉ. मंगेश हांदे, रिंगणे, कांदिवली
ब्लॉग वाचताना स्वतःच्याही आयुष्यात कधी डोकावलो हे कळलेच नाही... खूपच सुंदर लिखाण... ग्रेट सुभाष!🙏
पुष्पा कोल्हे ,जळगाव
खूपच हृदयस्पर्शी लेख ...!आपलेच गावचे घर आपल्याला परके करते तेव्हा होणाऱ्या वेदना पचवणं कठीण असतं...!
शिवाजी स.पेडणेकर चिपळूण
अप्रतिम लेखनशैली🙏
कोकणतील प्रत्येक घरात कमी जास्त प्रमाणातिल हे खरं वास्तव आहे.
🙏🙏
कमलाकर क्षीरसागर, मुंबई
आशयघन लेखन.
विठ्ठल कुसाळे, कोल्हापूर
अशाच परिस्थितीच्या कोंडमा-यात मी गेली ३-४ वर्षे अडकून पडलो आहे याची आपणांसही काहीसी कल्पना आहेच. त्यामुळे वाचन-लेखनात म्हणावं तसं मन रमत नाही. 🙏🙏कोंडमा-यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच मुक्तता होईल अशी आशा आहे. प्रसंगी दोन पाऊल मागे घेऊन सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
सुनील काजरोळकर, मुंबई
Aplya kutumbachya ujjval bhavishya sati gavatun mumbait alelya lokanni adi adchninvar mat karun kasht karun sangharsh karun kutumbache changle divas anle matra kal vel badalla manse badalli aani aplyach gharat apanch parke jholo.he vastav apan mandalet...🙏
Lad sir apla lekh vachat astana aaei vadilanchi aani gavchi athvan aali satat ti yetach ast.majha janma gavich jhala apla lekh vachun balpan athavle aani dolyatun pani ale.
मनावर आघात करुणारे वास्तव मांडले. आम्ही त्यापासून बोध घेऊन बदल घडवून आणावा लागेल. उत्कृष्ट समाज प्रबोधन .
ReplyDeleteखरं तर जून्या काळात कोकणातून मुंबईला गेलेल्या हरेक चाकरमान्याची ही कथा आहे. स्वतःच्या ईच्छा-आकांक्षा आणि गरजांवर अंकुश ठेऊन 'माझ्या गावातल्या कुटुंबासाठी' मला हे करायचंय, अमुक करायचंय.. तमुक करायचंय म्हणत अख्खी कारकीर्द ओढाताणीत घालवणाऱ्या मुंबईतल्या कर्त्या चाकरमान्याची ही व्यथा अत्यंत पोट तिकडीनं आणि वास्तवाचे यथार्थ दर्शन घडवणारी आहे. मी स्वतः चाकरमानी नसलो तरी अशा अनेक चाकरमान्यांचे अनुभव आणि उदाहरणे मी डोळ्यादेखत पाहिलेली असल्याने लाड सरांनी त्यांच्यातला 'चाकरमानी' आणि 'साहित्यिक' याची उत्तम सांगड या कथेत शब्दबद्ध केली आहे.
ReplyDelete